STORYMIRROR

Rahul Jadhav

Others

4  

Rahul Jadhav

Others

आम्ही थांबणार नाही !!

आम्ही थांबणार नाही !!

2 mins
67

सकाळची वेळ. रस्त्यावर वाहनांची गर्दी. प्रत्येकजण धावत आहे, ऑफिस, शाळा, कामं, डेडलाइन आणि या धावपळीच्या नादात एक गोष्ट मागे पडते, सुरक्षितता.

आजच्या यांत्रिक आणि वेगवान जीवनशैलीत थांबणे म्हणजे मागे राहणे, अशी एक चुकीची समजूत समाजात खोलवर रुजली आहे. प्रत्येकजण धावत आहे, कारण वेळ कमी आहे, कामं जास्त आहेत, आणि ध्येय गाठायचं आहे. पण या धावपळीच्या नादात आपण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट विसरत चाललो आहोत, आपली आणि इतरांची सुरक्षितता.

आपल्याकडे वाहन कोणतेही असो, दुचाकी, चारचाकी किंवा अगदी ट्रक, प्रत्येकजण लवकर पोहोचण्याच्या घाईत असतो. सिग्नल लागलेला असतानाही थांबणे म्हणजे वेळ वाया घालवणे, असा समज बळावत चालला आहे. काही जण तर सिग्नल तोडणे हे ‘धाडस’ समजतात. पण हे धाडस नाही, ही बेजबाबदारपणाची परिसीमा आहे.

वाहतुकीचे नियम हे आपल्याला अडवण्यासाठी नाहीत, तर आपले प्राण वाचवण्यासाठी आहेत. हेल्मेट घालणे, सीट बेल्ट लावणे, सिग्नल पाळणे, योग्य वेगात वाहन चालवणे, हे सर्व नियम आपल्याच हितासाठी आहेत. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, कारण ‘आमच्याकडे वेळ नाही’. आणि म्हणूनच, कुठल्याही परिस्थितीत, "आम्ही थांबणार नाही!"

जे नियम आपण स्वेच्छेने पाळायला हवेत, ते प्रशासनाला सक्तीने लादावे लागतात, हीच मोठी शोकांतिका आहे. हेल्मेट घालणे हे जर तुमच्या सुरक्षेसाठी आहे, तर तो नियम पोलीस सांगतील म्हणून नव्हे, तर स्वतःच्या जीवाची काळजी म्हणून पाळायला हवा. पण आपण काय करतो? पोलीस दिसले तर हेल्मेट घालतो, नाहीतर बिनधास्त चालवतो.

मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, सीट बेल्ट न लावणे, तीन जणांनी दुचाकीवर बसणे, हे आता ‘स्टाईल स्टेटमेंट’ झाले आहे. पण या स्टाईलमुळे किती जणांचे प्राण गेले आहेत, याचा विचार कोणी करतो का? अपघात झाल्यावर ‘अरेरे’ म्हणणं सोपं आहे, पण त्याआधी नियम पाळणं कठीण का वाटतं?

एक तरुण ऑफिसला निघाला. हेल्मेट घालणं विसरला. रस्त्यावर एक छोटासा अपघात झाला, पण डोक्याला जबर मार लागला. आज त्याच्या घरात शांतता आहे. कारण तो परत आला नाही. त्याच्या आईच्या डोळ्यात एकच प्रश्न, “जर त्याने हेल्मेट घातलं असतं तर?” अशा कितीतरी कहाण्या आहेत, ज्या नियम पाळण्याच्या गरजेची आठवण करून देतात.”

‘आम्ही थांबणार नाही’ ही वृत्ती आता बदलायला हवी. थांबणं म्हणजे पराभव नाही, तर जबाबदारी आहे. जेव्हा आपण वाहन घेऊन बाहेर पडतो, तेव्हा आपल्या घरी कोणी तरी आपली वाट पाहत असतो. अपघात फक्त आपल्यालाच नाही, तर आपल्या कुटुंबालाही हादरवतो. त्यामुळे नियम पाळणं ही केवळ कायदेशीर जबाबदारी नाही, ती एक नैतिक जबाबदारी आहे.

दररोज रस्त्यावर किती निष्पाप जीव जातात, हे आपण पाहतो. पण त्यातून काही शिकतो का? अपघात झाल्यावर आपण दुसऱ्याला दोष देतो, पण स्वतःच्या चुकीकडे दुर्लक्ष करतो. ‘माझं काही होणार नाही’ हा भ्रम आता सोडायला हवा.

प्रशासन कितीही नियम बनवो, पण ते आपण पाळले नाहीत तर त्याचा काही उपयोग नाही. समाज म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण स्वतःहून नियम पाळावेत, इतरांनाही प्रोत्साहित करावं. आपल्या कृतीतून इतरांना प्रेरणा मिळाली पाहिजे.

‘आम्ही थांबणार नाही’ ही वृत्ती आता बदलायला हवी. ‘आम्ही जबाबदारीने चालवू’ ही नवी घोषणा करूया. कारण रस्त्यावर चालवताना आपण फक्त वाहन चालवत नाही, तर एक जीवन वाहत असतो… स्वतःचं आणि इतरांचं….!!!


Rate this content
Log in