अविनाश पवार

Tragedy Thriller

4.9  

अविनाश पवार

Tragedy Thriller

जे जळलं,ते घर माझं होतं !

जे जळलं,ते घर माझं होतं !

4 mins
404


उन्हाळ्याचे दिवस. सूर्य भयंकर चिडलेला दिसत होता.धरणीचं नि त्याचं काही भांडणच जणू!  मार्च एप्रिल महिना असावा, सकाळची शाळा होती.

शाळा सुटल्यानंतर बरेच कारनामे करीत करीत गावात यायला कधी दुपार व्हायची,कधी टळून जायची. कधी कधी तर गावात येवून सुद्धा पाराजवळ खेळत राहायचं नि दिवस मावळता मावळता घरी जायचं.पण त्या दिवशी मी सरळ घरी न येता वाट वाकडी करुन जिथं आई निंदायला गेली होती तिथं गेलो. मला फार मस्त वाटायचं मी शाळेतून आईकडं गेलो की आईसोबत काम करीत असलेल्या बायका फार कौतुकानं बघायच्या नि म्हणायच्या,"आलं माय भारतचं पोरगं,आमचे पोरं तर शाळंचं नाव काडू देत न्हाईत!" (माझ्या आईचं नाव #भारतबाई, वास्तविक ते भारती किंवा भारतीबाई असायला हवं होतं,पण तिच्या आईवडलांनी ते ठेवलेलं होतं..तिथे अर्थ नाही,तर भाव काम साधून गेले.)

अशातच दुसरी कुणीतरी म्हणायची "बापू तू तरी ध्यान धरुन शिक,माय लई कष्ट खाते तुजी,तीज कर त्याचं!" त्या कौतुकाच्या शब्दांनी मी मोहरुन जायचो. तशीच कुणीतरी मत्सरभरानं म्हणायची, "अई ,मवा बाळ्या बी बक्कळ हुशार हाय,पण पोरगं एकटच हाय मनून बाप नको मन्तो शाळत जायला" असा तो मिश्रभावांचा संवाद चालू व्हायचा,पण आई मात्र कधीच माझं महत्व पटवून देण्याच्या भानगडीत पडत नसे.ती मला जवळ घ्यायची,पाठीवरुन तोंडावून तिचा रखरखीत हात फिरवायची डोक्याला बांधलेला पदर सोडून माझा घाम पुसायची.म्हणायची,"बापू , धु-यावर धडोप्याखाली पाण्याची चर्वी हाय,पाणी पी,भाकर खा आन तितच सावसीला बस.मी एवढी पात लागली की लगेच येतो" 

पण आई मात्र कधीच माझं महत्व पटवून देण्याच्या भानगडीत पडत नसे.

मी थोडावेळ बसायचो,गवतावरचे बारीक किडे,माशा उघड्या पायांना चावायच्या मग ते शेत किंवा त्याच्या आजुबाजूला ऊसाचं ,भुईमुगाचं कसलं असेल ते शेत शोधायचं तिथं जावून मिळेल ते जिन्नस खायचो आणि ," ये आई,मी जातो घरी" म्हणून निघायचो. आईकडे असा परस्पर खूप वेळा जायचो मी. बाबा घरी असतील आणि आई कुठे कामाला गेलेली असेल तर मला घरी जायला नकोच वाटायचं, कारण ते कधीच माझी कसलीच चौकशी करीत नसत. ना लाड ना प्यार. गावच्या मध्यभागी बाबांना मैत्रीपायी कुणीतरी एक रिकामी खोली दिली होती,त्या खोलीत त्यांची शिलाई मशीन आणि तिच्याबरोबर त्यांच्या भजनी मित्रांची दिवसभर मैफिल असायची.बाबांना भजनाची,वाचनाची भारी आवड,शिक्षण कमी असूनही व्यासंग दांडगा.

बाबा इथे जेवढे हसायचे,बोलायचे तेवढं ते घरी कधीच हसले नाहीत,बोलले नाहीत कायम ताठ असायचे!मला तर त्यांनी कधी हसून जवळ बोलावलंय किंवा खेळवलय असं अजून आठवत नाही,हां मार देण्यासाठी उपयोगात आणलं नसेल असं एकही साधन नसेल! कशानेही कशासाठीही मारायचे. पण आता खूप काळजी करतात,कदाचित तेव्हा न दिलेल्या प्रेमाची भरपाई म्हणून असेल कदाचित.

...आईजवळून निघून,पाठीवर तप्तर,डोक्यावर गवताचं पेंडकं नि खिशात मुगाच्या शेंगा घेवून मी घराकडे निघालो. दुपार टळली होती.पण उन्हाची काहिली तशीच होती. त्यादिवशी बाबा घरीच होते.

मी घराच्या दिशेने गेलो खरा,पण घरी पोहचोलोच नाही..कारण घराच्या भोवताल मला प्रचंड गर्दी आणि गर्दीच्या मध्यातून उंचउंच आगीचे प्रचंड लोळ दिसले..

लांबून नीट अंदाज आला नाही,मला वाटलं खारीतल्या आनंदा पाटलाचा कडबा जळला असेल..पण..पण तसं झालंच नव्हतं!

ती आग होती,आग •••!! माझं घर घेवून जायला आलेली राक्षशीनच !! धावा रे..नेवर्तीचं घर जळालं धावा रे..वाचवा रे..सगळीकडं एकच कल्लोळ उठला होता..लोकांची पळापळ चालली होती,कुणी टोपलं घे कुणी बकेट ने,कुणी पातेली कुणी कळशी काही बायका तर च्क्क परातीत पाणी घेवून येत होत्या.मिळेल ती वस्तू घेवून लोक आग विझवत होते..

अंगणात असलेल्या कडुनिंबाचा कोवळा मोहर करपून चालला होता..हळू हळू आग आटोक्यात येत होती

मी सगळं आवसन गाळून डोळ्यात तरारत्या थेंबासहित लोकांच्या घोळक्यात तसाच स्तब्ध ऊभा होतो!मी काय तरी करु शकत होतो? माझ्याजवळ होतं तरी काय? माझ्या डोळ्यातल्या थेंबांनी विझायला ती आग काय एवढी थिटी होती? सरकाराच्या कृपेनं गाव गोदातटी असूनही कायम पाण्याची टंचाईत..त्या परोपकारी लोकांनी पिण्याच्या पाण्यानं आग विझवली!!

...सगळीकडे शांतता पसरली...आता सूर्य शांत झाला होता आणि आगही! लोक जळलेल्या जागेत चप ा बुटानिशी फिरु लागले..कायकाय शिल्लक राहिलय ते सांगू लागली! बाजूला काढून ठेवू लागली.दोन थाटल्या,दोन तांबे एखादा ग्लास आणि भाकरीची काटवट याशिवाय जळायला तिथं होतच तरी काय? आमची जिद्द तर आमच्याच सोबत होती!

आता शेतातली माणसं गुराढोरांसहित घराकडं परतत होती..घराजवळून जाणारा प्रत्येकजण "अरेरे.." करीत थोडा थांबून जात होता.

आईला येतायेता वाटेतच खबर मिळाली..ती मोठ्यानं ओरडतच आली..रड रड रडली,खूप रडली..मी जागचा उठलो आईजवळ गेलो,तिला बिलगलो..

दोघे मिळून रडलो..

बाबा लांब बसून होते..शुन्यात. त्या गरीबितही जमवलेली पुस्तकांची जळालेली पुंजी बघत. पहिल्यांदाच मी त्यांच्या डोळ्यात पाणी पाहात होतो.

होय,आंमचं घर ते..शेणामेणाचं..भाराभर ऊसाची पाचट,पळसाचा व्हरका,तुराट्यांची भारी जमवून दरवर्षी जागा बदलूबदलू मामानं बांधून दिलेलं..अमाप प्रेमाची तिजोरी भरुन असलेलं स्वर्गस्थ सुखाचं नंदनवनच ते !! जळलं काहीच नव्हतं,बाबांच्या एका पुस्तकांच्या पेटीशिवाय..पण नुकसान लाखो-करोडोचं झालं होतं..माझ्या आईच्या घामाचे थेंब तिथे जळले होते....!!!

आता रात्र झाली होती..शेजा-यांपाजा-यांनी आणून दिलेल्या भाकरींकडे तसेच बघत उद्याच्या नव्या घराची स्वप्ने बघत आम्ही तसेच झोपी गेलो!!

घराच्या विझलेल्या आगीसहीत पोटातली आगही तशीच विझून गेली होती.


Rate this content
Log in

More marathi story from अविनाश पवार

Similar marathi story from Tragedy