जखमांची किंमत
जखमांची किंमत
रोड क्रॉस करत असताना वसुधाचा अपघात झाला, तिला जबरदस्त दुखापत झाली जवळपासच्या लोकांनी तिला उचलुन बाजूला नेलीत बराच वेळ तिची चौकशी चालली अशातच ती बेशुद्ध झाली आणि पोलीस त्याच्या वेळेत आल्यावर त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्याना अपघाता विषयी विचारणा करून पुढील कारवाईला सुरूवात केली त्या घटनास्थळी गर्दीच्या अवतीभवती सुधीरही उभा होता त्या गर्दीत डोकावून पाहील्यावर वसुधाला बेशुद्धावस्थेत बघुन सुधीरला धक्काच बसला खरतर त्याच वेळेस सुधीर ने तेथुन काढता पाय घ्याला हवा होता पण पायाला डोक्याला बऱ्याच ठिकाणी लगलेल होते त्यामुळे अनवधानाने तिला ओळखत असल्याच सांगुन पोलीसांनी सुधीरचा कबुली जबाब नोंदुन घेतला हा अनपेक्षित योगायोग समजावा की सुधीर तिथे उपस्थित असल्यामुळे त्याला अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले. मग नाईलाजाने सेवा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेली त्याची मैत्रीण डॉक्टर नम्रताला मोबाईलवरून घटनेची सविस्तर माहिती देऊन अँबुलन्स हॉस्पिटलच्या दिशेने रवाना झाली. अपघात गंभीर असल्यामुळे तातडीने प्राथमिक उपचार सुरू केले पण खर्च खूप येणार होता शिवाय ती कोमात गेल्यामुळे ती वाचेलच याची शाश्वती नव्हती आणि पोलीसात नोंद झाल्यामुळे यदाकदाचित काही बरंवाईट झालं तर याची जबाबदारी कोण घेईल म्हणून वसुधाच्या मोबाईलमधील नंबरवरून तिच्या नातेवाईकांना फोन करून घटनेची माहीती दिली तर आता आमचा तिच्याशी काही एक संबध नाही ती मेली तरी कळवू नका असे उत्तर मिळाल्यावर गुंता अधिकच वाढला. काही सरकारी योजनेतून उपचार करणे शक्य होते पण ती कोमात असल्यामुळे इतर अतिरिक्त खर्चाचं काय हा ही एक गंभीर प्रश्न होता तेव्हा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून सुधीरने वसुधाच्या आईवडिलांना भावालाही फोन करून वसुधाच्या अपघाताविषयी कळवले तर त्यांनीही हात वर करुन जबाबदारी नाकारली, तेव्हा आलीया भोगासी असावे सादर या म्हणीप्रमाणे अशा अवघड प्रसंगी कसलेच आढेवेढे न घेता सुधीरने खर्चाची जबाबदारी घेवून तिच्यावर उपचार करण्याची विनंती डॉक्टरांनी स्विकारली.
सुधीर एका कंपनीत मोठा अधिकारी होता तिथे पैशाला काही कमी नव्हती पण सुधीरने घेतलेला निर्णय डॉ. नम्रताला मान्य नव्हता. सुधीरचे आईवडिलही सहमत नव्हते, पण त्याने घेतलेल्या निर्णयापुढे कुणाचं काहीच काही चालले नाही. बराच वादविवाद ऊहापोह चालला पण नियतीचा हा खेळ कोणालाच कळत नव्हता. खरंतर सुधीर खूपच हळव्या मनाचा माणूस असल्यामुळे त्याला कोणाचं दुःख बघवले जात नव्हते कोणाच्या डोळ्यात अश्रू आलेले त्याला सहन होत नव्हते म्हणून वसुधाला वाऱ्यावर सोडून जाणाऱ्यांपैकी सुधीर नव्हता एखाद्याला मरणापासून दूर ठेवणेही खूप महत्त्वाचे वाटत असल्यामुळे सुधीरची माणुसकी जागृत झाली. आधीच सुधीरने बरेच आघात घेतले होते. त्याच्या मनावर इतके ओरखडे असताना वसुधासारख्या चुकीच्या व्यक्तीसाठी सुधीरने खर्च करावा हो कोणालाही मान्य नव्हते, वसुधाच्या आयुष्याची दोरी बळकट होती म्हणून सुधीरच्या निमित्ताने का होईना वसुधाला जीवदान मिळाले होते, नाहीतर कोमातून बाहेर पडणे खूपच कठीण होते. काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
तशी डॉ. नम्रता वसुधाची चांगली मैत्रीण होती. तेव्हा अपघात झाल्याचं आठवते पण त्यानंतर हॉस्पिटलमध्ये कसे आलो कोणी आणले यावर वसुधा आणि नम्रता यांच्यात दीर्घ चर्चा चालली आणि नम्रताने जे काही सांगितले ते ऐकून तर वसुधाच्या पायाखाली जमीनच राहिली नव्हती. सुधीरच्या तत्परतेमुळे जीव वाचला हे ऐकून तर वसुधाला धक्काच बसला. काय करावे रडावे की वेडे व्हावे, आभार मानावेत की क्षमा मागावी, काय करावं काहीच सुचत नव्हते. नम्रताला घट्ट मिठी मारून खूप रडूनही घेतले पण एकदा हातचं सुटल्यावर हाती पश्चातापाशिवाय काहीच नसते. पश्चातापाची आग जळूही देत नाही आणि मरूही देत नाही फक्त आयुष्याची राख झालेली असते.
स्वतःच्या मनासारख जगता येत नव्हते. हौस मौज होत नव्हती म्हणून क्षणीक क्षणभंगुर सुखासाठी सुधीरसारख्या देव माणसाला सोडुन वसुधाने दुसरा घरोबा केला होता. परिस्थिती एका जागी बसून राहात नाही ती केव्हातरी बदलतेच. अशा प्रतिकूल परिस्थितीत जर बायकोची नवऱ्याला साथ नसेल आधार नसेल तर त्या नात्याला अर्थ राहात नाही. समजून घेतले तर सर्व अडचणी दूर होतात पण मनासारखे जगता येत नाही म्हणून उगाच छळकपट करून त्रास देवून नवऱ्यापासून विभक्त होणे म्हणजे स्वतःहून स्वीकारलेला पराभव समजावा आणि सुधीरला सोडून वसुधाने तो पराभव स्वीकारला होता. असे असतानाही केवळ माणुसकीच्या नात्याने सुधीर वसुधाला दवाखान्यात घेऊन आला होतो. नवराबायकोचं नात सुई दोऱ्यासारखं असते, सुटतही नाही आणि तुटतही नाही फक्त सैरभैर स्वप्नरंजीत सुखासाठी सुधीरला सोडुन वसुधाने दुसरा घरोबा केला खरा पण त्या नंतर झालं काय प्रेम तर जावूच द्या प्रेमाचे बोलसुद्धा तिच्या नशिबी नव्हते. त्रास मारझोड वेदना यातना दुःख याच्याशिवाय तिला दुसऱ्या नवऱ्याकडुन कहीच नाही मिळाले. त्या वेळेस तिला सुधीरचा प्रेमळ सहवासही आठवतही असेल पण मनासारखे स्वैराचारी जगता यावे म्हणून तिने घेतलेला चुकीचा निर्णय तिला महागात पडला आणि सुधीरपासून वेगळी झाल्यापासून वसुधाच्या आईवडिलांसह नातेवाईकांनीदेखील तिच्याशी संबंध कायमचे तोडले कालांतराने त्रासाला कंटाळून वसुधाने दुसरा घरोबाही सोडला आणि एकाकीपण तिच्या वाटेला आला. सर्वच बाजुने वसुधा तुटल्यामुळे सकाळी मॉलमधे तर संध्याकाळी शिवणकाम करून तिचा उदरनिर्वाह भागवत असे.
आता सुधीरची परिस्थिती सुधारली होती. सर्व सुखसोई मिळाल्या होत्या. श्रीमंती आली होती पण या श्रीमंतीत वसुधा नव्हती. थांबली असती तर या श्रीमंतीचे सुख घेता आले असते. नशिबात होते पण घेता आले नाही शिवाय नियतीलाही ते मंजुर नसावे आणि काही अडथळे दूर झाल्याशिवाय ही प्रगती होत नाही, सुखाचे दिवस येत नाहीत. तेव्हा काम चुकीचे केले तर शिक्षा ही मिळतेच सुटका नाही म्हणून नियतीचक्रानुसार हा अपघात घडुन आला आणि सुधीरच्या कृपेने वसुधाला जीवदान मिळाले.
वसुधाचे जिवंत असणे हीच तिच्यासाठी मोठी शिक्षा होती आता वसुधाजवळ अश्रूंशिवाय काहीच नव्हते. सुधीरचे सहकार्य तिला मरेपर्यंत त्रासदायक ठरणार होते तरीही एकदा भेट घ्यावी म्हणून डॉक्टर नम्रताकडून मिळालेल्या निरोपाला सुधीरने नकार दिला. बघायला गेले तर सुधीरचा वसुधाशी काही एक संबंध राहिला नव्हता. सुधीरने खूप मनस्ताप भोगला होता, खुप घाव पचवलेत, खूप छळ करून स्वतःहून घटस्फोट घेतल्यावरही सुधीरने मदतीसाठी पुढाकार घेतला. दुसरा कोणी असता तर पाहून मरायला सोडून दिले असते. कधीतरी काहीतरी नातं होतं याची जाणीव ठेवून सुधीरने स्वतःचा मोठेपणा सिद्ध केला. तेव्हा काही देणे बाकी राहिले असावे म्हणून वसुधाने दिलेल्या जखमांची ही किंमत सुधीरने चुकवली होती. जे केले ते योग्य होते की अयोग्य हे ते त्या परमेश्वरालाच माहित पण तिने दिलेल्या जखमांची ही परतफेड होती, असे नम्रताला जवळ बोलावून सुधीरने सांगितले आणि हॉस्पिटलचे उर्वरित दोन लाख रूपये बिल भरले.