Suresh Kale

Tragedy

3  

Suresh Kale

Tragedy

बंध रेशमी

बंध रेशमी

15 mins
217


आजही तिची नेहमीची ५:३५ ची लोकल चुकलीच. ती मनातून चठफडत स्टेशनवर पुढच्या लोकलची वाट पहात बसली, आणि आता तिच्या हातात काही पर्यायही नव्हता. कल्याण सारख्या स्टेशनवर गर्दीच्या वेळी गाडी पकडणं हे एक फार मोठं दिव्य होतं. तिच्या नेहमीच्या गाडीत तशी थोडी गर्दी कमी असायची व किमान गाडीत चढणं तरी जरा सुसह्य असायचं पण नंतर एकदा का सी.एस.टी.चा लोंढा सुरु झाला की गाडीत चढणं महामुष्कील व्हायचं. पण अगदी निघायला जेमतेम ३० मिनिटे असताना बॉसनी तिला एक अर्जंट बिल्डींग प्लॅन व एस्टीमेट करुन द्यायला सांगितले व त्यामुळे ऑफीसमधून निघायलाच दहा मिनिटे उशीर झाला. ती धावत पळत कशीबशी स्टेशनवर पोहोचली पण व्हायचा तो उशीर झालाच व तिची लोकल चुकलीच. तेवढ्यात पुढची लोकल आली व तिने स्वत:ला त्या लोंढ्यात झोकून दिले. जसे डोंबिवली स्टेशन आले तसं तिनं पुन्हा: एकदा स्वत:ला गर्दीत झोकून दिलं व नेहमी प्रमाणे धक्के खात डोंबिवली स्टेशनवर उतरून घराच्या दिशेने तिची पावलं झपाट्याने चालू लागली. हे सगळं आता तिच्या अंगवळणी पडलं होतं. तिचं ती सकाळची वेळ संध्याकाळची लोकल तेच ते रोजचे धक्के खात प्रवास करणं. काही गर्दीत चुकून लागलेले तर काही जाणीव पूर्वक नको त्या जागी मारलेले धक्के, तिला सगळ कळत होते पण काही उपाय नसल्याने तिची रोजची कसरत चालू होती आणि अशा अंगचटीला येऊन धक्के मारणाऱ्यांची तक्रार तर कुणाकडे व कशी करणार. समजा केलीच तर “अहो बाई आता एवढ्या गर्दीत धक्का लागतोच की, काही तरी डोकं वापरून बोला की” हे तिलाच सुनावलं जायचं व तिला साक्ष देत पोलिस स्टेशनमध्ये हेलपाटे कोण मारणार. ज्याला त्याला आपल्या दोन वेळच्या भाकरीची काळजी. इथे कुणाला फिकीर पडली तिला कुणी धक्का दिला की आणखी काही केलं. समाजही कसा आता मुर्दाड बनत चालला आहे.

विचारांच्या तंद्रीत ती केव्हा बिल्डिंग जवळ आली तीचे तिलाही कळलं नाही. बिल्डिंग जुनी असल्याने लिफ्टची सोय नव्हतीच. रोजच्या सारखे जिने चढून तिने स्वता जवळील किल्लीने लॅच उघडलं व ती घरात आली. घरात पाऊल टाकता क्षणी एक उग्र दर्प तिच्या नाकात शिरला व ती तशीच पर्स कपाटात फेकून डोकं धरुन तशीच खाली बसली. रात्रीचे जवळ जवळ आठ वाजायला आले होते पण घरात काळोख. तिला उठून ट्युब लावायची सुध्दा ईच्छा होत नव्हती. असा किती वेळ गेला कुणास ठाऊक "काय सुटलं का ऑफीस, सायबानं काय ओव्हरटाईम करवून घेतला वाटतं.” अंधारातून शांत आवाज आला व तिच्या डोक्याची शीर हलली. त्याच्या बोलण्यातील खोच न कळण्या इतकी काही ती मुर्ख नव्हती. म्हणजे हा घरातच होता तर. “अरे तु जर घरात होतास तर मग लाईट का लावला नाहीस. अंधारात कसला बसून राहिलास.” ती बळेबळे काही तरी बोलायचे म्हणून बोलली. व उठून लाईट लावला. तो कॉटवर लोळत पडला होता. खाली जमिनीवर दहा बारा सिगारेटची थोटकं पडली होती. “अरे, आज जरा निघता निघता साहेबांनी एक अर्जंट बिल्डिंग प्लॅन करायला दिला व त्यामुळे ऑफीसमधून निघायलाच उशीर झाला व लोकल चुकली" काही कारण नसताना ती आपली उगीचच स्पष्टीकरण देत बसली व स्वयंपाक घरातील दिवा लावून देवापाशी समई लावली. “का आज काय त्या तुझ्या मित्राला तुला घरापर्यंत सोडायला जमलं नाही वाटतं” त्याचा तुसडा प्रश्र्न कानावर आला. त्याच्या प्रत्येक शब्दातील कडवटपणा तिच्या संतापात भर टाकत होता. त्याच्या मनातील विष तो प्रत्येक शब्दातून ओकत होता. त्याचबरोबर संपूर्ण खोली त्याच्या गलिच्छ विचारा प्रमाणे दारुच्या वासाने भरुन गेली त्याचे असले गलिच्छ विचार ऐकून तिला तिच्या निवडीची शंका येऊ लागली. हाच का तो एकेकाळी तिने ज्याच्यावर जीव ओवाळून टाकला होता. तोही तिच्या प्रेमात आकंठ बुडालेले असायचा. तिचा प्रत्येक शब्द झेलण्यासाठी तो कायम आसुसलेला होता. पण आता त्याला पहाताना हाच का तो असा प्रश्न पडत होता. हल्ली हे असंच होत होतं. तिच्या प्रत्येक हालचालीवर तो शंका घेत होता व रोज चिडचिड व्हायची. तिला आता त्याचा राग कमी व कीव जास्त यायची. तो मुळचा असा नाही हे तिला पुरेपूर माहिती होतं. तो आणि ती दोघेही ऊच्चशिक्षीत. तो एक मनस्वी कलाकार होता. उत्कृष्ट चित्रकार. समोर कॅनव्हास व हातात ब्रश आला की तो देहभान विसरून जायचा. तर ती एक उत्कृष्ट आर्कीटेक्ट व इंटेरियर डिझायनर. दोन वर्षांपूर्वी एका सिनेमाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली. दोघेही प्रतिभावान व कलाकार त्यामुळे ओळखीचे मैत्रीत व मैत्रीचे प्रेमात कधी रुपांतर झाले ते दोघांनाही कळले नाही. व दोघांनी एक वर्षापूर्वी लग्नाचा निर्णय घेऊन लग्न केले. लग्नानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. तो स्वतंत्र पणे काम करत होता व ती एका मोठ्या आर्कीटेक्ट कंपनीत नोकरी करत होती.


सहा महिन्यापुर्वीची गोष्ट तो रात्री एका सिनेमाच्या सेटवरुन घरी येत होता. एका वळणावर समोरून येणाऱ्या ट्रकच्या दिव्याने त्याचे डोळे दिपून त्याचा मोटारसायकल वरचा कंट्रोल गेला वतो शेजारच्या कंपाऊंडवर जाऊन आदळला. किरकोळ दुखापती वर निभावलं. पण दुर्दैवाने त्याच्या उजव्या हाताचा अंगठा व शेजारील तर्जनीचे बोटाला दुखापत होऊन तर्जनीचे एक पेर जवळपास पूर्ण तुटले होते. अपघातानंतर तो बेशुद्ध पडला होता व त्याच्या मित्रांनी हॉस्पिटलमध्ये नेले होते. ऑपरेशन नंतर भूल उतरल्यावर जेव्हा त्याला त्याचा अंगठा व तर्जनीचे एक पेर गेल्याचे समजले तेव्हा तो पूर्ण कोसळून गेला होता. जिवावरचे बोटावर निभावलं पण एका कलाकाराचा व त्यातही चित्रकाराला अंगठा व शेजारील बोट जर असेल तर त्याची काय अवस्था झाली असेल हे फक्त एक चित्रकारच जाणू शकेल. हॉस्पीटल मधून घरी आल्यावर सुध्दा तो एकाकी राहू लागला. हळूहळू ही बातमी इंडस्ट्री मधे समजली व त्याला काम मिळणं बंद झाले. तिची नोकरी सुरु होती व तिला आता प्रमोशन मिळाल्याने पगारातही वाढ झाली होती. त्यामुळे घरात काही अडचण येत होतं होती अशातला भाग नव्हता, पण आपण काही कामधंदा करत नाही व बायकोच्या जिवावर जगतोय मी कमीपणाची भावना दिवसेंदिवस वाढत चालली होती. व त्यामुळे चिडचिड वाढून दोघांच्यात सुरुवातीला थोडी कुरबुर व नंतर हळूहळू वाद व्हायला सुरुवात झाली होती. वास्तविक तिची काही सुध्दा तक्रार नव्हती. ती त्याला म्हणायची सुध्दा की तू मनातील ही कमीपणाची भावना काढून टाक व मस्त लाईफ एंजॉय कर. माझी नोकरी सुरु आहे व मला प्रमोशन मिळून आता पगार सुध्दा चांगला आहे. तू काही काळजी करु नकोस. मी एकटी आपला संसार अगदी चांगल्या पद्धतीने चालवू शकते. पण, हा पणच सगळं बिघडवत असतो. पण त्याचा ईगो व पुरुषी अहंकार त्याला डिवचत होता व बायकोच्या जिवावर आपल्याला जगावे लागते ही भावना त्याला रात्रंदिवस छळत होती. त्यातूनच मग हे सर्व विसरून जाण्यासाठी तो अधूनमधून बारमध्ये जाऊ लागला. सुरुवातीला आठवड्यात एखाद्या वेळी जाणारा तो कधी रोज जाऊ लागला हे त्याचे त्यालाही कळले नाही. त्याच्या या पिण्यामुळे ती पार वैतागून गेली होती व त्याला कितीही सांगून काही फरक पडत नव्हता. त्यामुळे हल्ली तिने काही सांगणेच बंद केले होते. रोज सकाळी उठून दोघांचा स्वयंपाक करून डबा घेऊन ती ऑफीसला जायची. यायला बहूधा ७ तरी वाजून जायचे. एखाद्या वेळी ऑफीसमधून येताना ती निव्वळ त्याला खुप आवडती म्हणून एखादी नॉनव्हेज डिश घेऊन यायची. पण याला काही फरक नव्हता. जर शुध्दीत असेल तर खायचा नाही तर तशीच पडून रहायची. पण त्याबद्दल तिने कधी तक्रार केली नाही. या सर्व प्रकारामुळे त्या दोघांतील प्रेम आणि रोमान्स मात्र केव्हाच संपला होता. इथपर्यंत सर्व ठीक होते. पण हल्ली हल्ली तो आता तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. त्याला सुरुवात पाच-सहा महिन्यांपूर्वी अचानक घडलेल्या त्या प्रसंगापासून झाली होती. 


जुलै महिन्यातील पावसाळ्यातील दिवस. त्यादिवशी तर पावसाने ऊच्छाद मांडला होता. ऑफीसमधील सर्वच जण आता संध्याकाळी घरी कसे जायचे या विचाराने अस्वस्थ झाले होते. तिची अवस्था तर फारच कठीण झाली होती. त्याच्या या असल्या विचित्र वागण्यामुळे त्याची काळजी वाटायची. आता तो घरी असेल की कुठ बारमध्ये बसला असेल. आणि पिलेल्या अवस्थेत या पावसात तो निट घरी पोहोचेल का. असले अनेक विचार तिच्या मनात येत होते व त्यामुळे ती आणखीनच बेचैन होत होती. पण काही झाले तरी पाऊस थांबेपर्यंत ऑफीसमधून बाहेर पडणे शक्य नव्हते. शेवटी रात्री १० नंतर पाऊस जरा कमी झाला व ती आवरुन घरी निघाली, एवढ्यात तिचे बॉसही घरी जायला बाहेर पडले. तेही तिच्या घराजवळच रहायचे. नेहमी ते ट्रेननी यायचे पण आज त्यांच्या दोन क्लायंटबरोबर साईटवर मिटींग होत्या म्हणून ते कार घेऊन आले होते. तिला बाहेर पडताना पाहून त्यांनी तिला “बाहेर अजून थोडा पाऊस पडतो आहे, मी आता घरीच चाललोय तर जाता जाता तुलाही घरी सोडून मी पुढे जाईन तुझी काही हरकत तर नाही ना?” अशी विचारणा केली. झालेला उशीर व बाहेर पडणारा पाऊस यामुळे तिनेही हो म्हणले व ती त्यांच्या बरोबर निघाली. घरी येईपर्यंत जवळजवळ ११ वाजायला आले होते. तिच्या बॉसनी बिल्डिंगच्या गेटपशी कार थांबऊन तिला ड्रॉप केले तिनेही त्यांचे औपचारिक आभार मानले त्यांची कार गेली तशी ती जिन्याकडे वळली, सहज वर पाहिले तर तिच्या फ्लॅटची जिन्याच्या बाजूच्या खिडकीतून उजेड येत होता. म्हणजे तो अजून जागाच असावा असं दिसत होतं. ती घरात आली व कपडे बदलायला आत बेडरूममध्ये गेली. तेवढ्यात हॉलमधून त्याचा आवाज आला. “काय आज बराच उशीर झाला नाही? अर्थात तु तरी काय करणार म्हणा पाऊसच जोरदार पडत होता. यावर “अरे ऐन निघायच्या वेळी इतका जोरदार पाऊस सुरू झाला, आणि मग सगळेच अडकून बसले” असे म्हणत ती हॉलमध्ये आली. “अरे तू काही खाल्लस का नाही, नसेल तर मी पटकन मस्तपैकी खमंग थालीपीठ लाऊन देते” तिने विचारले. यावर नको माझ्या पोट भरलय असे त्याने ऊत्तर दिले. त्यावर बरं मग ठीक आहे असं म्हणून ती झोपण्यासाठी बेडरूममध्ये जाऊया लागली. यावर त्याने बैस थोडं जरा गप्पा मारत बसू असे म्हणल्याने ती तिथेच सोफ्यावर बसून मासीक चाळू लागली. तोही तिथंच खुर्चीवर बसला व तिला विचारले “आज काय तुझ्या बॉसला बरंच काम पडले असेल नाही? “म्हणजे काय? “नाही एवढ्या सगळ्या स्टाफला घरी सोडायचे म्हणजे काम वाढलेच की.” त्यावर “अरे तो सगळ्यांना कशाला सोडायला जाईल ? त्यावर “ नाही तुला कारनं घरी सोडायला आला होता, म्हणून मला वाटतं की तो आज सगळ्यांना घरी सोडायला गेला असावा” त्याच्या प्रश्र्नातील तिरकस रोख तिच्या लक्षात आला. तरीही फारसा वाद नको म्हणून ती म्हणाली “अरे तो कशाला सगळ्यांना सोडत बसेल आज त्याने अनायसा कार आणली होती व पाऊसही होता म्हणून त्याने विचारले व मीही मग घरापर्यंत लिफ्ट मिळते म्हणल्यावर पटकन हो म्हणाले” त्यावर “अरे व्वा तुझी बरीच काळजी वाटते न त्याला. नाही तुला एकटीला घराच्या अगदी दारात सोडायला आला म्हणून म्हणलं.” आता मात्र तिचा संयम सुटला “तुला काय रे माहिती त्याने मला दारात सोडलं की आणि कुठं. त्यावर "अगदी मस्त शेजारी बसून ऐटीत आलीस की आणि खाली उतरल्यावर सुध्दा अगदी टाटा बाय चालू होतंच की आणि काय काय केलंस काय माहीत" यावर तिचा पारा जाम वाढला “म्हणजे तु माझ्यावर संशय घेतोस आणि मी केव्हा येते कुणाबरोबर येते यावर नजर ठेवतोस. शी मला तुझ्या विचारांची अगदी कीव येते. अरे तो किती चांगला समजूतदार आहे हे तुलाही माहीत आहे. बारावी पर्यंत तुझा अगदी चांगला मित्र होता. आणी त्यांच्याविषयी तुझे असले घाणेरडे विचार. आत्ता पर्यंत मला तुझी दया वाटायची पण तुझे हे असले घाणेरडे विचार ऐकून आता शिसारी येते. कुठून तुझ्यावर प्रेम करायची बुध्दी झाली आणि तुझ्या बरोबर लग्न केलं असं वाटतं.” एवढं बोलून ती ताडकन बेडरूममध्ये निघून गेली. त्या दिवसापासून हे असेच चालू होते. रोज काही ना काही कारणाने भांडण आणि तमाशा. 

त्यानंतर दिवसेंदिवस त्याचे दारुचे व्यसन वाढत गेले. पुर्वी बारमध्ये जाणारा तो आता घरी आणून पिऊ लागला. आज ती घरी आली तेव्हा सुध्दा पिऊन पडलेला होता. सगळी खोली त्याच्या सिगरेटच्या व दारुच्या वासाने भरुन गेली होती. तिने जास्त न बोलता हालची खिडकी उघडली व फॅन फुल लावला. जेणेकरून घरातील वास कमी व्हावा. तिने दोघांसाठी थालीपीठ केले व न बोलता जेवण केले. जेवताना दोघेही एकमेकांशी एक शब्दही बोलले नाहीत. रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा लागला नाही. आपल्या विषयी त्याचे इतके घाणेरडे विचार ऐकून तिला असह्य झालं होतं. ऊद्या काही करुन याविषयी आपल्या बॉस व एकेकाळच्या त्याच्या खास मित्राबरोबर बोलायचे असे ठरवले. 


सकाळी नेहमीप्रमाणे उठून ती ऑफीसला आली. रात्रभर झोप न झाल्याने व त्याच्या असल्या गलिच्छ आरोपामुळे ती पुर्ण खचून गेली होती. तिच्या मैत्रीणीने तिला हात करून गुड मॉर्निंग केले हेही तिच्या लक्षात आले नाही. बॉस येताच तिने शिपाया करावी त्यांना भेटायचे आहे असा निरोप दिला व त्यांनी बोलवताच ती त्यांना केबीनमधे भेटायला गेली. तिचा चेहरा रात्रीचे जागरण तिच्या डोळ्यात दिसत होते. बॉसनी तिला बसायला सांगून कॉफी पाठवण्यास सांगितले व कॉफी घेत बोलायला सुरुवात केली. “बोल, काय म्हणतीस ? काही प्रॉब्लेम? त्यानी सुरुवात केली. तिला काय आणी कसे सांगावे हाच प्रश्र्न पडला होता. सर, तिला पुढे काय बोलावे तेच सुचत नव्हते. त्यावर त्यांनीच बोलायला सुरुवात केली. “काय, काल काही भांडण बिंडण, त्यावर तिने स्पष्टपणे सर्व ईत्यंभूतपणे सांगितले. त्यावर “हे बघ, मी त्याला लहानपणापासून ओळखतो. तो खुप चांगला आहे पण अपघातात त्याचे जे सर्वस्व म्हणजे त्याच्या हाताची बोटेच अधू झाल्याने तो दारुच्या आहारी गेला व त्यातूनच त्याने असले भलते सलते विचार डोक्यात घेऊन तो बोलला असेल. तू ही गोष्ट मनाला लावून घेऊ नकोस व मीही मनावर घेत नाही. त्याला आपण यातून बाहेर काढू. माझ्या एका चांगल्या मित्राचे आयुष्य असं वाया गेलेलं मला चालणार नाही.” “पण सर आपण याला यातून बाहेर काढणार तरी कसं? तो तर काही ऐकून घ्यायच्याही मनस्थीतीत नाही. आणि तुम्ही काही करायचे म्हणाल तर तुमचं नाव काढलं तरी तो संतापतो.” “हो ही गोष्ट माझ्याही कानावर आली आहे. पण माझ्याकडे एक प्लॅन आहे व तो जर जमून आला तर तो यातून १००% बाहेर पडेल याची मला खात्री आहे.” “पण तुम्ही करणार तरी काय.” ऐक “ माझा एक अमेरिकन मित्र आहे त्याच्याशी ऑलरेडी मी बोललोय.” आणि पैशाची तु काळजी करु नकोस. ते मी आणि माझा मित्र पाहून घेऊ. सो, बी हॅपी “या आठवड्यात तुला एक चांगली बातमी मिळेल”


त्यानंतर तिचे रोजचे रुटीन चालू होते. ती ऊत्सुकतेने वाट पहात होती. बरोबर चवथ्या दिवशी बरोबर सकाळी ६ वाजता त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. ईतक्या सकाळी सकाळी कुणाचा फोन म्हणून चढपढतच त्याने फोन घेतला. “ हॅलो कोण? एवढंच तो बोलला व पुढे पाच मिनिटे तो नुसता ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावरील भाव क्षणा क्षणाला बदलत होते. फोन ठेवल्यावर तिने फारशी ऊत्सूकता न दाखवता त्याला विचारले “कोणाचा रे फोन एवढ्या सकाळी सकाळी” त्याला काय बोलावे हेच सुचत नव्हते. “अग युएस वरुन कोणी जॉर्ज नामक माणसाचा फोन होता. तो यु.एस.ए. मधील एका मोठ्या आर्कीटेक्ट कंपनीत तेथील चेअरमनचा पर्सनल सेक्रेटरी होता. त्यांचे एका हॉटेल प्रोजेक्टचे काम चालू आहे. त्या हाटेल मधील प्रत्येक रुममध्ये त्यांना भारतीय संस्कृतीतील महाकाव्य महाभारतातील पेंटींग हवी आहेत. आणी त्यासाठी त्यांनी मला ऑफर दिलीय. त्यांच्या चेअरमननी माझी काही पेंटींग दिल्लीतील त्यांच्या वास्तव्यात पाहिली होती. व त्यामुळे ती पेंटींग मीच काढावीत अशी त्यांची अपेक्षा आहे.” “ अरे पण मग तु त्यांना काही बोललास की नाही की तुझा अपघात झालाय व सध्या तुला पेंटींग करणं जमणं कठीण आहे” "अग, नाही मला काय बोलावे तेच सुचत नव्हतं आणि त्यांनी काही बोलायची संधीच दिली नाही. तुम्ही तुमची काय डिमांड आहे ते कळवा एवढं बोलून त्यांनी फोन बंद केला.” तिला आता बॉसच्या प्लॅन साधारण लक्षात येऊ लागला होता. तिने त्याला परत फोन आला तर स्पष्टपणे अपघातात विषयी बोल विनाकारण अंधारात ठेऊन नकोस असं सांगितलं व ती ऑफीसला आली.


इकडे तो आता अस्वस्थ झाला होता. इतकी चांगली संधी हातची जाणार ही रुखरुख लागली होती. तो विचार करुन थोडा वेळ शांत बसून राहिला व शेवटी त्यांचा फोन आला तर स्पष्टपणे वस्तुस्थिती सांगून रिकामे व्हावे हे त्याने मनोमनी ठरवले. नंतर सायंकाळी परत तोच फोन आला व त्यांनी विचारणा केली. त्यावर त्याने सर्व वस्तुस्थिती सांगून सध्या पेंटींग काढणे शक्य होणार नाही असं सांगितलं. व नंतर शांतपणे विमनस्क अवस्थेत दारुची बाटली काढून पित बसला. नंतर केव्हा झोप लागली हे त्यालाही कळले नाही. संध्याकाळी ती नेहमी प्रमाणे घरी आली पण तिने आपणहून तो विषय काढला नाही. असेच दोन दिवस गेले व एक दिवस सकाळी उजाडताच तोच फोन. त्यालाही आता आश्चर्य वाटले त्यांना आपण वस्तुस्थिती सांगून सुध्दा परत फोन म्हणून तो जरा नाराजीनेच फोन उचलला “ हॅलो “ पलिकडून तो परिचीत आवाज कानावर आला व मी मुंबईत आलो असून तुम्हाला भेटायला यायचे तर केव्हा येऊ अशी विचारणा केली. त्यावर काय ऊत्तर द्यावे हे क्षणभर त्यालाही कळेना. शेवटी दुपारी १२ वाजता भेटायचं ठरलं. त्याने तिला फोनवरील संभाषण सांगितले. त्यावर तीने “अरे भेटायला काय हरकत आहे भेटून तर बघ, कदाचित यातूनही काही मार्ग निघेल.” असं बोलून ती आवरुन ऑफीसला गेली त्यानंतर स्वताचे आवरले व तो त्या अपरिचित माणसाची वाट पाहू लागला.


बरोबर १२ वाजता बेल वाजली व त्याने दार उघडले. दाराबाहेर एक उंचपुरा गोरापान माणूस उभा होता. “मी जॉर्ज “ त्याने आपली ओळख करून दिली. त्यानं हसून त्यांचे स्वागत केले व त्यांना आत येऊन बसणेची विनंती केली. त्यांनी सरळ मूळ विषयावर येऊन बोलायला सुरुवात केली. “हे पहा आमच्या चेअरमननी तुमची दिल्ली येथील पेंटींग पाहिलीत व आमच्या हॉटेल मधील सर्व पेंटींग आम्हाला तुमच्या कडूनच हवीत” त्यावर त्याने अपघातात माझी बोटं अधू झाल्याने मी सध्या पेंटींग करु शकत नाही असं सांगून आपल्या हाताची बोटे त्यांना दाखवली. त्यावर हा विचार आम्ही केला आहे तुम्ही तुमचे एक्सरे व एम आर आय रिपोर्ट मला द्या मी ते लगेच स्कॅन करून आमच्या ऑफीसला पाठवणार आहे व ऑफीसमधे आता या क्षणी तिथे युएसए मधील तीन नामवंत सर्जन माझ्या रिपोर्टची वाट बघतायत असे सांगितले. त्याचा तर आता कशावरच विश्र्वास बसत नव्हता. त्याला एकामागून एक धक्के बसत होते. त्याने फाईल मधून दोन्ही रिपोर्ट काढून दिले व लगेच त्या व्यक्तीने ते स्कॅन करुन मेलने पाठवून दिले. व नंतर ते दोघे गप्पा मारत बसले. बरोबर १० मिनिटांत मेलला रिप्लाय आला व दोन्ही बोटावर सर्जरी करून त्यांना पुन्हा व्यवस्थित करणं शक्य आहे असा मेसेज आला. त्याला हे सर्व अचंबीत करणारं होतं. नंतर दोघांनी चर्चा करून दोन दिवसांत करार करण्याचे ठरविले. या सगळ्याचा एक सकारात्मक परिणाम म्हणजे गेल्या दोन-तीन दिवसांपासून तो याच विषयावर विचार करत असल्याने त्याला दारुची आठवण सुद्धा झाली नव्हती. आज तो किती तरी दिवसांनी तिची आतूरतेने वाट पहात होता. तिला कधी एकदा सांगतो असे झाले होते. 


