लगीन
लगीन


सदाभाऊच्या मुलीचं लगीन चार दिवसावर येऊन ठेपलेलं. गेल्या एक महिन्यापासून सगळ्या सामानाची जुळवाजुळव करता करता त्याच्या नाकी नऊ आलेले. पोरीचं लगीन म्हटलं की बापाचा दुसरा जन्मच होतो. नवरदेवाचे कापडं, पाहुण्यारावळ्यांना मानपानाची कापडं, टोप्या, उपारणे, भांडीकुंडी, टीव्ही, सोफा, कपाट असं सुईदोऱ्यापासून सगळं सगळं सामान पोरीच्या लग्नात द्यायला लागतं. मंडपवाला, स्वयंपाकाचा आचारी, बांगड्यावाला, सनईवाले या सगळ्यांशी बोलणी करून ठरवायचं, असे एक ना अनेक कामं रोजचं चालू होते.
तिन्हीसांज झालेली. सदाभाऊ डोक्यावर एक भलीमोठी गोणी घेऊन वाकत वाकतचं दारात येऊन ठेपला.
"अगं ये कारभारणे, जरा बाहेर येतीस का?" असं म्हणून बायको पार्वतीला सदाभाऊंनी जरा घाईगडबडीने आवाज दिला.
"आले आले". म्हणत धावतच पार्वती घराच्या बाहेर आली.
सदाभाऊंच्या डोक्यावर कसलीतरी भलीमोठी गोणी होती, तिला हात लावतचं.
"अगं बया" काय आणलं म्हणायचा या गोणीत?
"अगोदर तिचं बुड खाली तर टेकुदे, मग सांगतो की", असं म्हणत सदाभाऊ आणि पार्वती दोघांनी गोणी दारातच टेकवली.
सदाभाऊ गोणीच्या वज्यानं घामेघूम झालेला. डोक्याचं उपारनं सोडून घाम पुसता पुसता दारातच ठेवलेल्या बाजावर त्यानं बैठक टाकली. दिवस उन्हाळ्याचे असले तरी तिन्हीसांजेला गार हवेची झुळूक अंगाला सुखावत होती. सूर्य पश्चिमेकडे डोंगराआड जाऊन आकाशात लाली भरलेली. हवेत थोडाथोडा गारवा वाढू लागला होता. तोपर्यंत पार्वतीने पाण्याचा तांब्याभरून आणून सदाभाऊच्या हातात दिला आणि "चहा ठेवते" असं म्हणतं लगबगीनं गौऱ्या आणून चुलीत घालू लागली.
"अगं, लग्नाला घरातील गहू कमी पडतील म्हणून ही एक गोणी आणली पाटलाच्या कुशाबाकडून उसणी, पुढच्या साली आपले तयार झाले की देऊन टाकता येतील."असं मोठ-मोठ्यानं सदाभाऊ पार्वतीला सांगत होता.
"बैलांना चारापाणी केलं का?" असं खड्या आवाजातचं पार्वतीला सदाभाऊ विचारू लागला.
"व्हय" म्हणून पार्वती उद्गारली.
सदाभाऊ बोलता बोलताचं थांबला आणि त्याच्या डोक्यातलं विचारचक्र फिरू लागलं. उद्या सकाळी गहू दळायला नेऊन ठेवावे लागतील गिरणीत. नायतर पुन्हा लाईटीची पंचाईत यायची. लगीन चार दिसावं येऊन ठेपलयं. लगीन म्हटलं की सगळ्या गोष्टी गोळा करता करता पोरीच्या बापाचा जीव पार जेरीस येतो. एकदाचं लगीन पार पडलं म्हणजे माझा जीव भांड्यात पडला म्हणून समजा, तोवर आपली ही त्रेधातिरपीट चालूच राहिली. हा विचार चालू असतानाच सकाळी लवकर उठून पत्रिका वाटायला गेलेली पोरांची गाडी दारात येऊन थबकली.
"अरं पोरांनो लय उशीर केला रं?" असं सदाभाऊ पोरांना विचारू लागला.
"अहो बाबा, किती किती लांब पाहुणे हायेत आपले, कुठे कुठे जायला लागतंय, आणि काय ते रस्ते. एक वेळ सर्कशीतल्या तंबूत गाडी चालवनं परवडलं, पण हे रस्ते नको, आणि त्यात एवढे खड्डे, डोक्यात विचार येतो खड्ड्यात पडलं तर जीवचं जायचा".
तोपर्यंत पार्वती चहाचे कप घेऊन आली. सगळ्यांना चहा देऊन पुन्हा घरात गेली आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली.
"अहो बाबा, नवरदेवाकडच्या पाहुण्यांचा आम्ही गावाजवळ आल्यावर फोन आला होता, की नवरदेवाची आजी आत्ता एक तासापूर्वी वारली म्हणून."असं राम धास्तावल्या आवाजात बापाला (सदाभाऊंना) सांगू लागला.
"काय"?, आरं देवा, लई वंगाळ झालं. म्हातारीचं तसं वय झालं होतं, पण तिला बी हीच येळ सापडली का मरायला. आता मात्र लय सत्वपरीक्षा पाहिली देवानं. बरं, मयत कधी हाय काही सांगितलं का?"
"हो उद्या सकाळी नऊ वाजता होणार आहे म्हणाले."
"बरं बरं, मग उद्या सकाळी लवकरचं निघायला लागलं. आता जेवण करून लवकर पडू. आपल्या जवळच्या दोन-चार पाहुण्यांनाही सांगितलं पाहिजे. त्यांनाही फोन लावून कळवं."असं सदाभाऊ रामला सांगत होता.
सगळे घाईगडबडीत जेवण करतात, आणि झोपायला जातात. पण सदाभाऊला काय झोप लागली नाही, डोक्यात विचारचक्र चालू होऊन त्याला गरगरल्यासारखं होत होतं, जिवाचा आकांत करून एवढी तयारी करून ठेवली आणि हा मध्येच फाटक्यात पाय, बरं पत्रिकाही वाटल्यात, आचारी, मंडपवाले, बांगड्यावाले, सनईवाले, सगळ्यांना सांगितलयं, आणि ही मध्येच आडकाठी पडली. बरं सूतकात लगीन करा, असं बोलायला आपलं मनही धजावणार नाही. आणि लगीन पुढं ढकलायचं म्हटल्यावर, हे सगळं मुसळ पाण्यात. आपली परिस्थिती ही अशी,तेल हाय तर मीठं नाय. शेती सोडता दुसरा कसला आधार नाही. एवढी सगळी जुळवाजुळव केली, पण देवानं लय परीक्षा पाहिली आयुष्यात. आता आणखी आपल्या दुःखाच्या अग्नित तेल पडून हा आगडोंब उसळला म्हणायचा. 'दुष्काळात तेरावा महिना' ह्यालाच म्हणत्यात.
पार्वतीच्या डोक्यातही चिंतेच्या दिव्यानं काजळी धरलेली. पोरीचं लगीन म्हणजे जीवाला नुसता घोर. आता ही म्हातारीबी कशी आनंदाच्या कार्यात विघ्नं आणून गेली. पुढं कसं व्हायचं, भगवंतच जाणो. त्या विचारातच रात्रभर तिच्याही डोळ्याला डोळा लागला नाही. देवळीतल्या दिव्यापेक्षा तिच्या डोक्यातला दिवा मात्र जास्तच फुरफुरत होता.
भल्या पहाटेच उठून पार्वतीने चूल पेटवून सगळ्यांसाठी पाणी तापवलं आणि सदाभाऊंना आवाज दिला,"अहो उठा की, मयतीला जायचयं ना लवकर?"
"व्हयं,व्हयं,"असं म्हणतचं सदाभाऊ बिछान्यावर उठून बसला आणि पार्वतीला "अगं चूल पेटवली का?" म्हणून विचारू लागला.
"हो, आंघोळीसाठी पाणीबी तापलयं", पार्वती म्हणू लागली.
सकाळचा प्रात:विधी उरकून, जनावरांना वैरण तोडून टाकली. पार्वतीने झाडून लोटून घेतलं. शीतलला स्वयंपाक करायला सांगितलं आणि सदाभाऊ, पार्वती व मुलगा राम तिघेही मयतीसाठी गाडीवरून निघाले. नवीन होणाऱ्या व्याह्याच्या दारात पोहोचले, तेथे मोठमोठ्यानं रडारड चालू होती. मयतीची तयारी जवळजवळ झालेलीच होती. म्हातारी कालच वारल्यामुळे सगळे पाहुणेरावळे ही आलेले होते. हे पोहोचल्यावर अगदी दहा - वीस मिनिटातच तिरडी उचलण्यात आली. स्मशानभूमीत जाऊन मयतीचा कार्यक्रम आटोपला. सगळे माघारी परतले. काही वेळातच एकेक करता करता सगळी माणसं तिथून आपआपल्या घराकडे हळूहळू निघू लागली. सदाभाऊ, पार्वती तास-दोन तास थांबले आणि त्यांनीही तेथून निरोप घेतला.
दहावा, तेराव्वा झाला. थोडीफार शेतीवाडीची कामं राहिली होती, तीही पूर्ण झाली आणि आता पाहुण्यांबरोबर बोलून लग्नाची तारीख ठरवावी, या विचारातचं सदाभाऊ पाहुण्यांच्या घरी एक दिवशी अचानकच पोहोचला. चहापाणी झालं, थोडावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर सदाभाऊनी मूळ विषयाला हात घातला.
"या महिन्यातील 30 तारखेचा मुहूर्त चांगला हाय लग्नासाठी, मग ती तारीख ठरवायची का?"असं पाहुण्यांशी बोलून सदाभाऊनी विषयाला वाचा फोडली. शेतीवाडीची कामही आता उरकलीत. लांबची तारीख ठरवली, तर मग पुढं अवकाळी पावसाचा भरवसा नाय, वावटळी, वादळ सुरू होतया.
"हे बघा पावणं, राग मानू नका, पण जरा मी स्पष्टच बोलतो. आता हे सगळं राहुद्या बाजूला. आम्ही आता दोन वर्षे लगीन करायचं थांबवलं हाय. उन्हाळ्यातल्या वावटळीचं काय घेऊन बसलात सदाभाऊ, लगीन जमल्यापासून आमच्या घरावर संकटाच्या वावटळी सारख्या घिरट्या घालताहेत. त्यातून आम्ही कसेतरी आत्ताच सावरलो आहोत, म्हणून सगळ्यांचं म्हणणं हाय की आत्ता एवढ्यात लगीन नकोच."असं पाहुण्यांनी म्हटल्यावर सदाभाऊच्या तर पायाखालची मातीच सरकली आणि त्यास्नी बसल्याजागी दरदरून घाम फुटला.
"अहो असं नका म्हणू पावणं, मी कुणाला तोंड दाखवायच्या लायकीचा नाय रायचो. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून लग्नासाठी जमवाजमव करतोय. थोडेफार व्याजानं पैसे काढलेत, काही ठिकाणी तर उसनवारी करून लग्नासाठी तजवीज करून ठेवली आणि आज तुमच्या मुखातून असं ऐकल्यावर मला तर",.... असं बोलता बोलता सदाभाऊचा कंठ दाटून आला आणि त्याच्या डोळ्यातून खळकनं अश्रू वाहू लागले. डोईवरचं उपारनं सोडून सदाभाऊनी डोळे पुसत पुसत पाहुण्यांच्या पायावर पसरलं आणि हात जोडून विनंती केली, की मी आपल्यासमोर पदर पसरतो, पण माझ्या लेकराला नाट नका लावूसा.
"अहो असं काय म्हणता सदाभाऊ,"पाहुणे उदगरले. तुमच्याशी सोयरीक जमल्यापासून आमच्या घरातली ही दुसरी घटना हाय. सोयरीक जमवून तुमच्या गावाहून माघारी येताना आमच्या गाडीला अपघात झाला, पण दैव बलवत्तर म्हणून आम्ही त्यामधून कसेतरी बचावलो. आणि आता पुन्हा आमची आईही वारली. म्हणजे याला काय म्हणायचं? योगायोग की तुमचा पाय गुण."
"अहो अपघात हा माणसाच्या चुकीमुळे होतो, यात आमच्या पायगुणाचा कुठं संबंध येतो."असे समजुतीच्या स्वरात सदाभाऊ पाहुण्यांना सांगू लागला. आणि तुमच्या आईचं तर वय झालेलं, त्या तर बऱ्याच दिसापासून अंथरुणाला खिळलेल्या होत्या. पिकलं पान कधी गळलं याचा काय भरोसा असतो, पाहुणं. हे तर प्रत्येकाच्या आयुष्यात ठरलेलंच हाय. यात काय गैर हाय आणि आमचा तरी काय दोष."
बराच वेळ पाहुण्याबरोबर चर्चा झाली, हात जोडले, पाया पडला, विनंती केली, पण पाषाणहृदयी पाहुण्यांना काही सदाभाऊची दया आली नाही. त्यांनी सदाभाऊला आपली सोयरिक मोडली म्हणून सांगितलं. जड अंतःकरणाने सदाभाऊनी तिथून काढता पाय घेतला. डोक्यात मात्र विचारांचं काहूर माजलेलं. "परमेश्वरा तुझ एवढं काय वाईट केलं होतं मी, की मला आज तू हा दिवस दाखवला."असे स्वतःच्याच मनाशी बडबडत, औंढा गिळत सदाभाऊ चालू लागला. भगवंत तरी किती परीक्षा पाहतो, आता घरी जाऊन पार्वतीला आणि पोरांना काय सांगू?, की पाहुण्यांनी सोयरीक मोडली म्हणून सांगितलं, काय वाटल त्यांच्या जीवाला. या सर्व विचारांनी सदाभाऊच्या हृदयाला डागण्या दिल्यागत त्रास होत होता.
दिवस मावळून गेला होता. सदाभाऊच्या डोक्यात मात्र भलत्याच विचारांची लाट राहून राहून समुद्रात सुनामी यावी तशी उसळ्या घेत होती. अंधार पडू लागला होता, शीतलचं लगीन, शीतलचं लगीन, असं एकटाच मनाशी वेड्यागत बडबडत सदाभाऊ वाटेने चालू लागला, काही अंतर गेल्यावर अचानक काळोखात विलीन झाला...