मुलगी काळाची गरज
मुलगी काळाची गरज
"सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते!"
सर्वप्रथम मी श्री महालक्ष्मीला नमन करते! कारण ती स्त्री रुपी लक्ष्मी आहे. फार पूर्वी सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा ब्रह्मदेवाने चिखलाची एक मूर्ती तयार केली आणि आपल्या दैवत शब्दही शक्तीने ती मूर्ती सजीव केली आणि ती स्त्री होती. या पृथ्वी वरचा पहिला मनुष्य प्राणी म्हणजे स्त्रीच. स्त्रीचा उल्लेख करताना असं म्हणावं लागेल स्त्री हीच सर्वकाही आहे. आदि अंत अंतरिक्ष माता भूत-भविष्य तीच आहे. पुराणकथांमध्ये ही स्त्रियांच्या "आदिशक्तीचे"दर्शन घडले.
मी देवाचे आभार मानते त्याने मला स्री रुपी जन्माला घातले. त्या स्त्रीरूपी आईला मी वंदन करेल कारण " स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी", असे साने गुरुजींनी त्यांच्या शिकवणीतून सांगितले आहे. तिन्ही जगतात राज्य करून सर्वकाही जिंकून आलेल्या स्वामीला स्त्रीच्या प्रेमाची उणीव आपल्या प्रेमाची उणीव भासते. श्रीच्या प्रेमाचे विविध रूपे आहेत स्नुषा, पत्नी, भगिनी अशा विविध नात्यांनी ती जोखडलेली आहे. एक मूल जन्माला येते ते स्त्रीच्या अंकुरातूनच. त्याला पालवी फुटते ती तिच्या पालन पोषणातूनच. म्हणून स्त्री ही समाजाची देणं लागते.
स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा, व सुजाणपणा याची मूर्ती आहे. ती कोणत्याच बाबतीत कमी नाही भारतीय तत्वज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभुत सुविधा व समृध्दी देणारी लक्ष्मी ,दुसऱ्या टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा, आणि त्रिकोणाचा शिरोबिंदूमध्ये ज्ञान कल्पना देणारी महासरस्वती असते. एकविसाव्या शतकातली स्त्री तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. राजकारण, क्रीडा, पत्रकारिता, मल्टिनॅशनल कंपन्या, संशोधन, अभिनय जिथे जिथे संधी मिळेल तिने तिथे तिथे आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.स्वतःच कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी चा लागणारा संघर्ष तिने कधीच नाकारला नाही पण आता तिला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठीच संघर्ष करावा लागत आहे. कुठे गर्भपात असतानाच तिला शोधून तिचं अस्तित्व संपविण्यात येत आहे. या प्रकारात कित्येकदा अइच्छेने किंवा नाईलाजाने तिच्या जन्मदातिचा सहभाग असतो." मुलगाच हवा" तिला सभोवतालच्या गदारोळ यामध्ये तिला जगण्यासाठी आपल्या मुलीची चाललेली धडपड दिसत नाही.
कित्येक वेळेस नवजात अर्भके कचरापेटीत जिवीत अथवा मृत अवस्थेत आढळलेली आहेत आणि बर्याच वेळेस ते स्त्रीच अर्भक असते. हल्लीच काही महिन्यांपूर्वी ची हृदयद्रावक घटना आठवायची झालीस तर K.E.M. हॉस्पिटलच्या खिडकीमधून एका मातेने आपल्या नूतन अर्भकाला टाकून दिले. ही घटना तिथल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. तपास झाल्यानंतर असं लक्षात आलं की तिने जन्म दिलेल्या जुळ्या बालकांपैकी तिने स्त्री अर्भकाला खिडकीमधून टाकून दिले होते. नंतर त्या महिलेची मेडिकल काउंसलिंग करण्यात आली. C.S.R या संस्थेच्या अहवालानुसार स्त्री भ्रूणहत्या मागील प्रमुख दोन कारणे समोर आली ती म्हणजे
1) वारसा हक्क (मुलगाच हवा)
2) हुंडा पद्धत (मुलगी नको)
मुलगा झाला की कुटुंबाचा वंश वाढतो तो कुटुंबाचे पालन पोषण करतो. लग्न करून घरी सून आणतो आणि ती येताना हुंडा आणते याउलट मुलीचा जन्म म्हणजे तिच्या शिक्षणाचा खर्च, लग्नाचा खर्च आणि त्यापेक्षाही भयंकर म्हणजे हुंडा या कल्पनेनेच तिचा जन्मच नको असतो. सन 2011 च्या जनगणनेनुसार 2001 च्या तुलनेत दर एक हजार मुलांमागे मुलीच्या संख्येत कमालीची घट झालेली दिसते. स्त्री भ्रूण हत्या ही समाजाला लागलेली एकाप्रकारे कीड आहे सरकारनेही याबाबत पुढाकार घेत पुष्कळसे नियम बनविले आहेत. पुष्कळसे कायदे अधिनियम आणि योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. जसे की
1)हुंडा विरोधी कायदे
2) हुंडा विशेष अधिनियम
3) 1961 लिंग परीक्षण विरोधी कायदे
4)पीसीपीएनडीटी (PCPNDT) अधिनियम
5) कन्या शिक्षण प्रोत्साहन कायदे
6)स्त्री अधिकार हक्क अनुमोदन कायदे
7)कन्येसाठी संपत्तीमध्ये समान अधिकार अनुमोदन कायदे इत्यादी.
पण फक्त सरकारने कायदे बनवूनच चालणार नाही तर आपल्यापैकी प्रत्येकाला स्त्रीभ्रूणहत्येच्या विरोधात लढा द्यायला हवा फक्त "लेक वाचवा" "मुलगी शिकली प्रगती" असे स्लोगन्स बनवून चालणार नाही तर समाजाच्या स्त्री बद्दलची मानसिकता बदलण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करायला हवेत.
शेवटी सर्वार्थाने सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य तिच्या मध्ये आहे. आणि महत्वाचं म्हणजे मातृत्व तिच्याकडे आहे. मातृत्वाच्या अनुषंगाने येणारे संस्कार आचार विचार याची ती जननी आहे हे विसरता कामा नये. म्हणूनच सांगते स्त्री ही एक काळाची गरज आहे.