सायंकाळी नेहमी प्रमाणे ती घरी आली तर दारात तो तिची वाट पहात असलेला दिसला. चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. “अरे काय एकदम खुश काही विशेष” तिनं आत येता येता विचारणा केली. “ बाकी सगळं राहू दे, तु आधी इथं बैस मग सांगतो “तिने पर्स तशीच बेडवर टाकली व त्याच्या शेजारी येऊन बसली. बरेच दिवसांच्या रुसव्या फुग्यामुळे दोघांनाही काय बोलावे सुचत नव्हते. शेवटी तिनेच त्याचा हात हातात घेतला व म्हणाली “हं बोल आता.” यावर त्याने तिला सर्व सांगून तिचे हातावर ओठ टेकले. तिने त्याच्या केसातून हात फिरवत त्याला प्रेमाने जवळ घेऊन मिठी मारली दोघांच्या डोळ्यांतून अश्रू वहात होते. थोडं सावरल्यावर ती म्हणाली “आता दोन दिवस सुध्दा वाट बघू नकोस, त्यांना लगेच फोन करून कळव. त्यानंतर त्याने फोनवरून आपला होकार कळवला. त्याची फक्त एक अट होती ऑपरेशन साठी अमेरिकेत येताना पत्नी बरोबर हवी होती. त्याची विनंती मान्य होऊन दोघांची विमानाची तिकिटे आली. तिने ऑफीसमधून एक महिना रजा मंजूर करून घेतली होती. शेवटी आज तो दिवस आला. आज ती दोघे विमानाने अमेरिकेला प्रयाण करणार होते. सर्व तयारी करून त्यांनी विमानतळाकडे प्रयाण केले. तेथील सर्व सोपस्कार उरकून विमानाने आकाशात झेप घेतली व तिने शांतपणे डोळे मिटून खुर्चीवर मान टेकली. बरेच दिवसांनी तिला शांत झोप लागली होती. त्याने एकदा तिच्या चेहऱ्यावरील समाधान पाहिले व तोही शांतपणे झोपी गेला. एअर होस्टेसच्या घोषणेनंतर त्याला जाग आली. विमानतळावरून त्यांच्या रहाण्याच्या हॉटेलपर्यंत वाहनांची सोय केलेली होती. दोघेही गाडीत येऊन बसले व तिचा पुन्हा डोळा लागला. तो मात्र जागाच होता. मोबाईल काढून त्याने मिस्टर जॉर्ज यांना फोन करुन आपण अमेरिकेत पोहोचल्याचे कळवले. इतक्यात तिच्या फोनची रिंग वाजली. त्याने पाहिले तर ती अजून झोपेतच होती. सहजच ऊत्सूकतेने त्याने फोन बघीतला. त्यावरील मेसेज पाहून त्यांचे डोळे खाडकन उघडले व तिच्या प्रेमाने त्यांचा ऊर भरून आला. फोनवरील मेसेज तिचा बॉस व त्याच्या बालमित्राचा होता. “तुझ्याशी बोलल्या प्रमाणे सर्व काही व्यवस्थित झाले आहे. आता ऑपरेशन झाले नंतर तो पुन्हा एकदा दर्जेदार पेंटींग काढेल याची खात्री आहेच. मी लहानपणापासून त्याला ओळखतो. तो एक मनस्वी कलाकार आहे. तसाच तो एक प्रेमळ व हळवा मित्र आहे. तितकाच तो स्वाभिमानी आहे. त्यामुळे मी या कामात मदत केली हे त्याला कदाचित आवडणार नाही. पण मी हे स्पष्ट करतो की मी यात काही फार मोठी मदत केली अशातला भाग नाही. मी हा हॉटेल प्रोजेक्ट केला व जेव्हा हॉटेलच्या चेअरमननी महाभारतातील पोर्टेटचा विषय काढला त्याच वेळी प्रथम माझ्या नजरेसमोर आला तो माझा मित्र. मीच मग त्यांना दिल्लीतील त्याची काही पोर्टेट दाखवली व त्यांनी ही पोर्टेट त्यांचेकडूनच काढायचे निश्र्चीत केले.नंतर मी तुला याची कल्पना दिली. त्यानंतरच्या सर्व घटना तुलाही माहीत आहेतच. यात कोणताही ऊपकाराचा भाग नाही तर माझ्या एका कलाकार मित्राचे भरकटलेले आयुष्य सावरणे एवढाच हेतू आहे. ऑपरेशन करून लवकर भारतात येऊन तो पुन्हा उभारी घेतलेला माझा मित्र मला लवकरात लवकर मिळवून दे. ऑल दि बेस्ट.

हे सर्व वाचून त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वहात होते व पत्नी व आपल्या मित्राच्या प्रेमाने त्याला आता जग जिंकल्याचा आनंद झाला होता. त्याने तिच्याकडे एकदा प्रेमळ कटाक्ष टाकून तिच्या अर्धोन्मिलीत डोळ्यांवर ओठ टेकले व शांतपणे डोळे मिटून सीटवर मान टेकली. एका नव्या सहजीवनाचा आज नव्याने प्रारंभ होत होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy