स्टुपिड... इतका वेळ का घेतलास
स्टुपिड... इतका वेळ का घेतलास
सकाळी सकाळी आदीच्या फोनची रिंग वाजते. चार ते पाच वेळा फोन वाजून झाल्यावर आदी कॉल घेतो अन् झोपेतच आळस देत, हॅलो गुड मॉर्निंग, बोलतो. तितक्यात समोरून पाच-सहा शिव्या त्याच्या कानी पडतात. गधड्या मी इथं केव्हाची तुझी वाट बघतेय, अन् तू मस्त झोपलाय. तितक्यात आदी खाडकन उभा राहतो. आपण कोणालातरी टाईम दिलाय हे त्याच्या लक्षात येत. तो कॉल त्याच्या बालपाणीची मैत्रीण जियाचा असतो. ती पुण्याला शिकायला असते. अन् ते दोघे लाहानपणापासूनचे बेस्ट फ्रेंड असतात. आदी तिला सांगू लागतो फक्त अजून थोडा वेळ थांब बस 15 मिनिटे अजून... आलोच. अन् आदी जिया वाट पाहत असलेल्या कॅफेत पोहचतो. पोहचताच आदी तिची माफी मागू लागतो. जिया अजूनपण चिडलेलीच असते... गप आता. बस झालं तुझं माफीपुराण. मी मागच्या वेळेस तुला न भेटताच पुण्याला निघुन गेले म्हणून किती ओरडत होतास. किती टोमणे ऐकावे लागले होते मला अन् आता मला बोलावून स्वतः मस्त.. झोपाळू झोपा काढत होता. आदी तिला शांत करत, ओह्ह सॉरी ना चिल्ल मार... वेटरला दोन चॉकलेट शॉट आणायला सांगतो. थोडा वेळ दोघे गप्पा मारत बसतात. जियापण शांत होते. वेटरपण त्यांची ऑर्डर घेऊन येतो. तितक्यात जिया आदीला विचारू लागते, तू मला भेटल्यावर काहीतरी सांगणार होतास असं तूच प्रॉमिस केलं होतंस. मी खास करून ते ऐकण्यासाठीच तुला भेटायला आलीय. मी फार उत्सुक आहे. आदी इकडेतिकडे बघत मुद्दाम तिला अजून चिडवण्यासाठी... मला नाही आठवत, असं म्हणून टाळण्याचा प्रयत्न करतो. जिया हळूच त्याच्या पाठीवर दणका देत म्हणते, आता नाटक नको करू... आधीच माझा संताप आता कुठं शांत झालाय. बररर... बाई सांगतो, असं म्हणून आदी त्याच्या कहाणीला सुरुवात करतो...
जयपूर म्हणजे गुलाबी थंडीचे म्हणून ओळखले जाणारे शहर. अशा या पिंक सिटीमध्ये आम्ही ट्रीपसाठी गेलो होतो. हिवाळ्यात तर अजून गुलाबी थंडीची मजाच वेगळी होती. कॉलेजच्या दिवसांमधील ट्रीप म्हणजे सगळ्यांसाठी एक अविस्मरणीय क्षण असतो. तसाच आमच्यासाठी पण तो अविस्मरणीय क्षण ठरला. विशेषत: माझ्यासाठी.
कॉलेजचे दुसरे वर्ष होते म्हणून आमचा चांगलाच ग्रुप जमला होता. आम्ही 3 मुलं आणि 3 मुली असा सहा जणांचा आमचा ग्रुप होता. मी, कपिल आणि प्रणव आम्ही लहानपणापासूनचे मित्र होतो. अपूर्वा आणि प्रतीक्षा यांच्याशी फर्स्ट इयरच्या पहिल्याच दिवशी ओळख झाली होती. निकी डायरेक्ट सेकंड इयरला कॉलेजला आली होती. तरी तिचा आमच्या ग्रुपमध्ये चांगला जम बसला होता. आमच्यात ती पण चांगलीच रमली होती.
6 डिसेंबरच्या रात्री आम्ही मुंबईहुन दुरांतो एक्सप्रेसने जयपूरला जाण्यासाठी निघालो. जाताना खूप मज्जा केली. रात्रभर म्युझिक मस्ती गप्पा गाणी फुल्ल एन्जॉय. सकाळी रतलाम स्टेशनवर ट्रेन थांबली. मी चहा घेण्यासाठी ट्रेनच्या खाली उतरलो. तेवढ्यात मला कोणीतरी आवाज दिला, आदी…. आवाज ओळखीचा वाटला. मागे वाळून बघतो तर निकी झोपेतून उठत आळस देत होती. प्लीझ माझ्यासाठी एक कप कॉफी आणतोस का..? या व्हाय नॉट.. असं म्हणून मी कॉफी आणायला खाली उतरलो. स्वतः चहा पिऊन निकीची कॉफी घेऊन काही मिनिटांतच परत आमच्या बोगीमध्ये शिरलो. निकीच्या हातात तिचा कॉफीचा कप दिला.. थँक्यू सो मच आदी.. असं क्युट स्माईल देत ती म्हणाली. मला जरा रोमँटिक फील झाल्यासारखं वाटू लागलं.. कारण मी निकीच्या एवढा जवळचा नव्हतो. आम्ही एकाच ग्रुपमध्ये असूनपण आमच्यात फक्त कामापुरतंच संभाषण व्हायचं. त्याला कारणपण तसं स्पेशल होतं. तुम्हाला एखादी मुलगी कॉलेजमध्ये आवडत असेल तर तुम्ही जोपर्यंत तिला प्रपोज नाही करत तोपर्यंत तिच्याशी बोलायला घाबरता. तिला सोडून बाकी कोणत्यापण मुलीशी बिनधास्त बोलता. पण ती समोर आल्यावर काय बोलावं तेच सुचत नाही. माझ्या बाबतीत पण तसेच होते. निकी कॉलेजला आल्याच्या पहिल्या दिवसापासून मला आवडायची पण कधी हिम्मतच नाही व्हायची तिला विचारायची. नंतर ती आमच्या ग्रुपमध्ये मिसळल्यावर फक्त कामापुरतंच आमचं बोलणं व्हायचं. पण त्या दिवशी सकाळीच पहिल्यांदाच खूप प्रेमाने आवाज देऊन स्माईल देत निकी माझ्याशी बोलली होती म्हणून मी आतून खूपच खुश होतो.
त्याच दिवशी दुपारी आम्ही 2:30 वाजता जयपूरला पोहोचलो. जयपूर स्टेशनपासून 15 ते 20 किमीवर आम्ही बुक केलेले रिसॉर्ट होते. टॅक्सीने आम्ही रिसॉर्ट गाठले. सगळेजण प्रवासात खूप दमले होते म्हणून दुपारच्या जेवणानंतर आम्ही रेस्ट केला. रिसॉर्टच्या कर्मचाऱ्याने आम्हाला बॉईज आणि गर्ल्ससाठी वेगवेगळ्या अशा दोन रूम्स दिल्या.
संध्याकाळी आम्ही फिरण्यासाठी सिटीमध्ये गेलो. मस्त गुलाबी थंडीची मजा घेत जयपूर सिटीतील नाईट व्ह्यूच्या लाइटिंग्सच्या रोषणाईच्या नजाऱ्याचा आनंद घेत, ऊंट सवारीची मजा घेत फिरलो. रात्री रिसॉर्टला परतलो. जेवणाची ऑर्डर देऊन फ्रेश होण्यासाठी रूममध्ये शिरलो, तितक्यात माझ्या रूमची बेल वाजली. बाहेर बघितले तर अपूर्वा उभी होती. अरे आदी निकीने तुला बोलावलं आहे तिचं तुझ्याकडे काहीतरी महत्वाचं काम आहे. ती तुझी वाट पाहतेय खाली. मी खाली गेलो तर तिथं कोणीच नव्हतं. मला वाटलं ती माझी वाट बघून परत तिच्या खोलीत गेली असेल. म्हणून थोडा वेळ तिथंच थांबलो. काही क्षणातच तिथं निकी आली. हाय तू बोलवलं होतस ना..? मी निकीला विचारलं. निकीने लगेच रिप्लाय दिला, अरे नाही मी नाही बोलवलं. मी गोंधळून गेलो. मला अपूर्वाचा थोडा राग आला. बहुतेक तिने माझी विकेट घेतली असेल, असं मनातल्या मनात गृहीत धरून परत रूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेलो. सगळे जण जेवायला रिसॉर्टच्या डायनिंग हॉलमध्ये माझी वाट बघत होते. मी परत आलो तर अपूर्वा आणि प्रतीक्षा माझ्याकडे बघून हसत होत्या. तेव्हाच मला समजलं होतं की मला वेड्यात काढण्याचा त्या दोघींचा प्लॅन होता. कारण मला निकी आवडते हे त्या दोघींना माहित होतं. समोर निकीपण बसली होती म्हणून मी काहीच न बोलता जेवायला बसलो. जेवण झाल्यावर आंधळी कोशिंबीर खेळायचा आमचा प्लॅन झाला. निकीचं थोडं डोकं दुखत होतं म्हणून ती तिच्या रूममध्ये आराम करायला गेली. मग आम्ही सगळे रिसॉर्टच्या आवारात आंधळी कोशिंबीर खेळण्यात मग्न झालो. खेळताखेळता माझं लक्ष अचानक दुसऱ्या मजल्यावर असलेल्या निकीच्या रूमच्या खिडकीकडे गेलं, ती खिडकीतून आमची गंमत बघत होती. मी तिला इशारा करून खेळण्यासाठी बोलवलं. तिने बस नको असा इशारा करून स्माईल केली. तितक्यात मला कपिलने आऊट केलं. आता मात्र मी मुद्दामून थकलो आहे, माझं लक्ष नव्हतं असं म्हणून पळ काढू लागलो. आणि रिसॉर्टमधल्या बाकावर बसून राहिलो. सगळे मला चिडवत होते, यू आर चीटर, अपूर्वा आणि प्रतीक्षा मुद्दामून मोठ्यामोठ्या ने चिडवत होत्या. निकीकडे बघून मला या चिडवताहेत हे मला समजत होतं पण माझं लक्ष पूर्ण निकिकडेच होत. थोड्या वेळात मी एकटा रूममध्ये माझा मोबाइल फोन चार्जिंगला लावण्यासाठी गेलो तर माझ्या लक्षात आलं की मी माझ्या आयफोनचा चार्जर घरीच विसरलो. म्हणून मी परत अँफी थिएटरच्या परिसरात प्रतीक्षाकडे चार्जर घेण्यासाठी गेलो. तिने निकीला कॉल करून मला चार्जर द्यायला सांगितलं. मी अजून खूपच खुश होऊन निकीच्या रूमकडे धावतपळत गेलो. बेल वाजवली व निकी लगेच चार्जर घेऊन दरवाज्याजवळ आली. माझ्या हातात चार्जर दिला तेव्हा तिच्या हातांचा स्पर्श माझ्या हाताला पहिल्यांदाच झाला तेव्हा असं वाटलं की जणू परीसाचाच स्पर्श आपल्या हाताला होतोय. मी थॅंक यू म्हणून तिच्याकडे बघतच राहिलो, ती पण मस्त गोड स्माईल देत बोलू लागली. आणखी काही हवंय का. थकला असशील ना आदी. आराम कर आता. मला काय बोलावं तेच सुचेनासे झाले. म्हणून मी फक्त तू पण आराम कर आणि काही मदत लागल्यास सांग, असं म्हणून तिला गुडनाईट सांगून माझ्या रूममध्ये निघून गेलो अन् रात्रभर तिच्या आठवणीने थंडीमध्ये कुडकडत राहिलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पिकनिकसाठी निघालो. दिवसभर एन्जॉय करत हवामहल, शिषमहल, गलताजी टेम्पलसारख्या ऐतिहासिक पिकनिक स्पॉटवर गेलो. अपूर्वाच्या डी एस एल आर कॅमेऱ्यामध्ये फोटो क्लिक केले. माझ्या फोटोग्राफीच्या टॅलेंटचा फायदा घेत सगळ्यांनी माझ्याकडून वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो क्लिक करून घेतले. निकीचे पण खूप सोलो फोटो मी क्लिक केले. म्हणून त्या निमित्ताने आम्ही एकमेकांशी बोलू लागलो. गप्पा मारू लागलो. मी पण माझ्या फोटोग्राफीचं कौतुक तिच्या तोंडाने ऐकू लागलो. अन् दिवस कसा मावळला कळलंच नाही.
खरंतर दिवसभर फिरून एवढा थकलो होतो की बेडवर पाठ टेकवताच झोप येईल. रात्री रिसॉर्टला परतल्यावर जेवल्यावर झोपणारच तितक्यात माझ्या मोबाइल फोनवर मेसेज आला.. हाय झोपलास का..? मी लगेच रिप्लाय केला हु आर यु..? तिकडून काहीच रिप्लाय मिळाला नाही म्हणून मी truecaller ला नंबर शोधला पण तिथं काही भलतंच नाव आलं म्हणून मी नंबर माझ्या मोबाइलमध्ये सेव्ह केला अन् माझ्या व्हाट्सअँपच्या लिस्टमध्ये शोधू लागलो. पण तिथं मला त्या व्यक्तीचा डीपीच दिसत नव्हता. बहुतेक त्या व्यक्तीने तिच्या प्रायव्हसीमध्ये ओन्ली माय कॉन्टॅक्ट केलं असावं. म्हणून मी कॉल केला पण कॉल पण रिसिव्ह करत नव्हतं. थोड्या वेळात परत मेसेज आला व्हाट्सअँपला मेसेज कर अन् व्हाट्सअँप् ओपन करुन बघतो तर चक्क निकीने तो मेसेज केलेला होता. मला माझ्या स्वतःवर विश्वास बसत नव्हता. माझ्याकडे याच्या आधी निकीचा नंबरच नव्हता. कारण माझी हिम्मतपण नव्हती झाली कधी तिचा नंबर घेऊन तिला मेसेज करायची आणि आमचा व्हाट्सअँपला ग्रुपपण नव्हता. मी तिचा प्रोफाइल पिक्चर ओपन करून बघू लागलो. पिंक टॉप, ब्लू जीन्सवर खूप छान दिसत होती निकी त्या फोटोमध्ये. पण वेळ वाया न घालवता मी लगेच तिला रिप्लाय दिला. नाईस डी पी. तिकडून रिप्लाय आला थॅंक यू आदी. असं बोलताबोलता दोन ते अडीच तास आमची चॅटिंग चालली अन् झोप केव्हा लागली कळलंसुद्धा नाही.
सकाळी उठून बघतो तर रूममध्ये मी एकटाच. कपिल आणि प्रणवपण मला सोडून बाहेर कुठंतरी फिरायला गेले होते. मला वाटलं असतील जवळ इथंच कुठं म्हणून मी लक्ष नाही दिलं अन् निकीला गुड मॉर्निंगचा मेसेज केला. तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजली. दार उघडलं तर समोर निकी चिडक्या मूडमध्ये होती. अरे बघ ना हे सगळे आपल्याला न सांगताच फिरायला निघून गेले आणि आता ते म्हणताहेत आम्ही रिसॉर्टच्या 50 किमी दूर एका किल्ल्यावर आलोय. असं कोणी करत का एवढीच का आपली मैत्री. हीच का आपली फ्रेंडशिपची बॉण्डिंग... मी निकीला शांत केलं अन् कपिलला कॉल केला. आधी 2 शिव्या घातल्या मग त्याने सरळ प्रतीक्षाकडे फोन दिला. प्रतीक्षा - बेस्ट ऑफ लक आदी... एन्जॉय युअर डे... असं काहीतरी बडबड करत होती. मला काही कळत नव्हतं. म्हणून मी थोडा जास्तच संतापात तिला बोलू लागलो. काय बोलतेय तू मला काहीच समजत नाहीये. तिकडून प्रतीक्षा, चिल्ल मार आदी आणि ऐक आम्ही मुद्दामून तुम्हा दोघांना एकटं सोडून आलोय. कारण निकीला पण तू खूप आवडतो, हे तिने आम्हाला काल सांगितले आणि मीच तिला तुझा मोबाइल नंबर दिला. तिचं हे बोलणं ऐकताच माझा राग क्षणभरातच शांत झाला अन् आता संधीचं सोनं करू या असा विचार मनात आला. मग मी पण निकीला समजावून सांगू लागलो. आग जाऊ दे. ते नाहीतर काय झालं आपण दोघे जाऊ या ना फिरायला. तुला आवडेल ना माझ्यासोबत फिरायला..? निकीनेपण होकारार्थी मान हलवली.
आम्ही दोघे पण फ्रेश होऊन रिसॉर्टच्या टुरिस्ट गाईडच्या सल्ल्याने एका तलावाजवळ फिरायला गेलो. तिथलं निसर्गरम्य वातावरण असं होतं की कुणीही त्याच्या प्रेमात पडेल. तलावाजवळ फिरताफिरता आम्ही एका ठिकाणी येऊन बसलो. मी निकीला बोटिंगसाठी जायचं का म्हणून विचारलं.. नको मला भीती वाटते पाण्याची. असं म्हणून तिने माझा हात तिच्या हातात घेतला अन् माझ्याकडे एका नजरेने बघू लागली. थोड्या वेळाने मला विचारू लागली की, आदी एक गोष्ट विचारू का तुला..? हो विचार ना असं म्हणत मी होकारार्थी मान हलवली. तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीये ना..? निकी माझ्या डोळ्यात बघत गालातल्या गालातच हसत विचारू लागली. मी गोंधळून.. छे छे, नाही मी तुझ्यापासून काही का लपवू. ती जोरात हसू लागली. अरे एवढं दचकायला काय झालं किती रिऍक्ट करतोस. मी पण शांत बसलो थोडा वेळ... मनातल्या मनात विचार करत आणि हीच योग्य वेळ आहे आता नाही तर कधीच आपण विचारू शकणार नाही. असे माझे मन मला सांगू लागले. अरे डेरिंग कर थोडी... पण मनात भीती अशी पण होती की तिने जर नकार दिला तर काय. आमची मैत्रीपण कमी होईल. शेवटी हिम्मत करून मी तिला विचारलंच.. "ऐक ना, निकी मी खरंच तुझ्यापासून लपवलं आहे काहीतरी ते आज मला तुला सांगायचं आहे.. आय लाइक यू निकी.. अँड आय रिअली लव्ह यू.." निकी तिथून उठून थोडी चालत गेली अन् आपल्या पर्समध्ये हात घालून काहीतरी शोधू लागली. मी घाबरलो.. काही क्षणातच तिने पर्समधून गुलाबाचे फुल काढले न् माझ्याजवळ येऊन त्याच्या पाकळ्या वर फेकू लागली. मला जोरात मिठी मारत हळूच माझ्या खांद्यावर डोकं टेकून मला दोन-तीन बुक्के मारत स्टुपिड खडूस इतका वेळ का घेतलास सांगायला. आय लव्ह यू सो मच... असं म्हणाली.
ओह्ह... वाव... खरंच फार छान आणि रोमँटीक आहे तुझी लव्ह स्टोरी. जिया आदी भुवया उडवत आदीला सांगते. आदीपण त्याचा चॉकलेट शॉट संपवून नॅपकीनला हात पुसत तिला सांगू लागतो अन् तेव्हापासून आतापर्यंत आम्ही सोबत 4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत. नेक्स्ट टाईम येशील तेव्हा मी तुझी निकीशी ओळख करून देईल, असं म्हणत दोघे कॅफेतून बाहेर पडून एकमेकांना बाय करत आपापल्या मार्गाने जातात.