Pallavi Umre

Tragedy

3.5  

Pallavi Umre

Tragedy

कर्ज

कर्ज

3 mins
273


आज सकाळपासूनच सुमनचं डोकं दुखत होतं.अंगात तापही होता ,तीला बाजेवरन उठायच धड बळही नव्हत अंगात. जसं कोंबडं आरवल तशी सुमन अंथरुणातून बळेच उठली. घसाघसा दात घासले,अन् चुल पेटवून चहाच आधन ठेवलं,वाईच आंगण झाडून,सडासारवन आटोपलं. कपभर चहा घेऊन सुमनला आता थोडी हुशारी वाटली.लगेच तीन मंदाच पांघरुण ओढलं मंदे "अंग उठ की आता उन्ह वरती आलया,चल दातून कर लवकर चहा ठेवलाय...!! तुझ्यासाठी,शाळेमंधी नाय जायचं का"? असं म्हणत सुमन मंदीवर जवळजवळ डाफरलीच़. 


अंगात ताप असल्याने सुमनच कामात लक्षच नव्हतं.आज वावरात पण जरा लवकरच जायचं होतं तीला,वाईच भराभरा काम उरकून कशीबशी पिठलं भाकरी बनवली. तोपर्यंत मंदा शाळेत जाण्यासाठी तयार झाली. मंदा सुमनची एकुलती एक मुलगी.बाप मरण पावला तेव्हा पोरं पाच वर्षांची होती, आता मंदा तिसऱ्या वर्गात शिकत होती. सुमनचा धनी वावरात पान लागून मरण पावला. तेव्हापासून सुमन अन् मंदा दोघीच एकमेकींचा आधार.घरी चार एकर जमीन होती,त्या जमिनीवर सुमन राब राब राबायची.     


दोन खिल्लारी बैलांची जोडी आणि जमिन,अन् झोपडीवजा घर एवढीच सुमनची प्रापर्टी. सकाळची कामं करताना तीच्या डोक्यात सतत मंदाचे विचार येत होते. पोरीला शिकवून मोठ्ठ कराच हाय,असं सुमन नेहमी म्हणायची.. मागल्यावर्षी नापिकीमुळे सावकाराच कर्ज झालं होतं,यावर्षीतरी चांगलं पिक येईल म्हणून आस लावून बसली होती. विचार करुन करुन सुमनच्या डोक्याचा पार भुगा झाला होता.दावनीची ढोरं सोडता सोडता हणम्याचा आवाज आला. अगं मावशे आटपल का समद, वाईच बिगीबिगी निंघाच हाय‌ वावराकडं,चल बांध भाकरी नीघू लगेच..!! म्हणत हणम्यान सुमनला हाळी दिली. हणम्यान शेणमात काढत गोठ्याकड नेऊन टाकलं,तवर सुमन चहा घेऊन आली हणम्यासाठी. सपरीत बसून फुर्र फुर्र आवाज करीत चहा संपवला अन‌ तंबाखू ची डबी‌ काढून घोटत बसला.


हणम्या सुमनचा घरगडी होता,शेतीत काम करणारा. त्याच्याच सोबतीने सुमन जमीन नांगरत होती. हणम्याबि कामाले वाघ होता. एव्हाना सुमन सर्व भराभर आवरुन भाकरतुकडा बांधून वावराकडं निघाली होती. पांदणरस्त्याने डोक्यावर शिदोरी घेऊन सुमन भराभरा चालत होती, पायातील वाहानाचा करकर आवाज होत होता. सुमनच्या डोक्यात विचारचक्र सुरूच होतं.हणम्याच्या तोंडाचा पट्टा रस्ताभर सुरुच होता. बोलता, बोलता सुमन, आणि हणम्या शेतात पोचले.गेल्या गेल्या दोघेही कामाला लागले.


शेतात गेली की सुमन देहभान हरपून कामाला लागायची,तेव्हा तीचा थकवा कुठल्या कुठे पळून जाई.त्या हिरव्या रानात ती आपल्या लेकीचे स्वप्न शोधताना हरवून जायची. सर्व पेरण्या आटोपून पिके छान डोलायला लागली होती. सोयाबीन,पराटी,धान,इत्यादी पिके जोमाने वाढत होती. पराटी निंदताना सुमनच्या डोक्यात विचार आला, यावर्षी तर कापसाचं पीक हाती आलं की तो विकून ती सावकाराचे तोंडावर कर्जाचे पैसे फेकणार होती. ती एकटीच असल्याने त्या सावकाराची सुमनवर नजर होती. त्याची ती विखारी नजर तीला छळत होती. म्हणूनच ती शेतात खूप मेहनत करायची. चौथा वर्ग पास झाल्यावर सुमन मंदाला तालुक्याला शाळेत घालणार होती. 


मंदा अभ्यासात हुशार होती.सुमन तीची खूप काळजी घेत असे. सुमनचा हात भरभर चालत होता. निंदन झाल्यावर सुमनने हणम्याला भाकर खाण्यासाठी आवाज दिला.हणम्या पराटी डवरत होता, आवाज ऐकून हणम्या हात धुवून आला, दोघेही न्याहारी करून लागले.सुमनला तापामुळे अन्न गोड लागत नव्हतं, कसंबसं दोन घास खाऊन तीन हात धुतला. दोघेही न्याहारी आटोपून आपापल्या कामाला गेले. दुपार टळून गेली‌ होती, सोयाबीन च पिक पाहून सुमन मनोमन सुखावली. बैलासाठी चारा कापू लागली. अंग तापानं फणफणत होत . एव्हाना आभाळ ढगांनी भरुन आलेलं केंव्हाही पाऊस येणार, म्हणून ती लवकरच घराकडे निघाली. हणम्या आज मला जरा बरं वाटतं न्हाय,नीघते मी तू ये नंतर असं हणम्याला सांगून तरातरा चालू लागली. 


डोक्यावर गवताचा भारा होता.ती भराभर अंतर कापू लागली,आता हळूहळू पावसाला सुरूवात झाली होती. अंग पावसाने ओले झाले होते.कशीबशी घरी पोहोचली. अंगणात गवताचा भारा टाकून लेकीला आवाज दिला, अन् घराचं दार जोर्यात ढकललं.घरात अंधार होता, पावसामुळे लाईट गेले होते. जसं सुमनन दार ढकलले मंदा मोठयाने किंचाळली,ते समोरचे दृश्य पाहून सुमन गर्भगळीत झाली. सावकाराच्या तावडीतून निसटण्यासाठी मंदा जीवाच्या आकांताने ओरडत होती.परंतू बाहेर पाऊस पडत असल्यामुळे त्या लहानशा जीवाचा आवाज बाहेर पोचत नव्हता. सुमनच्या अंगात कुठून बळ आलं कोण जाणे तीने गवताच्या भार् याला लागलेला विळा काढला आणि सावकाराच्या अंगावर सपासप वार करत तुटून पडली. तीच्या अंगात आता दुर्गा संचारली होती. सावकाराचा देह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, आणि मंदा हे दृश्य भेदरलेल्या नजरेने मातेकडे पाहात मोठमोठ्या आवाजात रडत होती.सुमनने हातातला विळा खाली फेकून लेकीला कवटाळत मोठ्याने हंबरडा फोडला. क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. दोघीही मायलेकी एकमेकीला बिलगुन त्या भयाण अंधारात ओक्साबोक्शी रडत होत्या...             


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy