sneha salunke

Tragedy

3.4  

sneha salunke

Tragedy

अधांतरी

अधांतरी

3 mins
369


कांचन आणि नरेश. एका घरगुती समारंभात दोघांची ओळख होते. पहिल्या नजरेतच नरेश कांचनच्या सौंदर्यावर भाळतो. ज्या घरगुती समारंभात ही दोघं भेटतात, त्याच समारंभात नरेश जगजीत सिंह यांची एक छानशी गझल म्हणतो.


होठों से छू लो तुम मेरा गीत अमर कर दो!


त्याचा आवाज ऐकून कांचन भारावते आणि त्या दिवसापासून ती दोघं एकमेकांकडे आकर्षित होतात. कोणत्या ना कोणत्या कारणाने ती दोघं भेटत असतात. दोघांची कौटुंबिक पार्श्वभूमी एकदम वेगळी! ती जे.जे. स्कूल ऑफ आर्टसची विद्यार्थिनी तर तो लष्करामधला अभियंता. दोघांच्या जातीसुद्धा वेगळ्या असतात. पण म्हणतात ना प्रेम हे धर्म, जात, पात मानत नाही. दिवसामागून दिवस जात असतात आणि नरेशची बदली होते. शहरापासून दूर लांब अज्ञातस्थळी! एवढ्या लवकर लग्न करून संसार थाटणेसुद्धा शक्य नसते. दोघांची वयंसुद्धा लहान असतात. शिवाय नरेशची स्वतःची राहण्याची धड सोयसुद्धा नसते. अशावेळेस अज्ञातस्थळी हिला कुठे ठेवणार? असा सारासार विचार करून नरेश एकटाच बदली झालेल्या ठिकाणी निघून जातो. जायच्या आधी एकमेकांना पत्र लिहिण्याचे, फोन करण्याचे वचन देऊनच दोघं एकमेकांपासून वेगळे होतात.


नरेशला सोडायला कांचन स्टेशनवर जाते आणि साश्रू नयनांनीच त्याचा निरोप घेते. नरेशसुद्धा प्रवासात कांचनचाच विचार करत असतो आणि इथे कांचन रडून रडून लालेलाल झालेली असते. आई-वडिल कांचनला तिच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला सांगतात. कांचनला स्वतःचा व्यवसाय करायचा असतो. एका आठवड्यानंतर ती जरा स्थिरस्थावर होत असतानाच तिला व्यवसाय करण्याची मोठी संधी चालून येते. या संधीचं सोनं करायचं ती ठरवते. मधल्या काळात नरेशचा तिथे सुखरुप पोहोचल्याचा फोन येऊन गेलेला असतो. जायच्या आधी त्याने तिच्या आवडीची गाणी गाऊन, तिला मोबाईलवर पाठवलेली असतात.फोनवर दोघांचा संवाद सुरूच असतो. दोघांनाही एकमेकांची ख्यालीखुशाली कळत असते. कांचन नरेशला सांगते, तिला मोठ्या प्रमाणावर व्यापार करण्याची संधी चालून आली आहे. ती ही संधी स्विकारणार आहे. कधीपासूनचं तिचं स्वप्न पूर्ण होणार असतं आणि तेवढ्याकरता ती परदेशी जाणार असते. खरं तर नरेशला तिचं परदेशी जाणं मान्य नसतं. कांचन आपल्यापासून दुरावेल याची त्याला भीती वाटत असते. पण आता त्याच्या हातात काही नसतं आणि इथेच माशी शिंकते.


एकदम उत्साहात कांचन परदेशप्रवासाच्या तयारीला लागते. तिला आता अस्मान ठेंगणे वाटू लागते. कांचन परदेशी जाते. नरेश एकटा पडतो. आता त्याच्या राहण्याची सोय लष्कराच्या भागांत झालेली असते. असेच दिवस जात असतात आणि एक दिवस नरेशला एका मित्राच्या घरी जेवणाचे आमंत्रण येते. मित्राच्या घरी दार उघडून मित्राची बहीण त्याचे स्वागत करते. अनामिका नाव तिचे. मित्राच्या घरी जेवण झाल्यावर नरेशने गाणे गायल्यावर अनामिका नरेशच्या मनातील भावना चटकन् ओळखते. तशी ती चाणाक्ष असते. शिवाय तिलासुद्धा दारूड्या भावापासून सुटका हवी असते. नरेशसारखा चांगला, हुशार, शिकलेला मुलगा आपल्याला नवरा म्हणून मिळाला तर आपण खूप सुखी होऊ, या विचाराने दुसऱ्या दिवसापासून ती नरेशला भेटण्याचे मनसुबे रचायला लागते. इथे नरेशला एकटेपणा जाणवत असतोच. अनामिका त्याला भावनिकरित्या आधार देऊ लागते. अनामिका आणि नरेश यांची वाढलेली जवळीक मित्रांच्या लक्षात येते. असेच काही महिने जातात आणि कांचन परदेशावरून परत येते व अचानक नरेशला त्याच्या गावाला जाऊन भेट देण्याचे ठरवते. नरेशच्या आवडीचे  पदार्थ आणि भेटवस्तू तिने सोबत घेतलेल्या असतात. नरेशच्या मित्राला कांचनचे येणे माहिती असते. पण तो कांचननेच सांगितल्यामुळे नरेशला काहीच बोलत नाही.


कांचन एकदम नरेशच्या गावी त्याच्या राहत्या घरी पोहोचते. नरेशची स्वच्छ, टापटीप खोली बघून क्षणभर तिला आनंद होतो. भेटवस्तू ठेवण्याकरता ती जागा शोधते. तर तिथल्या टेबलाच्या खणांत तिला नरेशचे अनामिकाबरोबरचे फोटो दिसतात. तरीही ती काही बोलत नाही. नरेश येण्याची वाट बघते. तोपर्यंत नरेशच्या मित्राने तिला नरेश आणि अनामिकेच्या मैत्रीबद्दल सांगितलेलं असतं. तरीही तिला नरेशच्या तोंडून ऐकायचं असतं. रात्री उशिरा नरेश कामावरून घरी परततो. सोबत त्याच्या अनामिका असते. कांचनला असं अचानक आपल्या खोलीत बघून नरेशला आश्चर्याचा धक्काच बसतो. अनामिका गुपचूप निघून जाते. मित्र हळूच काढता पाय घेतो. कांचन क्षणाचीही उसंत न घेता नरेशसमोर त्याचे आणि अनामिकेचे फोटो फेकते व स्पष्टीकरण विचारते. एकंदरीत तिचा पवित्रा बघून नरेश हडबडतो व गप्प बसतो. काय उत्तर द्यावे हे त्याला सूचत नाही आणि तिथेच तो चुकतो. गैरसमजाचे भूत कांचनच्या डोक्यात आधीच शिरलेलं असतं. त्यात नरेशच्या गप्प राहण्याने तिला खात्री पटते. ती तशीच तडक निघते. नरेश तिला फोनवर सतत संपर्क करत असतो. पण ती त्याला संबंध तुटल्याचे सांगते. तिचे फोटो, पत्र त्याच्याकडून परत मागवते. नरेशच्या विनवण्या धुडकावून लावते व घरच्यांना नरेशशी कोणताही संबंध कुणीही ठेवायचा नाही असे स्पष्ट बजावते. मनोमन ती दु:खी झालेली असते. आपण फसवले गेल्याची बोच तिच्या मनाला लागून राहिलेली असते. अशाप्रकारे एका चांगल्या हौशी, कलाकार असलेल्या प्रेमी युगुलाची ताटातूट होते. शेवटी म्हणतात ना निरपेक्ष प्रेमाकडून अपेक्षांचे ओझे बाळगू नये. त्यातून फक्त भ्रमनिरासच होतो आणि पदरी निराशाच येते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy