Suresh Kale

Tragedy

3  

Suresh Kale

Tragedy

प्रतारणा की आत्मवंचना

प्रतारणा की आत्मवंचना

5 mins
420


“तु मला विसरुन जा” किती सोपं असतं न बोलणं. पण खरोखरच एकमेकांना विसरण इतकं सोपं असतं? दोन अनोळखी जीव एकत्र येतात. एकमेकांवर प्रेम करु लागतात व केव्हातरी अशी एखादी वेळ येते की एक व्यक्ती म्हणते “तु मला विसरुन जा” व असे म्हणून दोघे दोन दिशांना जातात. पण खरोखरच ते एकमेकांना विसरतात का. मला तरी नाही वाटत के ते विसरत असतील. तुझ्या बाबतीत माहीत नाही पण तो मात्र अजूनही तुला विसरु शकला नाही हे निश्चित. 


नुकतीच त्याची आणि माझी बरेच वर्षांनी गाठ पडली. तेच हॉटेल तेच टेबल व हातात बिअरचा ग्लास धरुन एकाकी बसलेला तो. अगदी तसाच जसा ३५ वर्षांपूर्वी बसला होता. मी ही त्यावेळी त्याच्या सोबत होतो व नेमका आजही तसाच समोर आलो. बरेच वर्षांनी गाठ पडली होती व मनसोक्त गप्पा मारल्या. पण का कुणास ठाऊक मला आजही त्याच्या डोळ्यात तेच दु:ख दिसत होते जे ३५ वर्षांपूर्वी मी त्याच्या डोळ्यात पाहिलं होतं. कदाचित तो माझा भ्रमही असेल. आपली फसवणूक झाल्याचे दु:ख त्याच्या डोळ्यात दिसत होते. त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागील दु:ख केवळ मलाच दिसत होतं कारण मी त्याचे प्रेम पाहिलं होतं. सोशल मीडिया वर जे त्याचे हासऱ्या चेहऱ्यातील फोटो होते त्या फोटो मागील वेदना फक्त मलाच वाचता येत होती. आजही त्याच्या चेहऱ्यावर तेच चिरपरिचित हास्य होतं. त्यावेळी तो अगदी कोसळून गेला होता. एका हातात बिअरचा ग्लास व डोळ्यात पाणी अशा अवस्थेत असलेल्या त्या माझ्या मित्राला मला सावरायचे होते. या अवस्थेत मी तरी काय बोलणार. मी त्याला एवढेच म्हणालो “काही झाले तरी तू तुझं आयुष्य दारुत बुडवून वाया घालवणार नाहीस” व मी ते तुला तसे करु देणार नाही. त्याप्रमाणे त्यानेही “माझे आयुष्य ही माझे आई-वडील यांचे आहे व ते मी असे वाया घालवणार नाही” असे वचन दिले व ते पाळले. लग्न करून प्रामाणीकपणे पत्नीसोबत संसार केला, व आपल्या आई वडिलांची मनापासून सेवा करुन जिवन सार्थकी लावले. अन्यथा अशा परिस्थितीत जिवाचे बरेवाईट करुन घेणारेही बरेच असतात. माझा मित्र प्रामाणीक प्रियकर होता. संधी असूनही त्याने तिच्या प्रेमाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही. कारण प्रेम व शारिरीक संबंध याची त्याने कधीच गल्लत केली नव्हती. लग्नाचे वेळी ती त्याला तशीच पवित्र हवी होती. तो एक हळव्या मनाचा, एक कलाकार होता. ऊत्तम चित्रकार व गायनाची आवड असलेले व्यक्तीमत्व होते. यानंतरही त्याने जिवनात हार न मानता एक सामान्य व्यक्ती म्हणून जिवन व्यतीत केले. लग्न करून एक समंजस पती म्हणून भुमीका निभावली. मुलांचे शिक्षण पुर्ण करुन त्यांना सन्मार्गाला लावले व नोकरीत ऊच्चपद प्राप्त करुन आता शांतपणे आपले आयुष्य जगतोय. 


आता आयुष्यातील या टप्प्यावर मात्र तो एकटा असल्या सारखा वाटतो. मुले त्यांच्या संसारात व पत्नी नातवंडात रमली व हा आता परत एकदा एकटा पडला आहे. कलाकार असल्याने आपल्या आवडीच्या विषयात वेळ घालवून चेहऱ्यावर तेच लोभस हास्य ठेऊन आनंदी राहायचा प्रयत्न करतोय. त्याची प्रिया आता कोठे असेल हेही त्यास ठाऊक नाही. जिवनाच्या या उत्तरार्धात कुणाला ठाऊक एखाद्या अनोळखी वळणावर त्यांची भेट होईल व तिच्या निव्वळ दर्शनाने सुध्दा या माझ्या मित्राचे आयुष्य आनंदाने व्यतीत होईल. कदाचित मला वाटते तसे काहीच नसेल तो आता तिला विसरून आपल्या संसारात छान रमलाही असेल. मी त्याचा एक जवळचा मित्र म्हणून त्याच्यावरील प्रेमापोटी मला उगाचच तसे वाटत असेल. मी आपला माझ्याच विचारात गुंग होतो. 


“ओय कुठे तंद्री लागलीय?” मित्राच्या प्रश्र्नाने मी माझ्या तंद्रीतून जागा झालो. “अरे चाललय काय? मी एकटाच बडबडत होतो व तु नुसता सुंबाट हातात ग्लास धरून बसला होतास. ईकडे लेका माझी आख्खी बाटली संपली. कसला विचार करतोयस?” मित्राचे प्रश्र्न सुरु होते व मी त्याच्या प्रश्र्नांनी पुरता गांगरुन गेलो होतो. “अरे काही नाही रे एकदम जुन्या आठवणी जाग्या झाल्या होत्या.” मी एवढे म्हणायचा अवकाश तो माझ्याकडे बघून जोरदार हसला व म्हणाला “कसल्या आठवणी जागवत बसतोस यार अरे ईतक्या दिवसांनी भेटतोय मस्त गप्पा मारायच्या सोडून कसला विचार आणि कुठल्या आठवणी काढत बसलायस.” त्याच्या या असल्या प्रश्र्नांच्या सरबत्तीने मला काय बोलावे तेच सुचेना. “काही नाही रे, मला आपली जुनी आठवण आली. त्यावेळी तू आणि मी याच टेबलवर बसलो होतो व तू पार खचून गेला होतास.” यावर तो थोडासा अडखळल्या सारखा वाटला नंतर पुन्हा ते फसकन हसणं. मला तर याच्या मनाचा थांगपत्ता लागत नव्हता. 


शेवटी न राहवून मी त्याला विचारलेच. “तुला खरंच तिची आठवण येत नाही का रे ? तू तिला खरोखर विसरलायस?” यावर तो थोडा वेळ गप्प होता. नंतर तो म्हणाला “त्याच काय आहे बंड्या सगळ्या गोष्टी आयुष्यात आपल्या मनाप्रमाणे होतातच असे नाही.” तो रंगात आला की माझ्याशी नेहमीच बंड्या या टोपण नावाने बोलायचा. “मी तिच्या प्रेमात पडतो होतो हे सगळं ठिक आहे. काही कारणाने नाही शेवटपर्यंत निभावलं. पण माझं काय वाईट झालं. चांगली सुसंस्कृत व समंजस पत्नी मिळाली. तिने माझ्या साठी काय नाही केलं सांग. अरे आज मी जे काही कमावलय ते सर्व तिच्या खंबीर पाठिंब्यामुळेच शक्य झालय. अरे त्या वेळी जर अशी खंबीर व समंजस पत्नी मला मिळाली नसती तर माझी काय अवस्था झाली असती याची तूही कल्पना करु शकतोस. कारण तु जसा माझ्या पहिल्या प्रेमाचा साक्षीदार होतास तसाच आमचा दोघांचा सुखाचा संसारही जवळून पाहिला आहेस. आता मला सांग मी का म्हणून जुन्या आठवणी उगाळत बसू. हा हे खरं आहे की केव्हातरी तिची आठवण येते पण त्यात काही गैर आहे असेही मला वाटत नाही. शेवटी ते माझं पहिल प्रेम होतं. त्यामुळे तु म्हणतोस तसं काही नाही. मी माझं आयुष्य अगदी मस्त एन्जॉय केलय. तेव्हा आता तुझ्या डोक्यातील जे काही विचार असतील ते काढ ॲंड चिअर्स.” असं म्हणून त्यानं बिअरचा ग्लास संपवला. व मग मीही त्याला चिअर्स करून निवांत मोकळेपणाने गप्पा मारत बसलो.


आमच्या या भेटीतून एक मात्र दिसून आलं की कोणाच्याही आयुष्यात असं होऊ शकतं एखादी व्यक्ती आपल्याला आवडते आपण तिच्या प्रेमात पडतो. ती व्यक्ती सुध्दा आपल्यावर मनापासून प्रेम करीत असते पण काही वेळा अशी काही परिस्थिती निर्माण होते की दोघांचे मार्ग बदलतात व दुसऱ्या अनोळखी व्यक्तीशी त्यांची आयुष्याची गाठ बांधली जाते. त्याला पुढील आयुष्यात साथ देणारी व्यक्ती जर समंजस असेल तर ती व्यक्ती मागील सर्व विसरून जिवनात यशस्वी होते. माझा मित्र खरोखर भाग्यवान की त्याला अशी समंजस व्यक्ती पत्नी म्हणून लाभली व तो आज छान आयुष्य व्यतीत करतोय. आम्ही नंतर छान जेवणाचा आस्वाद घेतला व एकमेकांचा निरोप घेऊन बिल द्यायला कौंटरवर आलो कॅशीयर सुध्दा आमच्याच जमान्यातील होता त्याच्या पाठीमागे तोच जुना मोठा रेडिओ व त्यावर विविध भारतीवर आमच्या वेळची जुनी गाणी लागली होती. आम्ही पैसे देऊन बाहेर पाऊल टाकणार एवढ्यात एका जुन्या काळातील गाणे सुरु झाले. "छोड दे सारी दुनिया किसीके लिये ये मुनासिफ नहीं आदमीके लिये. प्यार से भी जरुरी कई काम है प्यार सबकुछ नहीं जिंदगी के लिये.” आम्ही दोघांनीही नकळत एकमेकांकडे पाहिले व हसत हसत एकमेकांचा निरोप घेतला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy