STORYMIRROR

Naresh Dhotkar

Tragedy

4  

Naresh Dhotkar

Tragedy

दुरावा

दुरावा

21 mins
474

दुरावा भाग-१

नरेश धोटकर


अचानक तिच्या मेंदूला एक झटका बसला आणि ती काॅटवर खडबडून उठून बसली. अचानक झोपेतून जाग येण्याचं काय कारण काय, हे डोकं खूप दुखत असल्यानं तिच्या लक्षात येत तो नव्हतं. डोकं धरून ती परत पलंगावर पहूडली पण तरी तिला झोप येईना.

परत जांभई देत ती काॅटवर उठून बसली आणि नाजूक दोन्ही हात फैलावून परत जांभई दिली. मग तिनं आपल्या टपो-या डोळ्यांनी घड्याळाकडे बघितलं. भिंतीवरील घड्याळाचे काटे आता सकाळचे आठ वाजल्याचे दाखवत होते. काॅटवर बसल्या बसल्या तिनं कॅंलेंडरकडे बघितलं आणि आजच्या तारखेवर तिनंच केलेली स्केच पेनची गुलाबी रंगाची ती विशेष फुली बघताच ती दचकली आणि तिच्या पोटात धस्सं झालं. ताड्कन ती काॅटवर उठून उभी झाली आणि फरशीवर उडी घेतली.

अरे, असं कसं विसरलो आपण? आज तर सारंगचा वाढदिवस! त्याच्या घरी सकाळी साडेनऊ पूर्वी पोहचून त्याला शुभेच्छा द्यायच्या होत्या व तिला याचना पण करायची होती.

त्यासाठीच तर आठवणीसाठी तिने पंधरा दिवसांपूर्वीच या कॅंलेंडरमधल्या आजच्या तारखेवर ही फूली करून ठेवली होती. तसंच आज सकाळी सहा वाजता जाग येण्यासाठी तिनं मोबाईल मधला अलार्म पण सेट करून ठेवला होता.

काल रात्री झोपेपर्यंत तिनं मनात याची वारंवार घोकंपट्टी पण केली होती आणि त्याचा परिणाम उशीरा झोपल्यानं नेहमीपेक्षा उशीरानं जागे होण्यात आला. यामुळेच तिला मोबाईलचा अलार्म पण ऐकू आला नाही.

याच विचारांच्या गर्दीत ती आरशासमोर कधी येऊन उभी झाली हे तिचं तिला कळलं नाही, कळलं तेव्हां ती आरशांत दिसणारं आपलं प्रतिबिंब अभिमानाने न्याहाळून बघू लागली.

गौरवर्ण, गोल चेहरा, टपोरे डोळे, उजव्या गालावरची खळी, नैसर्गिक गुलाबी रंगाची छोटी जिवणी, पायापर्यंत खाली आलेले डोक्यावरचे घनदाट कुरळे केस, त्या केसांतून कपाळावर आलेली सापासारखी नैसर्गिक बट यामूळं तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसत होतं.

ती चाळीस वर्षाची असेल असं कुणालाही वाटत नव्हतं आणि ह्या ह्या सौंदर्यवतीला सागरनं घराबाहेर जा म्हणावं? मूर्खच आहे हा सारंग. असं कोण आपल्या सौंदर्यवतीला घराबाहेर जा म्हणतो.

पण आज ती सारंगला कसलीही पूर्वसूचना न देताच स्वत:हूनच सारंगकडे जाणार व त्याला आश्चर्यचकित करून त्याची माफी मागत याचना करणार होती.तो तिला नाही म्हणणार नाही याची तिला खात्री होती. सारंगचा वाढदिवस तर एक कारण होतं, त्यानिमित्ताने तरी तिला त्याच्या घरी प्रवेश करता येणार होतं.

मनातल्या विचारात असतांना परत तिचं लक्ष घड्याळाकडे गेलं आणि ती दचकली. आठ वाजून पाच मिनिटे झाली होती आणि ती आपल्या विचारात गर्क झाली होती. आता कांही विचार करायचा नाही. सरळ तयार होऊन सारंगला भेटायचं आणि आपल्या मनातलं ओकून त्याची माफी मागावी आणि पूर्वीसारखा संसार परत सुरू करावा. पण यासाठी घरून नऊ पूर्वी निघून त्याला सकाळी साडेनऊपूर्वी त्याच्या घरी गाठणं शक्य होतं. आज वाढदिवसाच्या दिवशी तो नाही म्हणणार नाही याची तिला पक्की खात्री होती.

याच विचारांच्या धुंदीत तिनं नेहमीप्रमाणे सकाळची तयारी सुरू केली. प्रातर्विधी आटोपल्यावर आपले कपडे हातात धरून ती स्नानगृहात शिरली. हिटर आधीच सुरू करून ठेवल्यामुळे त्यातलं गरम पाणी भरण्यासाठी तिनं प्लास्टिकची बादली नळाखाली ठेऊन नळ सुरू केला. बादलीत गरम पाणी यायला सुरूवात झाली.

आता आंघोळीसाठी ती आपले कपडे काढत होती आणि समोरच्या आरशांत आपलं सौंदर्य पण न्याहाळत होती. खरंच सौंदर्याबरोबरच तिला निसर्गानं आखीव रेखीव व सुडौल शरीर आकाराची देणगी दिली होती.

लोकांना तर ती आताही पंचेवीस वर्षाची दिसत होती अन् हा सारंग? खरंच तो मूर्ख आहे. माझं आणि त्यानं स्वत:चंच पंधरा वर्ष आयुष्य वाया घालवलं.

बादलीतील गरम पाणी अंगावर घेत असतांना तिला लग्नातला तो प्रसंग आठवला. विदाई समारंभ सुरू होण्यापूर्वी तिची आई तिला नवरीच्या खोलीत घेऊन गेली. तेथे कोणीच नव्हते. त्या दोघीच होत्या. तिची आई बोट उगारत तिला म्हणाली "हे बघ कमे, आता तू सासरी जाणार आहेस, तेथे तू सासू-नणंदेसोबत प्रेमानं व्यवहार कर. तुझ्या सौंदर्याचा व नोकरीचा गर्विष्ठपणा तेथे चालायचा नाही. मी सारंगला खूप लहानपणापासूनच चांगलं ओळखते. त्याच्या घरच्या लोकांवर तो खूप प्रेम करतो.मोठ्या पदावर असूनही तो मनानं खूप हळवा व समजदार आहे तसाच स्वाभिमानी पण आहे. त्याच्या स्वाभिमानाचा तू आदर कर. त्याचा स्वाभिमान दुखावेल, असं तू का़ही करायचं नाहीस आणि तुझ्यामूळं तो दुखावलेला मला तर मुळीच चालणार नाही. आता तुझं हे घर तुला परकं झालं आहे असंच समज आणि सासरची सारी माणसेच आपलेच नातेवाईक आहे असंच समजून व्यवहार कर आणि.... "

आईला तेथेच थांबवत कमलानं नाकातली नथ सरळ केली व आईला म्हणाली " आणि म्हणूनच माझी इच्छा नसतांनाही भावाच्या त्या सावळ्या मुलाच्या गळ्यात मला बांधलीस.ए अगं मी असा काय गुन्हा केला की इच्छा नसतांनाही त्याच्या गळ्यात बांधलंस? माझं सौंदर्य माझी लाख पगाराची नौकरी कशाकशाचाच विचार केला नाहीस तूं? आणि तो स्वाभिमानी?मग मी कशाला त्याचा विचार करू?मी पण त्याच्या बरोबरीनं शिकलेली आहे, त्याच्या इतकंच कमावते त्यानं पण माझं मन जपलं पाहिजे, मी जे म्हणेल ते त्यानं ऐकायला हवं."

आईनं रागात विचारलं "काही जबरदस्ती आहे कां तुझी? नवरी असूनही किती फाजील बोलतेस गं? "

कमला म्हणाली "हा तू दिलेल्या उच्च शिक्षणाचा परिणाम आहे. स्त्रीनं पारतंत्र्यात जगण्याचे दिवस गेलेत आता आणि माझ्या सौंदर्याचे तू काय घेऊन बसलीस? तुला वचन देते मी आई, मी माझ्या या सौंदर्याच्या बळावरच मी सारंगला ताटाखालचं मांजर कसा करत्ये, ते बघच तू आणि जर तसं नाही झालं तर मी पण तुझ्या दाराशी कधीच येणार नाही,आई" तिची आई कमलाची बडबड आ वासून ऐकत होती.

त्याचवेळी डोळ्यात गरम पाणी शिरलं म्हणून ती भानावर आली. लगेच तिनं आंघोळ आटोपली आणि गाऊ चढवून व डोक्यावर टाॅवेल गुंडाळून ती स्नानगृहा बाहेर आली. तेव्हा भिंतीवरच्या घड्याळात आठ वाजून तीस मिनिटे झाली होती.

आरशासमोर उभी राहून ती ड्रायरने आपले केस वाळवत असतांना तिच्या मनात परत विचारचक्र सुरू झाले.


सारंगच्या घरी तिनं माप ओलांडून प्रवेश केला तेव्हा ती जरा नाराजचहोती. सारंगचं लक्ष्मीनगरच्या एका बोळीतलं वडिलोपार्जित घर तसं चौघांच्या मानाने जरा ऐसपैसच होतं. सारंगचे वडील पत्नी दोन अपत्यांना मागे ठेऊन देवाघरी गेले होते. त्यावेळी तो लहान होता. आर्थिक परिस्थिती बेताचीच होती.

पण सारंगच्या आईनेच काबाडकष्ट करून सारंग व मुलीला लहानाचं मोठं केलं. दोघांच्या शिक्षणात कसलाही व्यत्यय येऊ दिला नाही. सारंगनंही इंजिनीअरींग पूर्ण करून तिच्या कष्टाचं चीज करून दाखवलं आणि चांगल्या पदावर कामही करू लागला होता. सारंगची बहीण अल्का तिच्या लग्नाच्या वेळी पंधरा वर्षाची होती.ती आता मॅट्रिकला होती.

आईच्या काबाडकष्टाची जाणीव व एकुलती एक लाडाची बहिण यामूळे सारंग त्या दोघींचं मन खूप जपायचा.

सारंगसोबत आनंदात घालवलेले क्षण तिला आठवत होते. सारंग सावळ्या वर्णाचा होता तरी तो दिसायला आकर्षक होता, मनानं स्वच्छ होता आणि मनमिळाऊ होता. त्याच्या या स्वभावाने ती कधी त्याला वश झाली हे तिचं तिलाच कळलं नाही. ती त्यावेळी सारंगमय झाली होती. सारंगही तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला होता. ते तिच्या सौंदर्यामुळे की उच्च शिक्षणामूळे हे कधीच तिला कळलं नाही. पण तिच्यावर खूप प्रेम करीत होता, हे निश्चित. 

बेडरूमच्या ड्रेसिंग टेबल समोर एकदा ती अशीच केस विंचरत होती.त्याचवेळी सारंगने मागाहून येऊन कधी तिला आपल्या कवेत घेतलं हे तिच्या लक्षातच आलं नाही. जेव्हा लक्षात आलं तेव्हा ती त्याच्या मिठीत होती आणि तिचे डोळे मिटले होते. 

जेव्हा तिनं डोळे उघडले तेव्हा ती दचकून बाजूला झाली. दारात सारंगची बहिण सारिका डोळे मोठ्ठे करून दोघांकडे हसत बघत उभीच होती.तिने सारिकाकडे बघताक्षणीच ती दारातून पळून गेली पण या घटनेमूळे तिला मेल्याहून मेल्यासारखे झाले होते. पण ती सारंगला कांही म्हणाली नाही. 

त्याच दिवशी काॅलेजमधलं लेक्चर लवकर संपवून घरी आली आणि आल्याआल्या सारिकाला बेडरूममध्ये बोलावून घेतलं आणि विचारलं "काय गं तुला कांही मॅनर्स आहेत की नाही? "

सारिकानं आश्चर्यानं विचारलं " कां बरं? काय झालं? "

कमलानं दात-ओठ खात विचारलं "आज सकाळी आमच्या बेडरूमचं दार न ठोठावता दारात उभी राहून काय बघत होतीस तू? "

सारिकानं परत आश्चर्यानं विचारलं "मग बघितलं तर काय झालं त्यांत? आणि दादाच्या बेडरूममध्ये मी नेहमीच केस विंचरायला येते? "

कमलला परत संताप आला तिनं रागात सारिकाला विचारलं "काय? माझ्या अपरोक्ष माझ्या बेडरूमचा वापरही करत्येस तू? "

सारिकानं म्हटलं "तुमच्या नाही माझ्या दादांच्या बेडरूमचा. आणि दादा जर मला कांही म्हणत नाही तर तुम्ही एकदम मला कशाला म्हणता वहिनी? आणि हो, हे मॅनर्सफॅनर्स तुमच्याकडेच ठेवा जपून. मला कांही नका सांगू वहिनी. मॅनर्सची एवढीच चिंता आहे ना, तर मग आधीच बेडरूमचं दार बंद नको कां करायला तुम्ही? आणि मॅनर्स म्हणे"

कमला त्यावेळी कांही बोलली नाही. पण यामूळे सारिकाविषयी तिच्या मनात कायमची अढी निर्माण झाली.

तसंच एकदा काॅलेजमध्ये जाण्याच्या घाईत तिच्या हातून भाजीत मीठ जास्त पडलं होतं. तेव्हां सासूबाईंनी गमतीत हसून म्हटलं होतं "असं जर आमच्या हातून झालं असतं तर माझ्या सासूबाईंनी माझ्या तोंडात मीठ कोंबलं असतं" 

गोष्ट साधीच होती पण असं कधीच न ऐकणा-या कमलच्या जिव्हारी ती लागली आणि पहिल्यांदा तिला तिच्या संसाराच्या दूधसागरात मीठ टाकल्यासारखे तिला वाटले. ती त्याचवेळी सासूबाईंनी दोन गोष्टी सुनावणार होती पण काॅलेज लेक्चरसाठी उशीर होत असल्याने महत्प्रयासाने तिने स्वतःला आवरले पण सासूबाईंविषयी अढी मनांत ठेऊनच ती काॅलेजला निघून गेली. 

याच नासुकल्या दोन कारणांनी तिनं सारंगला या घरातून वेगळं काढून दुसरीकडे वेगळं घर करायचं ठरवलं. त्याच रात्री बेडरूममध्ये या कारणांवरून दोघांमध्ये पहिली व शेवटची धुसफूस सुरू झाली. 

त्या रात्री ती बरोबर बोलली नाही सारंगशी.मग

त्यानंच विचारलं "काय झालं कम्मू,मूड ऑफ दिसतो राणी साहेबांचा" 

तेव्हां तिनं सारंगच्या कानात सारिकासोबत झालेलं बोलणं सांगितलं. सारंगनं शांतपणे सारं ऐकून घेतलं व तिचा हात धरून प्रेमाने थोपटत म्हणाला "कम्मू, एक सांगू कां तुला? त्यात सारिकाचं कांहीच चुकलेलं नाही. आपल्यापेक्षा ती लहान आहे, अल्हड स्वभाव आहे तिचा. त्याच अल्हडपणामूळे ती आली असेल बेडरूमच्या दाराशी. बेडरूमचं दार उघडं ठेवलं, ही माझीच चूक झाली हे मी मान्य करतो आणि आई, ती तर वयोवृद्ध आहे बोलण्याच्या ओघात ती तसं म्हणाली असेल पण म्हणजे तिनं बोलल्याप्रमाणे थोडंच केलं? " 

कमलाच्या डोक्यात सणक आली आणि तिनं त्याचा हात झिडकारून रागात म्हटलं "म्हणजे तुमची बहिण लहान व सासूबाई वयोवृद्ध म्हणून मीच दोषी वाटते काय तुम्हाला? चूक त्यांचेकडून झाली तरी या कारणास्तव दोष माझ्यावर लावून घेऊ? नाही, मला ते जमणार नाही" 

तिचं बोलणं ऐकताच सारंग आता गंभीर झाला व त्याच स्वरात त्यानं विचारलं "कम्मू, तू उगाच या गोष्टींचा इगो करत्येस. आता तूच सांग मी काय करू, ज्यामूळे माझ्या कम्मोराणीचा त्यांच्यावरचा राग निघून जाईल" 

कमलला ही नामी संधी आयतीच चालून आल्यासारखं तिला वाटलं. सारंगही आजकाल तिचा प्रत्येक शब्द झेलत असल्याचा प्रत्यय येत होता व तो तिला आताही जाणवला. 

सारंग तिच्या प्लॅनला नाही म्हणणार याची तिला खात्री वाटली. त्याच आत्मविश्वासात ती बोलून गेली. "अशा वातावरणात माझा श्वास कोंडला गेलाय. त्यामूळे आता मला येथे नाही राहायचं व तुम्हालाही माझ्यासोबत या घराबाहेर चलावंच लागेल. मात्र तुमच्या आई व सारिकाही येथेच राहतील. "

सारंगसाठी हा एक झटकाच होता. आश्चर्यानं तो म्हणाला "काय बोलत्येस याची कल्पना तरी आहे कां तुला? आई व बहिणी पासून माझी ताटातूट करत्येस? " 

कमला बेडरूममध्ये पाय आपटत म्हणाली "मी कुठे ताटातूट करत्येय?मी फक्त आपण वेगळं राहायला म्हणतेय. तुम्हाला आठवण झाली की तुम्ही त्यांना भेटायला येथे येऊ शकता.त्यांना आर्थिक मदतही करू शकता. " 

सारंग म्हणाला "पण नातेवाईक माझ्या तोंडात शेण घालतील ना त्याचं काय? आणि कांही झालं तरी मी त्यांना सोडून कुठेच जाणार नाही" 

कमलानं निर्वाणीचं विचारलं "कांही झालं तरी? "  

सारंग निश्चयपणे म्हणाला "हो हो, कांहीही झालं तरी"

कमलाच्या नेत्रांत अश्रू तरळले. ताटाखालचं मांजर ताट सोडून पळालं म्हणून की तिचा अभिमान दुखावला म्हणून तिला कळलं नाही. 

पण ती अश्रू पूसत निर्वाणीचे बोलून गेली "ठिक आहे. मी उद्यालाच तुमचं घर सोडून जात आहे. तुम्हाला यायचं असेल तर कधीही या, मी तुमची प्रतिक्षा करेल" 

सारंगही निर्विकारपणे म्हणाला "मी माझ्या कुटूंबाला सोडून तुझ्याकडे कधीच येणार नाही आणि तुझा त्याग पण करणार नाही. तुलाही कधी आपली चूक उमगली तर तूं कधीही या घरात परत येऊ शकतेस. कारण घर तुझं आहे आणि पुढे ही तुझंच राहणार आहे. तरीपण या घराचा उंबरठा ओलांडण्यासाठी पूर्वी तू एकदा परत विचार केलास, तर खूपच बरं होईल. " 

कमला पाय आपटत म्हणाली "अडलंय माझं खेटर" असं म्हणत तिनं आपली सूटकेस भरायला सुरूवात केली आणि सारंग हताशपणे तिची तयारी बघू लागला. 

दुस-या दिवशी तिनं घराचा उंबरठा ओलांडला तेव्हा त्याची आई व बहिण दोघीही घरात नव्हत्या. कुठे बाहेर होत्या तिला समजलं नाही. 

तिने काॅलेजची सहप्राध्यापिका सुशिलेच्या बंगल्यात तीन खोल्या भाड्याने घेतल्या. सुशिलेला तिचंअसं सारंगला सोडून वेगळं राहणं आवडलं नव्हतं पण बालमैत्रीण म्हणून व कुणाच्या खाजगी आयुष्यात कशाला डोकावून बघायचं म्हणून ती कांही म्हणाली नाही तिला. 

येथून तिचं काॅलेज जवळ होते. काॅलेज पर्यंत जायला जवळच ऑटो स्टॅन्ड होता. 

तिचं एकटीच जीवन सुरू झालं आणि तिने कामाच्या व्यापात ट्युशनमध्ये स्वत:ला गुंतवून घेतलं. सारंगच्या येण्याची वाट बघितली पण ना सारंग आला, ना त्याची आई व बहिण.

असे करता-करता नंतर तिच्या आयुष्याचे दहा वर्षे कसे निघून गेले, कळलंच नाही. 

दरम्यान तिचे आई-बाबा देवाघरी गेले तेव्हा ती गांवी गेली. तेथे सारंगही दिसला पण दोघांनी एकमेकांकडे सरळ पाहणं टाळलं. तिचे नातेवाईक, भाऊ, त्याची बायको तिच्याकडे विचित्र नजरेनं बघत असल्याचा तिला संशय आला आणि लगेच ती परत आली. 

दरम्यान नव-यापासून विभक्त सुंदर स्त्रीनं एकटं आयुष्य घालवणं किती कठीण असतं, याचा तिला वेगळाच अनुभव पदोपदी यायला लागला. काॅलेजच्या स्टाॅफची तिच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली होती. लोकांच्या विखारी नजरेची आताशा तिला भितीच वाटू लागली होती. काय करावे हे तिला समजत नव्हते. कोणाच्या लग्न समारंभात गेलं की तेथे आलेल्या जोडप्यांचे आनंदी चेहरे बघून प्रथम तर तिला कांहीच वाटत नव्हतं पण आताशा त्या आनंदी जोडप्यांचा रागही येत होता. दिवस तर कसातरी निघून जात होता पण आताशा रात्र काढणे ही कठीण जाऊ लागलं. झोप येत नसल्याने डोळ्यांवर काळी वर्तुळे येण्यास सुरूवात झाली होती. मनातलं गरळ कोणाजवळ तरी ओकून मोकळं व्हावं, असं तिला वारंवार वाटू लागलं. 

सुशिलेला तिच्यातला हा बदल जाणवत होता पण तिच्या सनकी स्वभावामुळे तिला विचारायची तिची हिंमत होत नव्हती. 

असेच आणखी चार वर्षे निघून गेली आणि एक दिवस सुशिलेनं तिच्या खोलीत येत हिंमत करून विचारलं "काय गं, तुझी प्रकृती ठीक आहे ना? " 

कमलानं हसत उलट विचारलं "कां? काय झालं मला? ठिक तर आहे ना मी. " 

सुशिला म्हणाली "मग ही तुझ्या डोळ्यां सभोवतालची वर्तूळं तर वेगळंच सांगत आहेत. तुला झोप येत नाही कां? " 


प्रथम कमला कांहीच बोलली नाही. मग सुशिलाच म्हणाली "हे बघ, मनातच सारं साठवून ठेवल्यानंच तुझी ही अवस्था झाली. तुझ्या मनातलं सारं बाहेर काढून अन् बघ, काय चमत्कार होतो ते" 


तेव्हा कमला हळूहळू सांगू लागली व गेल्या चौदा वर्षातलं सारं गरळ काढून टाकले तिनं. 


सुशिलेनं गंभीरतेनं विचारलं "मग तुला सारंगला सोडण्याचा पश्चाताप वाटत आहे, असं तुझ्याच बोलण्यावरूनच स्पष्ट दिसतंय मला आणि तुझा विचार जगावेगळा नाही आहे. अशीही उदाहरणे आहेत की, फॅमिली कोर्टात आलेली घटस्फोटाची प्रकरणे कोर्टातच समेट झाल्यानं निकाली निघाली आणि ती सारी जोडपी आता सुखाने नांदत आहेत आणि तुमचा तर घटस्फोट ही झाला नाही. हे बघ, कम्मू अजूनही उशीर झालेला नाही. आयुष्याची पंधरा वर्षे नासुकल्या कारणासाठी बर्बाद केलीत तुम्ही दोघांनी, तेवढंच पुरे झालं. आता उशीर करू नका तुम्ही. उशीर केला तर नियतीकडून परत संधी मिळत नाही. तेव्हा आता लगेच विचार करून अन् स्वत:कडे कमीपणा घेऊन त्याचेकडे माफी मांगून टाक. तसंही मला वाटतं की, सारंगचं यात कांहीही चुकलेले नाही" 


कमलानं हताशपणे विचारलं "म्हणजे सर्व दोष माझाच नाही कां? " 


सुशिला तिच्यासमोर हात जोडत म्हणाली "ए माझे आई, अशी हताशपणे बोलू नकोस गं बाई, मी सारंगचं कांही चुकलेले नाही असं म्हटलं पण या पंधरा वर्षात त्यानं एकदा तरी तुझ्याकडे येऊन विचारपूस तरी करायला पाहिजे होती, ती त्यानं केली नाही. हा दोष म्ह हवा तर त्याचा. पण त्यालाच दोष देत बसून आणखी त्रागा करण्यापेक्षा आता तूच पुढाकार घे आणि आता तुम्ही दोघेही परत एक होण्याच्या मताची मी आहे" 


कमलानं विचार करून म्हटलं "पण सारंग परत स्विकार करेल कां माझा इतक्या वर्षांनंतरही? " 


सुशिला म्हणाली "व्वा!न करायला काय झालं? त्याशिवाय कां तो इतके वर्षे एकटा राहिला आणि काल-परवाच मी ऐकलं की त्या दिवशी सारिकाचं लग्न झालं पण तू गेली नाहीस? कां? " 


कमला म्हणाली "हो, मला पण तिचं लग्न झाल्यावर आठ दिवसांनी कळलं आणि कळलं असतं तरी मी गेली असती कां ते सांगता नाही येणार मला"


सुशिला म्हणाली "बरं ते जाऊ दे. आता उद्याच निघ तू सारंगकडे" 


कमला म्हणाली "उद्याला नाही. पंधरा दिवसांनी सारंगचा वाढदिवस आहे, त्याच सकाळी मी जाणार आणि त्या सर्वांची माफी पण मागणार व असल्यानसल्या सा-या चूका माफ करून मला परत घेण्यासाठी यांनाही विनंती करणार. कारण एकटीने जगणं असह्य झालं आहे मला"


सुशिला जाताजाता म्हणाली "जशी तुझी इच्छा. पण उशीर होऊ नये याच मताची मी आहे"


सुशिला निघून गेल्यावर आज तिनं स्वत:साठी मस्तपैकी जेवण बनवलं व भरपूर जेवण केलं. झोपी जाण्यापूर्वी सारंगच्या वाढदिवसाच्या तारखेवर फुली मारली आणि त्या रात्री प्रथमच तिला गाढ झोप लागली. 


०००


अचानक तोंडावर आलेल्या ड्रायरच्या गरम हवेनं भूतकाळातून ती बाहेर आली. 


तिची घड्याळाकडे नजर जाताच ती दचकली. "अरे देवा, आता तर नऊ वाजायला केवळ दहाच मिनीटे शिल्लक राहिली त्यांत साडी नेसून, मेकअप करणं कसं शक्य होईल देव जाणे. बराच उशीर होईल अशानं तर" म्हणत तिने खूप वेगात तयारी सुरू केली. दहा मिनिटातच तिने मेकअपला फाटा देत आपली तयारी आटोपली. आरशांत बघितलं तशीही ती आधीच खूपच सुंदर होती. मेकअप न करताही ती आताही सुंदर दिसत होती. आताशा ती वर्तूळं पण आपोआपच दिसेनासी झाली होती. 


कुलूप हातात घेऊन ती खोलीच्या बाहेर आली तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. वेगानं खोलीचं दार ओढून त्याच वेगात तिनं खोलीला कुलूप लावलं आणि धाडधाड जिना उतरून वेगानं खाली आली. आता तिला सारंगकडे जाण्याची खूपच घाई झाली होती. त्यामुळे माघारी बाय बाय करीत असलेली सुशिला तिला दिसली पण नाही. 


आता घाईघाईने तिची पावले जवळच्या ऑटो स्टॅंडच्या दिशेकडे धावल्यासारखी पळत जात होती. पाच मिनीटांचं अंतर तीने दोन मिनीटात पार केलं आणि घामाघूम चेह-यानं ती ऑटो स्टॅंडवर पोहचली. पण हाय रे दैवा!


नेहमी खाली ऑटोनी गजबजणारा ऑटो स्टॅन्ड आज मात्र सुनासुना दिसत होता. एकही ऑटोवाला तेथे नसावा म्हणजे काय? संप तर नाही ना सुरू ह्या ऑटोवाल्यांचा?


तिनं रिस्टवाॅच बघितली. नऊ वाजून चार मिनीटे झाली होती. एकएक मिनीट आता तिच्यासाठी महत्वाचा होता. सारंग ऑफिसच्या टाईमपालनात खूपच जागरूक होता. साडेनऊ म्हणजे साडेनऊलाच तो ऑफिससाठी घराच्या बाहेर निघून जातो याचा तिला चांगलाच अनुभव आला होता. 


आता तिच्या गळ्यात आवंढा दाटून आला. तिनं स्टॅंडवरच्या ओळखीच्या पानठेलेवाल्यास विचारलं "भईयाजी,आज ऑटोवाले का स्ट्राईक शुरू है क्या? " 


ती नेहमीच काॅलेजला जाण्यासाठी येथूनच ऑटो करायची हे त्याला माहिती होतं. 


त्यानं हसून म्हटलं "नही ना बहेनजी।अभी तो चार ऑटो सवारी को लेकर चले गये। " 


तिनं विचारलं "कब? " 


तो म्हणाला "अभी-अभी नौ बजे" 


परत तिच्या गळ्यात आवंढा आला. आता कसं करणार? तिच्या ह्रदयाची धडधड सुरू झाली. समोरून एक ऑटोरिक्षा दिसताक्षणीच तिनं त्याला थांबवण्यासाठी आपला हात उंच केला आणि लगेच खाली पण आला कारण त्या ऑटोत प्रवासी खच्चून भरलेले होते. 


लगेच दुसरा ऑटो पण प्रवाशांनी भरलेला तिच्या समोरून वेगात निघून गेला. ती चरफडत राहिली. 


त्याचवेळी तिला दूरवरून एक खाली ऑटो येतांना दिसला आणि तिनं त्याला थांबण्यासाठी हाताने इशारा करूनही तिच्या समोरून खूप वेगात निघून गेला.


तिनं संतापून त्या ऑटोवाल्यास खूप शिव्याश्राप दिले. चरफडून म्हणाली "मेले लेकाचे,गरज नसते तेव्हा 'कहाॅ चलना बहेनजी , कहाॅ जाना बहेनजी' असं विचारत भंडावून सोडतात आणि आज बघा कसा माज आलाय ह्यांना "ती आता पुरती रडकुंडीला आली. 


खाली असलेला ऑटो लवकर यावा यासाठी मनात देवाचा धावा करू लागली.


आणि देव तिला खरोखरच पावला. दुरवरून एक खाली ऑटोरिक्षा येतांना तिला दिसला. ती वेड्यासारखी रोडच्या मध्यभागी धावत गेली आणि दोन्ही हात उभे करून ऑटोरिक्षाला थांबवण्यासाठी हात हवेत हलवू लागली.


ऑटोरिक्षा खूप वेगात येत होता पण ड्रायव्हरने तिला दुरूनच वेड्यासारखी हातवारे करीत असल्याचे पाहिले होते. त्यानं भितीनं तेथूनच करकचून ब्रेक दाबायला सुरूवात केली होती तरीपण ब्रेकचा कर्कश आवाज करून ऑटो थांबला तो अगदी तिच्या पुढ्यात. 


ब्रेकच्या कर्कश आवाजानं त्या पानठेला वाल्यासह सर्वांचं लक्ष ऑटो ड्रायव्हर कडे वेधल्या गेलं आणि ते सर्व ऑटोच्या आसपास गोळा होऊ लागले. 


त्या ऑटोरिक्षाचा ड्रायव्हर रागात खाली उतरला आणि तिला म्हणाला "अहो मॅडम, आत्महत्या करायला माझाच ऑटो मिळाला काय तुम्हास्नी?" 


मग बघ्यांना म्हणाला "बघा हो तुम्हीपण. या मॅडमनी काय केलं ते? " 


त्या सर्वांसमोर ती ऑटोवाल्याला हात जोडून ती म्हणाली "दादा, माझ्या जीवन मरणाचा प्रश्न झाला आहे. मी जर लवकर लक्ष्मीनगरात नाही पोहोचले तर काय होईल, ते सांगता येत नाही. तुम्ही सांगाल, तेवढे पैसे मी देते तुम्हाला पण मला लगेच तुम्ही लक्ष्मीनगरात घेऊन चला" असं म्हणत ती ऑटोत जाऊन बसली.


ड्रायव्हर म्हणाला "असं करू नका मॅडम. माझी नेहमीची सवारी आहे. उशीर झाल्याने मी तिकडेच वेगात जात होतो. त्याला काय उत्तर देऊ मी. उतरा खाली तुम्ही आता" 


कमला बघ्यांकडे बघत म्हणाली "तुम्ही सारे तर मला ओळखतात ना? मग समजवानं ड्रायव्हरला कांही तरी"


आता पानठेलेवाला पुढे होऊन ड्रायव्हरला म्हणाला "वो क्या है भय्या के, मॅडम कभी ऐसा तो करती नही। आज उनपर जरूर कोई मुसीबत आई है, तो आपको रिक्वेस्ट कर रही है तो आप जल्द उन्हे पहुंचा दिजीये। बाकी रही आपकी रेग्युलर पॅंसेजर की बात, तो आप उन्हे मोबाईल से हालात बताईये और हो सकता है मान भी जाये। "


ड्रायव्हरला त्याची गोष्ट पटली आणि "ऐसा करना है?" म्हणत शर्टच्या खिशातून मोबाईल काढून त्याच्या नियमित सवारीसोबत त्यानं बोलणं केलं आणि तो मोबाईल बंद करून म्हणाला "ठीक है मान गये वो। मै ले जाता हू उन्हे"

पानठेलेवाला म्हणाला "अल्लाह आपका भला करे भैय्या, अब जल्द ले जायें इन्हे"


ऑटोवाला ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि स्टार्टरचा दांडा वेगात वर ओढून ऑटो सुरू केला तसा अस्वस्थपणे सीटवर बसलेल्या कमलच्या जीवात जीव आला.


ऑटोवाल्यानं वेगात ऑटो चालवत विचारलं "कुठं जायचं आहे आपणाला? "


तिनं पत्ता सांगितला आणि पुढे म्हणाली "दादा, माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. साडेनऊ वाजण्यापूर्वी मला त्या बोळीसमोर कसंही करून पोहचून द्या" 


ड्रायव्हर म्हणाला "कसंही करून म्हणजे? मध्ये सिग्नल्स आहे, सडकेने चालणारी लोकं आहेत, मला त्यांचाही विचार करायला नको कां? आणि आताच तर सव्वा नऊ वाजून गेलेत व कितीही वेगात ऑटो चालवला तरी या सा-यांचा विचार केला तर मेनरोडनं आपण साडेनऊच्या पूर्वी लक्ष्मीनगर चौकात पोहचू शकत नाही. 


कमलानं ऑटोवाल्यास हात जोडले आणि म्हणाली " दादा, मघाशीच मी म्हणाल्ये,हा माझ्या जीवन मरणाचा प्रश्न झाला आहे. कसंही करा आणि मला साडेनऊ पूर्वी पोहचवा "असं म्हणतांना ती रडकुंडीस आली. 


ड्रायव्हरला तिची दया आली आणि म्हणाला "चिंता करू नका ताईसाहेब, हा बघा मी कसा चालवतो ऑटो" म्हणत त्यानं ऑटो फूलस्पीडवर आणला आणि चौकातील सिग्नल्सना फाटा देत त्यानं गल्लीबोळातून ऑटो चालवत बजाजनगर चौकातून नऊ पंचेवीसला ऑटो लक्ष्मीनगर चौकाच्या दिशेकडे नेला. 


आता येथून लक्ष्मीनगर चौक फक्त पाच मिनिटे पूढे असल्याचं तिला माहित होतं पण चौकाच्या पूढे जात नाही तोच झटके देत ऑटो बंद पडला. ऑटो बंद पडल्याचं बघून ती परत रडकुंडीस आली. त्याच स्वरात तिनं विचारलं "आता काय झालं, दादा? " 


ऑटोवाला खाली उतरत तो म्हणाला "कांही समजत नाही, ताईसाहेब. बघतो मी काय झालं ते" म्हणत त्यानं ड्रायव्हिंग सीट उजवीकडे फिरवली. खाली इंजिन होतं आणि ते खूप गरम झालं होतं.


ऑटोवाला म्हणाला "माफ करा ताई, फूलस्पीडनं ऑटो चालविल्यानं इंजिन गरम होऊन बंद पडलं आहे" 


तिच्या डोळ्यात अश्रू आले. हुंदके देत ती म्हणाली "कसं होणार आता माझं? " 


ऑटोवाला ही अस्वस्थ होत म्हणाला "रडू नका ताई, मी परत प्रयत्न करून बघतो" म्हणत त्यानं सीट पूर्ववत केली आणि त्यावर बसून स्टार्टरचा दांडा जोरातच वर ओढला आणि काय आश्चर्य! ऑटो सुरू झाला. 


ड्रायव्हरला तर तिच्यापेक्षाही खूप आनंद झाला व लगेच एक्सीलेटरला जोरात फिरवून त्यानं वेगात ऑटो पूढं नेला आणि त्याचवेळी लक्ष्मीनगरच्या चौकातून जोरदार ब्रेक दाबण्याचा आणि वाहनांची टक्कर झाल्यासारखा आवाज ऐकू आला.


समोरची सारी वाहने एकदम थांबली म्हणून तो ऑटोवालाही त्यांच्या मागे थांबला. आता कमला पुरती रडकुंडीस आली. ती जोरजोरात रडायला लागली. 


आता साडेनऊ वाजायला आले आणि इतके आटोकाट प्रयत्न करूनही अजून ती लक्ष्मीनगर चौक पार करू शकली नाही. 


