आईचे माहेरपण
आईचे माहेरपण
माझ्या भावाचे लग्न होऊन ३-४ वर्ष झाली त्याचे तीन मुलं वारली.त्या काळजीने तिची तब्बेत खूपच खालवली होती. त्यात भरीस भर मलाही मुलं नाही अजूनच तिला त्रास..त्यात तिच्या तब्बेतीच्या अनेक तक्रारी शुगर, दम्याचा त्रास सहन करत आहे. माझी आई आत्ता ४२ वर्षाची आहे. मनानेे खूप थकली आहे. पण आपला त्रास कुणाला होऊ नये म्हणून खूूप जपून राहतेे. अगदी साधं खाणं आणि राहणंही तसेच.
मागच्या वर्षी लॉकडाऊनमुुळे तिला यायला जमले नाही म्हणून यंदा ये बोलले त्यात परत कोरोना आहे. माझ्याच तब्बेतीची काळजी करत असते. आयुुष्यभर दीर, नणंद, जावा, सासू यांना एकत्र धरून ठेवण्याची तिची धडपड मी स्वतः पाहिली आहे. तिच्या संसाराच्या काळात नवऱ्याने बायकोची बाजू घेण्याची पद्धत नव्हती. तापट सासू, नणंद, दीर या सर्वांची मर्जी जपण्यात आयुष्य गेले. त्यामुळे स्वतःसाठी जगणंच ह्या बायका विसरून गेल्या आहेत.
आत्ता जरा जास्तच तब्बेत खालावली होती.
पण इकडे एकदा आणावे बोलते आणि इकडे आल्यावर सगळे आवडीचेच आणि मनासारखे करायचे ठरवले. तिला खाण्यापिण्यापेक्षा मनसोक्त गप्पा मारायच्या आहेत. फोनवर कुठे एवढं बोलायला मिळतं... मलाही तिच्याशी फार बोलायचं आहे अगदी तिच्या लग्नापासून माझ्या लग्नापर्यंत, माझे वडिल कॅनाल इंस्पेक्टर. पण त्यांनीही तिला कधी विचारलं नाही, काय हवंय तुला? सारोळे थडी तिचं माहेर. तिथल्या कथा मामा, कमल मावशी, सरला
मावशी, शोभा मावशी, अलका मावशी लग्नापासून ते मामाच्या मुलंं झाल्यापर्यंत मावशीचं रहाणं आत्या-काकाचे किस्से किती बोलू नि किती नाही असं झालंय तिला.
तेच तेेच किस्से मी ही मन लावून ऐकताना मी त्या त्या गावी मनानं फिरून येते. जेवताना काय करू गं विचारलं, काहीही कर मला चालतंय सर्व बोलते. पण मी हळूच तिच्या आवडीचे पदार्थ बनवेन. मु्ळ्याची भाजी, अंबाड्याची भाजी, मटण केलंं की चवीनं घासभर भाकर जास्त खाईन. साध्या साध्या आवडी मी जपेन. फार हळवी आहे माझी आई. लगेच डोळे भरून येतात. फोनवर नको गं धरपड करुस सदा सांगत असते तुला बरं आहे की नाही
बाळ विचारते. काल बोलता बोलता मन भरून आले. आतापर्यंत भोगलेेेल सुखाचं माहेर आठवते.
वयाच्या ४२ व्या वर्षांपर्यंत आम्हाला तिनं मनासारखं खाऊ घातलेलं आठवतं. पाय पसरून बसून आयता चहाचा कप हातात देणारी आई आठवती. तिच्या कष्टाचं मोल करता येणार नाही. पण आत्ता तिच्या चेहऱ्यावरचं हसू बघून मन तृप्त होईल. तिने आयुुष्यभर माहेरपण केलं. आता मला ही वेळ येऊ दे तिला सुख देण्याची... समाधानी देेण्याची...
तिचीच शिकवण तिच्याच ओंजळीत घालताना माझं मन मात्र सुखानं काठोकाठ भरून वाहील.
येशील ना गं आई... तुझ्या लेकीकडे माहेरपणाला...
