Vinod Neve

Tragedy

3  

Vinod Neve

Tragedy

माझिया मनाचा मकरंद

माझिया मनाचा मकरंद

3 mins
12.1K


     नदीच्या किनारी एकांतात बसून सरकत्या वाळूला 'आपलेसे' करीत, कधी वाळूवर बोटे फिरवीत तर कधी क्षितिजाकडे एकटक बघत मानसी शांतपणे बसली होती. शितल वारा, मंद सुगंध, संथ वाहणारे पाणी, मधूनच उसळत येणारे पाण्याचे तुषार तिला सुखावत होते. एकांतात आठवणींनी मन 'किलबिलत' होते. अलगद गवताच्या पात्यावर' हसत - डुलत' होते. वाऱ्याचा स्पर्श होताच'जीवलगा' सोबत गगनी उंच झेपावत होते. '' वेडा वारा झोका घेई उंच आकाशी झेपावत नेई.'' तिचे मन आज भिजलेल्या आठवणींचा पसारा मांडत होते. 


      मानसी - मकरंद चिंब प्रेमात न्हाऊन निघत होते. त्याच्या 'मानसीचा' दरवळणारा सुगंधित मकरंद जणू फक्त तिचाच होता. तिच्या मनाचा 'मानस' घेत मकरंद दिला खूणावत होता. त्याचवेळी मकरंदचा आस्वाद घेत मानसी हळूहळू बहरत होती. बालपणापासून एकत्र खेळलेले हे दोघं घराच्या समोरासमोरच रहात होते. खेड्यात राहणारे दोघांचेही आई-वडील शेतकरी होते. शेतीची कामे करून उदरनिर्वाह करणारे, एकत्र कुटुंब पद्धतीत रमणारे, खेळकर वृत्तीचे, सर्वांबद्दल आपुलकीची भावना जपणारे मानसीचे कुटुंब होते. श्रीमंतीचा गर्व नसलेले असे हे प्रगतशील शेतकरी चाकोरीबद्ध जीवन जगत होते.

 

       भाजी - भाकर, चटणी - भाकर खाऊन मजेत राहणारे मकरंदचे कुटुंब. '' धरणीचे अंथरूण आणि आभाळाचे पांघरूण'' घेऊन जगत होते. ''हाडाची काडे करून पै-पै जमवणारे ''हे कुटुंब गावात लौकिक होते. लंगडी, लपंडाव, गोट्या, विटी - दांडू हे खेळ आपल्या मित्रांसोबत खेळत असत. शिक्षण घेता-घेता आपण कधी मोठे झालो हे त्यांच्या लक्षातही आले नाही. मानसी कुशल चित्रकार आहे. तर मकरंदने वैद्यकीय क्षेत्रात प्राविण्य मिळवले होते. तारुण्याच्या पाऊलवाटेवर नकळत दोघे एकमेकांकडे आकर्षिले जात होते. '' साधी राहणी आणि उच्च विचारसरणीच्या'' मकरंदवर ती भाळली होती. चोरट्या नजरेने त्याच्याकडे बघत होती. त्याला बघताच तिची 'कळी खुलत' होती,सुखद अनुभवात हरवल्याचा भास देत होती. 'मन उधाण वाऱ्याचे' याप्रमाणे तिची स्थिती झाली होती. 'माझीया मना जरा बोल ना' मनाचा वेध घेणारा लटका प्रयत्न ती करत होती. त्याचा अंतरंगातील 'मानसी' शोधण्याचा प्रयत्न करत होती.


      तिच्या कुंचल्यात जणू जादूच होती. आपल्या मनातील भाव चित्रात उमटविण्याचा तिचा प्रयत्न होता. तो सुद्धा तिच्या चित्रातील भाव अलगद टिपत होता. तो दिसताच मनातल्या मनात 'लाजेने चूर होणे', 'गुलाबी गाली खळी पडणे' हे भाव तो नजरेत भरत होता. आपले स्वप्न 'मखमली' व्हावे, मखमली प्रश्नाला रेशमाच्या उत्तराचा स्पर्श कधी होतो याची जणू तो वाट पाहत होता. 


     अचानक दोघांच्या भावनांना अंकुर फुटतो. दोघांच्याही आई-वडिलांनी त्यांच्या' मनीचे भाव' नकळत अचूक टिपलेले असतात. या नवीन नात्याने त्यांचे जीवन फुलणार, त्यांचे भावी आयुष्य फुलणार याची जाणीव आई-वडिलांना होते. आपल्या मुलांच्या जीवनाला 'सोनेरी झालर' लावण्याचा निर्णय घेतात. 'मानसी फुलले रे क्षण माझे फुलले रे'म्हणून आनंदित होते. पैशांचा होणारा अपव्यय, वेळेची बचत, मान-पान, हुंडा पद्धत हे सारे झुगारून भारतीय संस्कृतीप्रमाणे घरगुती वातावरणात त्यांचा विवाह-सोहळा संपन्न होतो.  मकरंदला सामाजिक कार्याची आवड असते. समाजाचे आपण देणेकरी आहोत. समाजाचे ऋण फेडावे या जाणिवेतून गावकऱ्यांची सेवा करण्याचा तो निर्णय घेतो. 'लोकसेवा' नावाने दवाखाना उघडतो. 


     एकत्र कुटुंब पद्धत असल्यामुळे घरातील सर्वजण एकत्र जेवत असत. जेवताना निरनिराळ्या विषयांवर त्यांची चर्चा सुरू होती. एके दिवशी मकरंद वडिलांना विचारतो आपल्याकडील लोकांची रोगप्रतिकार शक्ती फारच कमी आहे. ती वाढवण्यासाठी काय करता येईल? मधेच मानसी म्हणाली मी सांगू का? ती म्हणाली आपला भारत देश 'कृषिप्रधान' आहे. त्यामुळे सकस अशा अन्नधान्याचे उत्पादन करा. तिच्या कल्पनेतून वडील त्याला सेंद्रिय शेती करण्याचा सल्ला देतात. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून तो सकस अन्नधान्याचे उत्पादन करू लागला. प्रात्यक्षिक म्हणून ते अन्नधान्य नातेवाईक आणि गल्लीतील लोकांना त्याने दिले. काही दिवसानंतर त्याच्या लक्षात येते की यामुळे सार्‍यांची रोगप्रतिकार शक्ती वाढली आहे. मानसीची संकल्पना असते की हे सकस अन्नधान्य भारतातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावे आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवावी. 


     मकरंद मित्रांच्या सहाय्याने ''ग्रुप शेती'' करायला सुरुवात करतो. त्याला घवघवीत यश येते. या यशाची पावती अर्थातच मानसी असते. त्या दोघांच्या जीवनात खऱ्या अर्थाने ''सुगीचे दिवस'' आलेले असतात. मानसी जणू मकरंदच्या जीवनाचा 'खरा शिल्पकार' असते. यातूनच त्यांच्या सुखी संसाराची वेल बहरते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy