Suraj Kamble

Tragedy Inspirational

4.5  

Suraj Kamble

Tragedy Inspirational

डोळ्यांत अश्रू आणणारा पाऊस

डोळ्यांत अश्रू आणणारा पाऊस

10 mins
400


         जिकडे - तिकडे कालवा कालव सुरू होती , आमच्या गावात लोकांची वर्दळ सुरू होती.. आमचं गाव गोपुरी..खूप काही लोकसंख्येचं नाही तर पाच -पन्नास घरांच्या वस्तीचं हे गाव..पाटील पांडे,आदिवासी,महार ,मांग,कुणबी,गुण्यागोविंदाने राहत असायचे..गावातील गुराखी मंग्या ,शाळेतील शिक्षणापेक्षा शेळीचं राखण्यात,वनावनात हिंडण्यात याला जास्त आवड होती म्हणून शाळा सोडून हा गुराखी झाला...लोकांची बकरी,गुरे- ढोरे दावणीवरून सोडून चारायला नेत होता,याच्या हातात नेहमी एक काडी व खांद्यावर कुर्हाड असायची...कुणी एक बकरीचं पिल्लू में..…में ओरडत होतं.. कारण त्याची माय म्हणजे बकरी आता दिवसभर त्याला सोडून चरायला रानात जात होती,त्या लहानश्या बकरीच्या पिल्ला ला त्या घरातील लहान मुले पकडून ठेवत होती...बाया उन्हांत वावरात जात होत्या,काही वावरातून कचरा वेचून घरी घामागच्छ होऊन येत होत्या....

  

                     रमश्या चा बाप बैलबंडीने नांगर घेऊन वावरात जात होता.. त्याच्या सोबत रमश्या ची माय बंडी वर बसून वावरात जात होती..उन्हाळा संपत आला होता..शाळेच्या सुट्ट्या सुद्धा संपत आल्या होत्या म्हणून शाळेचे कौलारू फेरणीचे काम मुख्याध्यापक,सोबत शिक्षक रामदास कडून करून घेत होते..सोबत शाळेचे पोट्टे आपल्या खेळात गुंग होते...वडाच्या झाडाखाली गावातील काही रिकामटेकडे माणसं आणि काही पोरं पत्ते खेळत बसले होते,मध्येच गेम हरला की एकमेकांना शिव्या हासडत होते.. समोर गेलं तर दिन्याचं म्हातारं ( दिन्याचे आजोबा ) मंदिरात जात होतं, दमल्यामुळे 

"हे विठ्ठल पांडुरंगा "

                म्हणून म्हणतं होतं..गावाच्या शेवटीच गोदरी असल्याने हागायला जाणाऱ्या बायांची वेगळी माणसांची वेगळी काही डब्बा घेऊन जात होती,कुणी मध्येच माणूस येतांना दिसला की दुरूनच त्या बाया उभ्या होऊन तो जात पर्यन्त ताटकळत राहायच्या ,आणि एकदाचा तो दूर गेला की मनातल्या मनात

 " मेला कुठला???? अईनं हागायला जायच्या टायमालाचं येतो,म्हणून त्याच्या नावानं बोटं मोडत असायच्या????

                              मग आपलं काम आटपून घरी यायच्या..वावराच्या मशागती ची सर्वच कामे आता आटोपली होती,राहिली - राहिली कामे पूर्ण करून आता फक्त पावसाची वाट पाहत सर्व होते...

                           मागील वर्षी पाऊस चांगला पडला नाही म्हणून यावर्षी तरी पाऊस चांगला येईल या आशेने सर्व शेतकरी पावसाची वाट पाहत होती.. परश्या च्या बाबाने( वाल्मिक ) सुद्धा आता यावर्षी तीन एकर ची चांगली शेतीची मशागत केली होती..बियाणे घरी आणले होते,आणि शाळा लागेल म्हणून परश्याले आठवडी बाजारातून शाळेचा नवीन पांढरा शर्ट न निळा हाल्फ पॅन्ट आणला होता..परश्या यंदा सातवीत गेला होता,अभ्यासात बऱ्यापैकी हुशारच होता,पण घरची परिस्थिती जेमतेमचं होती..परश्याची माय आणि मायी माय चांगल्या मैत्रिणी होत्या..लहानपणापासून च्या नाही बरं!!!!!! लग्न होऊन आल्या आणि थोड्या दूर अंतरावर परश्या चं घर असल्याने आणि परश्याची माय सुभद्रा आणि मायी माय यशोधरा सोबतच वावरात कामाला जायच्या म्हणून दोघींचं चांगलं पटत होतं..कदाचित म्हणून परश्या न मी संदीप चांगले दोस्त झालो होतो..यंदा पीक पाणी झालं की परश्याले तालुक्याच्या ठिकाणी शिकवायला पाठवायचा असं त्याच्या घरी ठरलं होतं..माझ्या घरी ही तसंच काही होतं,आता तसं म्हणजे गावात सातवी पर्यंतच शाळा असल्याने त्यानंतर शिकायला बाहेरगावी जावं लागतं असायचं..काही मुलं समोरचा वर्ग शिकायची नाही तर पडली ती कामे करून गावातचं राहायची...

                          आज लक्ख... उन्ह पडली होती. झाडांची पाने सुद्धा हलत नव्हती,अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या,काही वेळाने सुर्यासमोर आता ढग निर्माण होऊ लागली,सकाळी असणारं तेज उन्ह आता सौम्य झालं होतं..आता पाऊस येईल एवढी आशा सर्वांच्या मनात निर्माण झाली होती.. जून महिन्याचा शेवटचा आठवडा असल्याने मान्सून चा पाऊस येईल असा सर्वांचा अंदाज ठरलेला असतो,आणि मुंबई ला पाऊस आला की आमच्याकडे पाऊस येतो असाच सर्वांचा समज होता..दिवसभर झाडांची पाने न हलणारी आता वेगाने पाने हलू लागली..जीर्ण झालेली झाडांची पाने पटापट गळून पडून आवाज करत एका कोपऱ्यात जाऊ लागली..पक्षी सुद्धा हवेच्या वेगाने आप - आपल्या घरी झेप घेत होते....

                                आता मात्र थोडी पांढरी शुभ्र असणारी ढग काळे कुट्ट राक्षस सारखी रूपे घेऊन तयार होऊ लागली. सर्वत्र अंधार पसरला होता..आणि अचानक पावसाने हजेरी लावली.. धो धो पाऊस तापलेल्या जमिनीवर पडू लागला,जमिनीवर पडताच जमीन ते पाणी गटागटा पिऊ लागली,चोहीबाजूला मातीचा सुगंध दरवळत पसरला.….मंग्या आणि मंग्या च्या बकऱ्या में...में करत घराकडे पळू लागल्या...मंग्या सुद्धा पहिल्या पावसाचा आनंद घेऊन आला होता,म्हणजे तो ही पूर्णतः ओला झाला होता..पाऊस सतत सुरू होता,मध्येच ढगांचा गडगडाट होत होता,असं वाटत होतं की वर्षभर पाणी साठवून असलेला पाऊस आजचं त्याचा कोटा पूर्ण करणार की काय????मधेच वीज लख -लख आपला प्रकाश देऊन कडकडाट करत होती..मोजक्याच घरी लाईट असल्याने आणि जोराचा पाऊस,वाऱ्याचा वेग जास्त असल्याने गावातील लाईट गेली होती..पाण्याने वीज निर्मिती होते असे आमच्या सरांनी शिकवलं होतं,मात्र जोराचा पाऊस आणि वाऱ्याचा वेग जास्त असला की अलबत आमच्या कडची लाईट आत्ताही जाते,मग ते पावसाने वीज निर्मिती होते याचं काही गणित आमच्या लक्षात येत नाही...

                         सर्वत्र अंधार पसरला होता. घरांत एक मिणमिण करणारा दिवा जळत होता..हवेची झुळूक आली की तो फडफड करीत विजतो की काय असंच वाटत होतं..पण तो लहान दिवा आपल्या पेक्षा जास्त ताकदीने असलेल्या हवेचा सामना करत होता,तो ही काही केल्या विजत नव्हता..घरांवर फुटक्या टीना असल्याने काही भागांत गळत होतं त्यामुळे जिथे गळते तिथे तिथे आईने जे भांड भेटेल त्या खाली ठेवले होतें..ज्यात खराब झालेला गंज, हागायला जाण्यासाठी वापरायचा डब्बा ज्याला टमरेल म्हणतो,फुटकी बकेट इत्यादी भांडे ठेवले होते,आणि आई वावरातून नुकतीच काम करून घरी आल्याने पावसाने पुर्ण भिजली होती.. आईने येताच चुलीवर गरम पाणी केले आणि अंगावर पाणी घेऊन गरम गुळाचा चाय ठेवला...मी मात्र चाय आणि दुपारची भाकरी घेऊन चहात बुडवून खाल्ली...आई आता स्वयंपाक बनवायच्या तयारीत लागली,बहीण तिला मदत करत होती,बाबा मात्र निवांत पडले होतें,त्यांच्या ही चेहऱ्यावर समाधान दिसत होते..पाऊस बाहेर बरसतच होता,त्यामुळे सर्वांना वाटले की चला असो पावसाने आपली हजेरी लावली ,हजेरीच लावली नाही तर जोरदार पाऊस पडून लोकांच्या अपेक्षा सुद्धा वाढविल्या...

                 तश्याचं मिणमिणत्या दिव्यात आमची जेवणं आटोपली. रोजचं तशीच सवय होती,कारण घरी अजून तरी वीज जोडणी घेतली नव्हती.तशी परिस्थिती घरची नव्हती...शेवटी जिथे जागा मिळेल तिथे झोपी गेलो,ते शेवटी सकाळीचं जाग आला..रात्रभर पाऊस सुरू होता ,सकाळी तो उजाडला होता,पण रस्त्यांवर आता पाण्याचे डोबरे साचले होते,त्याचा आमच्यासाठी एक फायदा असा होता की हागायला जायला आम्हांला काही टमरेल सोबत न्यावं लागत नसायचं...परत सर्व गाव पक्ष्यांच्या आवाजाने,कोंबड्याच्या आरवण्याने किलबिल ,कुजबूज करून जागे झाले. सर्व आपल्या आपल्या कामावर व्यस्त झाले...पाऊस पूर्णतः थांबला होता आणि सकाळचं उन्ह आता सर्विकडे पसरले होते.आई- बाबा आप आपल्या कामाला निघून गेले,परश्या सकाळीच घरी आला होता,त्याचं ही घर किती तरी गळल हे तो सांगत होता आणि झोपेत असतांना अंगावर प्लास्टिक चा पाल घेऊन झोपावं लागलं अशी कथा त्याने सांगावयास सुरूवात केली होती...

               ज्यांच्या घरी रात्री पावसाने झोपू दिलं नाही ते आपल्या घरांची डागडुजी करण्यात व्यस्त झाले. कुणी आपली कौलारू फेरू लागली तर कुणी आपल्या जनावरांचा गोठा बरोबर करू लागली तर कुणी बकऱ्यांना बांधायची जागा नीट करून ठेवू लागले..असा रोज रात्री तीन - चार दिवस सतत पाऊस पडून गेला, त्यामुळे आता कास्तकाराला आपली पेरणी करण्याची घाई सुटली होती. वावरात आता नांगरणी मुळे जे ढेकलं बाहेर आले होते आता ते सततच्या पाण्याने फुटून गेले होते,कुठे वावरात पाणी साचत असल्याने चिखल सुद्धा झाला होता...सर्व शेतकरी लावणी करण्यास बाया- माणसं जे भेटेल त्यांची जुळवाजुळव करू लागली...आम्हांला सुद्धा "चालतं का रे बापू!!! डोबाले??? म्हणून बाया माणसं विचारत असायची,त्यामुळे आम्हीं सुद्धा पैसे मिळतील ,आपल्या शाळेत तेच पैसे कामात येतील म्हणून आम्ही सुद्धा लावणं करायला जात असू...

                परश्याच्या घरीं आणि माझ्या घरी स्वतःची बैलजोडी नसल्याने आम्हीं भाड्याने किंव्हा ज्या मालधन्याकडे बाबा कामाला असायचे त्याच्याकडून बैलजोडी आणून आपली दोन एकर शेती वाहायची असंच ठरलं असायचं. त्या बैलजोडी च्या बदल्यात त्या धन्याची नांगरणी,वखरणी,खुरपणी,इत्यादी कामे करून द्यावी लागत असायची...परश्याचे बाबा वाल्मिक सुद्धा अशीच मालधण्याकडून शेती कसत असायचे...मागील वर्षी पाऊस चांगला झाला नसल्याने परश्याच्या बाबांवर मागील वर्षीचं कर्ज झालं होतं. ते मालधण्याकडे कामाला जाऊन उतरवायचे असं सुरू होतं...याही वर्षी घरची तीन एकर शेती असल्याने दुसऱ्यांना ती मक्त्याने देण्यापेक्षा घरीचं वाहत होते...मक्त्यांचा पैसा ही जास्त काही मिळत नसायचां,आणि वावर थोडं पिकाला भांडणार नसल्याने भाव पाडून मक्ता मागत असायचे ,त्यामुळे या ही वर्षी पाऊस चांगला पडेल या आशेने दिगंबर पाटील या मालकांकडून परश्याच्या बाबाने कर्ज घेऊन बियाणे आणले होतें,आणि उरलेल्या पैश्याचे काही धान्य घेऊन आले होते...

                   आज परश्याच्या वावरात लावणं झाली होती,मी सुद्धा लावणं करायला आलो होतो. त्याचं लावणं झाल्यानंतर आमचंही दोन एकर लावणं सरकी टाकून झाली होती...एकदाचं सर्व झालं आणि रात्री धो धो पाऊस पडणं सुरू झाला..आमच्या घरचे आई बाबा, इतर शेतकरी सुद्धा या पावसाने सुखावले होते,जवळपास आता पिकं जमिनीवर येऊन उभे राहतील असाच पाऊस झाला होता...आम्ही मात्र आता नियमितपणे शाळेत जाऊ लागलो. सुट्टीच्या दिवशी मात्र जे हाताला काम भेटेल मग त्यात जी बाद सरकी असेल तिला लावणं करायला,किंव्हा मग पराटी थोडी वर आली की रासायनीक खते ,ओटे बांधून देत असायचो..गावातील सर्व शेतकरी अगदी आनंदात राहत होते,सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. शेतात जे काम भेटेल ते करून घरी येत असायचे,मजुरांना सुद्धा काम लागली होती,ते ही दिवसभर काम करून आपल्या घरी परत येत असायचे...शाळेचे दिवस सुद्धा मजेत जात होते.. शाळेत १५ ऑगस्ट च्या कार्यक्रमाची तयारी चालली होती, कुणी शाळेच्या आवराभोवतालची गवत काढत होती,तर कुणी झाडांना कुंपण करत होती,जे काम नाही करेल त्याला शिक्षकांचा मार बसत असायचा,कुणी शिक्षक स्वातंत्र्य दिनाची रंगीत तालीम बँड वर पोरांकडून करवून घेत होते,आम्हीही त्यात सहभागी होतो..झेंड्याच्या पायऱ्यांना रंग देण्यात आला होता...

              एकदाचा १५ ऑगस्ट चा स्वातंत्र्य दिन उजाडला. आम्ही सर्व शाळेत गेलो,कुणाच्या हाती झेंडे होते,तर कुणी आपली ड्रेस इस्त्री करून चमक मारत होते. पोरींनी आपल्या दोन वेन्यांना लाल रिबन लावले होते,जणू ते रिबन म्हणजे रंगीबेरंगी फुलपाखरू वाटत होते.. मुख्याध्यापक पवार सरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,आणि मग गावात प्रभातफेरी काढण्यात आली. शेवटी प्रभातफेरी आल्यानंतर सर्वांची भाषणे झाली आणि मग शाळेला सुट्टी झाली...आमचे शेतकरी आई बाप ,त्यांना कधी सुट्टी नसायची,सतत त्यांना शेतात काम करायला जावं लागतं असायची,पोळा जरी सण साजरा करतो म्हटलं तरी बैलांना धुवून त्यांचा ही सण साजरा करावंच लागतो,त्या ही दिवशी आमच्या शेतकरी बापाला काम असतो...

             

                                 आता पावसाने उघाड दिली होती. काही ठिकाणी पाऊस पडत असायचा पण आमच्याकडे आता पाऊस थांबला होता..शेतकऱ्यांची शेतीची कामे चालली होती. कुणी निंदन करत होती,तर कुणी शेतात रासायनिक खते टाकून आपल्या पिकांची काळजी घेत होती.कुणी डवरा फिरवून शेतीची मशागत करत होती,डवरा केल्याने अजून जमीन भुसभुशीत होऊन पिकांना हवा खेळती राहते,सोबतच वावरात असणारी तण सुद्धा नाहीशी होते..आता दोन हफ्ते झाले होते पण पाऊस काही आला नाही,वावर पुर्णतः कोरडी पडली होती,पण पाऊस येईल याची सर्व शेतकरी वाट पाहत होते..ज्यांच्याकडे विहीर असायची ते स्प्रिंकरल लावून पिकांना पाणी देत होते,मात्र कोरडवाहु शेतकरी पावसाच्या पाण्याची वाट पाहत बसले होते. पाणी नसल्याने पिकांची वाढ खुंटली होती,त्याच पावसाच्या वाट पाहण्यात तिसरा ही आठवडा निघून गेला. आता मात्र शेतकऱ्यांच्या मनात धास्ती भरली होती, सर्वांचे डोळे हे वर लागले होते. कधी पाऊस येतो आणि आमच्या पिकांना संजीवनी देतो असंच सर्वाना वाटायला लागलं होतं..सर्वांचे चेहरे पडले होते,रेडिओ वर पावसाच्या बातम्या काही देत होत्या,आता येईल मग येईल म्हणून अंदाज बांधत होत्या,तेवढाचं शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करत होता,पण पाऊस काही केल्या येत नव्हता...मग पाऊस यावा म्हणून या मंदिरात पूजा,त्या मंदिरात कार्यक्रम होऊ लागले,पण त्याचा काही केल्या असर झाला नाही..पाण्याने अंग भिजवणारा पाऊस आता मात्र शेतकरी बापाच्या डोळ्यांतच पाणी घेऊन आला होता..

                      असा एक महिना झाला होता पावसाने हजेरी लावली नव्हती, त्यामुळे वावरात उभ्याने डोलणारी पिके करपायला लागली,उन्हेमुळें जमीन तापायला लागली,व जमिनीत असलेला ओलावा नाहीसा करून पिके भाजून निघू लागली...इकडे आमच्या ही घरी बाबांच्या चेहऱ्यावर पूर्वी दिसणारा आनंद आता चेहरा पडून दिसत होता,

तसचं परश्याचे बाबा ही पाऊस न आल्याने चिंतातुर दिसत होते.

ते आपल्या पत्नीला म्हणत होते,

"सुभद्रा, कसं होईल व आपलं???? मोठ्या जोमाने आणि कर्ज घेऊन या वर्षी परत शेती वाहिली,मागल्या वर्षी पीक पाणी झालं नाही म्हणून या वर्षी होईल म्हणून पाटलांकडून कर्ज घेऊन शेती केली,आणि आता मात्र पाऊस गायबचं झाला????असं बोलताच परश्याच्या बाबांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते..

सुभद्रा मात्र आपल्या नवऱ्याला, " काळजी करू नका,येईल पाऊस नक्कीच ,हिंम्मत हरू नका,!!!" म्हणून सांत्वन करत होती...पण त्याचा तेवढ्या पुरता फायदा होत होता इतर वेळी मात्र परश्या चे बाबा इतर शेतकरी सुद्धा नाराज राहत होते..सगळ्यांच्या नजरा पाण्याच्या पावसावरचं टिकल्या होत्या..

                            जिकडे- तिकडे हाहाकार माजला होता, उभी असलेली पिकं आता भाजली होती,काही शेतकरी ज्यांच्याकडे पाण्याच्या सोयी होत्या त्यांच्या पिकांची स्थिती चांगली होती,बाकी सर्वांची पिकं मेली होती. कोरडा दुष्काळ जाहिर करा,म्हणून रेडिओवरून बातम्या येत असायच्या,आता सर्व शेतकरी मात्र चिंतातूर झाले होते,तिकडे राजकारण सुद्धा गरम झालं होतं,म्हणून शेतकरी वर्गाला आर्थिक मदत द्या म्हणून मोर्चे निघत होते,

आम्हीही शाळेत जायचो पण ,शाळेत मन काही रमत नव्हतं,सर सुद्धा पावसाच्या बातम्या सांगत होते,अचानक पाऊस गायब का झाला याची शास्त्रीय कारणे समजावून सांगत होते...

                    एके दिवशी शाळेत विज्ञानाचा तास आमचे मुख्याध्यापक पवार सर शिकवीत होते,तेवढ्यात चपराशी बातमी घेऊन आला,की परश्याच्या बाबाने दिगंबर पाटलाच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असा निरोप तो घेऊन आला...हे ऐकताच परश्याने रडायला सुरुवात केली,मी ही त्याच्या सोबत रडू लागलो,

लगेचं दोघेही घरी आलो तर परश्याची आई मोठ्याने हंबरडा फोडून रडत होती,परश्याची लहान बहीण बाबा ...बाबा...म्हणून रडत होती, माझी आई परश्याच्या आईला शांत करण्याचा प्रयत्न करत होती,

      पण ती सुभद्रा कशी शांत होईल?????तिच्या नवऱ्याने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली होती???? सततच्या नापिकीमुळे ,आणि शेतीसाठी पाटलांकडून घेतलेल्या कर्जामुळे तो पूर्णतः खचला होता. वरून अवकाळी,बेभरवशाचा पाऊस,महिना- दिढ महिना दडी मारून बसलेला पाऊस,शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा पाऊस,शेतकऱ्यांची स्वप्ने पायाखाली चुरडणारा पाऊस आज परश्याच्या बाबाचा बळी घेऊन शांत झाला होता...सर्व एकाएकी झाल्याने कुणाला काही कळत नव्हते,सर्वांच्या डोळ्यांत फक्त आसवं होती,आणि चेहऱ्यावर दुःख दिसत होती...

                       पोलीस पाटलाने परश्याच्या बाबाने वाल्मिकने आत्महत्या केली म्हणून पोलिसांना कळविले होते. पोलिसांची जीप पंचनामा करण्यासाठी आली होती. विहिरीत पडून असलेलं परश्याच्या बाबांचं पार्थिव शरीर बाहेर काढण्यात आले..पुन्हा एकदा परश्याने,त्याच्या बहिणीने,त्याच्या आईने रडायला सुरुवात केली,मी ही अश्रू गाळत होतो,माझी आई सुभद्रा (परश्याची आई ) जवळ बसून ती ही रडत होती,माझे बाबा त्यांचा मित्र गेला म्हणून एका कोपऱ्यात बसले होते..

                सरणावर पार्थिव शरीर ठेवण्यात आले, शेवटचं आज दर्शन घेऊन ,आता शरीराला परश्याने अग्नी दिला ,यानंतर आता परश्या कुणाला बाबा म्हणू शकणार नाही,तो एकप्रकारे अनाथचं झाला होता..कर्जाच्या भीतीने,सततच्या नापिकीने,तो अजून लढला असता पण त्याला लढण्यास बळ मिळाले नाही,आणि शेवटी त्याने जगाचा निरोप घेतला.......आज मात्र अग्नी देतांना पावसाने हजेरी लावली होती,एकाचा जीव घेऊन घेऊन हा निर्लज्ज पाऊस धो -धो परत कोसळत होता,आणि अग्निकडे पाहून आमची चेष्टा करत होता,असा हा पाऊस!!!!!!!

नव्या उमेदीने शेती करू,

म्हणून कर्ज काढून करायला घेतली शेती,

बेभरवशाच्या पावसाने,

शेतकऱ्यांच्या स्वप्नांची केली पावसाने माती,

शेतकऱ्यांच्या मुलांची स्वप्न चुरडून,

कास्तकाराला घ्यायला लावतो फाशी,

सरकार करतो मदत,

पण त्या थोडुश्या मदतीने नाही उडत,

आमच्या दुखावरची ती काळी माशी,

अवकाळी,अवेळी,पडणाऱ्या पावसाने,

झाली आमची ही अधोगती,

तो कधी सुखाने जगू देणार नाही,

अशीच आहे सध्याची शेतकरी दादांची स्थिती....

........समाप्त ....


टीप -

       असा हा पाऊस ही कथा काल्पनिक असून ती कुणाच्या जीवनावर आधारित नाही...पण वास्तविक शेतकऱ्यांची परिस्थिती अगदी तशीच असल्याने आणि हा प्रसंग घडल्यास तो योगायोग समजावा...ही कथा आमच्या सर्व शेतकरी बापाला,शेतकऱ्यांच्या मुलाला समर्पित.



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy