STORYMIRROR

Amol Patil

Tragedy Crime Others

3  

Amol Patil

Tragedy Crime Others

गरिबाचं दुखनं

गरिबाचं दुखनं

8 mins
368


"लय आंग दुखु ऱ्हायलं. एकदम कसा मसा जीव होऊ लागलाय. थंडीही खुप वाटतेय. काहितरी कर ना गं आये." जिव लपवून झावर पांघरून अंथरुणावर पडून तोंड वाकडं तिकडं करत कण्हत कुन्हत दिनू त्याच्या आईला म्हणाला.

गावातील प्रत्येक व्यक्तीच्या वाटेतून थोडं थोडं दुःख पदरात घेऊन त्याच्याशी झुंजत असतांना जेवढ्या वेदना होत असतील तेवढ्या वेदनांनी तिचं आंतरमन घायाळून गेले असेल. दुखत दिनूचं होतं, पण त्याच्यापेक्षा जास्त वेदना तिच्या आईला अप्रत्यक्षपणे होत होत्या.

    "काळजी करू नगसं हं. मी हाय ना इथं. काही होत नाहीये बघ. जागू गेलीय तुझ्या 'बा'ला बोलवायला. आता येतीलच की. तुला लगेच नेतीन दवाखान्यात. मग सारं ठीक होईन "अमृताने न्याहळलेला तिचा हात ती हलक्यानं त्याच्या कपाळावर फिरवत मनातल्या डंक मारणा-या वेदनांना दाबून म्हणाली. तिच्या स्पर्श आणि बोलण्यानं दिनू एक त्रास दाबून ठेवण्याचं औषध आपोआप पाषण करत होता. घराच्‍या बाहेर जरा डोकावले तर, सुन्‍नाट वारा वाट भेटेल तिकडे धावत विजेच्‍या डरकाळीच्‍या भितीने पळ काढत कुठेही कसाही धाव घेत होता. ढगाने आपलं साम्राज्‍य पुर्ण आकाशभर पसरवलेले पाहून झाडे गोंगाट करत बेभान होऊन डगमगू लागली. धरत्रिच्‍या भेटीसाठी व्‍याकुळलेलं मन भरून आल्‍यावर ढगांपासून थेंबानी तोल सोडला. अशात तिने त्‍याचं दु:खनं पाहून स्‍वयंपाकही केलेला नव्‍हता. दिनूचे स्‍वर्गाइतकं प्रिय मातीचं घर गळत होतं. छतातून पाणीचे थेंब निथरून ज्‍याठिकाणी पडत होते, तेथे त्‍याच्‍या आईने भांडे ठेवले होते. दिनूचे दु:खने अजून वाढले. त्‍याच्‍याने आता राहवत नव्‍हते. तो जोराने ओरडत होता. एवढ्‍या तुफान पावसात काय करावे ? कुठे जावे ? कुणाला बोलवावे ? तिला काहीच सुचत नव्‍हतं. एरवी तिथे दिनुचे वडीलही घरी आलेले नव्‍हते. तिची छाती विमानाच्‍या गतीइतकी धडधड करत होती. पण करावे नेमकं काय हेच सुचत नव्‍हते. तिने शेजारची सुनंदाताईला आणि कमलाबाईला हाका मारून बोलावले.

    "अहो सुनंदाताई...! काहितरी करा हो. माझं लेकूर बघा. कसं येड्‍यावानी करू रायलं. त्‍याचा 'बा' ही नाही घरी"

    "सकाळी तर बरा होता ना गं तो. मग अचानक कसं ?"

    "अवं..! मलाच काही समजत नाहीये बघा. काहीतरी करा. तुमचं लय उपकार होईल बघा." रडका चेहरा करत हृदय पिघळून गेलेल्‍या आवाजात दिनुची आई म्‍हणाली.

सुनंदाताईने आणि कमलाबाईने त्‍याला हात लावत त्‍याचे अंग वैद्‍यासारखे तपासू लागले. हाताला गरम चटका लागत होता.

    "बया...! याच्‍या अंगावर पाणी उकळून जाईल इतका ताप हाय." आश्‍चर्याने कमलाबाई म्‍हणाली.

    "असं अचानक घडणं म्‍हणजे यामागे काहीतरी मोठं कारणच असायला हवं" विचारात पडल्‍यासारखं सुनंदाताई म्‍हणाली.

    "म्‍हणजे मला काही कळालं नाय." घाबरत्‍या आवाजात दिनुची आई श्‍वास रोकत म्‍हणाली

    "मला ते वाटतं बाई. याला कोणी करणी केली असावी."

    " मला बी तेच वाटतेय."

    " छे..! छे..! आसं करणी बिरणी काही नसतं. तुम्‍ही उगाच अंधश्रद्‍धेवर विश्‍वास करता. मी नाही मानत त्‍यातल्‍या गोष्‍टी. आता माझा धनी यायामधी आहे. ते आल्‍यावर लगेच दवाखान्‍यात जाऊ आम्‍ही "

    "मला जे वाटलं ते सांगितले बया मी. बाकी मग तू बघ. आणि ह्‍या दवाखान्‍यानं काय व्‍हतयं त्‍याला. नुसती ते डाक्‍टरले पैसे खाया मागे असतात. माझं ऐक तर बरा व्‍हील. जा की त्‍या चमत्‍कारी बाबांकडे. सारं ठीक करीन तो." हुशारपणाणे समज घालवत सुनंदाताई दिन्‍याच्‍या आईला म्‍हणाली.

    "हा गं बाई..! लय चमत्‍कारी हाय चमत्‍कारी बाबा." कमलाबाई तिचे मत मांडत म्‍हणाली.

तेवढ्‍यात पावसाने ओलचिंब होऊन काळजात करपं भरत दिनुचा बाप व बहिण आले. आतून त्यांचे तुटलेल्या आरशासारखे मन झालेले होते. तसाच त्याचा बाप खोटे धाडस दाखवत दिनूपाशी गेला. बाप समोर पाहताच दिनूला गहिवरून आलं.

    " बा..! बरं झालं तू आलास. लय कसं मसं होऊ रायलं मला. मला लय भीती वाटतेय बा. " पोटातल्या आतड्या ताणत दिनू त्याच्या 'बा' ला म्हणाला.

    " तू नगं चिंता करू लेका. तुझा बा आलाय आता. लगेच बरा होशील तू. " तुटलेल्या आवाजात धीर देत दिनुचा बा दिनूला म्हणाला.

    "तुम्ही लवकर हे कपडे बदलवा. आणि घेऊन जा बरं ताबडतोब दवाखान्यात." दिनूची आई तिच्या पतीला म्हणाली.

कोपऱ्यात जाऊन घाईघाईने दिनूच्या 'बा' ने कपडे बदलविले. दवाखाना म्हटला म्हणजे पैस्याच्या प्रश्न येतोच. चुल्ह्यापाशी असलेल्या छोट्याश्या साखरेच्या बरणीत दिनूच्या 'बा' ने डोकावून पाहिले तर त्यात मूठभर साखर आणि मुंग्याशिवाय काहीच मिळालं नाही.

      " अगं रुखमे...! यात पैसे नाहीत." दिनुचा 'बा' नवलाईने दिनूच्या आईला म्हणाला.

      "कुठं उरतील पैसे ? घरात लागत नाही का काही ?"

दिनूला काय झाले काय माहित? त्यानं रक्ताची उलटी केली. रुख्मा जोऱ्याने ओरडून रडू लागली. दिनूच्या बाच्या डोक्यावर चिंतेचा डोंगर कोसळला; पण मात्र गडीने हिंमत हारली नाही. दिनूला अलगद हळूहळू उचलून पाठीशी साखरपोत्यासारखं घेतलं. बाहेर जीवघेणा पाऊस बेधुंद वाहत होता. इतक्या पावसात जाणं शक्य नव्हतं. जागूने तिच्याजवळ असलेली घोंगळी दिनूच्या अंगावर टाकली. दिनूच्या बानं काहीही विचार न करता निघाला तसाच पायी पायी त्या सुनसान तुफानी वाटेकडे. त्यांचं गाव येतं खेड्यापाड्याचं मग तिथे कशाचा दवाखाना बिवाखाना ? जावं लागतं 4 कोसावर असलेल्या शहरात.

      "अवं..! इतक्या पावसात जाणं कसं शक्य आहे?"

     " तू काळजी करू नगस. पोलीस पाटलांच्या गाडीने जातो."


पोलीस पाटीलाचं घर जरी म्हटलं तरी ते त्यांच्याघरापासून लांबच होतं. दिनूच्या 'बा' मध्ये आलेले ते धाडस ब्रम्हांडामधील सगळ्यात दुष्ट बलशाली दैत्याला ही नाश करू शकलं असतं. कसेमसे ते पोलीस पाटिलांच्या घरी पोहचले. गावाचा पोलीस पाटील पैस्याने लय श्रीमंत होता. त्यानं दिनूची अवस्था बघितली आणि लगेच शहराकडे निघण्यासाठी चारचाकी गाडी काढली. जशी जशी गाडी शहराच्या मार्गाने निघत होती तसं तसं ह्या निसर्गाच्या अंगात घुसलेले धुमाकूळ घालणारं चलींतर शांत होत होते. पश्चिमेकडच्या क्षितिजाने सूर्याला पूर्णपणे गिळलेले असतांनाचा हा प्रवास दिनूच्या बा ला आतल्या अंतराला उधी सारखं खात होतं. शहर आले. खेडेगावातल्या गल्ल्या ह्या वेळेला मुक्या होऊन आराम करण्याच्या मार्गांवर लागले असतात मात्र ह्या शहरातले रस्त्यांच्या जिवाला काही चैन नाही. दिनूच्या बाची नजर रस्ताच्या कडेला लावलेल्या त्या एका पाटीवर गेली. गाडी पुढं जात होती मात्र त्यांची नजर त्या पाटीकडून दूर काही होत नव्हती. पाटी दिसेनाशी होताच दिनूचा बा विचारांच्या मैफिलीत गुंग होऊन काही खुराप्ती कल्पनेत अडकले. दवाखाना कसा आला ते मात्र त्यांना कळालं नाही. लवकर

ात दिनूला दवाखान्यात दाखील केले. पोलीस पाटीलांसमोर दिनूच्या बाच्या डोळ्यातल्या अश्रूंना काही दम मारला गेला नाही, ते सरळ सरळ गालावरून नदीसारखे वाहून आले. पोलीस पाटलांनासाठी दोघी हाथ जोडत त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या मुखातून शब्द ही उद्गारला गेला नाही. अश्या अवस्थेत पोलीस पाटीलांनी त्यांना मिठी मारली.

           "काळजी करू नगस सखाराम. तुझ्या लेकाला काहीही होणार नाही. दवाखान्यात लागणारे सगळे पैसे मी भरेन, मात्र तू जिवाला खाऊ नको." पोलीस पाटील धीर देत दिनूच्या बा ला म्हणाला.

            " आधीच लय उपकार आहेत तुमचे. अजून पुन्हा..."

             "ते माझं आद्य कर्तव्य आहे सखाराम. तू माझा मित्र आहेस यार. कृपया माझ्या पुढे असं कृतज्ञ होऊन मला शरमिंदा नको करुस."

पोलीस पाटीलाचे मायेचे शब्द ऐकून दिनूच्या बाचे सगळं काळीज पिघळून गेलं. डॉक्टर कडून माहिती मिळाली. त्याला 3-4 दिवस ऍडमिट करणं गरजेचं होतं. दवाखान्यात लागणारी शुल्क ही काही कमी नव्हती. जवळपास विस हजारचा आकडा डॉक्टरने सांगितला होता. सगळ्या पैस्याची जबाबदारी पोलीस पाटीलने घेतली. थोडे डिपॉजिट भरून बाकीचे पैसे घेण्यासाठी पोलीस पाटील परत त्यांच्या गावाकडे घरी गेले. दिनूचा बा चूटू बुटू जीव करत दवाखान्यात थांबलेला होता. रात्र सारी ह्या कानी त्या कानी करत करत जागे होऊन निघून गेली. सूर्य प्रकाशाने साऱ्या लोकांना काळोखातून दूर करून आप आपल्या दैनंदिन कामाला लावले. दुपार होण्यात येत होती तरी पोलीस पाटलाचा पत्ता नव्हता. डॉक्टरने दिलेले मेडिकलच्या महागडे दवाईसाठी पैसे नव्हते. दवाखान्याच्या बाहेर दिनूच्या बाने पाय काढला. तो कुठे जाणार होता? काय करणार होता? हे त्याचं त्यालाच माहित. या आंधळ्या मतलबी दुनियेत वावरत असतांना महातूफानी संकटांचा मार सोसत जीवन अगदी वैतागल्या सारखं वाटतं. थोडं शहराकडून फेर फटका मारून दिनूचा बा दवाखान्याकडे परत आला. जागूला मांडीवर घेऊन कोपऱ्यात रडणारी तिच्या बायकोकडे त्याची नजर गेली. तो अवाक झाला.

             " अगं रुखमे...! तू येथे कशी आली? पोलीस पाटील कूठे आहे? आणि का रडतेय अशी? " दिनूचा बा अंतरात रडत असलेल्या शब्दांनी विचारात पडून म्हणाला.

एक ही शब्द दिनूच्या आईच्या मुखातून निघेनासे झाला. ती नुसती आवाज आतल्या आत दाबून ठसा ठसा रडत होती. दिनूच्या बाला काही कळेनासे झाले.

             " अगं झालं तरी काय असं रडायला. सांगशील का? दिनूला काही झालं तर नाही ना?"

दिनूच्या बाचे आतून अर्धे चिरलेल्या काळजातून हे शब्द निघत होते. मात्र रुख्मा काही बोलेना. तितक्यात तेथे एक नर्स आली.

             " अहो काका...! कूठे गेले होते तुम्ही? केव्हाची वाट बघतोय आम्ही. आणि हो ताई...! असं येथे रडू बिडू नका. तुमच्या मुलाला काही झालेलं नाही. लवकरच बरा होईल तो. उगाच जिवाला खाऊ नका. आणि तुम्ही तुमचे उर्वरीत फीस आणली का?" नर्स म्हणाली.

             " हो ताई...! तुमची सगळी फी आणलेली आहे. आता देऊ का तुमच्याकडे?"

              " माझ्याकडे नाही. त्या काउंटर मध्ये जमा करा. येते मी."

नर्स तेथून अगदी घाईत निघाली. दिनूच्या आईचं रडणं काही थांबेना. दिनूच्या बाला तिच्या रडण्याचं कारण कळत नव्हतं.

               " कुठून आणले एवढे पैसे? त्या पोलीस पाटलानं दिले असतील ना. " दिनूची आई रडतच म्हणाली.

               " नाय नाय. त्यांनी नाही दिले"

                " मग कुठून आलेत पैसे?"

                " सगळं सांगतो. आधी तू सांग. तू इकडे कशी? असं रडतेय कश्याला आणि पोलीस पाटील कूठे आहे?"

               " नाव नका घेऊ माझ्यापुढे त्या हरामखोराचं. मारून टाकलं मी त्याला " रडत्या चेहऱ्याने संतापात असलेल्या शब्दानं दिनूची आई म्हटली.

                " काय..? मारून टाकलं. पण का ?आणि कसं?"

               " तो आम्हाला त्याच्या गाडीत तिकडून दवाखान्यात आणत होता. अचानक त्यानं शहराकडे येणारी वाट बदलवली. एका सुनसान जागेवर त्याने गाडी आणून थांबवली. मला म्हणत होता तुझ्या लेकराले वाचवायला काही फुकटचा पैसा द्यायला तयार नाही मी. त्याच्यासाठी मला तरी काहीतरी हवं ना. आधीच पूर्वी घेतलेल्या कर्जापायी मी त्याच्या वासनाची शिकार झाली होती. आणि मी ते तुम्हाला कधी सांगितलं नाय. पण ह्यावेळी त्या रांडम्याची सडलेली पापी नजर ह्या आपल्या चिमुरड्या लेकीवर गेली. त्यानं जबरदस्ती केली. मी ही तेथे पडलेला दगुड टाकला त्याचा डोस्क्यात. केलं त्याला रक्तबंबाळ " रडून रडून हुंदका देत दिनूची आई म्हणाली.

दिनूच्या बाचे सगळे हाथ पाय गळाले. त्याच्या काळजाला मोठा धक्का बसला. एक ही शब्द त्याच्या मुखातून निघाला नाही. त्याच्या छातीला कान लावून जर ऐकलं असतं तर कदाचित कानाचा पडदा ही त्या आतून रडलेल्या आवाजाने फाटला असता. इतकं त्याचं काळीज आतून टरटर फाटून रडत होते, मात्र आवाज कोणालाही ऐकू येत नव्हता. थोड्या वेळाने पोलीस कर्मचारी तेथे आले. थोडी विचारपूस करत दिनूच्या आईला घेऊन गेले. दिनूच्या बा तसाच कोपऱ्यात बसून रडू लागला. त्याला काही सुचेनासं झालं. हे काय झालं? आणि काय होत आहे? जागूला ही तिच्या लहानग्या वयामुळे कळत नव्हतं, मात्र ती ही जोऱ्याने आई...आई...आई... करत रडत होती. पोलिसाची गाडी निघाली तशी त्या गाडीमागे जीव तोडून दिनूचा बा पळत होता. त्याला काहीच करता आले नाही. गाडी मागे पळता पळता तो ती पाटीजवळ आला. जेव्हा दिनूला गाडीत दवाखानाकडे आणण्याच्या वेळी दिनूचा बा ज्या पाटीकडे एकटक नजर लावून बघत होता. ती हीच पाटी होती. पाटीवर लिहलेलं होतं ' जिंका...! जिंका...!जिंका...! सुप्रसिद्ध तमाशातील नर्तकी सौं. चंपाबाई यांना कोणताही पुरुष साडी घालून नाचण्यात हरवून दाखवा. आणि जिंका पंचवीस हजार रुपये बक्षीस. आणि मिळवा संधी नाटकात काम करण्याची.' त्याच पाटीखाली खिश्यात असलेल्या पंचवीस हजार रुपयांवर हाथ ठेवत दिनूच्या बाचा अचानक विषारी विचारांच्या आधिनाने जीव गेला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy