Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!
Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!

Ajinath Saswade

Others

1  

Ajinath Saswade

Others

लॉकडाऊन

लॉकडाऊन

6 mins
316


   पंतप्रधानांनी अवघ्या देशात एकवीस दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केले. यंत्रवत धावणाऱ्या मानवांचा विद्युत पुरवठा खंडित व्हावा अन् हातातला घास हातात आणि तोंडातला घास तोंडातचं अडकून पडावा, अशी अवस्था निर्माण झाली. निसर्गचक्रात मानवाकडून होत असलेला हस्तक्षेप आणि त्यामुळे अनावधानाने कालबाह्य होऊ घातलेल्या गोष्टींनाही कुठेतरी न्याय मिळावा आणि त्याही समाज प्रवाहात पुन्हा चालू लागाव्यात, कदाचित या हेतूने साक्षात परमेश्वराने सोसाट्याच्या वार्‍यागत धावणाऱ्या माणसांसाठी अशाप्रकारे धोक्याची घंटा वाजवून लगामचं घातला आहे. निसर्गचक्र सुव्यवस्थित चालवायचे असेल, तर सर्वांना सोबत घेऊन चला. एकाची प्रगती दुसऱ्याच्या अधोगतीस जबाबदार ठरत असेल, तर हे निसर्गचक्र नक्कीच कोलमडले जाईल. निसर्गचक्र समसमान फिरलं तरच सजीवसृष्टी टिकू शकते. निसर्ग साखळीतील एक सजीव नामशेष झाला, तर इतर सजीवांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. हे असेच चालू राहिले तर, स्वतःहून आपणचं आपल्या मृत्यूला कवटाळणार आहोत. आपण निसर्गात केलेला अवाजवी हस्तक्षेप, हाच आज आपल्या विनाशास कारणीभूत ठरत आहे. विज्ञानाच्या प्रगतीरूपी वेलीने आकाशाकडे जेवढ्या जोमाने झेप घेतली, तेवढीच अधोगतीने आपली पाळंमुळं जमिनीत खोलवर रवली.

     

गावातून शहराकडे गेलेला माणूस गावाकडच्या मातीशी असलेली नाळ तोडून शहरात संवेदनाहीन होऊन सुसाटपणे धावत आहे, म्हणूनच त्यांना आवर घालण्यासाठी लाॅकडाऊन करावे लागले की काय? अशी शंकेची पाल मनात चुकचुकू लागते. गावातला माणूस शहरात पोटापाण्याच्या सोयीसाठी गेला. स्वतःचं पोट भरलं, नि गावाकडच्यांना मात्र कायमचा विसरून शहरी दुनियेत केव्हा रममाण झाला? हे कळायलाही सोय राहिली नाही. सदैव तिकडचाच होऊन गेला. शहरात जावून आपली बायको, मुलं, घरदार यामध्येच त्याचं विश्व सामावले गेले. पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी यासाठी तो हरीणाने कस्तुरीच्या शोधासाठी धडपडावे त्याप्रमाणे धडपडू लागला. गावाकडील मातीशी काहीतरी आपला ऋणानुबंध आहे, त्याच मातीने आपल्याला लहानाचे मोठे केले, आपल्यावर अनंत उपकार केले. तेव्हा कुठे आपला प्रवास इथपर्यंत पोहोचला, हे सर्व त्याच्या खिजगणितातही राहिले नाही.

    

कोरोनासारख्या आजाराचे थैमान पाहून लॉकडाऊन झाल्यानंतर घरात निष्काम होऊन पडल्यावर गावाकडील लोकांनी आपल्याला दिलेले संस्कार आपण आज विसरून गेलो आहोत. हे सर्व शहरातील बांधवांना स्वतःच्या दृष्टिपटलावर साक्षात चलचित्र दिसू लागले. मग ह्याच गावाकडच्या लोकांची आठवण मृत्यूचे संकट स्वतःच्या डोईवर घारीप्रमाणे फिरताना दिसल्यावर यांना होऊ लागली. त्यानिमित्ताने गावातील मातीशी आणि लोकांशी पुन्हा संपर्क स्थापित करण्यास शहरी लोक सरसावले. खूप वर्षापासून गावाशी मतदानापुरताच असलेला संपर्क जिवंत असल्यामुळे आता पुन्हा गावाशी जिव्हाळ्याचा, प्रेमाचा संपर्क साधायचा, तिथे जाऊन राहायचं म्हणजे मनात कमीपणाची, खजिलतेची भावना निर्माण होत असूनही, आम्ही गावाकडे येतोय हे गावाकडील लोकांना न राहून निरोप धाडू लागले. सर्वांना आपल्या गावच्या मातीची आठवण आता क्षणोक्षणी होऊ लागली. आपला गावचं बरा होता, याची आता त्यांना चुणूक येऊ लागली. स्वत:वर दुःखाचे आभाळ दाटून आल्यावरच माणसांना आपल्या लोकांची आठवण येते. आनंदाच्या क्षणी मात्र माणूस स्वतःच्याच मदमस्त चालीत धुंद होऊन चालत राहतो. वाऱ्याच्या वेगाने रस्ता कापत सर्वजण गावी येऊ लागले.

   

गावाला पोरकी झालेली माणसं गावाकडे परतताना पाहून गावच्या माणसांचाही ऊर भरून येऊ लागला. उदार अंतःकरणाच्या शेतकरी राजानं मोठ्या दिलानं त्यांना आपलंसं केलं. गावाकडच्या मातीचा विसरलेला गंध आणि मातीच्या चुलीवरच्या भाकरीची खरपूस चव यापासून अनभिज्ञ राहिलेल्या आधुनिक पिढीला पुन्हा एकदा या गोष्टीचा मनमुराद आनंद मिळू लागला. आजी आजोबाच्या प्रेमाला पोरकी झालेली नातवंडं आज त्यांच्या मांडी-खांद्यावर आनंदाने खेळून किलकाऱ्या भरू लागली. गाई, म्हशी, वासरे, बैलं हे सर्व पाहून शहरातील मुलांना आभासी दुनियेत गेल्याचा अनुभव येऊ लागला. तिन्हीसांजेला गाई-वासरांचे हंबरणे, रानातून घराकडे येणारी जनावरांच्या गळ्यातली घंटीचा खळांगऽऽ-खळांगऽऽ करणारा आवाज. शेळ्या-मेंढ्यांचे सुसाटपणे करडांच्या ओढीने घराकडे धावत येणारे कळप. दिवसभर आसमंतात विहार करणारे पक्षी पिल्लांच्या काळजीने आपल्या घरट्याकडे परतताना त्यांच्या पंखांचा होत असलेला फडफड आवाज हे पाहून सर्वजण आनंदविभोर होऊ लागली.

     

'आनंदाच्या डोही आनंद तरंग' अशीच सर्वांची अवस्था झाली. घड्याळाविना पहाटेची चांदणी उगवलेली पाहून वेळ सांगणारे गावाकडील बुजुर्ग मंडळी सर्वांच्या कुतूहलाचा विषय ठरू लागली. सकाळी-सकाळी कोंबड्यांच्या आरवण्यानं होत असलेली गावातील सुंदर पहाट, सर्वांना हवीहवीशी वाटू लागली. खेड्यातली पहाट भलतीच रोमांचकारी असते, उठल्याबरोबर सगळीकडे पक्षांचा किलकिलाट, जनावरांचा आवाज. शेळ्या, करडांचा म्याऽऽम्याऽऽ आवाज, सकाळच्या अल्हाददायक वातावरणात नवीनच उत्साह जागवित होता. घरावर बसलेला पारव्यांचा गुटूरऽऽ-गुटूरऽऽ करणारा थवा, त्यांच्या पंखांची फडफड आणि लिंब, बाभळीच्या काळ्याशार झाडावरती पांढराशुभ्र दिसणारा बगळ्यांचा थवा पाहून तर शाळेतील काळ्या फळ्यावर गुरुजींनी काढलेलेच पांढरे चित्र आहे की काय? हा मुलांना भास होऊन मनामध्ये आनंदाच्या लाटा उसळत होत्या. कमलपुष्प पाण्यावर डौलावे तसे शरीर डौलू लागे. मध्येच कावळा, चिमणी, राघू, मैना यांचा चिवचिवाट मनाला हर्षाने उल्हासित करू लागतो. कुठेतरी मोराचा पिऊऽऽ-पिऊऽऽ आवाज मनःशांतीला छेदत काळजाचा ठाव घेऊ लागतो. टिटवीचा टिवऽऽ-टिवऽऽ करणारा आवाज अपशकुनाचे संकेत देत असतो, या गोष्टींचेही नवखेडूतांना नवल वाटू लागले. कुत्र्या, मांजरांच्या गुरगुरण्याचा आवाज वेगळीच अनुभूती देत होता.

     

गावाकडची माती मुलांच्या पायाला चिकटल्यावर 'शीऽऽ'म्हणून कपाळावर आठ्यांचे जाळे पसरून तोंडाचा चंबू करणाऱ्या शहरातील मम्मीलाही आज गावाकडे आल्यावर सायंकाळी मातीने धारण केलेला शीतल गारवा हवाहवासा वाटू लागला. मनमुरादपणे सर्वजण त्या शितल मातीवर आपलं शरीर झोकून देऊ लागले. मुलांना खेळताना पडून जखम झाल्यावर कोरोनाच्या भितीपोटी दवाखान्यात जायचे टाळावे म्हणून माती जखमेवर अधीरतेने टाकून, ह्याने जखम लवकर बरी होते, हे मम्मी मुलांना आता कौतुकाने सांगू लागली. आश्चर्य तर या गोष्टीचे वाटत होते, की लॉकडाऊन, कोरोनाच्या निमित्ताने तरी मातीचे आणि गावाचे महत्त्व आज शहरातील लोकांना कळून चुकले होते. गतिमान युगात जन्माला आलेल्या, पशु पक्षांविषयी माहिती नसलेल्या मुलांना शहरात राहून, दूध कोण देते? या प्रश्नाचे उत्तर गावाकडं आल्यावर चांगलेच कळू लागले. चित्रातचं पाहिलेले कावळा, चिमणी, पोपट, कोकिळा हे सगळे प्रत्यक्ष पाहून आनंदाला उधाण येऊन मुलेही बावरली गेली. कोकिळेच्या कुहूऽऽ कुहूऽऽ गीताने तर सर्व परिसर दुमदुमलेला पाहून मुलांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

     

फक्त पुस्तकांमध्ये स्थिरचित्र पाहणार्‍या मुलांना आज गावाकडे प्रत्यक्ष हालती डूलती चित्र पाहून त्यांच्या आनंदाला भरती येत होती. शहरांमध्ये राहून मनुष्य सोडता इतर बोलते प्राणी आहेत, याची कल्पनाही नसणाऱ्या मुलांना गावाकडे आल्यावर मात्र सर्व सजीवांचा चांगलाच लळा लागू लागला. आजची आधुनिक पिढी विसरत चाललेल्या जुन्या खेळांना पुन्हा एकदा महत्त्व मिळू लागलं. शहरात राहून मोबाईल, कॉम्प्युटरवर गेम खेळणारे, फार-फार तर क्रिकेट, कबड्डी, खो-खो यापलीकडे शहरातील खेळांचा टप्पा नसतो. तसे पाहता शहर हे पारंपारिक खेळांपासून ओसच पडू लागले आहे. फक्त पैसा हाच एकमेव ध्यास उरी बाळगून त्याचा पाठलाग करताना होत असलेली सर्वांची त्रेधातिरपीट याला लॉकडाऊनने कुठेतरी पूर्णविराम दिला आहे. माणसांची प्रेमाची, हृदयाची नाळ एकमेकांप्रत पूर्ववत जोडण्याकरिता हेही चांगलेच झाले म्हणा.

      

गावाकडच्या खेळाने होत असलेला शारीरिक व्यायाम हा इतर कुठल्याही खेळाने होऊ शकत नाही. विहिरीत, तलावात पोहणे, झाडावर चढून माकडांसारखं इकडून तिकडे उड्या मारत सूरपारंब्या खेळणे. गोट्या, लगोरी, लुपाछपी, चोर-पोलिस यांसारखे खूप सारे खेळ खेळताना शहरातील मुलेही खेड्यातल्या मुलांबरोबर देहभान विसरून गेले होते. आंबा, चिंच, पेरू, चिकू, संत्रा यासारख्या उन्हाळी फळांचा मनमुराद आनंद लुटण्याचा अनुभव गावाकडे मिळू लागला. फुलपाखरासारखं लहान मुलांचे मनही खूप चंचल असते, ते सारखे इकडून तिकडे बागडत राहते. शहरात राहून राहणीमान उंचावले असले तरी, जीवनमान मात्र पूर्णपणे वधारले, आयुर्मान घटले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. शहरातील मुलं खेळणं विसरून गेले. त्यांचा खेळ असतो, फक्त कागदांबरोबर व मोठी माणसे खेळतात, एकमेकांच्या भावनेशी आणि मनाशी.

     

पूर्वीच्या काळी सर्वचं लोक खेड्यांच्या कुशीत राहत, आश्रमात गुरूकुल पध्दतीने शिक्षण घेत. तिथे ना पैशाचा हव्यास, न कुणी छोटा ना मोठा, सर्वांना समान वागणूक. राजा असो अथवा रंक सर्वांनी सगळ्या प्रकारची कामं करायची. प्रत्येकाला त्याच्या कुशलतेनुसार काम मिळत होते. आश्रमात राहिल्यावर सर्वांनी पाणी भरणे, साफसफाई करणे, आपल्या गुरूची सेवा करणे हे संस्कारीक शिक्षण मिळत होते. या गोष्टींना तिलांजली देत समाज प्रगतीच्या पथावर विराजमान तर झाला, मात्र सुसाट वेगाने उरफुटूस्तोर धावू लागला. आज त्याने पैसा, प्रसिद्धीच्या मोहापायी स्वतःचा जीवही धोक्यात घातला आहे. पैशाच्या हव्यासापायी निसर्गावर आक्रमण करून पशुपक्षीही मानव संपवू पाहत आहे. प्राण्यांची अन्नसाखळीच माणसांनी खंडित केली आणि त्याचा परिणाम म्हणजे निसर्गचक्र कोलमडून गेलं. त्यामुळेच आज आपण हे कोरोनासारखे महाकाय संकट भोगत आहोत. हे असंच दिवसेंदिवस चालू राहिलं, तर एक दिवस मनुष्यही नामशेष होईल, की काय? याचे आता भय वाटू लागले आहे. निसर्गातील प्राण्यांच्या जीवाशी अप-डाऊन करायचं मानवाने बंद केलं, तरचं भविष्यात अशा प्रकारचे लॉकडाऊन थांबणार आहे, अन्यथा लॉकडाऊनच्या फंदात एक दिवस अवघं जगचं शटडाऊन होणार आहे.


Rate this content
Log in

More marathi story from Ajinath Saswade