STORYMIRROR

Naresh Dhotkar

Tragedy

3  

Naresh Dhotkar

Tragedy

नियती

नियती

19 mins
207

त्या दिवशी , त्या मोठ्या वात्सल्य चाळी समोरील, बिशप चर्चच्या इमारतीवरील टाॅवरच्या घड्याळीने, सकाळचे आठ वाजल्याचे ठोके दिले.

उन्हाळा असल्याने एव्हाना सूर्य आकाशात बराच वर आला होता. त्या चर्चच्या बाजूला असलेल्या मैदानातील मोठ्या वृक्षावर पक्ष्यांचा चिवचिवाट, त्या चाळीपर्यंतही ऐकू येत होता.

त्या तीन मजली भव्य वात्सल्य चाळीतील रहिवाशांनी सकाळपासूनच कामावर जाण्यासाठी आपापली तयारी सुरू केली होती. त्यामूळे चाळीतले सर्व रहिवासी त्यांच्या तयारीच्या कामात व्यग्र झाले होते.

वात्सल्य चाळीतल्या कांही खोल्यांच्या स्वयंपाकगृहातून भाजीला दिलेल्या फोडणीचा सुवास खालच्या प्रांगणात पोहचला होता.

त्या वात्सल्य चाळीतल्या तिस-या मजल्यावरील ३०२ नंबरच्या खोलीचे दार आताही बंद होते.

वात्सल्य चाळीतल्या सर्व मजल्यावरील प्रत्येक ब्लॉक मध्ये समोरची पंधरा बाय दहा फूट आकाराची हाॅल कम बेडरूम व आठ बाय दहाची स्वयंपाक खोली व त्यालाच जोडून टॉयलेट बाथरूम, अशी वन आरके सारखी प्रत्येक ब्लॉक मध्ये व्यवस्था होती.

वात्सल्य चाळीतल्या या ३०२ नंबरच्या ब्लॉक वजा खोली मध्ये समोरील हॉल वजा खोलीत, सर्व ठिकाणी असतो तसा कोप-यात ठेवलेला एक सोफा कम बेड, त्याच्या बाजूला एक मोठा डबल बेड, खोलीच्या मध्ये एक छोटा टिपाॅय व समोर प्लास्टिक खुर्ची इत्यादी गरजेचं साहित्य होतं. याच खोलीत मुलांची खेळणी इतस्ततः विखरून पडलेली होती.

त्या दिवशी चर्चच्या टाॅवरवरील घड्याळीनं सकाळी आठ वाजल्याचे ठोके दिले आणि त्या बरोबर आकाशी रंगाच्या साडीचा पदर कमरेत खोचून, तेवीस वर्षीय गौरवर्णीय स्मिता, आपल्या हाताला लागलेलं गव्हाचं पीठ, मळसर कपड्याने पुसत समोरच्या खोलीत आली.

खोलीत आल्याआल्या तिची दृष्टी सोफ्यावर झोपलेल्या तीन वर्षाच्या गोंडस मुलीवर गेली.

नंतर लगेच तिनं कमरेवर दोन्ही हात ठेवून, तोंडावर पांघरूण घेऊन आताही बेडवर झोपलेल्या, पंचेवीस वर्षीय पती राहुलकडे लटक्या रागात बघितलं.

सकाळी सात वाजेपासून, दहावेळा आवाज देऊनही राहूलला अजूनही झोपलेल्या अवस्थेत बघून स्मिताच्या कपाळावर आठ्या आल्या. तिनं कमरेवर दोन्ही हात तशाच ठेवलेल्या अवस्थेत राहुलकडे आता रागात बघितलं.

मग तिनं झोपलेल्या राहुलच्या अंगावरचं पांघरूण खस्कन आपल्याकडे ओढलं आणि एका झटक्यात ते खाली फेकलं.

स्मिताने आपलं तोंड राहुलच्या कानाजवळ आणून जोरातच ती ओरडली "अहो, ऐकताय ना? "

अगदी कानाजवळ पत्नी स्मिता एकदम ओरडल्यानं, राहूल एकदम दचकून जागा झाला.

तो लगेच बेडवर उठून बसला आणि डोळे न उघडता त्यानं घाबरत विचारलं "एवढं जोरात ओरडायला काय झालं स्मिता ? कशासाठी ओरडलीस तू ? "

स्मिता कपाळावर हात मारत त्राग्यात म्हणाली "बाई, बाई...आता काय म्हणावं तुमच्या या बेजबाबदार पणाला? "

राहूलनं डोळे न उघडता चिडक्या स्वरात विचारलं "उशीरा उठणं, यात कसला आलाय बेजबाबदारपणा?"

आता त्यानं आपले डोळे उघडले आणि खाली फेकलेलं पांघरूण उचलत जांभई देत म्हणाला "अगं, मला थोडं झोपू दे ना. तुला तर माहितच आहे, आपणाला झोपायला किती उशीर झालाय ते? "

ते ऐकताच तिच्या रागाचा पारा खाली आला. तिनं एका क्षणासाठी सोफ्यावर झोपलेल्या छकुलीकडे बघितलं आणि राहुलच्या खांद्यावर हात ठेऊन प्रेमळपणे म्हणाली "हो, माहित आहे मला, आपणा दोघांनाही झोपायला रात्रीचे दोन वाजलेत."

राहुल परत चादर अंगावर घेत म्हणाला "मग? माहित आहे ना तुला? म्हणून झोपू दे की थोडावेळ" असं म्हणत तो बेडवर आडवं होण्यासाठी अचानक मागे झुकला.

आताही स्मिताचे दोन्ही हात राहुलच्या खांद्यावरच होते. झोपण्यासाठी तो पलंगावर अचानक आडवा झाला, त्यामुळे तोल सावरता न आल्यानं ती पण त्याच्या अंगावर पडली.

राहुलनं आपले दोन्ही हात तिच्या कमरेभोवती टाकले. त्याच्या मिठीतून स्वत:ला न सोडवता, स्मिता त्याला लाडिकपणे म्हणाली "अहो, असं काय करताय गडे ? सोडा नं मला ! मला माहित आहे. रात्री तुमची झोप पूर्ण झाली नाही. रात्री साडेअकराला आपल्या छकुलीला अचानक ताप आला व तो ताप उतरावा म्हणून आपण दोन वाजेपर्यंत तिच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया दोन-दोन मिनीटांनी बदलवत होतो. तिचा ताप उतरेपर्यंत आपण काळजीत होतो. ताप उतरल्यावरच आपण झोपलो."

