धुरात हरवलेलं स्वप्न
धुरात हरवलेलं स्वप्न
दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि उत्साहाचा सण आहे. प्रत्येक घरात दिव्यांची रोषणाई, गोडधोडाचा सुगंध आणि फटाक्यांचा आवाज वातावरण भारून टाकतो. पण कधी कधी हाच आनंद एका क्षणात दुःखात बदलतो.
माझे बाबा फळं विक्रीचा व्यवसाय करतात. रोज सकाळी टोपलीत ताजी फळं भरून ते विक्रीसाठी बाजाराच्या गजबजलेल्या रस्त्यावर निघतात. पण यंदा दिवाळीच्या आधीच काहीतरी वेगळं घडलं. आमचे शेजारी, गायकवाड काका, बाबांना म्हणाले, “यंदा फटाक्यांचं दुकान लावा. भरपूर फायदा होईल!” बाबांनी मनाशी ठरवलं. आईला सांगितलं. पण आईने विरोध केला. “सर्व बचतीचे पैसे आणि वरून कर्ज घेऊन असा धोका नको,” ती म्हणाली. पण बाबा हटले नाहीत. त्यांनी आईला समजावलं, विश्वास दिला. शेवटी आईने होकार दिला.
माझ्या आनंदाला पारावार उरला नाही! फटाक्यांचं दुकान म्हणजे माझ्या हातात असंख्य फटाके! आणि त्याहूनही खास, बाबांनी मला नवीन सायकल घेऊन देण्याचं मान्य केलं होतं. आमचं दुकान एका मोठ्या मैदानावर होतं. दरवर्षी दिवाळीत तिथे फटाक्यांची दुकानं लागतात. मी लहानपणापासून बाबांसोबत तिथे फटाके घ्यायला जात असे. पण यंदा मी विक्रेता होतो….बाबांचा छोटा सहकारी!!
शाळेला सुट्टी होती, म्हणून मी दुकानात थांबत होतो. ग्राहकांना फटाके दाखवणं, भाव सांगणं, आणि लहान मुलांचे हट्ट बघणं…सगळं खूप मजेशीर होतं. फक्त तीन दिवसांतच आम्हाला भरपूर फायदा झाला. आईच्या चेहऱ्यावर समाधान होतं. बाबांचा आत्मविश्वास वाढला. आणि माझं स्वप्न खरं होणार होतं…नवीन सायकल! ही दिवाळी एखाद्या स्वप्नासारखी होती. आनंद, उत्साह, आणि कुटुंबाची एकजूट..सगळं काही एका पुस्तकपानात सामावलेलं.
दिवाळी उद्या असल्यामुळे आज दुकानात खूप गर्दी होणार हे आईला माहित होते, त्यामुळेच आज आई पण आमच्या सोबत येणार होती. आईचा अंदाज खरा ठरला होता दुकान उघडताच गर्दीचा ओघ सुरू झाला. लोकांच्या चेहऱ्यावर खरेदीची घाई, उत्साह, आणि थोडीशी अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. मैदानावर वाहनांची रांगच लागली होती…जणू सगळं शहरच इथे एकवटलं होतं.
मी माझ्या कामात गुंतलो होतो, पण अचानक कानावर फटाक्यांचा आवाज आला. क्षणभर थांबलो, पण दिवाळी असल्यामुळे मुलं फटाके वाजवत असतील असं वाटून पुन्हा कामात गुंतलो. काही मिनिटांतच आवाज अधिकच तीव्र झाला, आता तो केवळ सणाचा भाग वाटत नव्हता, त्यात काहीतरी अस्वस्थ करणारी झणझण होती.
बाबांनी काळजीने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, “तू इथेच थांब. मी बघून येतो हा आवाज का येतोय.” त्यांच्या आवाजात एक अनामिक भीती होती. ते निघून गेले आणि मी थोडा अस्वस्थ झालो.
तेवढ्यात समोरून लोक घाबरून पळत येताना दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा थरकाप होता. एक व्यक्ती ओरडला, “अरे पळा! दुकानांमध्ये आग लागली आहे!” हे ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. वातावरणात एकच गोंधळ, आरडाओरड, आणि धावपळ सुरू झाली. मी घाबरून आईजवळ धाव घेतली. तिच्या डोळ्यांत काळजी होती, बाबा कुठे गेले याची तीव्र चिंता. काही क्षणांत बाबा परत आले, चेहरा घामाने ओलाचिंब, डोळ्यांत भीती. “अरे, बसलात काय इथे? लवकर पळा! खूप आग लागली आहे!” ते ओरडले.
आई अजूनही सामान गोळा करत होती, जणू त्या वस्तूंमध्ये तिचं आयुष्य भरलेलं होतं. पण इतक्यात काही रॉकेट आमच्या दुकानात उडून आले आणि मोठ्या आवाजात फुटले. त्या आवाजाने आई दचकली. बाबांनी तिचा हात घट्ट पकडला आणि ओढून बाहेर काढलं. आम्ही तिघंही धावत सुटलो.
आम्ही ज्या दिशेने लोक पळत होते, तिकडेच धावत होतो. पाठीमागून एक प्रचंड आवाज झाला, जणू संपूर्ण आकाश हादरलं. आम्ही मैदानाच्या बाहेर एका उंच जागेवर पोहोचलो. तिथून मागे वळून पाहिलं, तर संपूर्ण मैदान आगीच्या ज्वाळांनी वेढलेलं होतं.
“आपलं सगळं संपलं…” आई रडत रडत म्हणत होती. तिचा आवाज थरथरत होता, जणू प्रत्येक शब्दात एक तुटलेलं स्वप्न दडलेलं होतं. ती आपल्या नशिबालाच दोष देत होती, पण त्या क्षणी नशीबही कुठेतरी कोपऱ्यात लपून बसलेलं वाटत होतं. बाबांच्या डोळ्यांतही पाणी होतं. ते काही बोलत नव्हते, पण त्यांच्या नजरेत एक असहायतेचं आर्त दडलेलं होतं, जणू त्यांनी सगळं गमावलं होतं आणि ते स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
मैदानातून आकाशात उडणारी रॉकेट्स दिसत होती. याआधी फटाके वाजताना किंवा रॉकेट्स आकाशात जाऊन फुटताना पाहण्यात खूप आनंद वाटायचा. त्या रंगीबेरंगी स्फोटांमध्ये उत्सवाचा गंध असायचा. पण आज… आज त्या आवाजांनी काळजावर घाव घातला होता. आज तर त्या फटाक्यांचा आवाजच नकोसा वाटत होता. प्रत्येक स्फोट माझ्या मनात एक वेदनेचा विस्फोट घडवत होता. त्यांच्या आवाजात आता आनंद नव्हता…फक्त आठवणींचा राख झालेला गंध होता.
माझ्या नजरेसमोर काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. जणू काळोखानेच माझ्या डोळ्यांवर हात ठेवला होता. त्या अंधारात मी हरवून गेलो होतो, स्वप्नांच्या राखेत, आठवणींच्या धुरात.
ऐकू येत होते ते फक्त आवाज - अग्निशमन दलाच्या गाडीचे सायरन, आईच्या रडण्याचे हुंदके, आणि फटाक्यांचे थरथरते स्फोट.
डोळ्यांसमोर दिसत होता फक्त धूर. तो धूर फटाक्यांमुळे लागलेल्या आगीचा होता की आमच्या स्वप्नांचा, हेच मला समजत नव्हते…!!!!
