vinit Dhanawade

Tragedy

3  

vinit Dhanawade

Tragedy

"बाबा"

"बाबा"

33 mins
1.8K


सकाळचे ११.३० वाजत आले होते. छोटया आदित्यचे बाबा अजूनही कूठेच दिसत नव्हते. शाळेत जायला उशीर होत होता. आदित्यच्या शेजारी त्याची लहान बहिण दिपा बसली होती. तिचेही डोळे इमारतीच्या गेटला लागलेले होते कधीपासून.…" चल आदी… मी सोडते तुला शाळेत. तुझ्या बाबाला उशीर झाला आज. चल नाहीतर तुझ्या madam रागावतील तुला. " ,


" नको... बाबाला येऊ दे. "

" चल ना आदी… उशीर होईल तुला. " ,

" नको… बाबाचं घेऊन जाईल मला, नाहीतर मी नाही जाणार शाळेत.. ",

" ठीक आहे.. madam ओरडल्या तर मग मला सांगू नकोस हा.. " भार्गवी म्हणाली आणि तिने दिपाला उचलून स्वतःचा मांडीवर बसवलं.

आता सगळेच इमारतीच्या गेटकडे पाहत होते. ५-१० मिनिटे गेली असतील… अचानक छोटी दिपा आनंदाने ओरडली… " बाबा आला , बाबा आला.. "

तसा आदित्य शाळेची bag सावरत उभा राहिला… " sorry हा बच्चा... थोडा उशीर झाला, चल , लवकर चल..." अविनाश धावतच गेटमधून आत आला.

" काय ग भार्गवी... जरा जायचे ना शाळेत घेऊन आदी ला " ,

" अरे त्याला बोलली मी … पण त्याला त्याचा "बाबा" च पाहिजे ना.. " अविनाश हसला.


इकडे दिपा " बाबा… बाबा " म्हणत होती. अविनाश पटकन पुढे आला आणि त्याने दिपाच्या गालाचा " पापा" घेतला.

" चल भार्गवी… बाय दिपा.. " " लक्ष ठेव ग दिपावर... " अविनाश गेटबाहेर जाता जाता म्हणाला. अविनाश गेला तसा भार्गवीने त्याच्या घराला कुलूप लावलं आणि दिपाला घेऊन स्वतःच्या घरी आली. " चला दिपा madam…. आता आमच्या घरी. " भार्गवी दिपाला घेऊन घरी आली.

"काय ग... गेला का अविनाश आदित्यला घेऊन शाळेत …? " भार्गवीच्या आईने तिला विचारलं…

" हो गं… आत्ताच आलेला तो… उशीर झाला आज त्याला ",

" आणि दीपाला किती वाजता सोडायचे आहे शाळेत ? " ,


" आज नाही , आज सुट्टी आहे तिला. " भार्गवी दिपाकडे पाहत म्हणाली. " म्हणजे आज आम्ही दिवसभर मस्ती करणार… हो ना… दिपा. " तशी दिपा खुदकन हसली.…

" काय त्या पोराच्या नशिबात आहे, देव जाणे.. किती धावपळ करत असतो… एकटा माणूस सगळीकडे कसं लक्ष देणार… " भार्गवीची आई बोलली.

तशी भार्गवी पुढे आली आणि आईला शांत राहायला सांगितलं. " आई ! … तुला किती वेळा सांगितलं आहे कि या मुलांसमोर तो विषय काढू नको म्हणून, मग ते सारखं विचारात बसतात आणि मला त्यांना उत्तर द्यायला जमत नाही… पुन्हा विषय काढू नकोस… प्लीज… " भार्गवी म्हणाली आणि दिपाला घेऊन बाहेर गेली.


" देवा… त्या पोराकडे लक्ष ठेव रे बाबा…. चांगल होऊ दे त्याचा… " भार्गवीच्या आईने देवापुढे हात जोडले.

संध्याकाळ झालेली…. छोटा आदित्य शाळेत बसून बाबांची वाट बघत होता. शाळा सुटली होती केव्हाची, बाकीची मुले त्यांच्या आई-वडिलांबरोबर घरी जात होती. आदित्य त्यांच्याकडेच पाहत होता. त्याच्या ''बाबा'' ला आज पण उशीर झाला होता.

गेटमधून भार्गवी येताना दिसली," चल आदी.... " , " तू का आलीस.... माझा बाबा कुठे आहे ? . ",

" अरे त्याला उशीर होणार आहे… म्हणून त्याने मला सांगितलं तुला आणायला. " ,


"मग मी थांबतो इथेच… बाबाला येऊ दे…" ,

" चल ना आदी. नको हट्ट करूस. तिकडे दिपा पण एकटी आहे." आदित्य तयारच नव्हता,पण छोटया दीपाची आठवण झाली तेव्हा तो तयार झाला. आणि एकदाचा आदित्य घरी

आला. त्याचा बाबा आला नव्हता अजूनही. त्यामुळे दिपा आणि आदित्य, भार्गवीच्या घरी खेळत होते.

रात्री ९ वाजता अविनाश घरी आला. " sorry पोरांनो... खूप उशीर झाला आज.. " म्हणत अविनाश, भार्गवीच्या घरी आला.

" बाबा आला… बाबा आला... " म्हणत दोघेही धावत जाऊन त्याला बिलगले.

" बर झालं तू आलास ते बाबा…. तुझी पोरं वेडी झाली होती अगदी.. " भार्गवीची आई म्हणाली.

" हो… आज जरा काम होतं ऑफिसमध्ये…म्हणून उशीर झाला. " अविनाशने दीपाला वर उचलून घेतलं. " जेवलात का रे दोघेही… " ,

" हो... आमाला आज चोकलेट पण दिलं ताईने…" दिपा म्हणाली.

" छान छान… चला आता झोपी करायला." म्हणत अविनाश स्वतःच्या घरी आला. अविनाशने त्या दोघांनाही झोपवले. जरासा काही जेवला आणि ऑफिसच्या कामात गढून गेला. रात्रीचे ११.३० वाजले होते. आणि अविनाश भार्गवीच्या घरी आला.

" काय रे… झोपला नाहीस अजून… " ,

" हो गं… झोपतोच आहे आता…" ,

" ok… काही हवं आहे का तुला ? " ,


" नाही गं.. असंच आलो होतो, thank you म्हणायला… " ,

"कश्याबद्दल ? " ," तू दिपा आणि आदित्यची काळजी घेतेस म्हणून.

" गप्प बस हा अवि… नाहीतर उद्यापासून सांभाळ तू तुझ्या मुलांना… ",

" तसं नाही गं… तू लक्ष देतेस म्हणून., मी कधी घेणार त्यांचा अभ्यास… त्यांच्याकडे बघायलाही वेळ नसतो. तुला thanks म्हणायला सुद्धा वेळ मिळत नाही मला. तू त्यांना सांभाळतेस ते उपकारच आहेत माझ्यावर. " ,

" अरे वेडा आहेस का तू ? काहीही बोलतोस. ",


" बरं , उद्या पण उशीर होईल मला ऑफिसमध्ये , जरा आणशील का आदित्यला शाळेतून ? ",

" अरे ती सांगायची गोष्ट आहे का … तू पण ना… ",

"चल.. मी जातो झोपायला. " , " अवि.... " भार्गवीने त्याला थांबवलं."काय गं ? " ,

" सुरेखा कशी आहे रे ? " प्रश्न विचारातच अविनाशचा चेहरा उतरला.


" ठीक आहे. " ," डॉक्टर काय म्हणाले ? " , " अजून काही सांगता येत नाही म्हणाले… त्यांचे प्रयन्त चालू आहेत. " असं बोलून अविनाश शांत उभा राहिला….

भार्गवी मधेच बोलली. " आम्ही काही मदत करू का पैशाची… " हे ऐकताच अविनाशने नकारार्थी मान हलवली. " तुम्ही खूप करत आहात माझ्यासाठी… पैशाची कमतरता नाही आहे. कमतरता आहे ती फक्त वेळेची. वेळ अशीच निघून चालली आहे हातातून आणि हाती काहीच लागत नाही माझ्या. अजून काही माझ्यासाठी करायचे असेल तर त्या देवाकडे प्रार्थना कर , सुरेखासाठी. माझं देवाने कधीच ऐकलं नाही. बघ तुझं तरी ऐकतो का ते. " थोडावेळ शांतता. " चल, मी जातो झोपायला, सकाळी हॉस्पिटलमध्ये पण जायचे आहे लवकर.. " म्हणत अविनाश घरी आला.


अविनाश घरी तर आलेला झोपायला, झोप यायला तर हवी ना…. डोक्यात किती विचार चालू होते…. तळमळत होता तो बेडवर. झोपच येत नव्हती त्याला. तसाच उठून बसला अविनाश… उठून आदित्यच्या रूमकडे आला, दरवाजा हळूच उगडून त्याने झोपलेल्या आदित्यकडे पाहिलं. आदित्य , आपल्या लहान बहिणीला घेऊन शांत झोपला होता. अविनाश बाल्कनीत आला.रात्रीचे १२-१२.३० वाजले असतील. बाहेर हवा होती जराशी. अवीने वर आभाळात पाहिलं. पूर्ण चंद्र होता आज. पौर्णिमेचा चंद्र. त्याला पाहून अविला सुरेखाची आठवण झाली. अविनाश तिला पौर्णिमेचा चंद्र असंच म्हणायचा, इतकी सुरेख होती ती. म्हणून त्यानेच लग्नानंतर तिचं नाव " सुरेखा " असं ठेवलं होतं. सुरेखा म्हणजे अविनाशची बायको. Love marriage. सुरेखाची ओळख म्हणजे त्याच्या ऑफिसमधली. अविनाशने नवीन ऑफिस join केलं, त्याच्या बरोबर आठवड्याने सुरेखाने ऑफिस मध्ये entry केलेली accountant म्हणून. अविनाशच्या हाताखालीच ती काम करायची. चांगली मैत्री झालेली दोघांमध्ये. लवकरच प्रेम झालं आणि लग्नाचा निर्णय सुद्धा घेतला दोघांनी. दोघांमध्ये अजून एक गोष्ट common होती , ती म्हणजे दोघेही अनाथ होते. अविनाशचे शहरात फक्त एक चुलत काका राहायचे आणि सुरेखाचे तर कोणीच नव्हतं. त्यामुळे लग्नाला असा कोणाचा विरोध नव्हता. लागलीच लग्न झालं थाटामाटात. दोघेही चांगले कमावते होते. म्हणून एका चांगल्या सोसायटीमध्ये घर घेतलं. खूप छान ना… शेजारीही चांगले होते. भार्गवी राहायची शेजारी. तिला वाटायचं कि आपल्याला एक मोठा भाऊ असायला पाहिजे होता. अविनाश तिकडे रहायला आल्यापासून भार्गवीची तीही इच्छ्या पूर्ण झाली. भार्गवी दरवर्षी अविला राखी बांधायची आणि अविनाश प्रत्येक भाऊबीजला तिच्याकडून ओवाळून घ्यायचा. अगदी एक कुटुंबच तयार झालं होतं त्याचं.


आता १० वर्ष झाली होती अविनाश- सुरेखाच्या लग्नाला. प्रेम जराही कमी झालं नव्हतं दोघांचं. त्यात अजून दोघांची भर पडली होती. ती म्हणजे आदित्य आणि दीपाची… दोन्ही मुलं छान होती. लगेचच त्यांनी दोन्ही घरं आपली करून घेतली होती. वेळ वेळ कसा निघून गेला कळलही नाही त्यांना. आदित्य ५ वर्षाचा होता आणि दिपा ३ वर्षाची होती. सगळं काही छान चालू होतं. पण अचानक काय झालं कोण जाणे. सुरेखा आजारी पडली. निव्वळ तापाचा कारण झालं आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. तो दिवस तर अविनाशला अजून आठवतो. दोन दिवस ताप उतरलाच नव्हता. आदित्य आईच्या बाजूलाच बसून होता. दिपा भार्गवीकडे होती.


भार्गवीचे वडील अविनाशकडे आले. " चल बेटा… थोडयावेळाने ambulance येईल. तिला घेऊन जायलाच पाहिजे. चल तयारी कर." अविनाश सैरभैर झालेला. त्याने आदित्यकडे पाहिलं. कधीपासून तो त्याच्या आईच्या बाजूलाच बसून होता. त्याला कळतच नव्हतं, आपली आई का झोपली आहे ते. सुरेखा अंगात ताप असूनही त्याला त्याच्या आवडीची गोष्ट सांगत होती. तिकडे दीपाने रडून रडून घर डोक्यावर घेतलं होतं. भार्गवी तरी काय करणार ना. १० मिनिटात ambulance आली, सुरेखाला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यासाठी. सुरेखाच्या अंगात चालत जायची ताकद नव्हती. तिला stretcher वरून नेण्यात आलं. सुरेखाला जस घेऊन जाऊ लागले, तस आदित्यला कळलं.


" बाबा…. आईला कुठे घेऊन जात आहेत…. बाबा. " अविनाशकडे काहीच उत्तर नव्हतं.

तसाच आदित्य ambulance जवळ धावत गेला. " आई… आई … कुठे चालली तू…. मी पण येतो… "

छोटया आदित्यचा निरागस प्रश्न. " कुठे नाही रे बाबा… जरा गावाला जाऊन येते मी, आपली गोष्टीतली आजी आहे ना… तिला भेटायला जाते आहे मी… लवकर येते मी… " ,

" आजीला भेटायला जाते आहेस तर मी पण येतो. मला पण बघायची आहे आजी." ,


" नको बाबा… आपण नंतर जाऊ कधीतरी. दीपाकडे लक्ष ठेव हा, आणि बाबाला कधी सोडून जाऊ नकोस हा. " ,

" हो नक्की. पण तू लवकर ये आई. " आदित्यचे ते बोलणे ऐकून सगळ्यांचे डोळे पाणावले. दिपा एव्हाना शांत झाली होती.

भार्गवीने आदित्यचा हात पकडला. ambulance सुरु झाली. आदित्यने आईला ' टाटा ' केलं. नजरेसमोरून ambulance दूर गेल्यावर आदित्य जरा शांत वाटला.

ते दोघेही भार्गवीकडे खेळत बसले. थोडयावेळाने दीपाला आईची आठवण झाली. " आई कुठे गेली ? " छोटया दीपाने आदित्यला विचारलं.

" अगं , आई ना ती आजी आहे ना तिच्याकडे गेली आहे. आपल्याला चोकलेट आणायला. तुला पण देणार आणि मला पण. "

तेवढयात भार्गवी आली. " ताई… आई कधी येणार ? " ," का रे आदी ? " ,


" अगं , आईने तर माझी गोष्टच पुरी सांगितली नाही… अर्धीच सांगितली तिने. आई आली कि ती सांगेल ना पूर्ण. " भार्गवीला ते ऐकून रडूच आलं, तशीच ती बाहेर आली रडत रडत.


तो दिवस होता आणि आजच दिवस. आज २५ दिवस झाले होते. सुरेखा अजूनही हॉस्पिटलमध्ये होती. ताप अजूनही उतरला नव्हता. डॉक्टरांचे प्रयन्त चालू होते. थोडे दिवस, दिपा आणि आदित्य " आई कधी येणार " विचारायचे, हळूहळू त्यांना त्या गोष्टीचा विसर पडला. अविनाश किती धावपळ करत होता. सकाळी सकाळी हॉस्पिटलमध्ये जायचा. तिकडे थोडावेळ थांबून आदित्य आणि दीपाच्या शाळेची तयारी करायला घरी यायचा. त्यांना आंघोळ घालायचा, डब्बा करायचा, सगळ करायचा. शेवटी शाळेत सोडून यायचा. तिकडून तो ऑफिसला पळायचा. संध्याकाळी आदित्यला शाळेतून घरी आणण्यासाठी ऑफिसमधून थोडावेळ बाहेर यायचा. मग पुन्हा ऑफिसमध्ये जायचा. ऑफिस सुटलं कि पुन्हा हॉस्पिटलमध्ये. सुरेखा जवळ.तो पूर्ण वेळ राहू शकत नव्हता. कारण आदित्य आणि दीपा. भार्गवी जरी त्यांना सांभाळत असली तरी त्यांना त्यांचे , " आई किंवा बाबा " पैकी कोणीतरी पाहिजे होतं सोबतीला. असंच चालू होतं, अविनाशची तब्येतही खालावली होती,धावपळ करून. रात्रीची झोप मिळत नव्हती पुरेशी. जेवण नाही वेळेवर. कधी कधी ऑफिसमध्ये काम करताना डोळा लागायचा त्याचा. अर्थात बॉसला त्याची परिस्थिती माहित होती. तरीही कामात चुका होऊ नये म्हणून अविनाशला दोनदा ताकीद दिली होती. तो तरी किती धावपळ करणार सगळीकडे. शेवटी माणूसच ना तो.


पण छोटया आदित्यसाठी त्याचा " बाबा " म्हणजे superman होता. आई जेव्हा पासून " गावाला " गेली होती, तेव्हा पासून त्याचा " बाबा " च तर सगळं करायचा. त्यांच्या शाळेच्या तयारी पासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळ… त्यांना शाळेत घेऊन जायचा, शाळेतून घरी घेऊन यायचा. रात्री अभ्यास घ्यायचा. मार्केट मध्ये जायचा. त्यांना खाऊ घेऊन यायचा. रात्री झोपताना गोष्टी सांगायचा. पण आईसारखी गोष्ट त्याला सांगता नाही यायची. तरीदेखील कधीतरी आपली आई येऊन आपल्याला गोष्ट सांगेल या आशेवर दोन्ही मुलं शांत झोपी जायची.


एक महिना होऊन गेला होता. सुरेखाच्या तब्येतीत फरक पडत नव्हता. पैसेही मोठ्या प्रमाणात खर्च झाले होते. आदित्य आणि दीपाला आईचा जवळपास विसर पडला होता. त्या रात्री कुणास ठाऊक, आदित्यला आईची आठवण झाली. " बाबा , आई कधी येणार गावावरून ?" अविनाशच्या त्या प्रश्नाने आदित्य चमकला.


किती दिवसांनी त्याला सुरेखाची आठवण झाली होती. मग दीपाने " मला आई पाहिजे, मला आई पाहिजे " म्हणायला सुरुवात केली. अविनाशने दीपाला कसबसं शांत केलं.

ती झोपली तसा तो आदित्य कडे आला. " बाळा काय झालं ? आईची आठवण झाली का.. ",

" बाबा , आईला बोलावं ना गावावरून. कधी येणार आई ?",

" येणार रे लवकर. काम असते ना तिला …. म्हणून राहिली आहे ती तुला chocolate आणणार आहे ",

" chocolate…! आणि दिपाला पण ना… ",

" हो रे बाळा…. खूप chocolate's आणणार आहे ती. झोप हा आता… " म्हणत आदित्यला झोपायला नेलं.

आदित्य , आई येणार म्हणून जरा खुशीतच झोपी गेला. अविनाश मात्र बेडवर तसाच बसून होता, त्या दोन मुलांचा विचार करत.

पुढचा दिवस, अविनाश लवकर तयारी करून बाहेर पडला.

" का रे अविनाश …. घाई कसली एवढी… " भार्गवीच्या आईने त्याला विचारलं.

" काकू… आज ऑफिसला बोलावले आहे. काम आहे जरा." ,

" अरे आज सुट्टी आहे ना मग. " ,


"जरा काम राहिलं आहे म्हणून बोलावलं आहे बॉसने. या दोघांना सांभाळाल का जरा आज … ? तुम्हाला त्रास दिला सुट्टीच्या दिवशी… sorry.",

" अरे त्यात काय … जा तू , यांना राहू दे आमच्याकडे. " अविनाशने , आदित्य आणि दिपाला त्यांच्याकडे सोपवलं.

" चल बेटा, येतो हा मी लवकर " अविनाश ,दीपाच्या गालाचा पापा घेत म्हणाला. आणि धावतच इमारतीच्या गेट बाहेर गेला.

" चला आज आपण बाहेर जाऊया का फिरायला.? " भार्गवीने , आदित्य आणि दिपा कडे पाहत प्रश्न केला, तसे दोघेही आनंदले.


बऱ्याच दिवसांनी ते घर आणि शाळा व्यतिरिक्त दुसरीकडे कुठे गेले होते. पूर्ण दिवस त्यांनी भार्गवी सोबत फिरण्यात घालवला. संध्याकाळी फिरून फिरून दमलेले आदित्य आणि दिपा घरी आले. तरी अजून त्यांचा " अविनाश बाबा " आला नव्हता. दिपा तर खूप दमली होती. लगेच झोपी गेली. आदित्य मात्र बाहेर उभा होता.

भार्गवी त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली. " काय रे... तुला झोप नाही आली अजून. " ,

" नाही गं ताई… बाबाची वाट बघतो आहे." ,

" येईल रे तो…. तू दमला असशील ना , चल… जरा आराम कर. ",

" नको , बाबा येईल आता " ,


" ठीक आहे, मी पण थांबते इथे." दोघेही तसेच उभे राहिले अविची वाट पाहत.

थोडयावेळाने आदित्य बोलला ,"ताई …. आज सुट्टीचा दिवस ना, मग बाबा कसा कामाला गेला ? " ,

" अरे त्याचं काम होतं ना म्हणून गेला तो आज " आदित्य लहान वयातच खूप विचार करायला लागला होता.

खरेतर , अविनाश ऑफिसमधले काम लगेच संपवून हॉस्पिटलमध्ये गेलेला. दुपारपासून तो तिकडेच होता.….

" ताई, बाबा कधी झोपत असेल गं. ? ",


" का रे ? " , " माझी आई असताना तो आमच्या अगोदर झोपायचा, आता तर त्याला कधी पाहतच नाही झोपलेला… " भार्गवीला खूप वाईट वाटलं.

तीही त्याला रात्री उशिरा पर्यंत असाच बाल्कनीत उभा असलेला पहायची.

" झोपतो तो , तुम्ही झोपलात ना कि झोपतो तो. चल, तू पण झोप आता. " भार्गवी म्हणाली.

"मला ना , रात्री गोष्ट ऐकल्याशिवाय झोपच येत नाही. बाबा सांगतो कधी कधी, त्याला नाही सांगता येत नीट. ….

आई खूप छान सांगते गोष्ट… माझ्या आवडीची ,आजीची गोष्ट. ती गावाला गेल्यापासून तिची खूप आठवण येते. कधी येणार माझी आई ? " ते ऐकून भार्गवीच्या डोळ्यात पाणी आलं. ते अश्रू आदित्यच्या हातावर पडले. त्याने वर पाहिलं तर भार्गवी रडत होती. " तुला कोणी ओरडलं का ताई , मग कशाला रडतेस ? " ,


" नाही रे . डोळ्यात कचरा गेला जरा म्हणून डोळ्यातून पाणी आलं. " भार्गवी डोळे पुसत म्हणाली. " मग माझ्या बाबाच्या डोळ्यात पण सारखा कचरा जात असेल. " , " का ? " , " त्याच्या डोळ्यातून खूप वेळा पाणी येताना बघितलं आहे मी ना … " ते ऐकून भार्गवी गप्प बसली.


अविनाश उशिरा आला. तोपर्यंत आदित्य जागाच होता. बाबा आलेला पाहून त्याला आनंदच झाला. अविनाश खूप थकलेला वाटत होता. झोपलेल्या दिपाला त्याने उचलून घेतलं , आदित्यचा हात पकडून तो घरी जाऊ लागला. भार्गवीला पाहिल्यावर उगाचच खोटं खोटं हसला.


" काय झालं अवि ?" ,

" काही नाही गं , जरा दमायला झालं आहे. उद्या बोलूया. " म्हणत तो आदित्य आणि दिपाला घेऊन निघून गेला.

सकाळी सकाळी अविनाश पुन्हा आदित्य आणि दिपाला घेऊन भार्गवीकडे आला.

" काय रे आज लवकर … आणि यांना शाळेत नेयाचे आहे कि नाही आज. " भार्गवी म्हणाली.

" नाही… नको… आज शाळेत नको त्यांना. मी जातो चल… " अविनाश जाता जाता म्हणाला.

भार्गवी त्याच्या मागून धावत गेली. " अविनाश… थांब जरा." तसा अवि थांबला.


" काय झालंय… काल पण tension मध्ये होतास. " अविनाश गप्प. " बोल ना , काय झालंय " ,

" डॉक्टरने दोनच दिवस दिले आहेत फक्त गं …सुरेखासाठी ", अविनाशच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं.

भार्गवी तशीच उभी राहिली स्तब्ध.…. " कालपासून खूप तब्येत बिघडली आहे… " अविनाश सांगत होता.

" चल मी निघतो, जरा काळजी घे दोघांची. कदाचित आज जमणार नाही यायला मला. " म्हणत अविनाश निघाला.

जाता जाता मधेच थांबला, " तुझी मदत लागली तर येशील का हॉस्पिटलला जरा… मी call करतो… चल… bye " आणि अविनाश गेला निघून.

भार्गवीच मन लागत नव्हतं आज, अविनाशने सकाळी सांगितल्यापासून. आदित्य आणि दीपा तिथेच होते. भार्गवी कधी त्या दोघांकडे बघायची कधी घड्याळाकडे पहायची. वेळच जात नव्हता आज. घड्याळाचा काटा जणू अडकला होता. सकाळची दुपार , दुपारची संध्याकाळी झाली. अविनाशचा call काही आला नाही. इकडे भार्गवीच कुटुंब त्याचं tension मध्ये होते. संध्याकाळी ७ ची वेळ. दिवे लागणीचा काळ.

भार्गवीच्या आईने देवासमोर दिवा लावला आणि भार्गवीचा mobile वाजला. …. " Hello… बोल अवि… येऊ का मी हॉस्पिटल मध्ये… काही मदत हवी आहे का तिकडे. " अविनाश शांत, थोडयावेळाने तो बोलला. " हो मदत हवी आहे जरा… मीही खूप थकलो आहे… " ,


"मग मी येते तिथे लगेच… " ,

" तू नको…. काका - काकूला पाठव , तू आदी आणि दिपा सोबत राहा." ,

" बरं … सुरेखा कशी आहे ? " काहीच उत्तर नाही अविचं.

" भार्गवी…… तुझी वाहिनी गेली सोडून. " अवि शांत आवाजात म्हणाला. भार्गवीच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते.

" मला तुमच्या शिवाय कोणीच नाही. म्हणून तिची शेवटची कार्य करण्यासाठी काका-काकूला पाठव इथे. " असं म्हणून अवीने call कट केला. एव्हाना काका काकू ला कळल होतं. तेही रडतच गेले हॉस्पिटलला. आदित्य आणि दीपाला कळेना , नक्की काय झालंय ते. भार्गवी ताई का रडते आहे ते.


आदित्य दिपा सोबत होता ," अगं आपल्या डोळ्यात कचरा गेला कि आपण रडायला लागतो." आदित्यने दिपाला माहिती पुरवली.


सगळी कार्य करून अविनाश , भार्गवीचे आई वडील रात्री उशिरा आले. पुन्हा आदित्य जागाच होता. अविनाशला पाहिलं तसा धावत जाऊन त्याने त्याला मिठी मारली. त्याला कुठे माहित होते कि शेवटची कार्य करून आलेल्या व्यक्तीला शिवायचं नसते. नाहीतरी त्यांचा बाबाचं होता त्यांच्यासाठी आता. भार्गवी तर बाहेरच आली नाही. नेहमीप्रमाणे अवि , आदित्य आणि दिपाला घेऊन गेला घरी आणि त्यांना झोपवलं. आंघोळ केली आणि त्याने झोपण्याचा प्रयन्त केला. पण आज त्याला झोप लागणार नव्हती. तो बाहेर येऊन उभा राहिला. थोडयावेळाने भार्गवी बाजूला येऊन उभी राहिली. तसेच दोघे उभे होते शांत. अविनाश वर आभाळात असलेल्या, अर्ध चंद्रला पाहत होता.


भार्गवी म्हणाली. " आदित्य आणि दिपाला काय सांगणार आहेस आता…. निदान शेवटचं दर्शन तरी त्यांना दयायला पाहिजे होतंस." अविनाशने निर्विकार चेहऱ्याने तिच्याकडे पाहिलं. " एवढया लहान वयात त्यांना एवढा मोठा धक्का मला दयायचा नव्हता. त्यांच्यासाठी त्यांची आई गोष्टीतल्या आजीकडे गेली आहे, तिला गावालाच राहू दे. " ,

" त्यांना कधीतरी सांगायला हवं ना…. " ,


" त्यांना ते हळूहळू कळलं तर बरं होईल… काय ना, वेळ हे उत्तम औषध असते. अश्या गोष्टी हळूहळू कळल्या कि जास्त त्रास होत नाही मनाला. आणि अजून त्यांना खूप आयुष्य पाहायचं आहे. एवढे दिवस आईशिवाय राहिले. पुढेही राहतील. आणि त्यांचा " बाबा " आहे त्यांच्यासाठी. " ,


" आणि तू …. तू विसरू शकशील सुरेखाला…? तुझही आयुष्य आहे अजून पुढे. " त्यावर अविनाश शांत झाला जरा.


" भार्गवी…आपलं आयुष्य म्हणजे एखादया लोकल ट्रेन सारखं असते… आपण जेव्हा या जगात येतो तेव्हा आपल्या सोबत आपले आई-वडील असतात. तसच ट्रेनमध्ये सुरुवातीला मोजकेच प्रवासी असतात. जसा जसा प्रवास पुढे वाढत राहतो,तसे ट्रेनमध्ये नवीन प्रवाशी येत राहतात. काही चांगले असतात, आपले मित्र बनतात, सखी बनतात, नातेवाईक बनतात. ते कितीही चांगले असले तरी त्यांना त्यांचं स्टेशन आलं कि उतरावच लागते. सुरेखाचा प्रवास इतकाच होता माझ्यासोबत. तिचं स्टेशन आलं, ती गेली उतरून. माझा प्रवास चालू आहे अजून…… निदान आदित्य आणि दीपासाठी तरी… " मग कोणी काही बोललं नाही.


अविनाश पुढे म्हणाला, " चल, उदया लवकर जायचे आहे हॉस्पिटल मध्ये…. " तो बोलता बोलता थांबला, " विसरलोच मी…. ऑफिसमध्ये …. खूप दिवसांनी लवकर जाईन ऑफिसमध्ये… कोणी नाही निदान बॉस तरी खुश होईल ना मला लवकर बघून… " म्हणत अविनाश झोपायला गेला.


सुरेखाला जाऊन आता २ महिने होत आलेले. अविनाश आता कुठे सावरत होता. दोन महिन्यात आदित्यने एक-दोनदाच आईची आठवण काढली. छोटी दीपा तर आईला जवळपास विसरलीच होती. आणि त्यांना आईची आठवण येऊ नये म्हणून अविनाशने घरात सुरेखाचा फोटोही लावला नव्हता.


सर्व काही सुरळीत चालू झालेलं पुन्हा. अविनाश नेहमीप्रमाणे ऑफिसला जाऊ लागला होता. आदित्य आणि दीपा मात्र जाम खूष होते. कारणच तसं होतं ना. त्यांचा "बाबा" आता त्यांच्यासाठी खूप वेळ देत होता. सकाळी सकाळी छानपैकी मजा-मस्ती करत आंघोळ व्हायची तिघांची. मग नास्ता करून दोघांनाही शाळेत सोडायला जायचा. शाळा सुटण्याचा अगोदरच त्यांचा बाबा हजर असायचा. आता भार्गवी ताई येत नव्हती शाळेतून घरी आणण्यासाठी. शाळेतून ते तसेच भार्गवीकडे जायचे आणि अविनाश पुन्हा ऑफिसमध्ये. थोडयावेळाने अवि घरी यायचा, तोपर्यंत आदित्य आणि दिपाचा homework झालेला असायचा भार्गवी ताई कडेच. मग बाबा आला कि धमाल सुरु व्हायची. छान जेवण बनवून द्यायचा " बाबा " त्यांना. ते खाऊन मग रात्री गोष्ट सांगायचा. गोष्ट ऐकतानाच झोपी जायचे दोघेही, छान ना….


त्यात कमी होती ती फक्त सुरेखाची. अविनाश मुलांसोबत कितीही आनंदी वाटला तरी तो आतून पुरता ढासळलेला होता. सुरेखाची खूप आठवण यायची त्याला. एवढा सोन्यासारखा संसार ती अर्ध्यावर सोडून गेली होती. मुलं काय ती तर लहान होती अजून पण त्यांना किती दिवस तो खोटं बोलणार होता. त्याला खूप रडावसं वाटे. पण त्यांच्या समोर तो रडू शकत नव्हता. असा एकही दिवस गेला नसेल कि त्याला सुरेखाची आठवण झाली नसेल. सुरेखा असती तर किती बरं झालं असतं असा विचार तो नेहमी करायचा.

ऑफिसमध्येही अविनाश आता लक्ष देऊ लागला होता. खूप सुट्टया झाल्या होत्या. शिवाय सुरेखाही त्याच ऑफिस मध्ये कामाला होती. त्यामुळे बॉसने ते सगळं सांभाळून घेतलं होतं. तरीदेखील office management ने अविनाशला नोटीस दिली होती. त्यात बॉस त्याची काही मदत करू शकत नव्हता. नोटीस होती कधीही कामावरून काढून टाकण्याची. थोडे दिवस अविनाश त्याच tension मध्ये होता. जॉब त्याला सोडायचा नव्हता. कारण सुरेखाच्या आजारपणात पाण्यासारखा पैसा खर्च झाला होता. आणि आता तर तो एकटाच कमावणारा होता. बॉसने त्याची नोकरी जाणार नाही याची हमी अविनाशला दिली. " तुझा जॉब जाणार नाही ते मी बघतो. पण आता सुट्टया नाही घेऊ शकत तू . शिवाय उरलेले कामही खूप आहे , तेही तुला संपवावे लागेल. तुझी condition काय आहे ते कळते आहे मला. पण management ला मी Handle करू शकत नाही. तुझा जॉब मी वाचवतो, कसा टिकवायचा हे तुला बघावं लागेल. " बॉस अविनाशला बोलून गेला.


आणि पुन्हा एकदा अविनाशची धावपळ सुरु झाली, यावेळेस त्याची नोकरी वाचवण्यासाठी. तसंच सुरु झालं पुन्हा. सकाळी लवकर उठून स्वतः बरोबर त्या दोघांचा डब्बा तयार करायचा, पटापट आंघोळ घालून शाळेची तयारी करायचा आणि तसाच धावत धावत जाऊन शाळेत सोडायचा. तिथूनच तो ऑफिसला पळायचा. पहिला कधीतरी उशिरा येणारा अवि, हल्ली रोज उशिरा येऊ लागला होता. आदित्य आणि दिपाला घरी आणण्याची जबाबदारी पुन्हा भार्गवीकडे आली होती. आता तर रोज भार्गवी त्यांना शाळेतून घरी आणण्यासाठी. बरं, शाळेत सोडायला तरी जायचा अविनाश सुरुवातीला,हळूहळू तेही बंद झालं. सकाळीच उठून अविनाश दोघांची तयारी करायचा आणि त्यांना भार्गवीकडे सोपवून ऑफिसला निघून जायचा.खरतरं आदित्यला हे मूळीच आवडत नव्हत, तरी त्याचा बाबा किती धावतो आहे ते तो बघत होता.म्हणून तो काही बोलायचा नाही. भार्गवीचं मग दोघांची काळजी घ्यायची. त्यांना शाळेत सोडण्यापासून संध्याकाळी घरी आणेपर्यंत. घरी आले कि तीच त्यांचा अभ्यास घ्यायची. हल्ली दोघांचे जेवण सुद्धा भार्गवीकडे होऊ लागले होते. अविनाश उशिरा घरी यायचा. एवढया उशिरा घरी येऊन कधी तो जेवण बनवणार आणि त्यांना भरवणार. तो घरी यायचा तेव्हा दिपा झोपलेलीच असायची. आदित्य तेवढा बाबाची वाट बघत जागा असायचा. बाबा आला कि ते घरी जायचे आणि बाबांनी गोष्ट सांगितल्यावर झोपी जायचे. परंतू अविनाश नाही झोपायचा. ऑफिसचे काम करत बसलेला असायचा रात्र- रात्रभर. फार उशिरा झोपायचा.


अशातच ३ महिने निघून गेले. अविनाशच्या कामाचे tension जराही कमी झालं नव्हते. आदित्य आणि दीपाला त्यांची आई कधी गावावरून येणार हे माहित नव्हते.त्यांना सांगायलाच कोणी नव्हते. त्यांचा " बाबा " त्यांना काही क्षणासाठीच दिसायचा, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना. शेवटचा निवांत वेळ कधी मुलांसोबत घालवला होता ते अविनाशला आठवत नव्हतं. आदित्य आणि दिपा तसे लहान होते,तरी आदित्यला बाबाची धावपळ कळत होती. त्यामुळे बाबाला आपल्याकडून काही त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यायचा तो.सुट्टीच्या दिवशीसुद्धा अविला मुलांना वेळ देता येत नव्हता. सुरेखा गेल्यापासून भार्गवीची खूप मदत झाली होती. तिच्यामुळे अविनाश कामावर लक्ष देऊ शकत होता,नाहीतर त्याने काय केल असते. धावपळ करून त्याची तब्येत खालावली होती. बॉसला सगळं समजत होते,परंतु तो काही करू शकत नव्हता. कसा हसरा चेहरा होता अविचा , पूर्ण झाकोळून गेला होता अवि ,tension मुळे.


अश्यातच एक दिवस, सकाळी अविनाश दोघांना उठवायला गेला तेव्हा दीपाचं अंग थोडं गरम जाणवलं त्याला. तापच होता तिच्या अंगात. तडक त्याने बॉसला call केला. अवि काही बोलणार तेवढयात पलीकडून बॉसचा आवाज आला, " बरं झालं तूच call केलास ते, मीच तुला call करणार होतो. आज एक महत्वाची मीटिंग आहे,Main branch मधले सर येणार आहेत. लवकरात लवकर ये ऑफिसला. " अविनाश समोर बिकट प्रसंग होता, जॉब कि मुलगी. डोक्यावर टांगती तलवार जणू. तसाच दीपाला घेऊन तो भार्गवीकडे आला.


" भार्गवी.... दीपाला ताप आला आहे गं …. बघ गं जरा… " भार्गवीने दीपाला घरात घेतलं. आदित्य सोबत होता.

" बघशील ना तिला... " अविनाश म्हणाला. भार्गवीने त्याच्याकडे पाहिलं. डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.

भार्गवीने मानेनेच " हो " म्हटलं. तसा तो धावतच गेला ऑफिससाठी. आदित्यला "Bye" ही नाही केलं त्याने आज. दीपाला डॉक्टर कडून तपासून आणले त्यामुळे आज दोघांनाही शाळेत पाठवलं नाही. आदित्य आपल्या बहिणीजवळ बसून होता. भार्गवी त्यांना लांबूनच पाहत होती. थोडयावेळाने आदित्य बाहेर जाऊन बसला.


भार्गवी त्याला घरात घेऊन जाण्यासाठी आली. " चल आदित्य, घरात चल … बाहेर कशाला बसतोस… " काहीच बोलला नाही तो. भार्गवीला कससं झालं.

" काय झालं रे आदि… " भार्गवी बाजूला जाऊन बसली त्याच्या.

" बाबा खूप बदलला आहे ना ताई... ",

" का रे … काय झालं ? " ,

"आता कुठे येतो तो शाळेत सोडायला… घरी पण तूच आणतेस ना. रात्रीच जेवण पण करत नाही. तो तरी जेवतो ते माहित नाही, मला रात्रीची कधीतरी जाग येते तेव्हा पण तो काम करत असतो. झोपतो कधी काय माहित. सुट्टीच्या दिवशी कामाला जातो. पहिला फिरायला घेऊन जायचा. आता घरीच उशिरा येतो. आमच्याकडे बघत सुद्धा नाही. आज पण दीपाला बरं नाही ना, तरी तो ऑफिसला गेला. आई तर दोन-दोन दिवस जायची नाही घरातून बाहेर दीपाला बरं नसलं कि. जवळच बसून रहायची. आता रात्रीची गोष्ट पण सांगत नाही. मला वाटते बाबाला आम्ही आवडत नाही आता."


यावर भार्गवीकडे काहीच शब्द नव्हते, तरी ती बोलली," तसं नाही रे… तू बघतोस ना किती धावत असतो ते. त्याच काम वाढलं आहे ना म्हणून तुला तसं वाटत असेल. तुमच्यासाठीच तो करतो आहे सगळं " ,

" आणि आई… तिला काहीच वाटतं नाही आमच्याबद्दल. ती कधी येणार गावावरून तेही सांगत नाही बाबा मला. तुला माहित आहे का ग ताई ? " भार्गवीच्या डोळ्यात पाणी आलं. ती तशीच उठून गेली घरात.

अविने भार्गवीला call केला," Hello… कशी आहे दिपा … ताप उतरला का ? ",


" हो… तसा ताप नाही आहे आता. डॉक्टरने औषध दिले आहे. रिपोर्ट संध्याकाळी मिळणार आहेत." ,

" हो ते मी आणतो येताना, तू फक्त दीपाकडे लक्ष ठेव. " म्हणत अविने फोन cut केला. रात्री ऑफिस मधून येतानाच तो डॉक्टरकडे दीपाचे रिपोर्ट आणण्यासाठी गेला.

" ये ये अविनाश… बस " ,

" दीपाचा ताप उतरेल ना डॉक्टर ? " ,

" ताप उतरला आहे , पण काहीतरी वेगळे सांगायचे आहे तुला. " तसा अवि सावरून बसला.

" काय झालं डॉक्टर ? " ,

"दीपाला आधी कधी मोठा आजार वगैरे झाला होता का ? " ,

" तसा नाही कधी, का … काय झालं ? ",

" दीपाला कधी मैदानात नेतोस का खेळायला ? " ,

"पहिला घेऊन जायचो, आता वेळ नाही मिळत, तरीही ती जास्त खेळत नाही मैदानात, लहान आहे ना दमते लवकर ती ",

तेच सांगायचे आहे तुला …दीपाला दम्याचा आजार आहे. " ते ऐकून अविच्या पायाखालची जमीनच सरकली.

" कसं शक्य आहे ? " ,


" हो… तू आधी कधी तिच्या test's नाही केल्यास ना. आज मला वाटलं म्हणून मी स्वतः हून तिच्या test केल्या तेव्हा मला कळलं. " अवि गप्पच झाला.

" एवढया लहान वयात आजार झाला आहे, तो बरा होऊ शकतो वेळेवर औषधे दिली तर. तुला खूप काळजी घ्यावी लागेल . " अविनाश औषध आणि रिपोर्ट घेऊन घरी आला. आदित्य आज त्याची वाट बघत नव्हता. दीपाच्या शेजारीच तो झोपला होता. अविला पाहिलं तशी भार्गवी बाहेर आली.


" रिपोर्ट नॉर्मल आहेत ना दीपाचे. " अवि काहीच बोलत नव्हता. भार्गवीने त्याच्या हातातून रिपोर्ट घेतले आणि तीही गांगरून गेली.

" आपण दुसऱ्या डॉक्टरला दाखवूया दीपाला. एवढया लहान मुलीला "दमा" कसा होऊ शकतो. हे रिपोर्ट चुकीचे आहेत. " भार्गवी रडलेल्या स्वरात म्हणाली.

अविनाशने तिला शांत केलं. " हे बघ… डॉक्टरचे रिपोर्ट बरोबर आहेत. चूक आपली झाली आहे, मी लक्ष देण्यात कमी पडलो. sorry सुरेखा ….

मी एकटा नाही सांभाळू शकत यांना… " अवि आभाळातल्या चंद्राला पाहून बोलला. थोडावेळ शांतता.


" आता एक करायला हवं. तो आजार बरा होऊ शकतो. वेळच्या वेळी औषध घेतली तर. मीही लक्ष देईन पण तुझी जबाबदारी वाढली आहे आता. करशील ना मदत मला… ? " भार्गवीने होकारार्थी मान हलवली आणि अविनाश नेहमी प्रमाणे त्या दोघांना घेऊन घरी आला.

दीपाचा ताप उतरला होता आणि दम्याची औषधे सुरु झाली होती. भार्गवीचं लक्ष असायचं नेहमी तिच्यावर. शाळेला घेऊन जाताना आणि घरी आणताना ती दीपाला उचलून घ्यायची, चालून चालून दम लागू नये म्हणून. आदित्यचीही ती काळजी घ्यायची. भार्गवी तर पूर्णपणे गुंतून गेली होती दोघांमध्ये अगदी. पण अविनाशचं tension अजून वाढत जात होतं. आधीच खूप खर्च झालेला, त्यात दीपाच्या आजाराची भर पडली होती. तो खर्च वाढला होता. त्यात शाळेचा खर्च,घरचा खर्च. ऑफिसचे tension. काम संपत नव्हतं. अपूर्ण झोप, शरीराला आराम नाही. नुसती धावपळ. संपूर्ण तेज उतरलं होतं त्याचं. मधे तोही आजारी होता तरी ऑफिसला आलेला होता. अंगावर काढलं होतं त्याने आजार.


गेले काही दिवस त्याला अस्वस्थ वाटत होतं.गेले दोन दिवस झोपही पुरेशी झाली नव्हती. त्यात आज मीटिंग होती महत्त्वाची. दीपाला सकाळचे औषध देऊन तो निघाला ऑफिसला. घराच्या बाहेर पडला तसा त्याला गरगरल्यासारखं झालं. लगेच त्याने दरवाजाचा आधार घेतला. थोडयावेळाने बरं वाटलं तसा तो निघाला ऑफिसला. मीटिंग पार पडली परंतु एक महत्वाचं काम त्याच्या डोक्यावर येऊन पडलं. दोन दिवसात त्याला ते द्यायचे होते. आधीच इतर कामाचे tension होते, नवीन कामाचं वाढलं होतं. घरी दीपा आजारी, तिला आज पुन्हा डॉक्टरकडे चेकअप साठी घेऊन जायचे होते, Light Bill आले आहे , ते भरायचे आहे. अपूर्ण झोप, अर्धवट जेवण. कितीतरी विचार डोक्यात. ऑफिसमध्ये चालता चालता पुन्हा त्याला चक्कर आली. यावेळेस जवळ काहीच नव्हतं आधारासाठी. तसाच तो खाली पडला. ऑफिस मधल्या लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये admit केलं लगेच.


अविनाशला जाग आली तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता. बाजूला भार्गवीचे वडील होते बसून.

" काका …. मी इकडे कसा ? " ,

" अरे तुला चक्कर आलेली ऑफिस मध्ये म्हणून तुला admit केला इकडे. कालपासून तू इकडेच आहेस." ते ऐकून अविनाश बावरला.

" काल…. कालपासून इकडे आहे. आणि आदित्य , दिपा.…. " ,

" ते आहेत आमच्याकडे… तू आराम कर. " ,

" नको… चला काका, मला जायला हवं घरी… आदित्य वाट बघत असेल घरी.

" काकांनी त्याला थांबवला,"हे बघ…. घाई करू नकोस. तुला डॉक्टर संध्याकाळी discharge देणार आहेत… " ,

" संध्याकाळी कशाला.... आणि कालच सोडायचं ना… चक्कर तर आली होती फक्त " .

" शांत हो जरा अवि… डॉक्टरला तुझाशी काही बोलायचे आहे म्हणून तुला थांबवलं आहे… शांत हो please… " ते ऐकून अविनाश शांत झाला. तो थांबला तर होता हॉस्पिटलमध्ये पण त्याच सगळं लक्ष होत ते आदित्य आणि दीपाकडे.

संध्याकाळी डॉक्टर आले. त्यांनी अविनाशला discharge दिला आणि त्याला आपल्या कॅबीनमध्ये बोलावले. " कसं वाटतंय तुम्हाला अविनाश ? ",

"ठीक आहे जरा. बर वाटतंय . ऑफिसमध्ये कामाचं tension , झोपही झाली नाही आणि काल जेवलोच नाही म्हणून चक्कर आली असेल मला." ,

"तुला अशक्तपणा जाणवत असेल ना… आधी कधी आजारी पडला होतास का ? " ,

"तसा नाही कधी पण या महिन्यात दोनदा आजारी होतो, येवढा नाही पण .",

" OK... मला काही सांगायचे आहे तुला म्हणून तुला बोलावले मी. तुझ्या काकांना सांगितलं आहे मी , पण मला वाटलं कि तुलाही सांगावे. ",

" बोला डॉक्टर " ,

" तुला चक्कर येण्याचे कारण अशक्तपणा नाही. " ,

" मग... " डॉक्टरने एक मोठा pause घेतला, " अविनाश... तुम्हाला Blood cancer आहे. " डॉक्टरचे ते बोलणे ऐकून अविनाश जवळपास कोसळलाच.

" काय बोलताय तुम्ही डॉक्टर ? " ,

" हो अविनाश…. तुमची blood test करताना माझ्या assistant ला काहीतरी वेगळं वाटलं म्हणून त्याने मला बोलवलं. मग मी ही वेगळ्या वेगळ्या test करून पाहिल्या तेव्हा ते conform केला मी. " अविनाशने काकांकडे पाहिलं. ते रडत होते.

" काका.... काय झालं हे.... काय करायचं आता ? " अविनाश थोडयावेळाने शांत झाला. " कोणती stage आहे माझी ? "

" 2nd stage वर आहात तुम्ही. तो अजूनही ठीक होऊ शकतो. आपल्याकडे medicine आहेत. operation ने ठीक होऊ शकतो. " ,

" किती वेळ आहे माझ्याकडे ? ",

" तशी blood cancer ची 2nd stage आहे, तुम्ही अजूनही ठीक होऊ शकता. " ,

" किती वेळ आहे माझ्याकडे डॉक्टर ते सांगा ",

" अजून तरी ७-८ महिने … त्या अगोदर operation वगैरे करून तुम्ही ठीक होऊ शकता. आजपासूनच आपण औषधे चालू करूया आणि लवकरात लवकर admit व्हा तुम्ही. तुमच्या कुटुंबाला कळवा हे ",

"आणि ही औषधे घ्या जाताना." डॉक्टरने काकांच्या हातात चिट्ठी दिली.काका अविनाशला घेऊन खाली आले. दोघेही गप्प गप्प होते. अविनाश अचानक हसायला लागला.

" काय झालं अवि ? " काकांनी विचारलं,

" नाही… काही नाही. डॉक्टर बोलले तुझ्या कुटुंबाला कळव.…… आदित्य,दीपाला त्यांची आई कुठे आहे ते अजून माहित नाही….blood cancer काय असतो ते त्यांना काय कळणार … " ,

" डॉक्टर बोलले ना तू ठीक होशील ते " ,

" ठीक… ? ७-८ महिने आहेत आणि ठीक सुद्धा होऊन मी ? "त्यावर काका काही बोलले नाहीत.

" काका... मला वचन द्या " ,

" कोणतं ? " ,


" हि गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहिलं… भार्गवी आणि काकूला काही सांगायचे नाही… " ," Please काका …. माझ्यासाठी…… Please " मग त्यांना अविनाशचे ऐकावेच लागले.

औषधाच्या दुकानातून अविनाश औषध घेत होता. दुकानदाराने एक औषधाचे पाकीट देताना सांगितलं ," ह्या गोळ्या एका महिन्यातच संपवा, याची expiry date एका महिन्याचीच आहे, त्या नंतर ते टाकून द्या. " अविनाश त्याच्या विचारात गुंतला होता.

" चल अविनाश... घरी चल , कसला विचार करतो आहेस ? " भार्गवीच्या वडिलांनी त्याला विचारल.

"Expiry date चा विचार करतो आहे."


"काय ? " ,

"आपल्या Birth certificate वर जर आपली Expiry date लिहिली असती तर किती बरं झालं असतं ना. म्हणजे सगळी कामं अगोदरच आटोपता आली असती. कोणत tension मागे राहिलं नसतं. " काका निमूटपणे ऐकत होते. " थांबा काका, दोघांना chocolate घेतो… खूप दिवस त्यांना खाऊ आणून नाही दिला मी." म्हणत त्याने दोघांना chocolate घेतलं.


आदित्य आजही बाहेर बसला होता बाबाची वाट पाहत. जसा अविनाश गेटमधून आत आला,तसा आदित्यने धावत जाऊन त्याला मिठी मारली. दोन दिवसांनी त्याला "त्याचा बाबा" भेटला होता.


" कुठे गेला होतास तू बाबा ? " अविनाशने त्याला उचलून घेतलं. घराच्या दरवाजात दिपाही आनंदाने उड्या मारत होती. खूप दिवसांनी बाबा आज लवकर घरी आला होता. दिपा सुद्धा त्याला जाऊन बिलगली. अविनाशने तिलाही उचलून घेतलं आणि आपल्या घरी आला. भार्गवीला सुद्धा त्या सगळ्यांना एकत्र पाहून आनंद झाला. थोडावेळ अविच्या तब्येतीची चौकशी करून ती निघून गेली. मग अविनाश जेवणाच्या तयारीला लागला. छानपैकी त्याने दोघांच्या आवडीचे जेवण केला होता आज. स्वतःच्या हाताने त्याने दोघानाही भरवलं. स्वतःही जेवला. दीपाला औषध देऊन स्वतः औषध घेतलं. दीपा झोपून गेली, आदित्यही झोपला होता. अविनाश मात्र बाल्कनीत येऊन बसला होता. झोप येत नव्हती, एवढं सगळं होऊन झोप कशी लागेल ? .

थोडयावेळाने आदित्य बाहेर आला, " काय रे आदी… झोपला होतास ना तू … " ,

" नाही , मला गोष्ट नाही सांगितलीस तू …. मग झोपू कसा ? " त्याच्यामागून दीपा ही आली.

" बाबा …. इकडे का बसलाय ? " ,


" असंच गं दीपा… बसा इकडे तुम्हीपण. " दोघे अविच्या आजूबाजूला बसले. छान हवा होती बाहेर.

थोड्यावेळाने आदित्य बोलला, " कुठे गेला होतास बाबा ? " ,

" काम होतं रे जरां, म्हणून आलो नाही. घाबरलास का तू ? " ,

" मी नाही घाबरलो. दीपाला भीती वाटते ना काळोखाची. मग ती रडत होती रात्रीची… " अविनाशने दीपाच्या डोक्यावरून हात फिरवला. " घाबरायचं नाही हा बाळा आणि रडायचं पण नाही. मी आहे ना . " दीपाला त्याने मांडीवर उचलून घेतलं.

आदित्य पुढे म्हणाला," मला वाटलं तूपण गावाला गेलास… आई सारखा. " अविनाशला कससं झालं." बाबा …. मी कधी होणार मोठा…. आणि मी मोठा झालो कि तूपण मोठा होणार ना अजून. ",


" हो रे …. खूप मोठा हो…चांगला कामाला जा… चांगला हो… मुलं मोठी होतात रे, बाबा कधी मोठा होत नाही. तो तेवढाच राहतो. " ,

" बाबा …. आई कधी येणार ? " इतका वेळ शांत असलेली दीपा बोलली. अविनाश कडे उत्तर नव्हते.

" कुठे आहे आईचा गाव ? " अविनाशने वर पाहिलं. आज अमावस्या होती त्यामुळे बऱ्यापैकी तारे-चांदण्या चमकत होत्या. " ते बघ.…. वरती… ती चांदणी आहे ना तिकडे आहे तुझी आई… रोज बघत असते तुम्हाला." अविने दीपाला सांगितलं,

" मग आपण जाऊया का तिकडे… आईच्या गावाला…. " दीपा म्हणाली.


"जाऊया हा…. … नक्की जाऊया…. सगळे एकत्र जाऊया हा आपण…" अविचे डोळे भरून आले होते.

" बाबा… तुझ्या मांडीवर झोपू का…. खूप दिवस झोपलोच नाही तुझ्या मांडीवर आणि मला गोष्ट पण सांग हा… " आदित्य म्हणाला.

" झोप हा बाळा झोप… " मग दोघेही त्याच्या मांडीवर डोक ठेवून झोपले. आणि अविनाशने गोष्ट सुरु केली. दोघेही काही क्षणात झोपी गेले. पण अविनाश तसाच बसून होता. गोष्ट तर कधीच थांबली होती. डोळ्यातून पाणी येत होता ना त्याच्या . रडत बसला होता तो कधीचा. खूप दिवसाचं साठलेलं पाणी बाहेर येत होतं.


पुढच्या दिवसापासून पुन्हा रुटीन सुरु झालं. दोघांची औषध सुरूच होती. अविनाश जरा बारीक झाला होता. दीपाची काळजी घेण्यासाठी भार्गवी तरी होती. अविनाश कडे कोण बघणार ? त्यात त्याला झालेला आजार. भार्गवीच्या वडिलांनी दिलेलं वचन पाळल होतं. अविने त्यांच्या ऑफिसमध्ये ही सांगितल नव्हते. जॉबच tension कमी झालं नव्हतं. pressure अजून वाढत चाललं होतं. त्यात एकदा अचानक, दीपा शाळेत खेळत असताना तिला दम्याचा attack आला. बेशुद्धच झाली ती शाळेत. अविनाश त्याची मिटिंग तशीच अर्ध्यावर सोडून आला.


दीपाला admit केलं होतं लगेच. अविला सुरेखाचे हॉस्पिटल मधले दिवस आठवले. भार्गवीही होती तिथेच. तिच्या आईने तर नवस केला होता देवाकडे, दीपासाठी. जरा तब्येत बिकट होती दीपाची. सगळ्यांनी मग तिला चांगल्या मोठ्या हॉस्पीटल मध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. लगेच admit केलं तिला. डॉक्टरने तिला चेक केलं आणि एक operation करण्याचा निर्णय घेतला. त्याने ती बरी होणार होती. प्रश्न होता तो पैशाचा. एवढी रक्कम अवि आणि भार्गवीच्या कुटुंबाकडे नव्हती. बँक कडून लोन घ्यायचे झाले तरी त्याला वेळ लागणार होता. परंतु अविनाश च्या ओळखीने लोन भेटलं, ते घर गहाण ठेवून. दुसरा पर्याय नव्हता त्याच्याकडे. दीपाच operation झालं. तरी निदान महिनाभर तिला हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार होतं. पेचप्रसंग, आधीच हॉस्पिटलमध्ये अविनाशला आठवडा झाला होता. त्यात अजून एक महिना. दीपाला सोडून तो ऑफिसला जाऊ शकत नव्हता म्हणजे जॉब गेलाच. आणि झालंही तसंच. नोकरी गेली अविनाशची. अविनाश management ला काही उत्तर देऊ शकत नव्हता. तो तसाच त्याचा resignation letter घेऊन बाहेर आला ऑफिसच्या .


भार्गवीच्या घरी ही बातमी पोहोचली होती. ते काही मदत करू शकत नव्हते. आदित्य भार्गवीकडेच असायचा. कधीतरी तो दीपाला पाहायला जायचा हॉस्पिटलमध्ये. अविनाश रात्रीचा तेवढा घरी यायचा. सकाळी उठून पुन्हा हॉस्पिटलमध्ये दीपाकडे जायचा. आता त्याला ऑफिसला जायचे नव्हते काही. दीपा आता बरी होत होती. किमान २० दिवस तरी ती होती हॉस्पिटलमध्ये. अविनाशची औषध चालू होती. खरं तर त्यालाही admit होण्यास सांगितलं होतं.परंतु तो जर admit झाला तर दोघांचे हाल होतील म्हणून त्याने तो विचार बाजूला ठेवला. दीपाला आता घरी सोडलं होतं, औषध चालूच होती तिची. लवकरात लवकर अविनाशला नवीन जॉब शोधावा लागणार होता. त्याच bank account जवळपास रिकामं झालं होतं. लोनचे पैसे बँकेत भरायचे होते. औषधांचा खर्च, घराचा खर्च यासाठी तरी अविनाशला नवीन जॉब हवा होता.


पण नशीबाला अविनाशच सुख नकोच होतं. बँकचे हप्ते भरायला वेळ लागला. अविकडे पैसेच नव्हते भरायला बँकेत. बँकने घर ताब्यात घेतलं. सुरेखा सोडून गेल्यापासून नशीब अविनाश वर रूसल होत. त्याला ते घर सोडावंच लागलं. भार्गवीला तर आज बाहेरचं यायचा नव्हतं. सगळेच रडत होते. भार्गवीच्या वडिलांनी खूप प्रयन्त केले घर वाचवायचे, परंतु बँकवाले तयारच नव्हते. अविनाशने bag भरल्या आणि त्याने सगळ्यांचा निरोप घेतला. आदित्य आणि दीपा ,भार्गवीला सोडायलाच तयार नव्हते. त्यांना जावेच लागणार होते. एक कुटुंब वेगळं होणार होतं. अविने आदित्य आणि दीपाला गाडीत बसवून सामान भरलं.


" भार्गवी… मी येणार हा भाऊबीजला तुला भेटायला… " अवि म्हणाला आणि …

भार्गवीने त्याला मिठी मारली," काय झालं हे सगळं …. पहिली वहिनी गेली आणि आता तुम्ही सगळे जात आहात." ,

" जावेच लागेल ना… आठवतंय तुला मी बोललो होतो ते, आपलं आयुष्य लोकल ट्रेन असते. आज माझं स्टेशन आलं बहुतेक. चल मी निघतो… " ,

" कुठे रूम घेतलीस तो पत्ता दे मला… आणि दोघांची काळजी घे. नाहीतर दोघांना माझ्याकडे राहू दे. ",


"नको भार्गवी…. खूप मदत केलीस तू… तुझ्या सारखी बहिण सगळ्यांना भेटू दे. तू नसतीस तर मी काहीच करू शकलो नसतो. thanks for everything thing……. " थोडावेळ कोणीच काही बोलले नाही. अविनाश निघाला तेव्हा सगळेच रडत होते.

आता प्रश्न होता तो राहायचा. अविनाशने एक रूम बघितली होती, भाडयाने. रूम बऱ्यापैकी होती, तरीसुद्धा मोठ्या घराची सवय असलेल्या दोघांना ती लहान वाटत होती. अविनाशला लवकरात लवकर नवीन जॉब पाहिजे होता. एक मिळाला जॉब. पगार कमी होता, तरी नवीन रूमचे भाडे, दोघांच्या औषधाचा खर्च,म्हणून तो राहिला जॉबला. खर्च तरीही भागत नव्हता. कसबस घर चालू होतं. पैसेच हातात उरत नव्हते. शाळेचा खर्च होताच. अविनाशची तब्येत खूप खालावली होती दरम्यान. वरचेवर तो आजारी पडायला लागला. त्यामुळे कामावर पुन्हा सुट्ट्या होऊ लागल्या. दोन वेळचे जेवण कठीण होऊन गेले. जास्त खर्च औषधांवर होत होता. आदित्यला ते कळत होतं. बाबाची तब्येत ठीक नसते ते त्याला दिसत होतं. शाळेत असताना काही प्रश्न नव्हता, शाळेतून घरी आले कि ते दोघेच असायचे. आपली आई आता परत येणार नाही हे त्याला कळल होतं. आणि भार्गवी ताई नव्हती आता. त्यामुळे तोच दीपाला सांभाळायचा. तिच्या सोबत खेळायचा,तिचा अभ्यास घ्यायचा. तिचं औषधपाणी करायचा. सगळ करायचा. अविनाशने त्याला औषधाचे दुकान दाखवून ठेवलं होतं, कधी काही गरज लागली तर. आदित्य रात्री जेवताना अर्धच जेवायचं. कारण बाबा आपल्यासाठी उपाशी राहतो हे त्याला माहित होतं. आपण कमी जेवलो तर बाबाला जेवायला मिळेल म्हणून उगाचच पोट भरलं म्हणून सांगायचा.


अविनाशला आता कळून चुकलं होतं कि आपली last stage चालू झाली आहे. अगदी बारीक झाला होता तो. सारखा आजारी राहायचा. थोडे दिवस तो जायचा ऑफिसला, आजार अंगावर काढून. नंतर त्याला घरातून बाहेर पडणं अशक्य होऊ लागलं. त्या दोघांना कोण शाळेत घेऊन जाणार मग. त्या दोघांची शाळा सुटली तेव्हापासून. अविनाशचा जॉब गेला दरम्यान. औषध आणायला तेवढा बाहेर पडायचा घराच्या. घरातले पैसे संपत आले होते. काय करावं ते सुचत नव्हतं अविला.


गेल्या दोन दिवसांपासून शहरात वातावरण जरा तंग होते. तोडफोड , दंगली चालू होत्या. अविनाशच औषध संपलं होतं.घरातले कालपासून जेवले नव्हते कोणी. सगळीच दुकाने बंद होती. अविनाशची तब्येत अजून बिघडली. त्यात दीपाचे औषध संपले. आता काहीतरी करायलाच पाहिजे. दोघांनाही औषधाची गरज होती. पण पैशाची कमतरता होती. अविनाशला चालण्याची ताकद नव्हती. तो कालपासून झोपून होता. त्याने आदित्यकडे पैसे दिले आणि दीपाचे औषध आणायला सांगितले.आज सगळी दुकाने उघडली होती.आविनाशने आदित्यला दुकानाचा रस्ता दाखवला होता. तसा आदित्य निघाला. दीपा अविनाशच्या बाजूला बसली होती.

" बाबा…. तुला गोष्ट सांगू का मी….मग तू झोप हा… " दीपा म्हणाली.


" सांग हा बाळा… " दीपाने गोष्ट सुरु केली. तिकडे आदित्य दुकानात पोहोचला. दीपाची औषधे घेतली त्याने. आणि तो घरी येण्यास निघाला.


इतक्यात मागून आवाज आला. " पळा…पळा…" आदित्यला काहीच कळत नव्हते. दंगल पुन्हा सुरु झाली होती. जो तो पळत होता. आदित्य घाबरला. त्याला कळत नव्हते नक्की काय झालं ते. आदित्य पळू लागला. इकडे अविनाशने घरातून बाहेरचा आवाज ऐकला. आदित्य बाहेर होता. पण अविनाशच्या अंगात तेवढी ताकद नव्हती, उठून बाहेर जाण्याची. आदित्य पळत होता. सगळीकडून लोकं सैरावैरा धावत होती. दुकानांवर दगड फेकत होती. तोडफोड चालू झालेली पुन्हा. आदित्य रस्ता पूर्णपणे विसरला होता. परंतु हातातली दीपाची औषधं वाचवण्यासाठी तो पळत होता. अचानक एका दिशेने एक दगड भिरभिरत आला आणि त्याने आदित्यच्या कपाळाचा वेध घेतला. आदित्यचा तोल गेला आणि तो खाली पडला. हातातली औषधं त्याने खाली पडू दिली नव्हती. तो उठून बसला रस्त्यावर. सुन्न झालेला अगदी तो. डोळ्यासमोर अंधार झालेला. कानाने तर काही ऐकूच येत नव्हतं. थोड्यावेळाने तो भानावर आला. कपाळावर मोठी जखम झाली होती त्याच्या. भळाभळा रक्त वाहत होतं. काय करावं सुचेना. अजूनही रस्त्यावर दंगे चालू होते. तो सावरून उभा राहिला. अंगातला शर्ट रक्ताने लाल झाला होता. हातात दीपाची औषधं. घरी तर जायलाच हवं पण रस्ता कुठे ठाऊक होता, हरवलेला तो. डोक्यात प्रचंड वेदना, रक्त अजूनही वाहत होतं. आदित्य मग एखादा आडोसा शोधू लागला. दंगे थांबले कि घरी जाण्यासाठी. थोडासा चालला आणि पुन्हा डोळ्यासमोर अंधार झाला. बाजूलाच असलेल्या झाडाखाली जाऊन तो बसला. कालपासून पोटात काही नाही. अंगातली उरली सुरली ताकद त्याने एकटवली आणि पुन्हा तो उभा राहिला. परंतु तेवढा ताण त्याच्या लहान शरीराला जमला नाही. आदित्य तिथेच खाली बसला , हातातली औषधं घट्ट पकडून.


दीपाला गोष्ट सांगताना दम लागला होता. तिच्याही पोटात काही नव्हते.औषध संपले होते. ती रडू लागली. अविनाशने तिला हातानेच खूण करून बाजूला झोपायला सांगितले. तशी दीपा त्याच्या छातीला बिलगून झोपली. थोडावेळ तिच्या श्वासांची जाणीव अविनाशला होत होती. हळूहळू कमी होत होत ती कायमची बंद झाली अस अविनाशला जाणवलं. अविनाशने तिला हलवलं. दीपा शांत झाली होती. तेव्हाच अविनाशच्या छातीत एक जोरदार कळ आली …

" दिपा…… " अविनाश मोठयाने ओरडला. बाहेर चाललेल्या दंग्यात तो आवाज कोणालाच ऐकू आला नाही.


सुमारे दोन तासांनी शहरातलं वातावरण नॉर्मल झालं. पोलिस आता रस्त्यावर उतरले होते. खूप जणांना पोलिसांनी पकडून नेलं होते. अनेकजण जखमी झाले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवत होते. अजून काही नाही राहिले ना , हे बघत पोलिस, हवालदार सगळीकडे फिरत होते. दोन हवालदार फिरता फिरता त्या झाडाखाली आले.


" अरे बघ…. कोणीतरी बसला आहे इथे…. ",

" कोण रे…… हो… हो… लहान पोरगा दिसतोय… लपला असेल. डोक्यावर केवढी जखम झाली आहे बघ… सगळा शर्ट भरला आहे रक्ताने.",

"ये पोरा… चल, तुला हॉस्पिटल मध्ये नेतो… चल रे " आदित्य अजिबात हालचाल करत नव्हता. तेवढयात एक पोलिसांची गाडी येताना दिसली. तशी त्या दोन हवालदारांनी गाडी थांबवली.

" साहेब…. तिकडे एक लहान मुलगा बसला आहे, बघा जरा. " तसे Inspector उतरले गाडीतून लगेच.

" ये मुला… चल तुला तुझ्या घरी सोडतो, कुठे राहतोस तू…. चल. " काहीच हालचाल नाही. Inspector ने खाली बसून त्याला निरखून पाहिलं," बिचारा…. " ,

"काय झालं साहेब ? " ," त्याने जीव सोडला आहे… उशीर झाला, जखम खूप मोठी झाली आहे, जास्त रक्त गेल्याने बहुदा…. " ,

" साहेब काय करायचं याचं… ? " ,


" थोडावेळ वाट बघा इकडे. त्याचं कोणी येते का शोधत . " म्हणत inspector साहेब निघून गेले.

आदित्यच्या डोक्यावर झालेला आघात खूप मोठा होता. त्याचं लहान शरीर त्याला साथ देऊ शकलं नाही. आदित्यचे प्राण निघून गेले होते कधीच, पण त्याने हातातली दीपाची औषधं खाली पडू दिली नव्हती.

इकडे अविनाश आणि छोटी दीपा एकमेकांना बिलगून झोपलेले होते, चिरनिद्रा. दोघांचे श्वास कधीच थांबलेले होते कायमचे. अविनाशच्या आयुष्याचे स्टेशन आलेलं होते आणि त्या दोन लहान मुलांचेही. तिघे जण आयुष्यरुपी लोकल ट्रेन मधून उतरून गेलेले होते, कदाचित अविनाश सुरेखाला आणि आदित्य, दिपा त्यांच्या आईला शोधायला निघाले होते. अविनाश म्हणाला होता ना कि सगळे एकत्र जाऊ आईच्या गावाला…. तसेच सगळे मिळून निघाले होते शेवटच्या प्रवासाला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy