स्ट्रेचर
स्ट्रेचर


सकाळपासून चाललेल्या धावपळीनंतर नुकतच जेवण संपवून आईला व्हिडीओ कॉल करायला घेतला तेवढ्यात बाहेरून आवाज आला. कोणीतरी माझ्या नावाने ओरडत येत होतं, मिता म्याडम.. मिता म्याडम, अहो तिकडे १८ नंबरच्या पेशंटची तब्येत बिघडली चला लवकर. हातातला फोन बाजूला ठेवत मी पळतच वार्डमध्ये गेले. पेशंट खूप अस्वस्थतेने तळमळताना दिसला मी चेक करेपर्यंत त्यांनी जीव सोडला होता. गेल्या दोन महिन्यापासून अश्या बऱ्याच केसेस होऊन गेल्या पण सुरेखा ताईंच्या जाण्याने जरा त्रास झाला. मला थोडा वेळ काही सुचेना, सुन्न झाले. बाहेरून स्ट्रेचर आला मृतदेह लगबगीने प्लास्टिकमध्ये ठेवला गेला. स्ट्रेचर खाली घेऊन जाऊ लागले आणि मी माझ्या कॅबीनमध्ये. जाता जाता माझे डोळे पाणावले. डोकं शांत ठेवावं म्हणून खिडकीत जाऊन उभी राहिले तर मला त्यांच्यासोबतचे प्रसंग आणि त्यांनी सांगितलेले किस्से डोळ्यासमोरून जाऊ लागले जणू काही ते मी समोर पाहते.
मी सुरेखा इकडे मुंबईत PSI आहे. तुम्ही म्हणताय प्रोग्रेस आहे पण मला वाटतय की फार वेळ नाही माझ्याकडे. मला थोडं बोलायच आहे मन मोकळं करायचय थोडा वेळ आहे तुमच्याकडे? असं त्यांनी विचारताच मी होकार दिला आणि सुरेखा ताई बोलू लागल्या मी पुण्यातल्या एका गावातली मुलगी. माझ्या ७ लहान बहिणी आणि आई वडिलांसोबत एका कुडाच्या घरात रहायचे. माझ्या घरी खायची मौत होती. लहानपणापासून बघत आले रोज काय खायचं असा प्रश्न असायचा आईपुढे पण तरीही माझ्या बापाला आठ मुलींमागे वंशाला दिवा पाहिजे म्हणून कारखाना चालूच होता. शेवटी मुलगीच झाली. त्यामुळे रोज रोज तो दारू पिऊन घरात चिडचिड, हाणामारी करायचा. त्याच्या याच वागण्याने त्याने बाहेर काहीतरी राडा करायचा म्हणून खूपवेळा घरी पोलीस यायचे असच एकदा काहीतरी मोठं केलं म्हणून पोलीस त्याला घेऊन जायला आले होते. आई-बापाने खूप गयावया केली पण ते ऐकायला तयार नव्हते. घरात खायला पैसे नाही पण तरी बापाने आईचं मंगळसूत्र मोडून पोलिसाला पैसे दिले. मी मोठी असल्यामुळे कळती होते हे सगळं पाहत होते. त्या किस्स्यानंतर पोलीस परत कधीच आले नाहीत. तेव्हाच मी ठरवलं पोलीसच व्हायचं. एवढा फाटका माणूसपण त्याला पैसे देतो म्हणजे पोलिसांकडे खूप पैसा असेल असं वाटायला लागलं. पोलिस होणं म्हणजे माझं काही Passion वगैरे नव्हतं. तर ती या किस्स्यापासून सुरु झालेली लालसा होती पैश्याची लालसा... मला लोकांची सेवा वगैरे नव्हती करायची फक्त पैसे कमवायचे होते. मी पोलीस होईन, माझ्या बारक्या बहिणींना शिकवेन. मला जे नाही मिळालं त्यांना ते सगळं देईन. हेच डोक्यात ठेऊन मी रडत रडत दहावी पास केली. स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे कॉन्स्टेबल व्हायला मदत झाली, म्हटलं आता चांगले पैसे येतील पण नाही.. तसं काहीच झालं नाही. माझ्या थोड्या पगारात परिस्थिती पाहिलेपेक्षा सुधारली पण बहिणींना हवं तसं वाढवू शकत नव्हते. इकडे घरात पैसे येतायेत हे पाहून बापाचा माज वाढला. आईला आणि बहिणींना रोज त्रास देऊन पैसे घेऊन जाऊ लागला. हे कसं सुधारावं मला कळेना मग मी आजूबाजूला पाहिलं तर वाटलं PSI ला खूप पैसे मिळतात म्हणून वेळ काढून कशीबशी PSI ची परीक्षा देऊन पास झाले आणि माझी बदली इकडे मुंबईत झाली. घरात सगळे आनंदी होते पण बापाचा त्रास आई आणि बहिणींना आता सहन होईना. शेवटी मी बापाला तिकडेच ठेऊन आई आणि बहिणींना मुंबईत घेऊन आले. सगळ्या बहीणींचं शिक्षण करायचं म्हणून इकडून तिकडून फाळका मारत खूप पैसे कमावले. सुरेखा म्याडमकडची केस पैश्याशिवाय पुढे जात नाही असं नाव झालेलं माझं पण मला त्याचं काहीच वाटत नव्हतं. मला बहिणींना शिकवायचं होतं त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं. आता माझं सगळं चांगलं झालंय. सगळ्या बहिणींचं लग्न लाऊन दिलं त्या मार्गी लागल्यात. सगळं छान आहे. माझ्याकडे 2 bhk घर, गाडी, पैसा सगळं मला हवं होतं तसच आहे पण त्या घरात मी एकटीच राहते. आई गेली, बहिणींची लग्न झाली. बहिणींचं शिक्षण, लग्न या सगळ्यात मी ना लग्न केलं ना माझी ड्युटी कधी इमाने इतबारे केली. फक्त पैसा पैसा करत बसले.
या कोरोनाच्या काळात रेड झोन एरियामध्ये ड्युटी लागलेली. कळत-नकळत जबरदस्तीने का होईना पहिल्यांदा प्रामाणिकपणे ड्युटी केली. यावेळी अनेक लोकांशी संबंध आला त्यातच एक वयस्कर एकटेच राहणारे दुधवाले काका भेटले. हो दुधवालेच.. त्यांचं आडनाव अजूनही माहित नाही मला पण दर दोन दिवसाआड दुध आणायचं म्हणून खाली यायचे. रोज त्यांना दटावलं तरीही पुन्हा यायचे आणि एका कोपऱ्यातल्या खुर्चीवर बसून राहायचे. दुध आणून देईपर्यंत बसतो असं म्हणत तास दोन तास हलायचे नाहीत. त्यांच्या घरात कोणी नसल्यामुळे माझ्याशी गप्पा मारत बसायचे. पहिल्यांदा असं काहीतरी अनुभवत होते मी. बहिणींची लग्न झाल्यापासून त्यांनी कधी स्वतःहून फोन केला नाही की भेटायला आल्या नाहीत. पण मी मात्र मायेने नेहमी जायचे. आत्ता कोरोनाच्या काळात मी एवढ्या रिस्की एरियात ड्युटी करते हे माहित असूनपण एकाही बहिणीने साधा फोन करून कशी आहे? काळजी घे ही विचारपूस पण केली नाही. पण हे काका नेहमी येऊन मायेने भरभरून बोलून जायचे त्यांच्याकडे पाहून वाटायचं माझा बाप पण असाच मायाळू असता तर.. हे सगळं अनुभवत ड्युटी करत असताना कोरोना पॉझीटीव्ह झाले आणि इकडे बेडवर येऊन पडले. आत्ता जरी या बेडवर झोपून जगणार की मारणार हे माहित नसलं ना तरी या कोरोनाला मात्र मनापासून आभार मानते. एवढ्या वर्ष्यात जे समजलं नाही, कधी प्रेम अनुभवलं नाही ते या कोरोनामुळे झालं. हे सगळं बोलत असताना त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं माझेही डोळे पाणावले होते. सगळे लोक घाबरून बसले आहेत. आजूबाजूला भयंकर परिस्थिती आहे पण तरीही सुरेखा ताईंसाठी हा व्हायरस सकारात्मक होता. हे सगळं डोळ्यासमोरून जात असताना लांबून येणारा रुग्णवाहिकेचा किंचितसा आवाज हळू हळू मोठा झाला.
रुग्णवाहिका गेटमधून हॉस्पिटलच्या आवारात आली. प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या सुरेखा ताईंना स्ट्रेचरसकट रुग्णवाहिकेत ठेवलं आणि पुन्हा आवाज करत रुग्णवाहिका हॉस्पिटलच्या आवाराबाहेर निघून गेली.