तिचं रडणं ऐकून ऑटोवाल्यास दया आली आणि त्यानं चौकाकडून येत असलेल्या एकाला विचारलं "अरे वो भैय्याजी, क्या हुआ है चौक में? " 


त्यानं सांगितलं "चौक में अभीअभी ट्रक और स्कूटर वाले का एक्सीडेंट हो चुका है,आगे पूरा चौक जाम हो गया है और मुझे नही लगता कि, दो घंटे के भीतर ट्राफिक क्लिअर होगा. " 


ऑटोवाल्यानं सहानुभूतीने, पदर तोंडावर ओढून हुंदके देत असलेल्या कमलाकडे बघत म्हणाला "चिंता नको ताई. मी आता डावीकडच्या झोपडपट्टीत वळवून शार्टकटनी लक्ष्मीनगर चौकापूढे जातो की नाही बघा आत्ताच" 


तिचे हुंदके कमी झाले व त्यानं ऑटो महत्प्रयासाने डावीकडच्या झोपडपट्टीत आणला आणि तेथल्या अरुंद बोळातून कसातरी ऑटो चालवत शेवटी तो लक्ष्मीनगर चौकात आला. ते बघून कमलाची आशा पल्लवित झाली आणि तिनं चौकाकडे बघितलं. 


लक्ष्मीनगर चौकात एक्सीडेंटनी हाहाकार माजला होता. ते ज्या दिशेकडून येत होते त्याच्या विरूद्ध दिशेला एक्सीडेंट झाल्याचं गोळा झालेल्या गर्दी वरून दिसत होतं.जो मृत झाला होता त्याच्या नातेवाईकांच्या आक्रोशाने वातावरण शोकाकुल झाले होते. 


पोलिसांची लाॅरी त्या जागी आली होती. ते बघ्यांची गर्दी दूर करीत होते. पण त्यांना यश येत नव्हते. 


चौकाच्या पलिकडे गर्दी वाढत वाढत त्यांच्या ऑटो पूढे यायला लागली होती. 


अपघाताच्या ठिकाणी जाऊन एकदा बघावं म्हणून ड्रायव्हरने ऑटोची स्पीड कमी केली. 


ते बघून कमला त्याचेवर ओरडून रागात म्हणाली "अरे नऊ पस्तीसच्यावर टाईम झाला आणि तू येथे टाईमपास करायला लागला. चल लवकर ऑटो पूढे घे आणि मला पोहचवून दे लवकर" 


ऑटोवाल्यानं नाईलाजाने ऑटो सरळ पूढे नेत पुटपुटला "असं करायचं नसतं मॅडम, कधी कधी यात आपला नातलगही निघतो" पण त्याचं पुटपुटणं हवेतच विरलं. 


कारण सारंगच्या घरासमोरची बोळ आता जवळ आली होती. 


कमला ड्रायव्हरला थॅंक्स म्हणत वेगात ऑटोखाली उतरली. आता नऊ चाळीस झाले होते. तिनं वेगात पर्स उघडली आणि त्यातले जे पाचशे तिच्या हातात आले ते ड्रायव्हरच्या हातात दिले आणि वेगात ती बोळीत शिरली.


ड्रायव्हरच्या "अहो मॅडम, बाकी पैसे घेऊन तर जा" म्हणण्याकडेही तिचं लक्ष गेलं नाही. 


बोळीत शिरल्या बरोबर तिला एक गोष्ट खटकली.बोळीत सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती. कांहींच्या घराचे दार उघडे होते पण घरात कोणीच दिसत नव्हते. तर काहींच्या घराला कुलूप होती. कांही तरी विचित्र जाणवलं तिला. 


याच विचारात ती सारंगच्या घरासमोर आली. पंधरा वर्षापूर्वी घर जसं होतं तसंच आताही होतं. तिनं दारावर हात ठेवताक्षणी दार उघडलं. 


उशीर झाल्याने सारंग घरी भेटण्याची शक्यता कमीच होती. निदान त्याच्या आईला भेटून तिची माफी मागून घरात पुनर्प्रवेश करून घ्यावा आणि सारंगला कांहीही कल्पना न देता सरळ सायंकाळी त्याला आश्चर्यचकित करावे आणि त्याचा वाढदिवस तिघांनी मिळून आज रात्रीच धडाक्यात साजरा करावा असा विचार मनात घोळत असतांना ती कधी हाॅलमध्ये आली कळलंच नाही तिला. 


तिला स्वयंपाक खोलीतून कांही तरी जळत असल्याचा वास आला. ती स्वयंपाक खोलीत आली. स्वयंपाक खोली धूराने व्यापली होती. गॅस शेगडीवर ठेवलेल्या स्टील भांड्यातलं दूध जळून त्याचा धूर खोलीत पसरला होता आणि बर्नर सुरूच होता. 


कमलानं "ह्या सासूबाई ना! गॅस सुरू करून आंघोळीकरिता बाथरूममध्ये जाऊन बसल्या असतील. तेव्हा पण दोन-तीन वेळा असंच केलं होतं ह्यांनी" म्हणत तिनं बटन फिरवून शेगडी बंद केली. 


मग सासूबाईला शोधत ती तिच्या बेडरूममध्ये आली. त्यांची बेडरूम आताही अगदी तशीच दिसत होती. फक्त एकच बदल दिसला तिला. काॅटच्या शेजारी सारंग व तिचा फोटो टेबलवर दिसला. तो फोटो तिनं उचलून हातात घेतला व निरखून पाहिलं. कित्ती आनंदी दिसत होती दोघं त्या फोटाेत. 


तिनं फोटोतल्या सारंगचं हळूच चुंबन घेतलं आणि म्हणाली "आज आपण दोघांनी तुमचा वाढदिवस जोरात सेलिब्रेट करायचं हं. " म्हणत तिनं फोटो तसाच ठेऊन दिला. बेडवर झोपणा-याला तो फोटो सहज दिसत होता. म्हणजे सारंग अजूनही तिला विसरला नव्हता तर" हाच विचार करत ती बेडरूम बाहेर आली. 


तिनं लगेच बाथरूममध्येही सासूबाईला शोधलं पण तेथेही त्या नव्हत्या. आता तिला याचं आश्चर्य वाटलं.मग तिने घरात सगळीकडे शोधलं पण त्या कुठेच दिसल्या नाही. कुठे गेल्या असतील सासूबाई घर एकटं सोडून?असा विचार करत ती घराच्या बाहेर आली. 


समोरच्या घराच्या खिडकीवरील सज्जावर चिमण्यांनी घरटं बांधलेलं होतं. तिकडे दुर्लक्ष करून तिनं घरा समोरच्या उजवीकडे व डावीकडे गेलेल्या रस्त्यावर दृष्टीक्षेप टाकला. नेहमी गजबजणारा रस्ता आताही सामसूम होता. रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हतं आता. .....


त्याचवेळी तिला रस्त्याच्या उजवीकडून डावीकडे धापा टाकत धावत जाणारा एक अनोळखी तरूण दिसला.


त्याला दारासमोर थांबवत तिनं विचारलं "अहो, मला एक सांगताय कां? या मोहल्यातील सर्व लोकं कुठे गेलीत हो?" 


तो तरूण रडकुंडीला आला होता व धापाही टाकत होता. त्यानं रडतच म्हटलं "अहो,तुम्ही नवीन आहात असं दिसतेय मला. म्हणून तुम्हाला कांहीच माहित नाही. अहो, ज्या घराच्या दारासमोर तुम्ही उभ्या आहात ना, त्याचे मालक सारंग यांचा आत्ताच साडेनऊच्या सुमारास लक्ष्मीनगर चौकात अपघात झाला आहे आणि या एरीयातले सर्वजण तिकडे गेले आहेत. मी पण तिकडे जात आहे, तुम्ही पण चला" म्हणत जोरात रडत आणि तसाच धापा टाकत तो पूढे निघून गेला. 


प्रथम तर तो काय बोलला ते तिच्या लक्षातच आलं नाही. म्हणजे ऑटो बसल्या असतांना लक्ष्मीनगर च्या चौकातून दोन वाहनांच्या अपघाताचा जो आवाज तिनं ऐकला होता, तो सारंगच्या अपघाताचा आवाज होता म्हणजे आणि चौकात आल्यावर तो अपघात पाहण्यासाठी ऑटो ड्रायव्हरने स्पीड केली म्हणून ती त्याच्यावर कित्ती रागावली होती त्याच चौकातील अपघात सारंगचा झाला होता म्हणजे! 


आणि हे जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा तिनं उभ्या-उभ्या जोरदार किंकाळी मारली. तिची ती आर्त किंकाळी त्या मोहल्ल्यास भेदून आसमंतात निघून गेली. 


तिच्या किंकाळीमूळे समोरच्या घरट्यातले चिमणा-चिमणी घाबरून आपलं घरटं सोडून आसमंतात पळाले आणि तिच्या किंकाळी नंतर समोरच राहत असलेल्या मनुमावशीच्या घराचं दार उघडलं. 


काठीचा आधार घेऊन मनुमावशी बाहेर आली व सांभाळून हळूहळू आपले पावले पूढे टाकत ती कमला समोर येऊन उभी झाली व तिनं थरथरत्या स्वरात डोळे फाडून विचारलं "कोण गं तू? आणि इतक्या जोरात ओरडलीस कशाला? " 


कमलानं तिचे हात हातात धरून रडत म्हणाली "बघा ना मावशी, अचानक काय झालंय ते. मी आले अन् हे गेले"


मावशीनं जोरात विचारलं "पण आहेस तरी कोण तूं? " 


कमला तिच्या हातून आपला हात न सोडवता म्हणाली "मनू मावशी, तुम्ही ओळखलं नाही मला? मी कमला, सारंगची पत्नी कमला" 

असं म्हणताना तिच्या पायातले त्राण निघून गेलं आणि तिच्या डोळ्यासमोर एकदम अंधारी आली. ती मनूमावशीचा हात सोडून दाराच्या पायरीवर मटकन् खालीच बसली. 


आता मनुमावशीनं तिला ओळखलं. ती पण हळूहळू खाली फरशीवर बसली.  


मनुमावशीनं डोळे बंद केलेल्या कमलचा उजवा हात आपल्या हातात धरला आणि थरथरत्या स्वरांत म्हणाली "पोरी कमले, काय केलेस गं तू हे? अगं पोरी, तुमच्या दोघांत दुरावा निर्माण करून काय साध्य केलंस तूं? सारंग तुझ्यावर नितांत प्रेम करत होता तसंच आपल्या घरच्यांवरही तो प्रेम करीत होता. म्हणूनच घटस्फोट न घेता तुझ्या इच्छेप्रमाणे त्यानं तुला वेगळं होण्यास होकार दिला. तो घरच्यांना नाराज करू शकत नव्हता अन् तुलाही. अगदी अडकित्त्यातली सुपारी झाला होता सारंग. तुला परत आणायची त्याची इच्छा होती पण तुझा मान राहावा,तुला दुखवू नये यासाठी तो तुझ्यापासून दूरच राहिला व त्याच्या आई व बहिणीला पण स्वत:ची शपथ देऊन त्यांना तुझ्यापासून दूर ठेवलं.नाहीतर त्यांनी कधीच तुला घरी परत आणलं असतं कारण दोघींच्या मनात तुझ्याबद्दल कांहीच वाईट हेतू नव्हता.पण नासुकल्या प्रकरणाचा बाऊ करून तूच वेगळी झालीस. " 


मनुमावशी बोलण्यात स्पष्टवादी होती हे तिला माहित होतं पण हे ऐकल्यावर डोळे मिटून पायरीवर बसलेल्या कमलाच्या ह्रदयातून एक जबरदस्त कळ आली. 


कमलानं लगेच डाव्या हाताने आपली छाती दाबून धरली.बंद झालेल्या डोळ्यांसमोरचा अंधार आणखी गडद झाला.


मनुमावशीचे शब्द तिला खोल विहीरीतून ऐकू येत असल्यासारखे ऐकू येत होते."तू कधीतरी परत येशीलच, याची सारंगला खात्री होती पण तू पंधरा वर्षे होऊनही आली नाहीस. आज त्याचा वाढदिवस होता आणि आज आठ वाजता त्यानं आपला अंतिम निर्णय घेऊन घरात सांगून टाकलं की, आज कांही झालं तो तुला घरी सकाळी दहाच्या पूर्वी परत आणणार आहे. त्यासाठी आज साडेनऊ पूर्वी तो स्कूटर बसून माझ्या समोरच घराच्या बाहेर निघून गेला आणि बघ, नियतीनं तुमच्या दोघांत कायमचा दुरावा निर्माण करून टाकला गं .... "


// समाप्त //




Rate this content
Log in

More marathi story from Naresh Dhotkar

Similar marathi story from Tragedy