Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

rutuja dhore

Others Inspirational

2.5  

rutuja dhore

Others Inspirational

स्वप्नाच्या निमित्ताने

स्वप्नाच्या निमित्ताने

10 mins
1.0K


“नमस्कार!

आज या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला तुम्हा सर्वांचं एवढ्या संख्येने इथे उपस्थित असणं हीच मला माझ्या थोड्याफार केलेल्या कामाची पावती वाटते. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि देवाच्या व आई-वडिलांच्या आशीर्वादामुळेच मी आज इथवर पोहोचली आहे. पण ‘हा’ ह्या प्रवासाचा मुक्काम किवा शेवट नक्कीच नाही. तुमचे आशीर्वाद, शुभेच्छा अर्थातच तुमची साथ जर अशीच मिळाली तर या देशासाठी, समाजासाठी वैद्यकीय क्षेत्रात राहून मला व माझ्या डॉक्टर टीमला खूप काही करता येईल. अगदी थोड्या पैश्यात कोणतीही शस्त्रक्रिया शक्य असणाऱ्या या ‘जीवनदान’ मल्टी स्पेशालीस्ट रुग्णालयाने गरीबाला जगण्याची एक नवी आशा, उमेद आणि ऊर्जा द्यावी हाच माझा मानस आहे...


”डॉ. मीरा एकदम थांबल्या, दीर्घ श्वास घेऊन म्हणाल्या -


“मला आजवर अनेक प्रश्न विचारले गेलेत-शहरात एवढ्या संधी असल्यावरसुद्धा मी ग्रामीण भागात जाऊन सेवा द्यायचं का ठरवलं? किंवा माझ्या कामामागचा प्रेरणास्त्रोत काय आहे? आज पहिल्यांदाच ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला या रुग्णालयाचं स्वप्न-एक ‘जॉईंट-स्वप्न’ साकार झालं या निमित्ताने द्यावीशी वाटतात. हे रुग्णालय होणे, ही श्रींची इच्छा जरी असली तरी ती प्रथम... ’मानस’ ची इच्छा होती. ”डोळ्यांकाठी नकळत आलेले ते आसवांचे थेंब हळूच करंगळीने पुसत डॉ. मीरा नाईक पुढे बोलू लागल्या.


“बारावीनंतर ‘पालकांसाठी’ मी पुण्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. माझी आणि मानसची पहिली भेट - आठवून हसू आल्याशिवाय राहत नाही. कॉलेजचा तो पहिलावहिला आठवडा, आजही तसाच स्वच्छ लखलखीत आठवतो. तीन-चार दिवस झाले असले तरी सगळं नवीननवीनच होतं. त्या दिवशी मला उठायला थोडा उशीर झाला आणि आठच्या क्लासला जाण्यासाठी, निघायलाच मी चांगलीच पाच मिनिटं लेट झाले. तो तास होता देशमुख सरांचा. सर अत्यंत कडक शिस्तीचे. त्यांच्या वर्गात दोन मिनिटंही उशीर ते खपवून घ्यायचे नाहीत. धावतपळतच मी कॉलेज गाठले. वर्गाचा दरवाजा बंद होता. घड्याळात बघितलं तर चांगलेच दहा-बारा मिनिटं उशीर झाला होता. त्या डिजिटल घड्याळातल्या बारा अंकाकडे बघताच माझ्या चेहऱ्यावरही बारा वाजले. ’आज काही आपल्याला हा तास करायला मिळणार नाही’ असा विचार करत मी जड पावलांनी होस्टेलमध्ये जायला परत फिरले. तेवढ्यात एक साधारण उंचीचा, मध्यम बांध्याचा, सावळा पण नाकीडोळी नीट्स असा मुलगा आला आणि तोही त्याच्या जाड्या पट्ट्याच्या घड्याळाकडे बघत - ”अरे यार, झालोच लेट,” असं धापा टाकत म्हणाला.

”सर नाही अलाऊ करणार आपल्याला, चांगलाच उशीर झालाय,” मी त्या मुलाला म्हणाले आणि मागे फिरणार इतक्यात, ”आताही उशीर नाही झाला. आपण आतासुद्धा आत जाऊ शकतो. बट आय विल नीड युअर कोऑपरेशन”

“काय?? तू शुद्धीवर आहेस ना? आत घेणं तर दूर, सर अपमान करतील आपला. त्यापेक्षा...”


“चला खिंड लढवायला,” माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याने हाताला रुमाल बांधला आणि दार वाजवलं. एका पहिल्या बाकावरच्या मुलीने सरांच्या सांगण्यावरून हळूच दार उघडलं.

‘तो’ मुलगा अक्षरशः १५ मिनिटं उशिरा देशमुख सरांच्या वर्गात शिवाजी महाराजांच्या ऐटीत चालून आत गेला. मी सरांचा रागातला चेहरा पाहून जागीच थबकले. आपण एका उपाशी वाघाच्या गुहेत प्रवेश केल्यागत मला वाटलं. मी मनातल्या मनात देवाचा धावा करू लागले. सगळी मुले आम्हा दोघांना आश्चर्य, भीती आणि अभिमान अशा मल्टीपल नजरेने बघत होती. आश्चर्य वाटणं तर साहजिकच होतं. आता सर यांना खातील की गिळतील आशी भीती आणि आम्ही दोघं चांगले १५ मिनिटं उशीर होऊनही वर्गात आलो असता, आमच्या विलाक्ष्याणीय पराक्रमावर अभिमान!


“... आणि मी विचारू शकतो, तुमच्या सो कॉल्ड घड्याळात किती वाजलेत?,” आता सगळ्यांचं लक्ष आमच्या उत्तराकडे. काही मागे बसलेल्या मुलांना परिस्थिती बिकट असली तरी तास खोळंबला याचा अतिशय आनंद होत होता.

“सर आम्ही वेळेतच निघालो होतो यायला...,” तो मुलगा स्पष्टीकरण देऊ लागला.

“मग उशीर कसा झाला? आणि तुम्ही आत येण्याची हिम्मतच कशी केली?” एव्हाना सरांचा स्वर खूप चढला होता.

“सर मी हिचा जीव वाचवला. झालं असं की मी येत असताना मी हिला फोनमध्ये बघत चालत असतांना बघितलं. कॉलेजच्या बिल्डिंगच्या समोर एक गाय हिच्या आडवी येत होती.” थोडी विश्रांती घेत,”किंबहुना ही त्या गायीच्या आडवी येत होती.” सगळा वर्ग हसायला लागला

“...आणि ह्या तर फोनमध्ये इतक्या गुंग की यांचं लक्षच नव्हतं. मी ह्या दोघींच्या आडवा गेलो आणि हिचा जीव वाचवला. त्याच गडबडीत पडल्यामुळे हे लागलं.” हातावरच्या पट्टीकडे आणि माझ्याकडे आळीपाळीने पाहत त्याने सरांना उत्तर दिले. मी हे त्याचं स्वकथित पुराण ऐकून जागीच स्तब्ध. काय बोलावं काय करावं सुचेना.

“काय तुम्हा आजकालच्या पिढीचं. ते छोटंसं डबड तुमचं जीवनच झालंय जणू. एक लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच.”

मग माझ्याकडे पाहून - ”जरा रस्त्यावर तरी त्या खेळण्याला एकट सोडावं. किती त्याचं व्यसन? हा होता म्हणून, नाहीतर केवढ्याला पडलं असतं ते आपल्याला.” मी चूक नसतानाही मान खाली घालून उभी राहिले.

”चलो, नो मोअर टाईमपास, बसा तुम्ही दोघं आणि तू, पुढल्यावेळी लक्ष ठेव. जिवापेक्षा काहीही महत्वाचं नाही.” असं म्हणत सरांनी पुढे शिकवणं सुरु केलं. आम्ही दोघंही जाऊन बसलो.


तास झाल्यावर मी तो जिथे बसला होता तिथे गेले. त्याचा एक मित्र त्याने केलेल्या धाडसाबद्दल एकंदरीत त्याच्या बुद्धीचातुर्याबद्दल त्याचं कौतुक करत होता. त्याने मला शेजारी उभं असलेलं बघितलं.

”इट्स ओके. धन्यवाद म्हणायची काही गरज नाही. मी जुगाड करण्यात तरबेज आहे.”

“ओ हेल्लो. मी का तुला धन्यवाद म्हणू. उलट तूच मला सॉरी म्हणायला पाहिजेस. तू मला न विचारता असं काहीही कसं काय सांगू शकतो? तू तर हिरो बनला पण माझा किती अपमान झाला सगळ्यांसमोर. त्याचं तुला काही नाही.” मी जे मनात येईल ते बोलत सुटले.

“पण ते जर केलं नसतं तर आज आपल्याला ह्या महत्वाच्या तासाला मुकावं लागलं असतं. त्या वेळी मला जे सुचलं तेच मी केलं. मिस...”

“मीरा,” मी म्हणाले.

“तरीही तुला तुझंच बरोबर वाटतंय?”

”तुम्ही जर माझ्या जागी असता तर तुम्हाला कळलं असत मिस्टर...”

“मानस”

”हे बघ खरंच तुला वाईट वाटलं असेल तर मी माफी मागतो तुझी. आय एम सॉरी.”

ह्या माफीची मी कल्पनाच केली नव्हती. मला वाटलं हा मुलगा अजून भांडेल कारण भांडण्यात मी पटाइत होते. झालं उलटंच. काय बोलावं हे न सुचल्यामुळे मी काही न बोलता तिथून काढता पाय घेतला.

कॉरिडोरपर्यंत चकित झालेली मी स्वतःशीच विचार करू लागले, ‘खरंच एवढं झालं होतं की मी त्याला जाऊन इतकं बोलले. जास्त कोणी मला कॉलेजमध्ये ओळखत पण नाही. मग अनोळखी लोकांसमोर झालेली अवहेलना मला एवढी का लागायला पाहिजे? तसं पाहिलं तर त्याच्यामुळे आजचा तास माझ्या हाती लागला. वरून त्याने किती शांतपणे माफी मागितली. आता उलट मलाच त्याची माफी मागायला हवी.’ तशीच कॉरिडोरमधून वर्गात परतले. मानस तिथेच होता.

”मला वाटतं की मी जरा जास्तच बोलले तुला. हो, थोडंसं वाईट वाटलं मला पण त्यामुळेच क्लास अटेन्ड करता आला. सो इट्स ओके”

थोडं थांबून मी विचारलं,“फ्रेंड्स मग?”

“मगाशी ज्या रागात तू ते बोलून गेली, मी तर बाबा घाबरलोच होतो. आताही शॉकमध्येच होतो. वाटलं माहित नाही या नव्या चिडक्या ‘मैत्रिणीची’ कशी समजूत काढावी लागेल”

बोलता बोलताच त्याने मला मैत्रीण म्हटलं आणि सगळेच हसू लागले. मग तिथेच बसून असलेले, आमच्या भांडणाचे साक्षी असलेले प्रशांत, सूरज आणि राधिका यांच्याशीदेखील माझी मैत्री झाली. त्या दिवशी दोन गोष्टी घडल्या, एक - माझी भेट मानसशी झाली आणि दुसरी - मी वर्गात ‘मोबाईलवाली गाय’ या नावाने ओळखू जाऊ लागले.

 

त्या दिवशीची मीरा आणि आजची मीरा...यात जमीन आसमानाचा, कदाचित त्याहूनही जास्त फरक असेल. मानस नसता तर आज मीरा कोणी दुसरीच असती, एखाद्या हॉस्पिटलमध्ये काम करणारी एक साधारण डॉक्टर असती नाहीतर अजून कुणी. जुनी मीरा एकप्रकारे बिघडलेली - बेजबाबदार, ध्येयशून्य,थोडीफार न्यूनगंडाच्या कोशात अडकलेली, भरकटलेली, कशाचाच ताण न घेणारी, मनसोक्त भांडणारी!’ जे जसं सुरु आहे तसं सुरु राहू द्या’ अशी वेगळ्या प्रकारच्या बिन्धास्त प्रवृत्तीची. कधी चुकून भविष्याबद्दल विचार केलाच तर दिसे नुसता अंधार! त्या मीराला भविष्याची मुळी चिंता करायचीच नव्हती. बारावीला उत्तम गुण मिळाल्याने नातेवाईकांच्या, शिक्षकांच्या सल्ल्याने आई-बाबांनी तिला अर्थातच मला एमबीबीएसला टाकले. पुढे आयुष्यात काय करायचं, काय बनायचं अशाप्रकारच्या स्वप्नांनी तिला कधीच स्पर्श केला नाही. कॉलेजमध्ये आल्यावर काही नाही तर निदान थोडाफार अभ्यास करून डॉक्टर तर बनूनच जाईल मी, अशी तिची विचारधारा.


“आज मी जे काही आहे ती मानसमुळेच, त्याच्या विचारांमुळेच. त्याने मला अंधाराच्या गर्तेतून बाहेर काढलं, निराशेकडून आशेकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेलं, बेजबाबदारपणा झटकून जबाबदारी घ्यायला शिकवलं. जसाजसा सहवास वाढत गेला, तसतसं मी त्याच्या विचारांना, एकंदरीत आयुष्याला समजून घेऊ लागले. त्या प्रवासात मला ‘मी’ गवसले. माझ्यातल्या क्षमतांची मला जाणीव होत गेली. त्या दरम्यान मीही स्वप्नं बघू लागले. ह्या आमूलाग्र बदलाची सुरुवात देवाच्या साक्षीने झाली! कॉलेजमध्ये आमचा ४-५ लोकांचा ग्रुप होता.सुट्टीच्या दिवशी रूमवर शीण आल्यावर आम्ही जवळच्या गणपतीच्या देवळात जाऊन बसायचो, वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायचो, कधीकधी नुसतीच तिथली अध्यात्मिक शांतता अनुभवायचो आणि प्रसन्न मनाने पुढील दिवसाची सुरुवात करायचो. त्या रविवारी, बाकी लोकं प्रोजेक्टच्या कामात व्यस्त होते, आमचं काम आधीच संपल्यामुळे मी आणि मानस आम्ही दोघांनीच मंदिरात जाण्याचं ठरवलं. ती संध्याकाळ माझ्या जीवनात एक नवीन पहाट घेऊन आली. आसमंती तांबडा रंग, घरट्यात परतणाऱ्या पक्षांचा किलबिलाट, मंद आणि मधुर गतीने होणारा गाभाऱ्यातला घंटानाद... अशा वातावरणात आम्ही दोघंही दर्शन घेऊन बाहेरच्या वडाच्या पारावर बसलो. अभ्यासाच्या, कॉलेजच्या इतर गोष्टी सुरु होत्या. पण आज मीच जास्त बोलत होते. मानस फक्त अधूनमधून हम्म, हो एवढंच म्हणत होता. मानसची ही गंभीर प्रतिमा त्याच्या नेहमीच्या खोडकर, हसऱ्या प्रतिमेपेक्षा वेगळी होती. माझ्याकडच्या गोष्टी संपल्या आणि तिथे उरली फक्त एक विचित्र नीरव शांतता.

त्या अवघडणाऱ्या अवस्थेतून सुटका करण्यासाठी मीच पुढाकार घेतला, ”का रे काय झालं?” त्या दिवशी मानसने तो, त्याची घरची परिस्थिती, त्याचे विचार, स्वप्नं - त्याचं पूर्ण जीवन उघडलेल्या पुस्तकासारखं माझ्यासमोर ठेवलं. मानसला वडील नव्हते. ते आधी छोट्या पदावर नोकरी करत. ते कुठल्यातरी दीर्घ आजाराने (ज्याचं नावही माहित नाही) पैशांअभावी, मानस १५ वर्षांचा असतांना वारले. सर्व जबाबदारी एकट्या आईवर येऊन पडली. त्याच्या आईने शिकवणी घेऊन, शिवणकाम करून, बरेच लघुउद्योग करून मानसला व त्याच्या छोट्या बहिणीला लहानाचं मोठं केलं आणि शिकवलं. स्वतः निखाऱ्यावरून चालत मुलांना योग्य दिशा दाखवली पण कधीच त्याची झळ त्यांना लागू दिली नाही. मानसला त्याच्या हलाखीच्या परिस्थितीची जाणीव होती कारण कष्टाचे दिवस तो आधीपासूनच बघत आला होता म्हणून त्याने वयाच्या १५ व्या वर्षीच मोठा डॉक्टर होण्याचं व नंतर गोरगरिबांना मोफत सेवा देण्याचं ध्येय मनाशी बाळगलं. आपल्या बाबांबरोबर जे झालं ते कुणासोबतही होऊ नये अशी त्याची आकांक्षा! 


हे सगळं ऐकताच माझ्या काळजात लक्कं झालं. आपण किती भाग्यवान आहोत हे मला त्यातून उमगलं आणि ते मी बोलून पण दाखवलं. ”बापरे! किती लहान वयापासून तुझ्यावर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. मी त्या मानाने खूप लकी आहे. कुठलंच दडपण नाही, ध्येय नाही, स्वप्नं नाही, जबाबदारी नाही....”

हे माझे वाक्य ऐकून न राहवून तो म्हणाला - “मीरा, आज मुद्दामच बोलतो. तुझ्या काळजीपोटी बोलतोय असं समज. प्लीज मला चुकीचं समजू नकोस. जीवनात ध्येय असणं खूप गरजेचं असतं. अगं. त्याशिवाय माणसाच्या आयुष्याला, जगण्याला काही अर्थ नाही. कदाचित स्वप्न बघायला तू घाबरत असशील - ते पूर्ण होईल की नाही, तुझ्यात त्याला पूर्ण करण्याची क्षमता आहे की नाही, एका प्रकारे त्याचं दडपणच. पण स्वतःच्या अनुभवावरून मी हे नक्की सांगू शकतो की माणसाने एखादी गोष्ट साध्य करायची ठरवली आणि अथक परिश्रमाने त्याचा पाठपुरावा केला तर त्याला निशित यश मिळते. तो प्रवास खूप सोपा मुळीच नाही पण सुखकर असतो. जागोजागी आपल्याला आपण नव्याने सापडतो. वेगवेगळे अनुभव येतात. कधी चुकतोही, नापासही होतो, पण ध्येयापर्यंत पोहोचण्याची ती उत्कट इच्छाच आपल्याला सावरते आणि नव्याने सुरुवात करण्याची ताकद देते.


आज मी मागे वळून बघितलं तर मला दुःखाशिवाय काहीच दिसणार नाही. पण जर दृष्टीकोन बदलला तर मला त्या माझ्या परिस्थितीने जबाबदारी, समंजसपणा, काटकसर, वक्तशीरपणा दिला. स्वप्न बघण्याची ताकद आणि ते पूर्ण करण्याची क्षमता आणि विश्वाससुद्धा दिला. माझं निःशुल्क रुग्णालय बांधण्याचं जसं स्वप्न आहे तसंच तुझंही एक असावं असं मला वाटतं. ते तू शोध आणि बघ तुला नव्याने जगण्याचा आनंद येतो की नाही. आई-बाबा म्हणतात म्हणून डॉक्टर नको बनू, लोकांची सेवा करण्यासाठी किंवा इतर कोणत्या भल्या कारणासाठी बन...”