राहुलने तिच्या कमरेभोवतीचा आपला पाश त्यानं जरा सैल केला. ती उठून उभी झाली आणि विस्कटलेली साडी तिनं ठिक केली.

राहुल झोपेसाठी परत कूस बदलत असल्याचं बघितलं आणि चिडून त्याच्या अंगावरचं पांघरून खस्कन् आपल्याकडे ओढून ते पुन्हा फरशीवर फेकून दिलं.

आता त्याच्या खांद्याला गदागदा हलवत स्मिता म्हणाली "अहो,परत तेच-तेच असं काय करताय तुम्ही? मलाही तुमच्या एवढंच जागरण झालंय ना? आणि सक्काळी उठून मी पाणी भरलं की नाही? "

राहुल तस्सेच डोळे बंद ठेऊन म्हणाला "पण घरी तुला दुपारची डाराडूर झोप तरी घेता येते. पण मला तर ऑफिसमध्ये जागंच रहावं लागतं ना."

राहुलनं ऑफिसचं नांव घेताक्षणीच तिनं आपल्या कपाळावर हात मारला आणि म्हणाली "अहो, आत्ता मला आठवलं. काल रात्री तुम्ही म्हणत होता ना, मिटिंगमूळे आज तुम्हाला ऑफिसला दहाच्या आधी पोहचायचं आहे म्हणून? "

मीटिंगचं नांव स्मिताच्या तोंडून निघताक्षणीचं राहूल बेडवरून पटकन् उठला आणि डोळे चोळून तो रागात म्हणाला "हे, हे तूं मला आता सांगत्येस?"

मग घड्याळाकडे लक्ष जाताच बेडवरून खाली उडी घेत म्हणाला "आणि ते ही आत्ता सव्वाआठ वाजता? अरे देवा, मला आता एका तासात सारी तयारी करावी लागेल जायची. तिकडं ऑफिस मीटिंगची तयारी साडेदहा पूर्वी केली नाही तर बाॅस फाडून खाईल ना मला" असं म्हणत त्यानं बेडजवळची चप्पल घाईनं पायात घातली व त्याच वेगात मागे फिरल्यानं, त्याच्या मागे उभ्या असलेल्या स्मिताला त्याचा हलकासा धक्का लागला.

राहुलच्या मजबूत शरीराच्या हलक्या धक्क्यामूळेही ती खाली पडणारच होती पण राहुलनं लगेच डावा हात लांब करून तिला अधांतरीच धरलं आणि ती सरळ त्याच्या बाहुपाशात आली.

पण लगेच त्याच्या बाहुपाशातून स्वत:ला सोडवून घेत हसून ती म्हणाली "फाजीलपणा पुरे झाला आता आणि तुम्ही किनई, नेहमी असंच करता. जेव्हा बघावं तेव्हा घाई व गडबड. अशानं कसं होईल तुमचं. मला कांही कळतच नाही"

राहुलनं घाईनं लुंगी कमरेभोवती गुंडाळली आणि म्हणाला "अगं माझे बाई, वटवट पुरे कर आणि लवकर बाजूला हो. मला जाऊ दे एकदाचं बाथरूममध्ये" असं म्हणत त्यानं तिला एका हाताने बाजूला केलं आणि तो बाथरूममध्ये निघून गेला.

ती ओरडून म्हणाली "अहो, तुमचा टूथब्रश, पेस्ट,गरम पाणी व कपडे, सारं सारं अगोदरच बाथरूममध्ये ठेवलेलं आहे. तेव्हां आता सर्व कांही उरकूनच बाहेर या तुम्ही."

मग स्मितानं छकुलीकडे मायेनं बघितलं. कालच्या तापाने मलूल झाली होती बिचारी. तिनं पूढे जाऊन छकुलीच्या कपाळाचं हळूच चुंबन घेतलं व तिच्या हाताला चाचपडत आता तिला ताप नसल्याची खात्री केली. छकुलीला ताप नसल्याचं बघून तिच्या चेह-यावर समाधान झळकलं.

लगेच तिनं किचनमध्ये जाऊन दहा मिनीटात त्याच्यासाठी नाश्ता तयार केला.

राहुल पंधरा मिनिटात बाथरूम बाहेर आला. ऑफिसला जाण्यासाठी लगेच त्यानं आपली तयारी जरा वेगातच सुरू केली.

पायात मोजे घातल्यावर त्यानं ऑफिसचा ड्रेस अंगावर चढवून त्यावर लाल रंगाची जर्सी घातली. आता तो खुर्चीत बसून बूट घालणार, त्याचवेळेला नाश्ता आणून तो टिपाॅयवर ठेवत स्मिता म्हणाली "हां, आता नाश्ता करून मगच जा ऑफिसला."

बूट घालून तो खुर्चीवरून उठला आणि कपाळावर आठ्या चढवून म्हणाला "ए माझे बाई, आता पावणेनऊ झालेत. प्लीज ,आता मला नाश्त्यासाठी आग्रह करू नकोस. ऑफिस बॅग आणून दे मला लवकर."

स्मिता म्हणाली "तुमची ऑफिस बॅग रेडी केली आहे मी. पण असे कसे हो तुम्ही ? नाश्ता पण नको म्हणता." त्यानंतर कडक स्वरात म्हणाली "नाश्ता खायला सुरू करा आधी" म्हणत तिनं त्याला खुर्चीवर बसवलं.

प्लेटमध्ये त्याच्या आवडीचे कांदेपोहे होते. तो घाईघाईने नाश्ता खायला लागला पण ऑफिसच्या गडबडीने तो कसातरीच नाश्ता करीत आहे, ते बघून ती म्हणाली "अहो नाश्ता जरा दमानं खा. कुठे पळून नाही चालला तो. प्रत्येक वेळेला नेहमी तुमची घाईच असते अन् या घाईघाईत कांही गडबड झाली नाही, म्हणजे मिळवली" 

ते ऐकून राहुलला एकदम ठसका लागला. ग्लासातलं पाणी पिल्यावर तो म्हणाला "आता हा बाकीचा नाश्ता तूच खाशील. आता मला उशीर होतोय ऑफिसला जायला. " 

स्मिता जरा चिडूनच म्हणाली "बाई बाई, कित्ती घाई करताय हो तुम्ही? जेव्हा बघावं तेव्हा घाईच घाई "

राहुलही चिडून म्हणाला "आज तू जास्तच वटवट करत्येस? चल, लवकर माझी बॅग आणून दे "

बोलता बोलता त्याचं लक्ष छकुलीकडे गेलं आणि तो एकदम शांत झाला.लगेच तो सोफ्यावर झोपलेल्या छकुलीजवळ गेला.

दरम्यान तिनं राहुलची ऑफिस बॅग खुर्चीवर आणून देवली आणि लगेच त्याचं हेल्मेट बाजूच्या टेबलवर आणून ठेवून दिलं व त्याच्या पाठीमागून तिनंही छकुलीकडे बघितलं.

राहुलनं छकुलीच्या कपाळाला हात लावून बघितलं. आता तिला आता ताप नव्हता.

स्मिता म्हणाली "आता तिचा ताप उतरला आहे वाटतं. नाही?"

राहुल म्हणाला " होय. छकुलीचा ताप पूर्ण उतरला आहे. तरीपण मी गेल्यावर छकुलीच्या प्रकृतीकडे जरा लक्ष दे. तिचा ताप वारंवार चेक करत रहा. ताप वाढल्यासारखा वाटला तर लगेच तिला डाॅक्टरकडे घेऊन जाशील. यांत हयगय केलेली मुळीच खपवून घेणार नाही मी."

स्मिता खुर्चीवर ठेवलेली बॅग त्याच्या हातात देत हसून म्हणाली "मला माहित्येय, खूप जीव आहे तुमचा छकुलीवर.पण मी देखील तिचीच आई आहे म्हटलं. काळजी करू नका तुम्ही. ताप वाटला तर घेऊनच जाईल डाॅक्टरकडे. आता ही बॅग घ्या आणि काळजी न करता ऑफिसला जा तुम्ही."

स्मितानं हातात दिलेली ऑफिस बॅग, ती पाठीवर लटकावून तो हसून म्हणाला "बरं बरं, आता जास्त पारायण करू नकोस. मी छकुलीकडे एकदा बघतो." म्हणत त्यानं छकुलीच्या गालावरून हलकासा हात फिरवला.

ओळखीचा स्पर्श जाणवला म्हणून की काय, छकुलीनं लगेच आपले डोळे उघडले. पप्पा राहुलला समोर बघताच छकुली निरागसपणे मधूर हसली. पण त्या हसण्यात अशक्तपणा दिसत होता.

राहुलनं छकुलीला हसत लाडात विचारलं "माझ्या छकुल्या, कसं वाटतंय बेटा आता तुला? "

छकुली निरागसपणे बोबड्या स्वरात म्हणाली " पप्पू, आता मला बरं वाटतंय."

राहुल तिचा लाड करीत म्हणाला " खूप छान बेटा."

छकुली म्हणाली " पप्पू , आता कुठे जात आहात तुम्ही? थांबा ना थोडा वेळ."

राहुल तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला "छकुली बेटा, पप्पू आता ऑफिसला जाणार. मला उशीर होतोय ना ऑफिसला जायला. बरं, आज शाळेत जायचं नाही हं बेटा...."

पण तिचा मलूल उतरलेला चेहरा बघूनच त्याला पुढे बोलता येईना. त्याच्या गळ्यात आवंढा दाटून आला. डोळ्यात जमा होणारे अश्रू त्या दोघींना दिसू नयेत, याची काळजी घेत त्याने दोघींकडे पाठ केली.

तेवढ्यात मागाहून छकुलीचा आवाज आला "पप्पूsss"

तिच्याकडे न बघता त्यानं विचारलं "बोल बेटा लवकर. मला ऑफिसला जायला खरंच उशीर होतोय बेटा "

छकुली फुरंगटून म्हणाली "मग जा ना लवकर ऑफिसला. तुमची नेहमीच घाई असते.तुम्ही मला मुळी वेळच नाही देत नाही पप्पू."

ते ऐकून राहुलला राहवलं नाही. परत फिरून तो तिच्याजवळ गेला आणि विचारलं "तसं नाही बेटा, ऑफिसपूढे तुझ्या पप्पूचं कांहीच चालत नाही बेटा. आता लवकर सांग बेटा, काय म्हणतेस तू? "

छकुली बोबड्या स्वरात म्हणाली " पप्पू, आपण त्यादिवशी दुकानात बघितली ना तीच डाॅल मला आजच पाहिजे. नेहमी आणतो आणतो म्हणता अन् विसरूनच जाता. आज विसरायचं नाही हं पप्पू. प्राॅमिस? सायंकाळी दारात बसूनच मी तुमची वाट बघेल. तुम्ही डाॅल घेऊन येईपर्यंत मी दारातून घरात परत जाणार नाही पप्पू. "

राहुल उठून हसत म्हणाला"ओक्के बेटा. प्राॅमिस करतो तुला. काहीही झालं तरी तुझी ती डाॅल सोबत घेऊनच परत येईल मी घरी. अच्छा, जातो मी आता."

ते ऐकताच स्मिता लगेच अस्वस्थ होऊन म्हणाली "अहो, बाहेर जातांना असं " जातो" म्हणू नये, "येतो" असं म्हणायचं असतं आणि हे बघा, काळजीमूळे मी परत सांगत्ये तुम्हाला. हेल्मेट विसरायचं नाही व ऑफिसला उशीर होतोय म्हणून सडकेवर जास्त स्पीडने गाडी चालवायची नाही आणि हो, समोरच्या गाडीवाल्यांना पुढे जाऊ द्यायचं. उगाचच त्यांच्या पूढे जाण्याची स्पर्धा करू नका तुम्ही. तुमच्या मागे आम्ही आहोत म्हटलं, आमची पण आठवण असू द्या तुम्ही. तेव्हा जरा..... "

पण तिचं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच राहुल तिला म्हणाला   " ए माझे बाई, आता तुझी वटवट बंद कर बघू. जाण्याच्या वेळेला माझा मूड ऑफ करू नकोस तू."

मग स्मिताच्या चेह-याकडे बारकाईने बघत विचारलं "आणि काय गं, तू वारंवार डोळ्यांची अशी उघडझाप कशाला करत्येस? "

स्मिता डोळ्यासमोरून हलकेच बोट फिरवून, उदासलेल्या स्वरात म्हणाली "कांही समजतच नाही मला.आताच असं कां बरं होतंय ते. यापूर्वी असं तर कधी झालं नाही. आत्ताच डोळ्यांचं फडफडणं सुरू झालं आणि जीव पण घाबरल्यासारखा वाटतोय मला."

राहुल म्हणाला "तू उगीचच जास्त बडबड व चिंता करतेस ना, म्हणून तुझा बीपी डाऊन झाला असेल. छकुलीला लगेच डाॅक्टरकडे घेऊन जाशील तेव्हा बीपी चेक करुन घे आणि काळजी घे स्वत:ची."

मग घड्याळाचे लक्ष जाताच तो म्हणाला "अरे बापरे, बोलण्यातच खूप वेळ गेला. आता नऊ दहा झालेत. आता तर मला कोणत्याही परिस्थितीत जायलाच हवं. बायबाय." असं म्हणत त्याने डोळ्यावर गॉगल घातला आणि लगेच तो दाराबाहेर निघून गेला.

त्यानंतर जिन्यावरील पायऱ्या उतरून तो लगेच खाली उतरला.

राहुल निघून जाताच, आता तिचं लक्ष तिने खुर्चीवर ठेवलेल्या हेल्मेट व पाण्याच्या बाटलीकडे गेलं. ऑफिसला जाण्याच्या घाईत तो ह्या महत्वाच्या वस्तू विसरून गेला होता आणि त्या राहुलला देण्याची त्यावेळी तिलाही आठवण राहिली नव्हती.

स्मिताने लगेच हेल्मेट व बाटली आपल्या दोन्ही हातात धरली आणि धावतच ती दाराबाहेर आली. पण तो जिन्याच्या पायऱ्या उतरून कधीचाच खाली निघून गेलेला होता. हताशपणे ती जिन्याच्या पाय-यांकडे बघत राहिली.

काॅरिडोरच्या लाकडी कठड्याजवळ उभी राहून, राहुल चाळीच्या प्रांगणात तरी दिसेल, या आशेने ती खाली बघू लागली. पण तो तिला दिसला नाही. तिचा डावा डोळा फडफडत असल्यानं ती पुन्हा उदास झाली.

 चाळीतल्या प्रांगणात क्रिकेट खेळत असलेल्या लहान मुलांकडे राहुलने दुर्लक्ष केले आणि त्यांना ओलांडून तो वेगात पार्किंगकडे निघाला.

पार्किन्ग मध्ये आल्यावर, लगेच त्यानं बाईकचं स्टँड पायाने मागे केलं. बाईकला हाताने मागे ओढून ती पार्किन्ग बाहेर आणली.

बाहेर येताच लगेच तो बाईकवर बसला. पॅन्टच्या खिशातून बाईकची चावी पटकन् बाहेर काढली आणि ती स्विचच्या खाचेमध्ये घातली व लगेच उजवीकडे फिरवली.

बाइकचं स्टार्ट बटन दाबून त्यानं बाईक सुरू केली. घुर्रssघुर्र आवाज करीत बाईक लगेच स्टार्ट झाली.

त्याचवेळी त्याला आपण कांही तरी विसरून गेल्याचं त्याला जाणवलं. आपसूकच त्याचा हात मानेवर गेला आणि हेल्मेट विसरल्याचं आता त्याच्या लक्षात आलं.

पण आता खूपच वेळ झाला होता. ऑफिस मधल्या मिटिंगच्या पूर्वतयारीसाठी, दहा वाजे पूर्वी त्याचं ऑफिसला पोहोचणं खूपच आवश्यक होतं आणि सव्वानऊ तर येथेच वाजून गेले होते.

ऑफिसही येथून तीस कि.मी. दूर अंतरावर होतं. रस्त्यातून बाहुलींच्या दुकानातून छकुलीसाठी डाॅल पण घ्यायची होती. तेथेही, नाही म्हटले तरी दहा मिनिटे तरी वाया जाणारच होती.

म्हणजे उर्वरित अर्ध्या तासात तीस किमीचं अंतर शहरातल्या रस्त्यावरच्या गर्दीमूळे पार करणं सहज शक्य नव्हतं. याशिवाय मध्ये येणारं रेल्वेचं ते फाटक ! ते जर उघडे असेल तर प्रश्नच नव्हता पण त्यावेळी बंद असेल तर ?

नाही नाही, हेल्मेट घ्यायला आता परत वर जाऊन घेऊन येणं आता शक्यच नव्हतं.

आपल्या मानेवरचा हात खाली घेतांना, त्याची दृष्टी सहजपणे वर गेली.

स्मिता आताही कठड्याला टेकून, तिच्या हातातलं हेल्मेट व बाटली त्याला दाखवून ते खाली आणत असल्याचा इशारा करून त्याला थोडा वेळ थांबायला सुचवत होती.

मात्र लगेच त्यानं तिला हातातलं घड्याळ दाखवून, उशीर झाल्याचा इशारा केला व परत तिच्याकडे न बघता, त्याने लगेच वेगात एक्सिलेटर फिरवून बाईक लगेच पुढे नेऊन दिसेनासा झाला.

स्मिता हताशपणे एका हातात हेल्मेट व पाण्याची बाटली हातात धरून, राहुल तो गेला त्या दिशेकडे एकटक बघतच राह्यली. तिचा डावा डोळा जास्त फडफडत होता, याकडेही आता तिचे ध्यान नव्हते.


०००


राहुलची बाईक आता पन्नासच्या स्पीडनं शहरातल्या राज्य महामार्गावरून वेगाने पुढे जात होती.

गर्दीतून तीन कि.मी.चं अंतर दहा मिनीटात पार केल्यावर मार्केट एरियात तो आला. बाहुली विकणाऱ्या मोठ्या दुकाना समोर त्यानं आपली बाईक आणून उभी केली.

दुकानदारानं शाॅपचं शटर नुकतंच वर केलं होतं. समोर काचेच्या शोकेस मध्ये बसलेली दिड फूट उंचीची छकुलील आवडलेली तीच डाॅल बघताच त्याला हायसं झालं.

आज रात्री तरी घरी परत जातांना, नक्कीच तो छकुलीच्या आवडीची ही डाॅल घरी घेऊनच जाणार होता. यापूर्वी पण त्यानं प्रयत्न केला होता पण ऑफिसमूळे घरी परतायला नेहमीच उशीर होत असल्याने, हे दुकान त्यावेळी त्याला नेहमीच बंद दिसायचं पण आज रात्री तर तसं होणार नव्हतं, असं त्याच्या मनाला वाटलं.

त्याने आपल्या मनातले विचार लगेच झटकले आणि घाईघाईने त्यानं दुकानदाराला म्हटलं "अहो, ती समोरच्या शोकेस मध्ये ठेवलेली डाॅल मला काढून द्या लगेच."

दुकानदार म्हणाला "अहो साहेब, मी दुकान आताच उघडलं आहे, मला देवाची पूजा करू द्या आधी, मग देतोच ती बाहूली तुम्हाला."

राहुल घाईतच म्हणाला "नाही हो, देवाची पुजा-बिजा नंतर करत बसा तुम्ही. मला आत्ताच ती डॉल हवी."

दुकानदार राहुलला नखशिखांत न्याहाळत राहुलला म्हणाला " इतकी घाई झाली तुम्हाला ? असं वाटतं खरंच तुम्हाला खरंच लवकर जायची खूप घाई झालेली आहे."

दुकानदाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून, राहुल अस्वस्थपणे म्हणाला "अहो, तुम्ही आता बोलण्यात वेळ घालवू नका ना प्लीज. आतापर्यंत तुम्ही बाहुली बाहेर पण काढून दिली असती."

दुकानदाराने शोकेस मधून प्लास्टिकने आच्छादित ती बाहुली बाहेर काढली व त्यानं मागितली ती रक्कम दुकानदाराच्या हातात दिली व उर्वरित पैसे न घेताच आपल्या हातात बाहुली धरून तो विजयी मुद्रेत दुकानाबाहेर आला.

लगेच बाईकजवळ येऊन त्यानं हातातली बाहुली दोन्ही हॅंडलच्या मधोमध ठेवली व तो वेगानं बाईकवर बसला. बटन दाबून त्यानं बाईक स्टार्ट केली व एक्सीलेटर जोरात फिरवून बाईक आणखी जास्त वेगात पूढे नेली.


०००


आता त्याची बाईक ताशी सत्तरच्या स्पीडने शहराच्या राज्य महामार्गावरून वेगात पूढे धावत होती.

कांही अंतर पूढे गेल्यावर इंग्रजी भाषेतल्या " व्ही " आकाराचे दोन मेनरोड त्याच्या ऑफिसकडेच जातात हे त्याला माहित होते.

परंतू आता जर नेहमीच्या सरळ मार्गाने पूढे निघून गेलं तर, या मेनरोडवर पूढे लोहमार्गावर रेल्वेचा ओव्हरब्रिज असल्यामूळे, रेल्वे फाटकाचा अडथळा नव्हता. पण ह्या मार्गाने जायचे म्हटले तर दहा कि.मी.चं अंतर वाढलं असतं. पण आज ऑफिस मीटिंगच्या पूर्वतयारीसाठी हा नेहमीचा मार्ग आता त्याला योग्य वाटला नाही.

म्हणून ते अंतर कमी करण्यासाठी, त्याने डावीकडच्या या मेनरोड वरुन आता जायचं, असं त्यानं ठरवलं. रेल्वे गेटचा अडथळा नेहमी नसतो असंही त्यानं ऐकलं होतं म्हणूनच आता या शार्टकटवाल्या डाव्या मार्गाने जाण्याचं त्यानं ठरवलं.

त्याच्या मनात हे विचार सुरू असतांना, त्यानं आपली बाईक डावीकडच्या त्या मेनरोडवर आणली.

आता त्याची बाईक शहराबाहेर आली होती. त्यामूळे पूढचा रोड आता पूर्णपणे मोकळा दिसत होता.

त्यामुळे त्या रस्त्यावरून नव्वदच्या स्पीडनं पूढे जात असतांना, सकाळच्या वातावरणातील गारगार वारा त्याच्या चेह-यावर येत होता. डोक्यावरचे केसही भुरूभुरू उडत होते. त्याला या स्पीडनं बाईक चालवायला खूप आवडत होतं.

रोडवर जातांना त्याच्या पूढे कोणतंही वाहन दिसलं की, आपल्या बाईकचा आणखी वेग वाढवून, त्यांच्यापूढे निघून जाण्यात त्याला नेहमी वेगळाच आनंद वाटत होता आणि ही त्याची सवयच झाली होती.

स्मिताला याच गोष्टींची नेहमी काळजी वाटत असल्याने तिला नेहमी राहुलची काळजी वाटायची पण तिनं काळजीपोटी दिलेल्या सूचनांकडे तो नेहमीच दुर्लक्ष करायचा.

राहुलने आताही अगदी तस्संच केलं. राहुल बाईकवरून नव्वदच्या स्पीडनं मेनरोड वरून वेगात पूढे जात होता. त्याचवेळी मेनरोड वरून खूप पूढे, त्याला ट्युशनवरून घराकडे स्कूटीनं परत जाणा-या हेल्मेटधारी विद्यार्थिनींचा एक ग्रूप , आपसात हसत-खिदळत वेगात त्याच्या पूढे जात असलेला त्याला दिसला. त्यांना पूढे जात असलेलं बघून राहुलने बाईकचा वेग आणखी वाढवला आणि आता त्याची बाईक शंभरच्या वेगानं त्या मुलींच्या जवळ जाऊ लागली.

हवेच्या वेगाने त्याची बाईक पूढे जात होती. आता त्याची बाईक वेगात विद्यार्थिनींच्या आणखी जवळजवळ यायला लागली आणि राहुलने बाईकचा जोरात लांब हाॅर्न वाजवला अन् तो वारंवार तस्साच वाजवत राहिला.

त्याच्या बाईकच्या सततच्या हाॅर्नमूळे विद्यार्थिनी मुली कांहीशा घाबरल्या व लगेच त्यांनी डावीकडे जात राहुलला पूढे जायला जागा करून दिली आणि हवेच्या वेगानं राहुल त्या मुलींना लगेच बाय-बाय करीत त्यांच्या पूढे निघून गेला. पण त्या मुलींनी त्याच्याकडे ढुंकूनही बघितलं नाही.

त्यांच्या पूढे निघून गेल्यावरही राहुलने आपल्या बाईकची स्पीड जराही कमी केली नाही. तो त्याच वेगात पूढे जात होता. परंतू कांही अंतर त्याच वेगात पार केल्यावर त्याच्या कपाळावर आठ्या आल्या आणि त्याला आपल्या बाईकची स्पीड कमी करावी लागली.

कारण समोर रेल्वेचे फाटक बंद होते आणि रेल्वेगेट पासून एक कि.मी.अलिकडे थांबलेल्या वाहनांचा लांबचलांब ताफा त्याला दुरुन दिसला होता. 

राहुलनं मनातल्या मनांत रेल्वे फाटकाला एक शिवी हासडली आणि म्हटलं "च्यायला! आताच हे गेट बंद व्हायचं होतं."

त्यानं समोरच्या ट्रकमागे आपली बाईक थांबवली. मग त्यानं घड्याळात पाहिलं. आता नऊ वाजून चाळीस मिनीटं झाली होती. आता त्याचं ऑफिस चारच कि.मी.पूढे होतं.

पावणे दहाला तरी ऑफिसला पोहचून मीटिंगची पूर्वतयारी सुरू करणंही आवश्यक होतं. रेल्वे फाटक बंद नसतं तर तो पोहचू शकला असता. पण आता कधी ऑफिसल पोहचणार ? आणि आता साडेदहाला जर तयारी पूर्ण झाली नाही तर बाॅस त्याला फाडूनच टाकेल, या भीतीने तो कांहीसा अस्वस्थही झाला.

आता ही ट्रेन कधी येईल आणि कधी फाटक उघडेल व लांबचलांब वाहनांच्या ह्या रांगा कधी पूढे जाणार ? आणि कधी आपण त्यांच्या पूढे निघून जाऊ ? मनातल्या या प्रश्नांनी त्याला खूपच अस्वस्थ केलं आणि या मार्गाने आल्याचा आता त्याला पश्चातापही होऊ लागला.

पण आता तर फारच उशीर झाला होता. परत मागे फिरणंही त्याला शक्यच नव्हतं.

अस्वस्थपणे त्यानं आजुबाजूला, पूढे व मागे बघितलं. आता त्याच्या मागाहून त्या विद्यार्थीनी जवळ येत असलेल्या त्याला दिसल्या. लवकरच त्या त्याच्या मागे आल्या व त्यांनी आपापल्या स्कूटी त्याच्याच मागे व शेजारी उभ्या केल्या.

त्यानं अस्वस्थपणे परत डावीकडे पाहिलं. त्याच्या बाजूला त्यांच्यातली डोक्यावर हेल्मेट घातलेली एक विद्यार्थीनी स्कूटी उभी करून गेटकडे बघत होती.

तिच्या डाव्या बाजूला डांबरी रोड संपला होता. त्यालाच लागून पूढे गेलेली दोन फूट रुंदीची कच्ची पाऊलवाट त्याला दिसली आणि ते बघून त्याच्या मनात एक कल्पना आली.


०००


लगेच राहुल बाईकच्या खाली उतरला. त्यानं हॅंडलवर ठेवलेल्या बाहुलीला सांभाळत, बाईक थोडी पूढे घेऊन ती हलकेच डावीकडे वळवली आणि शेजारी स्कूटीवर बसलेल्या त्या विद्यार्थीनीस म्हटलं "अहो, तुम्ही तुमची स्कूटी जरा मागे घ्या."

त्या विद्यार्थिनीने हेल्मेट आडूनच त्याला विचारलं "कां बरं? "

राहुल म्हणाला "मला ही बाईक तुमच्या डावीकडे घ्यायची आहे म्हणून, तेथून मी या कच्च्या रस्त्याने रेल्वे गेट पर्यंत पूढे जाणार आहे तेव्हा जरा प्लीज."

ती म्हणाली "अहो काका, आता एवढी घाईच कशाला करता तुम्ही? येथेच थांबा आणि जरा पाच मिनीटं जरा धीर तर धरा. ट्रेन निघून गेल्यावर गेट लवकर उघडेल."

राहुलला तिचं "काका" म्हणणं आवडलं नाही. कपाळावर आठ्या आणून तो चिडक्या स्वरातच तिला म्हणाला "इतकं मागे उभे राहिल्यानंतर मला ऑफिसला जायला उशीर होणार आहे. प्लीज, आता तरी मागे घेणार की नाही? "

 तिनं राहुलच्या स्वरातला चिडका स्वर ओळखला. उगाच याच्याशी वाद नको, असं वाटून तिनं स्कूटी मागे घेतली.

जायला जागा मिळाल्यावर राहुलने आपली बाईक ढकलत डांबरी रोडच्या साईडला आणली. तेथल्या गवतावरून हाताने बाईक ढकलत ढकलत, एक कि.मी.दूर पूढे नेली.

पण पूढचा रोड जरा उंचीवर होता, अवजड बाईक हाताने पूढे ढकलत नेतांना त्याचा चेहरा घामाने ओलाचिंब झाला होता.

आजूबाजूचे वाहनचालक राहुलची ही कसरत बघूनच त्याच्याकडे विचित्र नजरेनं बघत होते पण त्यानं त्याकडे दुर्लक्ष करून बाईक ढकलत ढकलत शेवटी बंद रेल्वे फाटकाच्या अगदी जवळ कशीतरी आणलीच.

त्या बंद रेल्वे फाटकाच्या पलीकडेही विरुद्ध दिशेकडून येणारी बरीच वाहने उभी दिसत होती.

बंद असलेल्या रेल्वे फाटका जवळ आल्यावर, रोडच्या शेजारील पायवाटेवरून त्यानं आपली बाईक, गेटसमोरच्या सडकेवर आणून छोटा स्टँड ओढून उभी केली, त्याचवेळेस त्यानं मागच्या वाहनचालकांकडे विजयी नजरेनं बघितलं पण कोणीही त्याच्या विजयी चेहर्‍याकडे ढुंकूनही बघितलं नाही.

तो उभा होता त्याच्या डावीकडे रेल्वे फाटकाला संचालित करणारं छोटसं कंट्रोल ऑफिस होतं. त्याच्या समोर नाईट ड्युटी करणा-या कर्मचाऱ्याच्या आरामासाठी दोरीची जुनाट खाट ठेवलेली होती. खाटेपासून थोड्या दूर अंतरावर लोहमार्ग शेजारी टाकलेल्या गिट्टींच्या ढिगा-यांना लागून खूप सारी जंगली झुडूपे उगवलेली होती.

राहुलनं पॅन्टच्या खिशातून रूमाल बाहेर काढला व चेह-यावरचा घाम पुसून टाकला. राहुलनं उजवीकडच्या बाईक स्वाराकडे बघितलं. तो बाईकस्वार गाडीवर बसून बाटलीतलं पाणी पीत होता. त्याचं पाणी पिऊन झाल्यावर त्यानं राहुलकडे बघितलं आणि त्याच्या चेहर्‍यावरचा घाम बघताच त्याला पाण्याची बाटली दिली.

राहुलला आधीच खूप तहान लागलेली होती. राहुलनं "थॅंक्स" म्हणत ती बाटली आपल्या हातात घेतली व त्यातलं अर्ध पाणी गटागट पिऊन ते आपल्या घशात ओतलं. पाणी पिल्यावर बाटली परत देत राहुलने त्याला "थॅंक्स" म्हटलं.

राहुल ने बाईकचा छोटा स्टँड मागे ओढला आणि परत तो आपल्या बाईकवर बसला व ट्रेन कधी निघून जाते याची इतर स्वारांप्रमाणे प्रतिक्षा करू लागला.

आता बाइकवर बसून ट्रेनची प्रतिक्षा करणं त्याला कंटाळवाणं वाटू लागलं म्हणून, त्यानं सहजच आकाशाकडे बघितलं.

स्वच्छ निळ्याशार आकाशात खूप उंचावर एक घार आपले पंख फैलावून आकाशात घिरट्या मारत असलेली त्याला दिसली. आकाशात घारीचा विहार बघून त्याला गंमत वाटली. तो आणखी निरखून तिच्याकडे बघू लागला. घार तशीच आपले पंख फैलावून आकाशात मुक्त विहार करत होती.

आकाशात मुक्तपणे विहार करणाऱ्या घारीची तीक्ष्ण दृष्टी, रेल्वे फाटका पलिकडे असलेल्या, लगतच्या मैदानावर गेली आणि अचानक तिने जमिनीच्या दिशेने खाली वेगात झेप घेतली.

त्यानंतर कांही क्षणातच ती परत आकाशाकडे उडाली मात्र यावेळेला तिच्या पंजात दोरीसारखं कांहीतरी लोंबकळत असल्याचं राहुलला दिसलं.

पण ते काय होतं ते खूप उंचीवरून घार उडत असल्याने राहुलला स्पष्ट दिसलं नाही. ते कांहीतरी हवेच्या झोकात तिच्या पंजात वळवळत होतं.

तरीपण घार त्या वस्तूला मुळीच न सोडता, मनात येईल तशी आकाशात गोल चक्कर घेऊन त्यासोबत विहार करीत होती. हे बघूनच टाइमपास करणा-या राहुलच्या चेह-यावर हलकसं स्मित आलं.

त्याचवेळी दूरवरून ट्रेनचा भोंगा ऐकू आला आणि सारेच वाहन चालक आपापल्या वाहनांवर स्वार होऊन आतुरतेने लवकरच निघून जाणा-या ट्रेनची प्रतिक्षा करू लागले कारण ट्रेन गेल्यावर आता फाटक उघडणार होतं.

जवळ येत असलेल्या ट्रेनचा आवाज ऐकूनही राहूलचं सारं लक्ष मात्र आताही आकाशाकडेच लागलं होतं.

घार ती वस्तू आपल्या पंजात धरून आकाशात मुक्त विहार करीत होती.

उर्वरित इतर सर्व वाहन चालकांचं सर्व लक्ष रेल्वे फाटकाकडे व येणा-या ट्रेनकडेच लागलेलं होतं.

आता उजवीकडून ट्रेनचं इंजिन आणखी वेगात जवळ यायला लागलं.

आकाशातील घारीने पण आकाशातून खाली वेगात जाणारी ट्रेन बघितली. आता ती रेल्वे इंजिनच्या वेगात, इंजिनच्या अगदी वर आली आणि इंजिनसोबतच ती पंजात ती वस्तू तशीच आपल्या पंजात धरून त्याच गतीने उडत गेटच्या अगदी वर आली.

राहुल अगदी खाली त्याच जागी बाईकवर बसला होता. त्यानं डोक्याच्या अगदी वर आलेली घार त्यानं बघितली.

त्याचवेळी गेट ओलांडून सरळ पूढे निघून जाण्यापूर्वी रेल्वे इंजिननं जोरात डबल भोंगा वाजवला. भोंगा इतका जोरात वाजला की राहुलसह सर्वांनी आपापल्या कानात बोटे घातली.

भोंग्याच्या त्या आवाजानं आकाशात उडत असलेल्या घारीनं घाबरून आपला पंजा एकदम सैल केला.

दुस-याच क्षणी तिच्या पंजातली ती वळवळणारी लांब वस्तू मोकळी झाली आणि हवेतून तरंगत वेगात खाली आली आणि बेसावध बंसलेल्या राहुलच्या मानेवर ती वस्तू आदळली. ती लांब दोरीसारखी वळवळणारी वस्तू म्हणजे काळ्या रंगाची नागीण होती.

मानेवर आदळल्या बरोबर घाबरलेल्या त्या नागिनीने उसळून राहुलच्या मानेवर कडकडून दंश केला.

तत्क्षणी हेल्मेट डोक्यावर न घातल्याच्या पश्चाताप होऊन सर्पदंशाच्या वेदनेने राहूल जोरातच ओरडला पण लोखंडी रुळांवरून, धाडधाड आवाज करीत पूढे जाणा-या ट्रेनच्या आवाजात, राहुलचं जोरात ओरडणं, शेजारच्या स्वारालाही ऐकू गेलं नाही.

आता रेल्वे फाटका समोरून ट्रेन धाडधाड आवाज करीत अर्धीअधिक पूढं निघून गेली होती.

त्याचक्षणी खूपच घाबरलेल्या राहुलने, भितीने थरथरत आपल्या दोन्ही हाताने नागिनीला पकडून मानेवरून बाहेर काढलं आणि थरथरत्या हाताने तिला डावीकडे फेकले. नागिन सळसळ करीत रेल्वे रूळाशेजारच्या झुडपात जाऊन अदृश्य झाली.

ते बघताच आकाशात विहार करणा-या, त्या घारीने लगेच त्या झुडूपाकडे झेप घेतली आणि दुस-याच क्षणी नागिनीला परत आपल्या पंजात घट्ट धरून, आकाशाकडे वेगात झेप घेतली. एका क्षणातच हे सारं घडलं.

त्याचवेळी ट्रेनची शेवटची बोगी निघून गेली आणि सगळं वातावरणच एकदम शांत झालं.

त्याचवेळी राहुल बाईकसह खाली कोसळला आणि तेव्हां शेजारच्या बाईकस्वाराचे लक्ष राहुलकडे गेलं.

तो लगेच आपल्या बाईकवरून खाली उतरला आणि आपली बाइक स्टॅंडवर लावून त्यानं लगेच राहुलकडे धाव घेतली.

राहुलला उभ्या-उभ्या अचानक, बाईक घेऊन खाली पडलेलं बघताच, त्या जागी एकदम गोंधळ उडाला.

मागचे अनेक वाहन चालक आपापली वाहने स्टॅडवर लावून धावतच तेथे आले.

राहुल अचानक खाली कां कोसळला हे कोणाच्याही लक्षात आले नाही.

लगेच शेजारच्या त्या बाईक स्वारानं राहुलची बाईक त्याच्या अंगावरून उचलून बाजूला उभी करून ती स्टँडवर लावली.

राहुल जमिनीवर तडफडत होता आणि त्यांच्या तोंडातून पांढरा फेस बाहेर यायला लागला.

त्या बाईकस्वारानं घाबरून राहुलला विचारलं "काय झालं तुम्हाला? "

पण राहुल बोलण्याच्या स्थितीत होताच कुठे?

त्या बाईकस्वारानं राहुलची गंभीर स्थिती ओळखली आणि बघ्यांना विनंती करून त्यांनी राहुलला उचलून गेट ऑफिस समोरच्या दोरीच्या खाटेवर झोपवलं.

बघ्यांपैकी कोणीतरी सडकेवर आडवी पडलेली त्यानं छकुलीसाठी नुकतीच विकत घेतलेली बाहुली उचलून, ती त्याच्या पायाजवळ आणून ठेवली. बाहुलीचा चेहरा राहुलच्या दिशेनी होता.

त्याचवेळी राहुलनं आपले डोळे अर्धवट उघडले. कोणीतरी त्याच्यावर झुकून त्याला कांहीतरी विचारत होता पण त्याचा आवाज मात्र राहुलला ऐकूच येत नव्हता.

त्याला पायाजवळ बसलेली छकुलीची बाहुली दिसली. हळूहळू बाहुलीच्या जागी छकुलीचा चेहरा, वेगानं अंधूक होत असलेल्या नजरेपूढे, त्याला दिसू लागला.

छकुली त्याला म्हणत होती " पप्पू, आपण त्यादिवशी दुकानात बघितली ना तीच डाॅल मला आजच पाहिजे. नेहमी आणतो आणतो म्हणता अन् विसरूनच जाता. आज विसरायचं नाही हं पप्पू. प्राॅमिस? सायंकाळी दारात बसूनच मी तुमची वाट बघेल. तुम्ही डाॅल घेऊन येईपर्यंत मी दारातून घरात परत जाणार नाही पप्पू. "

राहुलच्या नजरेसमोर एकदम अंधार दाटून आला. त्याच्या डोळ्यात पाणी तरळू लागलं. त्याचे डोळे आपाेआपच बंद झाले.

तरीपण काळोखातल्या खोल विहिरीतून येतो तसे आवाज राहुलच्या कानावर आदळत होते.-

"..... तुम्ही किनई, नेहमी असंच करता. जेव्हा बघावं तेव्हा घाई व गडबड. अशानं कसं होईल तुमचं. मला कांही कळतच नाही"

"अहो काका, आता एवढी घाईच कशाला करता तुम्ही? येथेच थांबा आणि जरा पाच मिनीटं जरा धीर तर धरा. ट्रेन निघून गेल्यावर गेट लवकर उघडेल." 

" इतकी घाई झाली तुम्हाला ? असं वाटतं खरंच तुम्हाला खरंच लवकर जायची खूप घाई झालेली आहे."

त्याचवेळी राहुलच्या घशात हुंदका दाटून आला पण तो बाहेर निघतच नव्हता.

गडद काळोखात निघून जाण्यापूर्वी, त्याची पत्नी स्मिताचा शेवटाचा स्पष्ट आवाज त्याला ऐकू आला....... 

"अहो, बाहेर जातांना असं " जातो" म्हणू नये, "येतो" असं म्हणायचं असतं आणि हे बघा, काळजीमूळे मी परत सांगत्ये तुम्हाला. हेल्मेट विसरायचं नाही व ऑफिसला उशीर होतोय म्हणून सडकेवर जास्त स्पीडने गाडी चालवायची नाही आणि हो, समोरच्या गाडीवाल्यांना पुढे जाऊ द्यायचं. उगाचच त्यांच्या पूढे जाण्याची स्पर्धा करू नका तुम्ही. तुमच्या मागे आम्ही आहोत म्हटलं, आमची पण आठवण असू द्या तुम्ही. तेव्हा जरा..... "

आणि त्याचवेळी खाटेवरती बेशुद्ध राहुलच्या कमरेचा भाग वेगात वर आला आणि शेवटचा झटका देऊन त्याच वेगात खाली आला. मग नेहमीसाठी सारं शांत-शांत झालं.

स्मिता व छकुलीच्या नशिबी सायंकाळी घराच्या दारात उभे राहून राहुलची वाट पाहण्याशिवाय नियतीने आणखी दुसरं काय ठेवलं होतं ?


//समाप्त//


Rate this content
Log in

More marathi story from Naresh Dhotkar

Similar marathi story from Tragedy