नात्यांचा खेळ इतका किचकट का रे
नात्यांचा खेळ इतका किचकट का रे


एप्रिल २०१५ - एप्रिलची ती आठवण आजपण मनात दाटते, का कुणास ठाऊक अन् मन सुन्न होते. अचानक बाबांची तबियत बिघडली आणि बाबांना हॉस्पिटल ला अॅडमीट केले. कारण काही समजत नव्हते कोणाला पण डॉक्टर बोलले हार्ट अटॅक आला आहे बायपास ऑपरेशन करावे लागेल. काहीतरी कापतांना सुरीने बोट कापलं जावं, आणि टचकन पाणी डोळ्यात यावं, काळीजच तुटावं, अगदी तसं झालं. देवाची कृपा अन् बाबांचे नशीब वाचले.
बाबा घरी आल्यानंतर सांगायचे होते त्यांना की थकलायेस तुम्ही आराम करा नका जाऊ कामावर पण तो आपला अधिकार नव्हे सूर्याला की मावळ आता. खरंतर ते त्यांनी सांगायला हवे होते “काय हवं ते करा माझी तब्येत बरी नाही, मला कामावर जायला जमणार नाही.” खरंतर हा अधिकार आहे त्यांचा सांगायचा, पण ते काकुळतीला का आले? ह्या विचारात माजे मन खचलं. नंतर माझं उत्तर मला मिळालं, जस जसा मी मोठा होत गेलो, बाबांच्या कवेत मावेनासा झालो नुस्त माझं शरीर वाढत नव्ह्त त्याच्यासोबत वाढत होता तो अहंकार आणि विसंवाद, आई जवळची वाटत होती, पण बाबापण तेवढेच जवळचे वाटत होते. मनाच्या खोल तळापर्यंत प्रेमच प्रेम होतं पण ते शब्दात सांगताच आलं नाही; बाबांनेही ते दाखवले असेल, पण दिसण्यात आलं नाही. मला लहानाचे मोठे करणारे बाबा स्वतःच स्वतःला लहान समजत होते. मला ओरडणारे-शिकवणारे बाबा का कुणाच ठाऊक बोलतांना धजत होते.
मनाने कष्ट करायला तयार असलेल्या बाबांना शरीर साथ देत नव्हते हे त्या शून्यातून उभा केलेल्या तपस्वीला घरात नुसतं बसू देत नव्हते, हे मी नेमकं ओळखलं. लहानपणीचे हट्ट पुरवणारे बाबा, मधल्या वयात अभ्यासासाठी ओरडणारे बाबा, आणि नंतर चांगले वागण्यासाठी कान उघडणी करणारे बाबा, आजवर सारं काही देऊन कसलीच अपेक्षा न ठेवता, जेव्हा खुर्चीत शांत बसतात, तेव्हा वाटत की काही जणू आभाळंच खाली झुकलं. आज माझंच मला कळून चुकलं.