त्या दिवशी तो बोलत राहिला, मी ऐकत राहिले. मानसची गंभीरता म्हणा किंवा वातावरणातली, त्याचा शब्दनशब्द मी मनात साठवून घेतलाआणि माझ्या खऱ्या बौद्धिक विकासाला सुरुवात झाली.


दिवसागणिक माझ्यात प्रगल्भता आली. आई-वडिलांनाही तो बदल जाणवला. छोट्या-छोट्या जबाबदाऱ्या घेऊ लागले. अभ्यासातही परिश्रम करू लागले. एकंदरित खूप सीरियस झाले. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. मानस होताच अडीअडचणीत मार्गदर्शन करायला. अधूनमधून त्याच्या वैचारिक खाद्याची गरज पडायची. त्याची परिस्थिती त्याच्या अभ्यासासाठी कधीच बाधक ठरली नाही. तो नेहमी पहिल्या तीनमध्ये राहायचा. मीही ते बघून हळूहळू वर येऊ लागले. कधीकधी कमी गुण आल्यामुळे मी कांगावा करायचे तर तो नेहमी म्हणायचा - ‘फक्त कष्ट महत्वाचे न ठरता, कोणत्या प्रकारचे कष्ट झाले यावर यश अवलंबून असते. ’त्याच्या सांगितलेल्या छोट्या-छोट्या गोष्टींनी खूप प्रेरणा आणि ऊर्जा मिळे.

मानसच्या छात्रछायेखाली मी जीवनाचे नवे धडे गिरवले. असं म्हणतात आपल्या जीवनातल आलेला प्रत्येक माणूस हा काही न काही करणासाठी आपल्या जीवनात येतो. त्याची मला प्रचिती आली. त्याने मला ‘मी’ शोधण्यासाठी प्रेरित केले. आज माझं काम जर एक विशाल वृक्ष असेल तर त्याचं बीज मानसने पेरलेलं आहे आणि त्याची मुळे हे त्याचे विचार आहेत.”

भानावर येत डॉक्टरने सभोवार नजर टाकली. सगळे स्तब्ध होऊन त्यांना ऐकत होते. बाजूला ठेवलेलं पाणी पीत आणि डोळ्यातील आसवे पुसत त्या म्हणाल्या -

“आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझ्या आयुष्याची व्याख्या बदलवणारे डॉ. मानस सध्या आहेत तरी कुठे? आम्ही चांगल्या प्रकारे एमबीबीएस झालो. तोपर्यंत त्याचं स्वप्न ते आमच्या ग्रुपच जॉईंट-स्वप्न बनलं होतं. पण नियतीला हे सहज साधं मंजूर नव्हतं. एका अपघातात डॉ. मानसचे दोन्ही डोळे गेले. तरी तो धैर्याचा महामेरू खचला नाही, जिद्दीने सगळी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी हिम्मत त्याने परत गोळा केली, काही नवी स्वप्ने पाहिली. मंडळी! ह्या माझ्या त्यावेळी निरर्थक वाटणाऱ्या जीवनाला दिशा देणारे डॉ. मानस आज इथे आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित आहेत.”

त्यानंतर डॉ. मीरा आणि त्यांचे यजमान डॉ. आरव मंचाखाली उतरून सभागृहाच्या पहिल्याच रांगेत बसलेल्या एका इसमाला उठवत वर घेऊन आले. संपूर्ण गर्दी त्यांच्याकडे अतीव आदराने बघत होती, निरखत होती आणि काही वेळेच्या स्मशान शांततेनंतर सभागृहात प्रचंड टाळ्यांचा कडकडाट!

तेही त्यांच्या मैत्रिणीने साकार केलेल्या त्यांच्या स्वप्नाला मिळालेलं कौतुक बघत होते -आत्म्याच्या नजरेतून!


Rate this content
Log in