Mayuri Kadam

Tragedy

3  

Mayuri Kadam

Tragedy

अधूरे प्रेम

अधूरे प्रेम

4 mins
12.1K


"सर , सर...... जरा थांबता का ? काल मी भुजंगप्रयाती वृत्तात एक कविता लिहिलीय. बघता का जमलीय का ते ?"सुनंदा सरांच्या मागे धावत धावत येत म्हणाली.

आनंद सरांनी मागे वळून पाहिलं आणि ते थांबले.

   "हो दाखव बरं !"


कशी ओढ वाटते तु‌झा रे जिव्हाळा,

समुद्र किनारी सजे रानमाळा 


पुकारे तुला रे मनाचा उसासा,

जुने घाव माझे खुले ना जरासा.

  

"जमलीय की! छान आहे". आणखी वृत्ताचे वेगवेगळे

प्रकार आहेत ते ही शिकून घे."सर वही देत म्हणाले.

 "हो सर, अभ्यासाचे तास संपले की,तुम्ही मला वृत्ताचे वेगवेगळे प्रकार शिकवाल का?"

  "हो नक्कीच".

आनंद सरांनी शिकवण्याची हमी दिली आणि त्यांच्या रस्त्याला लागले. सुनंदा आनंदाने तपासलेली कविता घेऊन मैत्रिणींच्या घोळक्याकडे आली ,तेव्हा मैत्रिणी तिची खेचण्यात मग्न होत्या.

 "काय मग ? सरांनी दिली का कविता तपासून ?"

खेचण्याच्या स्वरात अनघा म्हणाली.

  "हो का गं ?" सुनंदा म्हणाली.

"हं.. तुला ते तपासून देतीलच म्हणा".सिद्धी म्हणाली.

"अगं, असं काय करतेस.तुम्हालाही ते वृत्तांत कविता कशी लिहायची ते समजावून सांगतील".

 " नाही .नको आम्हाला नाही वेड कवितेचं.तुलाआणि तुझ्या सरांना आहे ते बास! चेतना म्हणाली.

 "आता तुम्हाला कवितेची आवड नाही त्याला मी काय करणार?" सुनंदा म्हणाली.

काॅलेज संपल्यावर सगळ्या मैत्रिणी हसत खिदळत आपापल्या घरी परतल्या.


    सुनंदा कणकेश्वर गावातील रूबाबदार, श्रीमंत पाटलांची एकुलती एक मुलगी.दिसायला गोरीपान,निळ्या डोळ्यांची, सुंदर आणि त्याच बरोबर अभ्यासात हुशार,मराठी विषयाची कवितेची आवड असणारी पुढे शिकून तिला प्राध्यापक व्हायचे होते.ती वेगवेगळ्या कविता लिहून आनंद सरांकडून तपासून घेई .

    एके सांज वेळी आनंद सर नदीकाठी बसले होते.सुनंदा तिथे आली आणि तिने 'समुदितमुदना' वृत्तातील 'कृष्णराधेय' कविता वाचू लागली.

 

अवचित येता कृष्ण गोविंद राधा बावरि खुले,

 प्रेममयी क्षण अबोल स्पर्श तनातनावर फुले.

    

धुंद पाउस फूलून जाता ओल्या माळा वरी,

एक होऊनी तन मन बरसे ,प्रीतीच्या त्या सरी.


   आनंद सर तिचं सौंदर्य,कविता बोलण्याची लय, त्यातील शब्द पाहून भारावून गेले.ती त्यांना आवडू लागली. कधी कधी ते तीला कॅन्टीन मध्ये मदत करु लागले. हळूहळू ही गोष्ट गावात पसरलीआणि तिच्या वडिलांना म्हणजे रमेश पाटलांना समजली.त्यांनी मुलीचा राग न करता तीला समजून घ्यायचं ठरवलं.आणि दोघांच्याही नकळत सरांच्या आईला भेटून दोघांचं लग्न ठरवलं.आनंद सरांना हे समजताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.एकतर ती त्यांना आवडत होतीच शिवाय त्यांचं तिच्यावर मन जडलं‌ होतं.सुंदर मुलगी,श्रीमंत घराणं पाहून त्यांची आईही आनंदून गेली होती.


      काॅलेजमधे आल्यावर मात्र सुनंदाचे सरांशी भेटणे, मार्गदर्शन घेणे बंद झाले.इतकेच काय तर सर दिसले की, ती त्यांना टाळू लागली.सरांना वाटले लग्न ठरल्यामुळे लाजत असेल. लग्नाचा दिवस उजाडला.सुनंदाच्या दारात गोकर्णीची वेल सजली होती.चाफा, मोगरा, प्राजक्ताचा सुगंध आसमंतात दरवळत होता.खाण्याच्या जिन्नासाच्या वासामुळे जिव्हाग्रे अधिकच खुलली होती.दारात घातलेला मंडप माणसांनी फुलून गेला होता.प्रत्येकजण आपापल्या कामात, गडबडीत होते.सुनंदाच्या मैत्रिणींचं हसणं खिदळणं चालुच होतं.सुनंदा लालचुटुक शालू नेसून सजली होती.मुळातच गोरीपान , निळ्या डोळ्यांची, यौवन सुंदरी अधिकच खुलून दिसत होती.पण त्या डोळ्यांमध्ये आभाळ आल्यासारखं उदासपण जाणवत होतं.जणू काही तिची घुसमट होतेय की काय असं वाटत होतं.

    

लग्न झाल्यानंतर आनंद सर सुनंदाला आपल्या घरी घेवूनआले.मित्रमंडळींच्या चेष्टामस्करीनंतर दोघांनाही सजविलेल्या खोलीत पाठविण्यात आले. पलंग सुवासिक फुलांनी सजला होता.चंद्र, चांदण्या हळूहळू पुढे पुढे प्रवास करीत होत्या.खोलीत काही क्षण निःशब्द शांतता पसरली.मग सरांनीच पुढाकार घेऊन तिच्याजवळ आले.तिच्याशी बोलू लागले."मला वाटलं नव्हतं सुनंदा मार्गदर्शन करता करता आपण दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडू आणि आज हा दिवस येईल". असं म्हणता म्हणता ते तिच्या जवळ येऊन तिला मिठीत घेणार! ईतक्यात ईतका वेळ शांत बसलेली सुनंदा जोराने कडाडली,


"मला मला हात लावू नका, मी तुमची प्रेयसी, बायको होऊ शकत नाही, मी तुम्हाला गुरू मानते,तुम्ही मला गुरूस्थानी आहात,मी तुमची शिष्या आहे."

 "काय ? मग तुझं सतत माझ्या कडे येणं,प्रेमावरील कविता बोलून दाखवणं हे काय होतं?"

  "मला फक्त मार्गदर्शन हवं होतं.माझ्या भावना तुमच्यांशी गुरूच्या आहेत.मला शिकून पुढे खूप मोठं व्हायचं होतं.तुमच्यासारखंच प्राध्यापक व्हायचं होतं तुम्ही माझे आदर्श आहात".


 एखाद्या स्वप्नातून खाड्कन जागं व्हावं तसं सरांचं झालं. सुनंदा पुढे बोलू लागली,

 "माझ्या वडिलांना सांगायचं तर दूरच त्यांच्या समोर उभं रहायचीही माझी हिंमत नाही. ते खूप कडक आहेत.त्यांना सारं गाव घाबरतं,त्यामुळे मी ही त्यांना खूप घाबरते.सर,मला माफ करा.मी तुमची अपराधी आहे.मला माफ करा.मला माफ करा".असं म्हणत विव्हळून रडू लागली.सरांना सुरुवातीला सुनंदाचा ,नियतीचा खूप राग आला नंतर परिस्थितीशी जुळवून घेतलंच पाहिजे या हेतूने ते तीला म्हणाले,

  "रडू नकोस , माझंही चुकलं.मी तुला लग्ना आधी विचारायला हवं होतं.मग आता पुढे काय करायचं?"

  "एकदा लग्न झाल्यावर वडिलांचे दरवाजे मुलीसाठी बंद होतात.ही या गावची रीत आहे.मी पहाट होताच कोणाच्याही नकळत माझं भविष्य शोधायला निघून जाईन.स्वतःची वाट मी स्वतः शोधीन.तुम्ही एखादी चांगली मुलगी बघून लग्न करा".

  "नाही, सुनंदा मी तुझ्यावर खरंखुरं प्रेम केलंय.मी दुसरं लग्न नाही करणार".बोलता बोलता पहाट होताच सुनंदाने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र सरांच्या हातात ठेवलं व

कपड्यांची पेटी घेऊन पहाटेच्या अंधारात भविष्यातील प्रकाश शोधावयास निघून गेली.

  आनंद सर डोळ्यांत आसवे घेऊन आपल्या अधुऱ्या प्रेम कहाणीकडे शांतपणे बघण्याशिवाय काहीच करु शकत नव्हते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy