माझी शाळा
माझी शाळा


रंगीबिरंगी तक्त्यांचा वर्ग आणि, काळ्या रंगाचा फळा,
आजही मनात ओलावा येतो, जेव्हा आठवते मला माझी शाळा।।
सुट्ट्या संपायला आल्या की, शाळेच्या तयारीची सुरू व्हायची लगबग,
वह्या, पुस्तके, कंपास, कपडे घेताना, व्हायची साऱ्यांची दगदग
दप्तराचं ओझं घेऊन शाळेत जाताना, पाठीत यायच्या कळा
आजही मनात ओलावा येतो, जेव्हा आठवते मला माझी शाळा ।।1।।
शाळा सुरू होताच प्रार्थनेसाठी, उंचीनुसार लागायच्या रांगा
केस-नखं वाढली, शर्टींग नाही केली म्हणून, पिटीचे मास्तर घालायचे वांदा
वेळूची छडी जेव्हा हातांवर पडायची, तेव्हा डोळ्यातून निघायच्या धारा
आजही मनात ओलावा येतो, जेव्हा आठवते मला माझी शाळा ।।2।।
प्रयत्नांची पराकाष्ठा करून पूर्ण शाळेत मिरायचो, घेऊन हरिश्चंद्राचे रूप
>
गुणतालिकेच्या शेवटच्या पानावर सापडायचा, आमचा सभ्य ग्रुप
भूगोलाचे सर नेहमी ओरडायचे, बंद करा रे बाबांनो तुमचा चाळा
आजही मनात ओलावा येतो जेव्हा, आठवते मला माझी शाळा ।।3।।
डॅशिंगपणा आपल्या रक्तात होता, पण मुलींबाबत होतो थोडा लाजरा
मित्र प्रेमाने मला "बैल" म्हणायचे, रोज बैलपोळा व्हायचा साजरा
दीक्षितांची मधुरा तशी सुंदरच होती, तिच्या दोन्ही गालावर पडायच्या खळा
आजही मनात ओलावा येतो, जेव्हा आठवते मला माझी शाळा ।।4।।
शाळा कॉलेज संपले आता रोज ओढतोय मी प्रपंचाचा गाडा
जीवनाच्या चक्रव्यूहात इतका अटकलोय की रोज पडताय हृदयात तडा
परवा डोळ्यांतून अश्रूंची धार लागली जेव्हा कळले, शाळेच्या मित्राच्या फोटोवर लागल्या माळा
आजही मनात ओलावा येतो जेव्हा आठवते मला माझी शाळा ।।5।।