स्पर्श
स्पर्श
पावसाळ्याचे दिवस. बाहेर प्रचंड पाऊस, वारा, कडाडणारी वीज आणि दवाखान्यात ऑपरेशन रूममध्ये असलेली "ती".
लग्नाच्या सात वर्षांनंतर रिमाला मातृत्वाची चाहूल लागली होती. देवाने रीमाच्या पदरात जुळ्यामुलाचं दान घातलं होतं. त्यामुळे खूप काळजी घेत होती. आता रिमाला सातवा महिना चालू होता. अचानक एक दिवस रिमाच्या खूप पोटात दुखायला लागले. बाहेर प्रचंड पाऊस, वादळ अश्या सगळया परिस्थितीत रिमाचा नवरा तिला दवाखान्यात घेऊन आला होता. डॉक्टरांनी तपासून सांगितले तिचे लगेच ऑपरेशन करावे लागेल. नाहीतर परिस्थिती फार गंभीर होईल. इतक्या वेळात रिमा बेशुध्द झाली होती. डॉक्टरांनी लगेच तिला ऑपरेशन रुममध्ये घेतले.
काही तासांनंतर रिमाने एक मुलगा व एक मुलगी अशा दोन गोंडस बाळांना जन्म दिला. पण ती दोन्ही मुलं वेळेपूर्वी जन्माला आल्याने त्यांना वेगळं ठेवण्यात आले. इकडे रिमाची तब्येतही खूप खराब झाली होती. डॉक्टरांनी पुढचे बारा तास खूप महत्वाचे आहेत असं सांगितलं होतं. रिमाच्या घरचे आणि तिचा नवरा खूप काळजीत होते. एकीकडे आई आणि एकीकडे दोन छोटी पिल्लं अशी परिस्थिती होती. घरच्यांना दोन्ही सुखरुप हवे होते. बाहेर चालू असलेला पाऊस, वादळ यांचा आवाज असह्य होत होता.
बारा तासानंतरही रिमा शुद्धीवर आली नव्हती. हळू हळू रिमा कोमात गेली. आता मात्र सगळ्यांचा धीर पूर्णपणे खचून गेला. इकडे तिची दोन्ही पिल्लं मात्र सुखरुप होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. म्हणतात ना, 'देव तारी त्याला कोण मारी' तसचं वेळेआधी जन्माला येऊन सुध्दा दोन्ही मुलं सुखरुप होती. रिमाचा फक्त श्र्वास चालू होता बाकी ती असून नसल्यासारखी होती. काही दिवसांनी डॉक्टरांनी दोन्ही मुलांना रिमाच्या घरच्यांच्या स्वाधीन केले. पण त्यांना आता सगळयात जास्त गरज होती ती त्यांच्या आईची. पण आई अजून काही शुद्धीवर आली नव्हती.
डॉक्टरांचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु होते. पण अजून यश मिळत नव्हते. रिमाचा नवरा आपल्या एका मुलाला रिमा जवळ घेऊन गेला आणि रडून सांगत होता,"बघ ग रिमा, आपली मुलं तुझी वाट बघत आहेत. आता तरी उठ. त्यांना आणि मला तुझी खूप गरज आहे." बोलता बोलता त्या मुलाचा हात रिमाच्या हातावर पडला. काही क्षण तो हात तसाच होता आणि काय आश्चर्य? रिमाने आपल्या हाताची हालचाल केली. नवऱ्याने लगेच डॉक्टरांना बोलवलं. रिमा हळूहळू शुद्धीवर येत होती. काही दिवसात ती पूर्ण बरी झाली. ती ज्या परिस्थितीत दवाखान्यात आली होती आणि बेशुद्ध झाली होती त्यामुळे तिला आपल्या मुलांबद्दल काहीही माहिती मिळाली नव्हती त्या धक्क्याने ती कोमात गेली होती. पण जसं आपल्या मुलांचा स्पर्श झाला तशी ती आपल्या मुलांसाठी मृत्युशी झुंज देऊन परत आली होती. ही ताकद फक्त एका आईमध्येच असते.
काही काळाने जसं बाहेरचं वादळ शमलं होतं तसचं रिमाच्या आयुष्यात आलेलं हे वादळही आता पूर्णपणे नाहीसे झाले होते. रिमाचा आता एक छान सुखी परिवार होता.
