श्रावणी सोमवार!
श्रावणी सोमवार!
आज पहिलाच श्रावणी सोमवार!
मयुरी सकाळी खूप छान मूडमध्ये उठली. लवकर लवकर मुलांचे डबे, नवऱ्याचा डबा बनवला. मुलांना दूध बिस्किटे खाऊ घालून दोघांना शाळेच्या बसमध्ये बसवून आली. घरी आल्यावर नवऱ्याला नाश्ता दिला, सासूसासऱ्यांना नाश्ता दिला. नवरा कामावर निघून गेला.
मयुरीने छान अंघोळ केली. सासूसासाऱ्यांना त्यांच्या अंघोळीची तयारी करून दिली. सासूबाईंनी पूजेची साग्रसंगीत तयारी करून ठेवली. सासरे बुवांनी मस्त पूजा केली. आरतीसाठी मयुरी नैवेद्य घेऊन आली. व्यवस्थित स्वैपाक करून नैवेद्याचे पान आणले होते तिने. ते पाहून सासूसासाऱ्यांना तिचे खूप कौतुक वाटले. सगळ्यांनी मिळून आरती केली.
पूजा आरती आवरून मयुरीने उरलेली सगळी कामे आवरली. दरवर्षीप्रमाणे महादेवाच्या अभिषेकासाठी मंदिरात जायला निघाली.
रस्त्यात तिला सारंगा, तिची मैत्रीण भेटली. सारंगाचे आईबाबा मयुरीच्या बिल्डिंगमधेच राहत होते. दोघेही सध्या आजारी होते. त्याच्यासाठी सारंगा इकडे आली होती. सारंगा मयुरीला सांगू लागली, "बाबा आजारी आहेत. उठुनही बसू शकत नाहीयेत. आई एकटी त्यांचं सगळं करू शकत नाही. तिलाही सध्या थोडं बरं नाहीसे झालं आहे. माझ्या घरी पण सासू सासरे आहेत. माझी लहान मुलगी, माझी नोकरी त्यात दोन्ही घरं सांभाळावी लागताहेत सध्या. खूप ओढाताण होतेय गं. सध्याचे दिवस इतके वाईट चालले आहेत की आईकडे काम करायला कुणी बाईपण मिळत नाहीये. काय करू काही सुचत नाहीये." असं म्हणून सारंगा रडूच लागली.
मयुरीने तिला खूप धीर दिला. मयुरी म्हणाली, "मी आत्ता मंदिरात जायला बाहेर पडले होते. त्या ऐवजी आता मी जाते तुझ्या आईकडे. त्यांना काय हवं नको बघते. तू काळजी करू नकोस."
सारंगा:- पण तू मंदिरात जात होतीस ना, मग?
मयुरी:- दरवर्षी श्रावणात रोजच मंदिरात जायचा नेम असतो गं माझा. पण आता तिकडे जाण्यापेक्षा तेवढ्या वेळेत मी तुझ्या घरी जाऊन मी तुझ्या आईबाबांची काळजी घेईन. तुझी धावपळ कमी होईल आणि त्यांनाही काही लागलं तर मी जवळच असल्याने लगेच त्यांची कामे होत जातील. तुझे आईबाबा म्हणजे माझेही आईबाबाच ना! त्यांच्या ठाई मी देव समजून त्यांना पूर्ण बरे वाटेपर्यंत मी त्यांच्याकडे पूर्ण लक्ष देईन. अगदीच दवाखान्यात वगैरे जायचे असेल तर तुला तुझ्या सोयीने आपण ठरवत जाऊ या. चालेल का तुला?
सारंगा:- अरे पण तुझे सासुसासरे काय म्हणतील? तुझा नवरा?
मयुरी:- त्यांना खूप आनंद होईल गं मी अशी कुणाच्या उपयोगी पडेल तर.
सारंगा:- ठीक आहे. चालेल तर मग.
दोघीजणी सारंगाच्या आईकडे आल्या. त्यांना सगळं समजावून सांगितलं. दुसऱ्या दिवशीपासून घरातल्या सगळ्यांच्या परवानगीने मयुरी घरचं सगळं आवरून सारंगाच्या आईबाबांकडे जात होती. त्याचा स्वैपाक, जेवण, संध्याकाळचा नाश्ता, त्यांची औषधं वगैरे अगदी आपल्या सासू सासऱ्यांची जशी सगळी व्यवस्था ठेवायची तशीच इकडेही करू लागली. घरी जाऊन परत घरचंसुद्धा सगळं करत होती.
घरच्या देवाची पूजा, नैवेद्य झाल्यावर मयुरी रोज देवाला सांगायची, "इथूनच माझा नमस्कार घे बाबा सध्या. आणि माझे हे दुसरे आईबाबा आहेत ना, त्यांना लवकर बरं वाटू दे."
थोड्याच दिवसात सारंगाचे बाबा बरे झाले आणि आईलाही पुरेशी विश्रांती मिळाल्याने त्याही उत्साही वाटू लागल्या होत्या. मयुरीची सेवा फळाला आली होती.
मयुरीच्या घरी दरवर्षी श्रावणात सत्यनारायणाची पूजा करायची पद्धत होती. या वर्षी पण आता करायची ठरली. त्यानिमित्ताने तिने सारंगाच्या आईबाबांनाच मेहुण म्हणून जेवायला बोलावले. आणि सारंगाला सवाष्ण म्हणून बोलावलं.
पूजेच्या दिवशी छान साग्रसंगीत पूजा, नैवेद्य झाला. सगळे जेवायला बसले. सगळ्यांनी मयुरीच्या स्वैपाकाचे खूप कौतुक केले. घरात समाधानी वातावरण होतं. सारंगा मयुरीचे मनापासून आभार मानू लागते. "तुझ्यामुळे हे दिवस मी निर्धास्तपणे काढू शकले गं. आईबाबा पण लवकर बरे झाले. खूप छान लक्ष दिलेस त्यांच्याकडे तू. त्यांना अजिबात माझी उणीव नाही जाणवली."
मयुरी म्हणाली, "माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. तो नेहमीच आपल्या पाठीशी असतो. संकटकाळात कुणाच्या न कुणाच्या रुपात आपल्याला मदत करतो. त्याच देवाने मला तुझ्या आईबाबांची सेवा करायची बुद्धी दिली. माणसात देव पाहून त्याची सेवा केली की ती लवकर पोहोचते असे म्हणतात. ती माझ्याकडून करवून घेतली, बस. बाकी काही नाही."
"खुलभर दुधाची कहाणी आपण लहानपणापासून ऐकत वाचत आलो आहोत ना. मग ती अमलात आणायची संधी मिळाली मला!"
मयुरीच्या अशा स्वभावामुळे आणि त्याला तिच्या घरच्यांची जोड मिळत असल्याने मयुरीचे घर कायम आनंदात, समाधानात असते.
हीच समाधान मिळवण्याची छोटीशी कहाणी सुफळ संपूर्ण!
