नुसरत मंझिल
नुसरत मंझिल


मला गोष्ट सांगायला तसं तर मुळीच आवडत नाही , किंवा मी काहीसा माणूस घाणा ही आहे , अर्थात ते तसं का याची पण एक मोठीच गोष्ट आहे, आता मला एकट्याला कंटाळा आलाय खुप काळ लोटलाय , मला एकांतात राहून राहून मी कदाचित पशु बनेन अशी भिती वाटते आहे मला,
म्हणून माझा कंटाळा घालवायला ,किंवा तुम्हाला त्रास द्यायला म्हणा, किंवा मी भित्रा, घाबरट आहे असं म्हणा, पण ही एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटतेय, का ? कदाचित मलाही नाही माहीत ! तुम्हीच गोष्ट ऐकून झाली की सांगा का ते !
आत्ता मला ती जुनी पुराणी, गलितगात्र झालेली ,आपलं अस्तित्व टिकवून राहण्याचा प्रत्येक शक्यतो प्रयत्न करणारी, पण तरीही परिस्थिती समोर हरणारी हवेली दिसतेय, हवेली , दयालबाग जवळची ती निसर्गाच्या सानिध्यात वसलेली , शांत ,सुंदर हवेली जी कधीकाळी साऱ्या लखनौची शानोशौकत होती, हवेली ,जिने कधीकाळी ऊँची शराब पाण्यासारखी वाहताना पाहिली होती , नवाब शुजाखान ची, अतिशय आवडती, दिलके करीब असलेली .
अर्थात , ही नवाबांची एकच हवेली नाही.पण त्याची सर्वांत जास्त आवडती , कारण ती एका खास व्यक्तीसाठी बनवली गेली होती. लखनौमध्ये क्वचितच एखादा बाशिंदा असा असेल ज्याने या हवेलीत नवाबांचा पाहुणचार घेतला नसेल . सगळ्यांना , अमीर-गरीब , रंक-रावांना या हवेलीबद्दल प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे माहिती होतीच ; ही हवेली नवाबाने आपल्या सर्वांत तरुण बेगमेसाठी , नुसरतसाठी बनवली होती, नुसरत नवाबापेक्षा जवळपास १०-१५ वर्षांनी तरुण, त्याच्या मुलीच्या वयाची होती, अर्थात , शेवटी ती नवाबाचा जीवश्च कंठश्च यार नवाब लियाकतची एकुलती एक बेटी होती, एखाद्या खानदानी नवाबप्रमाणे त्याने आपल्या मुलीचा लियाकत शी आणि त्याच्या बेटीशी स्वतः निकाह केला होता. तसंच एका अस्सल नवाबप्रमाणे लढाई , जंग करायलाही कधी नवाब शुजा जात नसे , ती कामं एखाद्या मर्दाला करायला दिली जात, बरोबरच आहे म्हणा जर नवाब जंग करायला गेला तर मग बकऱ्याची झुंज, ऐयाशी, नाचगाण्याच्या मैफिलींना कोण जाऊन त्यांची शोभा वाढवेल .
पण ती एक लढाई मात्र अतिशय संहारक होती, फतेहपुरच्या कुंवरशी जशी शुजाने जंग छेडली , तशीच ती कुंवर ने मोडून पाडली जंग इतकी भयानक होती की सैनिकांची मुंडकी छाटून शुजाकडे पाठवली गेली , रक्ताचे पाट वाहू लागले, हाहाकार माजला. आता नवाबाच्या लक्षात आलं की आपल्याला असा सिपेहसलार पाहिजे , असा मर्द पाहिजे, जो या सगळ्याचा बदला घेऊ शकेल , आपली कुंवरने लुटून नेलेली , इज्जत परत आणू शकेल ,या सगळ्यातच कोणीतरी नवाबची भेट झोरावरशी घालून दिली , जोरावर एक पक्का सिपेहसलार , असा शिपाई ज्याच्यावर पाहता क्षणी नवाबाचा विश्वास बसला आणि त्याला नवाबाने कामगिरी दिली, की फतेहपुरच्या कुंवरला जंगमध्ये हरवलंस तर सोन्या नाण्याने तुला मढविन , आणि जर त्याचं मस्तक आणलंस तर तुझी प्रत्येक मुराद पुरी होईल . झोरावरने ही नवाबाला पाहताक्षणी ठरवलं होतं की, याचं मन मोडायचं नाही, याने दिलेली कामगिरी फत्ते करूनच दाखवायची !
मग काय तर, जंग झाली , जबरस जंग झाली, तसे तर नवाबचे शिपाई निकम्मेच होते, पण अल्ला जाने, झोरावर ने काय करिश्मा केला की ते निकम्मे एकदम ,तंदुरुस्त शिपाई बनले आणि त्यांनी झोरावरच्या राहनुमाई खाली कुंवर च्या सैन्याचा फ़डशाच पाडला, अशी लूट माजली की काय स्त्रिया, काय म्हातारे कोतारे, कोणीच यातुन सुटलं नाही , फतेहपुर वर सतत दोन दिवस झोरावर कहर बरसवत होता, शेवटी कुंवरने आपल्या लोकांचे हालहाल पाहून शरणागती पत्करली आणि मग त्याला घोड्याच्या मागे मुसक्या आवळून घेऊन झोरावर फरपटत लखनौ पर्यंत घेऊन आला. नवाबाच्या पुढ्यात त्याला टाकून , झोरावर म्हणाला, ‛लिजीए आपका , कुंवर नवाब साब, आपसे दुष्मनी का क्या हश्र होताहे ये सबको पता चलने दो, इसके हाथ पाँव तोड़के इसे शहर के बाहर फेंक दे ?’ नवाब कुंवर ला बघून म्हणाला, 'कुंवर एक बहाद्दर आहे, अस काहीतरी करायला हव की त्याची बहादूरी निघून जाईल .' कुंवर म्हणाला ,‛वीराची बहादुरी मृत्यूत आहे ' , त्यावर झोरावरने म्हटले, ‛मौत तो आसान है, जब वो आहिस्ता आहिस्ता मिले तब असली मजा हैं', पण नवाब खरंतर काहीसा हलक्या दिलाचा, काहीश्या मुलायम स्वभावाचा होता म्हणून त्याने कुंवरला एक संधी द्यावी असं ठरवलं आणि त्याने सांगितलं, ‛कुंवर अजूनही वेळ गेली नाही, मला शरण ये आणि तुझा जीव वाचव’ , पण कुंवर काही केल्या ऐकायला तयार नव्हता, त्याने राग, शरम अशा संमिश्र भवनांसकट सांगितलं,‛ माझी नखं उपटून काढली तरी देखील मी तुझ्या पायावर डोकं ठेवणार नाही, मी शरण येणार नाही ’
त्यावर शुजाने झोरावरला सांगितलं, ‛कुंवर आपले मेहमान आहेत, त्यांची एकेक मुराद पुरी करणं आपली जबाबदारी आहे ’ , त्यांनतर गरम लोखंडी चिमट्याने कुंवरची हातापायांची नखं उपटून काढली गेली , अजूनही नवाबाने एक संधी द्यावि असं ठरवू
न म्हणाला, ‛अब भी समय है कुंवर , माफी मग आणि तुझा जीव वाचव’ , तरीही कुंवर काही मोडायला तयार नव्हता, त्यानेही संतापाच्या भरात आपला मानसन्मान पणाला लावून उत्तर दिलं, ‛ जीभ हासडून काढलीस तरी या दोन पैशाच्या नवाबाला मी शरण येणार नाही’ यावर मात्र नवाब भडकला, आणि झोरावरला त्याने कुंवरला हातापायांत खिळे ठोकून एका चौकात टांगून ठेवण्याची आज्ञा केली , कुंवरच्या शिक्षेचा मजमा लागला, येता जाता लोकं त्याला बघून , थरथरू लागली ! झोरावर कुंवरला म्हणाला , ‛अभी भी तेरी अकड गयी नहीं, अब तो तेरा वो हश्र होगा , जिसे देख कर सब लोग डर से कापेंगे' आणि नवाबाने दवंडी पिटली , ‛जो कोणी कुंवरला दया दाखवेल , त्याचीही हालत देखील अशीच केली जाईल’ .
आपल्या शेवटच्या क्षणांत कुंवर झोरावरला म्हणाला, ‛ झोरावर, लक्षात ठेव, जो नवाब माझ्याबरोबर अशी वागणूक करतोय, तो कोणाचाच असू शकत नाही .’ त्यांनतर कुंवरच्या शरीराचे कावळे - गिधाडांनि चवीचवीने लचके तोडले, काही दिवसांत लोक कुंवर बद्दल विसरले, झोरावर देखील विसरला की पेरणी झाली की कापणी होतेच, पण मरणाऱ्याचा शाप , कित्येक वर्ष अपूर्णच राहतो.
फतेहपुरची लढाई भले लहान असेल, ओण त्या लढाईने झोरावर नवाबाच्या नजरेत खूप भरला, त्याचं महत्व अचानक खुप वाढलं, त्याचा रुतबा वाढला, कोणाविरुद्ध जर झोरावरने एक शब्द देखील काढला की त्याची कम्बख्ति आलीच, अगदी जनानखान्यात देखील झोरावरला बेधडक प्रवेश होता .पण नुसरत मंझील , हा नुसरत मंझीलची बातच न्यारी, तिथे फक्त एकाच मर्दाला प्रवेश दिला जात होता , स्वतः नवाब शुजाला . एक दिवशी नवाब नुसरत मंझील मध्ये आपल्या बेगमेसोबत बसला होता, तेव्हा ती म्हणाली, ‛तुम्ही माझ्यापेक्षा जास्त वेळ तर इतरच घालवता, माझ्यावर प्रेम आहे की नाही, इथे आसपास किती जंगली प्राणी आहेत, पर्वा तर रुक्झाना वर बिबळ्याने हल्ला केला, जीव धोक्यात आला होता, हात तर मुळापासून तुटला तिचा .’ त्यावर मस्करी करत नवाब म्हणाला , तुमच्यासाठी अजून दोन चार, दुरुस्त रुक्झाना पाठवून देऊ.’ बेगम रागावून म्हणाली, ‛तुम्हाला तर मी नकोच आहे,कधी एकदा मी मरतेय याचीच वाट बघत आहात तुम्ही !’ त्यावर नवाब म्हणाला ,‛ आता आम्ही नवाब आहोत , म्हणजे काय एका वेळी , दोन ठिकाणी नाही ना असू शकत, आता मेळ्याची तयारी करायची आहे, गेल्यावेळी सारखा नवाब उत्तनचा बकरा जिंकला तर आमची इज्जत पुन्हा धुळीला मिळेल .’
नवाब त्यांनतर आपल्या आग्ऱ्यातल्या हवेलीत येऊन बराच वेळ विचार करून शेवटी नवाबाने काही तरी, ठरवलं आणि एका सेवकाला झोरावरला बोलवायला सांगितलं,
थोड्याच वेळात झोरावर हवेलीत आला , आणि नवाबाला म्हणाला , 'बंदा आपकी खिदमत में हाजीर हैं , नवाब साब क्या हुक्म हैं ? ' ते ऐकूनही नवाबच्या चेहऱ्यावर आनंद दिसला नाही , ही गोष्ट झोरावरच्या हवेलीत येताक्षणीच लक्षात आली होती की, नबाब आज काहीसा चिंतेत आहे , त्याला कसलातरी घोर लागलाय , तो पुन्हा एकदा म्हणाला , ' नवाब साब , क्या हुक्म हैं बंदे के लिये , आप कुछ परेशान लग रहे हैं , सब खैर तो हैं ना ? ' नवाब म्हणाला, ' झोरावर मियाँ , आम्ही अल्लाच्या मेहेरबानीने ठीक आहोत पण आमची जान .........' त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधीच झोरावर बोलला ,' खुदा आपकी जान सलामत रखे .' त्यावर हसून नवाब म्हणाला ,' हमारी पुरी बात तो सुन लो मियाँ , आमची जान म्हणजे , बेगम नुसरत , यांच्याबद्दल बोलतो आहोत , त्यांना आम्ही नवीन हवेली बांधून दिली आहे हे तुम्हाला माहीत असेलच , तर आता मसला असा आहे मियाँ, की आम्ही इथे अडकून पडलोय बकर्यांच्या झुंजीच्या तयारीत, आणि आमची जान बेगम आहेत नुसरत मंजिल मध्ये , आणि सध्या ना आम्ही तिकडे जाऊ शकतो, ना बेगम इथे यायला तयार आहेत , तर आमची तुम्हाला एक विनंती आहे .' त्यावर लगेच झोरावर म्हणाला ,'नवाब साब आप हुक्म करो, और हम उसकी तामिली करेंगे , दरखास्त नहीं .' हे ऐकून नवाब अतिशय आनंदून बोलला ,' आमची इच्छा आपण बरोब्बर ओळखली झोरावर मियाँ , तुमच्यासारख्या भरोसेमंद , आणि सही सही जबाबदारीची जाणीव असणाऱ्यावरच ही कामगिरी सोपवायची होती , तर मामला असा आहे की , नुसरत मंजिल ही आम्ही खास शोरशराब्यापासून , गोंधळापासून दूरच बांधली आहे , कारण आम्हाला आणि बेगमसाहिबांना एकांत फार आवडतो , तो इतर कुठेच मिळत नाही , पण या एकांताची किंमत म्हणूनच की काय नुसरत मंजिलच्या जवळपासच्या जंगलातून कुठल्यातरी बिबळ्याने काही दिवसांपूर्वी हवेलितल्या एका नोकरावर हल्ला केला , अल्लामेहेरबानी मुळे तिचा हातच या हल्ल्यात कामी आला , तिच्या जीवाला काही झालं नाही , पण यामुळे आम्हाला बेगमसाहिबांच्या जीवाची काळजी लागून राहिली आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला तिकडे पाठवून बेगमसाहिबांच्या रखवलीची जबाबदारी देत आहोत , तुम्ही आम्हाला जवळचे आहात , मित्रापेक्षाही भावासारखे आहात म्हणून तुमचीच या मोहिमेवर नेमणूक केली आहे .' ते ऐकून झोरावरनेही जबाबदारी स्वीकारली आणि नवाबाचा निरोप घेऊन आपले काही विश्वासू साथीदार घेऊन तो नुसरत मंजिल कडे घोडदौड करू लागला !