STORYMIRROR

Priti Gole

Tragedy

3  

Priti Gole

Tragedy

सोहळा वैधव्याचा

सोहळा वैधव्याचा

3 mins
518

साधारणतः एक वर्षापूर्वी डॉ. अनिल अवचट लिखित 'अमेरिका' हे प्रवासवर्णन आणि 'कार्यरत' हे व्यक्तिचरित्र वाचले. वाचत असतांना डॉ.अभय बंग आणि डॉ.राणी बंग या दांपत्यावर डॉ.अनिल अवचट यांनी लिहिले आहे.त्यांचा आयुष्याचा प्रवास वाचून मी भारावून गेले आणि मग समाज माध्यमावर त्यांच्या मुलाखती त्यांची भाषणे ऐकत गेले.अशातच मला डॉ. राणी बंग यांनी त्यांच्या लग्नामध्ये डॉ. अभय बंग यांना घातलेली अट जी डॉ. राणी बंग यांनी स्वत :सांगितली त्यामध्ये त्यांनी सांगीतले की, ’मी अभयला म्हटले,लग्नामध्ये मी असे काही दागिने घालणार नाही. जे तुझ्या मृत्यूनंतर मला काढून टाकावे लागतील.जर तू असे काही घालत असशील तर मी घालेल. ’डॉ.अभय बंग यांनी असे काही घालणार नसल्याचे सांगीतले. तेव्हा राणी बंग यांनी पण लग्नामध्ये असे अलंकार घातले नाहीत. त्यांनी असे करण्याचे कारण म्हणजे त्यांनी त्यांच्या आत्याच्या पतीच्या मृत्यूनंतर आत्याचे सौभाग्यलंकार समारंभ पूर्वक काढल्याचे बघितले होते. त्याचे त्यांना अतीव दुःख असणे स्वाभाविकच होते. त्यांच्या आत्याच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगाचे मला पण वाईट वाटलेच आणि मी हा प्रसंग माझ्या पतीला पण सांगितला त्यांचा पण याला विरोधच होता. पण…


      पण काही दिवसांनंतर हा प्रसंग आपल्यावर ओढवेल किंवा आपल्या पत्नीवर,याची कल्पना जी निसर्ग नियमाप्रमाणे कुणालाही नसते त्याला आम्ही कसे अपवाद ठरणार? जून २०२१ ला माझ्या पतीचे निधन झाले. कुठल्याही स्त्रीच्या वाटेला असे दुःख येऊ नये ते माझ्या वाटेला आले. मी जगात एकटी नाही याची कल्पना मला आहे. पण मी एकटी नाही यामध्ये काही सुख नाही.उलट दुःख आहे. आजतागायत मी निसर्गाकडे सर्वांना सुखी ठेवण्याचीच प्रार्थना करीत आले. पण, आता आणखी त्यामध्ये भर पडली की, कुठल्याही स्त्रीच्या वाटेला वैधव्य येऊ देऊ नकोस. कारण पती निधनाचेच दुःख काय कमी असते की, वैधव्याचा सोहळा केला जातो. पती निधनानंतर तेराव्या दिवशी जो कार्यक्रम झाला ही प्रथा सगळीकडे असेलच असे नाही पण फार वाईट आहे. हे माझ्याच बाबतीत घडले असे नाही ते पूर्वापार चालतच आले आहे. पण मला अजूनही तो प्रसंग स्वस्थ बसू देत नाही.


पतीने घालून दिलेले अलंकार त्याच्या निधनानंतर असे काढून टाकणे जे की असे केलेले त्यांनाही नको असते. हा अतिशय वाईट अनुभव माझा आहे. तेराव्या दिवशी घरी आलेली मंडळी समोर आपल्याला अंगणात बसवून एखाद्या विधवा स्त्रीनेच जोडवी, मंगळसूत्र, बांगड्या काढून घेणे आणि नकली मंगळसूत्र घालून देणे, बांगड्या काढून काळ्या रंगाच्या दिसणार्‍या बांगड्या घालून देणे आणि एक नवीन साडी आणून तिला ती देणे किंवा घालायला सांगून परत त्या अंगणात येणे. हे पुरेसे नाही तर, घरातील सर्व स्त्रियांना बसवून त्यांना कुंकू लावून हातात कापड देऊन मग कुंकवाची पुरचुंडी विधवा स्त्रीच्या बाजूला टाकून देणे.की. कुंकवाला हात लावायची तिला भीती वाटावी. हे किती क्लेशदायक असते. अशाप्रसंगी ती स्त्री तिला न पटत असूनसुद्धा विरोध करू शकत नाही. पती निधनाचा आघात मोठा असतो. जो व्यक्ती आपल्याला दु:खी बघू शकत नाही, त्याच्या निधनानंतर असा प्रसंग घडावा. लोक म्हणतात, “रडू नका त्यांच्या आत्म्यास दु:ख होईल.’ पण सांगावस वाटतं की, त्या व्यक्तीच्या प्रिय व्यक्तिसोबत असे घडत असताना त्याला याचेही दु:ख होतच असेल. कुटुंबातील लोकांना पटले नाही तरी, त्या प्रसंगी समाजासाठी ते करतात आणि मग चक्र असेच सुरू राहते.


       मी वर पण नमूद केले आहे की, असे माझ्याच सोबत घडले असे नाही. पण मला व्यक्त व्हायला आवडते. माझ्याशी सहमत त्या स्त्रिया आणि त्यांचे आप्त नक्कीच असतील ज्यांनी ह्या वेदना सोसल्या पण माझ्याप्रमाणे ज्या त्या क्षणी मला माझ्यासोबत घडलेल्या प्रसंगावरून सांगावेसे वाटते ज्यांचा कालांतराने विवाह होईल आणि ज्यांचा विवाह झालेला आहे अशा सर्वच पुरूषांना सांगावेसे वाटते की, अशी वेळ तर येऊच नये, परंतु जर दुर्दैवाने असे आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत घडले तर, पटत नसेल तर विरोध करा.                       


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy