STORYMIRROR

Priti Gole

Others

2  

Priti Gole

Others

शहाणे करणारे अनुभव

शहाणे करणारे अनुभव

3 mins
117

 नवदुर्गेचे रूप तू ,

 चंद्राची शीतल छाया तू,

 घराचा कणा तू,

 वात्सल्याचा खळखळणारा झरा तू, 

 तुझे उपकार नाही फेडू शकणार कुणी,  

 तरी,समाजाच्या धारदार नजरेची का शिकार तू?


          वरील ओळीवरुन तुमच्या चाणाक्ष बुद्धीने ओळखले असणार की,ह्या ओळी स्त्री संदर्भात आहेत.जिच्याशिवाय घराला पूर्णत्व नाही.तिला गृहीत का पकडले जाते?हा प्रश्न नेहमीच माझ्या मनात निर्माण होतो.सर्वच स्त्रियांच्या बाबतीत घडत असेल असे नाही.परंतु,घडत नाही ,असेही म्हणता येत नाही.जिथे स्त्रीला गृहीत पकडले जाते तेथील म्हणजेच त्या घरातील लहान मुले ते बघतच मोठी होतात.आणि घरामध्ये जी पुरुषांची मानसिकता बनलेली असते त्याचेच अनुकरण ही मुले करत जातात. आणि ,याच मानसिकतेतून पुरुषी अहंकार वाढत जातो.मग घर म्हणा किंवा कामाचे ठिकाण जिथे पुरुषांची संख्या जास्त आहे तिथे स्त्रीला झुकते माप दिले जाते.पूर्वीपासून स्त्री म्हणजे अबला असेच बिरुद लावले जात असल्यामुळे काळ बदलला असून सुदधा स्त्रीला कमजोर समजणारी पुरुष जात अजूनही समाजात आहे.अर्थात सर्वच पुरुष नाही किंवा सर्वच पुरूषांना हे लागू होत नाही.परंतु पुरुषी अहंकारातून आणि वासनेतून अत्याचार मग ते शारीरिक असो वा मानसिक जन्माला येतात.


            स्त्रीच्या रक्षणार्थ कडक कायदे करून सुद्धा कायद्याची भीती न बाळगणारे पुरुष आहेतच. त्यामुळेच स्त्रियांवरील अत्याचार वाढत जातात.तिच्यासोबत गैरवर्तन केले जातच आहे.एका नाण्याच्या दोन बाजू असतात.त्याचप्रमाणे,कायद्याचा धाक दाखवून पुरूषांना वेठीस धरणार्‍या स्त्रिया पण आहेत .हे अमान्य करून चालणार नाही.परंतु ज्या स्त्रीच्या संदर्भात गैरवर्तन घडते.तिला नकोशा असणार्‍या किळसवाण्या कृती किंवा वर्तन पुरुषांकडून घडते आणि मग ती व्यक्त होते.मला आलेले अतिशय वाईट अनुभव ताजेच असल्यामुळे लिहावेसे वाटले.स्त्री म्हणून जे सहन केले ते का केले?असा विचार मनात आज पण येतो.एक प्रसंग नुकताच घडलेला की,मी दुचाकीवरून जात असतांना पुरुष एका झाडाच्या बाजूने लघुशंकेला उभा असतांना माझी गाडी दिसताक्षणी माझ्या दिशेला वळला.मी अतिशय संतापाने गाडीचा वेग वाढवून गाडी समोर नेतच नाही.तो अंदाजे वर्ष ४५-५० वयाच्या दरम्यानचा पुरुष दुचाकीवरून माझ्या विरूद्ध दिशेने येत होता.अतिशय किळसवाणे वाटेल अश्याप्रकारे जिभेने विचित्र प्रकार त्याने केला.त्याचक्षणी वाटले की,गाडी मागावर घेऊन मागे गाडी घेऊन जात असणार्‍या पुरूषांना सांगावे.पण,विचार केला की,याला कोणी माझ्याशिवाय प्रत्यक्षदर्शी नाही.असे न करण्यामागचे कारण आणखी असे की,अंदाजे ४/५ वर्षापूर्वी बसने प्रवास करतांना एका पुरुषाने बसच्या सीट मागून हात टाकायचा प्रयत्न केला होता.त्याचा हात माझ्या शरीराला स्पर्श करतो न करतोच त्याक्षणी त्याच्या कानाखाली लगावली.आणि बस पोलिस स्टेशन मध्ये लावायची विनंती वाहकास केली.तर लगेच बसमधील लोक म्हणाली,"जाऊ द्या ना बाई.आम्हाला वेळ होईल.जाऊ द्या हो साहेब,द्या त्याला उतरून इथेच."मला ह्या बोलण्याचा अतिशय संताप आला आणि त्या लोकांनाच सुनावले "तुमच्या मुलीच्या बाबतीत हा प्रकार घडला असता तर गप्प बसले असते का?"लगेच त्या पुरुषाला उतरून देण्यात आले.


           हे सर्व लिहिण्यामागचे कारण की,असला प्रकार नुसतं माझ्या बाबतीत नाही.तर,कित्येक महिलांच्या बाबतीत घडला असेल आणि घडत सुद्धा असतील.माझा हा लेख फेसबूक वर टाकला तेव्हा माझ्या मैत्रिणींनी 'त्यांच्या बाबतीत पण असे घडले आहे.'असे संगितले.जी स्त्री घर सोडून कामासाठी बाहेर पडते तेव्हा बस मध्ये असो की.,कुठल्याही ठिकाणी,जिथे लोक असतात ती तिथे स्वत:ला सुरक्षितच समजते.पण जेव्हा लोकांनी अश्या चुकीच्या बाबींवर पडदा टाकला.त्या बाबीला ती विरोध करतांना तिला साथ दिली नाही.किंवा त्या व्यक्तिला शिक्षा देण्यासाठी तिची मदत केली नाही.तर मग,शारीरिक व मानसिक अत्याचार,बलात्कार इ.प्रकारच्या घटना घडल्यानंतर जीव गमवावा लागणार्‍या स्त्रीच्या वेदनादायी मृत्यूनंतर हळहळ,शोक,राग व्यक्त करणे किंवा मेणबत्त्या पेटवून तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी मोर्चे काढणे व्यर्थ असेल.जर आपण एखाद्या स्त्रीची सत्यासत्यता पडताळून तिची मदत केली.तर तिला सर्व ठिकाणी सुरक्षित वाटेल.आणि कुठलाही पुरुष असे कृत्य करतांना विचार करेल. किंबहुणा असे कृत्य करणार नाही.अर्थात सर्वच पुरुष असे नसतात पण आलेले अनुभव हे शहाणे करून जातात.


Rate this content
Log in