Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Smita Joglekar

Tragedy


0.4  

Smita Joglekar

Tragedy


वन वे ट्राफिक

वन वे ट्राफिक

9 mins 852 9 mins 852

  तोच रोजचा प्लॅटफॉर्म . तीच गर्दी , तोच घामाचा दर्प आणि तेच बिनचेहेऱ्याचे मानवीदेह. हवा हि तीच आणि फिरणारं चक्र सुद्धा तेच.

धोपट्याचे दोन्ही बंद एकाच खांद्यावर अडकवलेला तो म्हणजेच मिस्टर क्ष अवतरतो. नेहमीचाच पायऱ्यांचा जिना एकजीवाने सरकणाऱ्या एकसंध गर्दीमुळे जणू सरकता जिना बनून जातो . क्ष या गर्दीतला एक ठिपका होऊन गर्दीसोबत घरंगळत खाली येतो . अगदी रहाटाच्या चक्राप्रमाणे तो येतो . सवयीनं रोजच्या ठिकाणी थांबतो . ट्रेन येते . इंडिकेटरपेक्षा दोनचार मिनिटं इकडेतिकडे बस . बाकी डोळे झाकून कराव्या अशा कृती टिपिकल चाकरमान्यांच्या .

   लोकल ट्रेन निर्दयी अजगरासारखी स्टेशनमध्ये शिरते . हबकलेली गर्दी आपसूक एकेक पाऊल मागे सरकते , तीही लोंढ्याने . सरसकट माना उजवीकडून डावीकडे सरकत राहतात . एक दोन तीन . अहं अडीच . अडिचावा डबा लेडीजचा ज्यात ती चढते आणि मग त्याच्या पुढच्या अर्ध्या डब्यात क्ष चढतो . रोज . जणू नियमच असल्यागत . क्ष चं स्वतः विणलेलं एक विश्व असतं . त्यात तो असतो आणि ती असते .

     तिची त्याची येण्याची वेळ क्ष ने ऍडजेस्ट करून घेतलीये . क्ष च्या मते ती त्याची असली तरी अजून त्याला तिचं नाव ठाऊक नाहीये . सोय म्हणून क्ष ने मनातल्या मनातलं तिचं नाव सखी ठेवलंय . सखी . आह नाव उच्चारता त्याच्या मनात अनेक व्हायोलिन्स आपोआप सूर छेडू लागतात आणि एक मधुर सिम्फनी झरू लागते . ती त्याला पहिल्यांदा दिसली आणि जणू जन्मोजन्मीचं कोणी भेटावं असं त्याला वाटून गेलं . ती भेटल्याला , म्हणजे अजून त्यांची भेट झाली नसली तरी क्ष त्याला भेटणंच म्हणतो . तर तिला प्रथम बघितल्याला , ती अशी इथे दिसू लागल्याला झाले आता सहा आठ महिने . सरणारा प्रत्येक दिवस क्ष साठी उत्कंठेचा प्रतिक्षेचा असतो .

        हल्ली तो तिच्या येण्याची वाट बघू लागलाय . ती आली कि वारा वाहत नसला तरी जणू एक सुगंधी झुळूक क्षच्या अंगावरून झुळकत जाते तो डोळे मिटून या झुळुकीत दरवळत राहतो .मोठ्ठा श्वास घेऊन जणू तो दरवळ मनात भरून घेतो . डोळे उघडतो आसपासची गर्दी अंधुक करून टाकतो आणि सखीला डोळ्यांनी पिऊन घेण्यासाठी पंचप्राण एकवटून टाकतो . तिला या कशाचाच पत्ता नसतो , नाजुकशी ती स्वतःमध्ये गुरफटलेली असते .सखीकडे छोट्या छोट्या ठिपक्यांची एक काळीपांढरी ओढणी आहे . सखी कधी नक्षीचे जॅकेट घालते . पण बहुदा दुसरी एक ओढणी तिची खूप जास्त फेव्हरिट असावी . हलक्या फुलक्या सरमिसळ रंगाच्या फुलाफुलांची ती ओढणी सखी बऱ्याच ड्रेसवर मिक्स अँड मॅच करून घालते , हि ओढणी क्षला सुद्धा खूपखूप आवडते . कदाचित सखीला ती आवडते असा त्याचा ग्रह झाल्यामुळे असेल पण त्यालाही हि ओढणी भलतीच आवडू लागलीये . ज्या दिवशी सखी या ओढणीत दिसते त्या दिवशी क्ष विशेषच खुशीत येतो . सखी तिच्या निमुळत्या फोनवर आपली तशीच निमुळती गोरीपान लांबसडक बोटं फिरवत राहते आणि क्ष खुळावल्यागत त्या सरसरणाऱ्या बोटांकडे आणि त्या सोबत लुकलुकणाऱ्या तिच्या डोळ्यांकडे मंत्रमुग्ध बघत राहतो . कधी ती फोनवर बोलत बोलत मान तिरपी करून ओढणीचं टोक चुरगळत राहते . आणि क्ष च्या काळजाचं पाणी होतं . सिनेमाच्या गाण्यांमध्ये म्हणतात तसं तो स्वतःला त्या ओढणीचं ते चुरगळलं जाणारं टोक करून टाकतो . हा सिलसिला सखीची ट्रेन येऊन ती गर्दीसोबत ट्रेनमध्ये लोटली जाईपर्यंत चालतो ,

   पॉलीशवाला मुलगा तोंडाने स्सsssस्स sss आवाज करत , आपल्या हातातला ब्रश लाकडी फळकुटावर खाडखाड आपटतो . या परिसरातले कुत्रे सुद्धा आता क्षच्या परिचयाचे झाले आहेत , सखी येईपर्यंत क्ष या कुत्र्यांच्या लकबींचा अभ्यास करत बसतो .त्यातल्या कोणाची कोणाशी दोस्ती आहे आणि कोणाशी वैर हेही आता क्षला माहित झालंय .  तिथेच कँटीन शेजारी एक भिकारीण बसते . भिकारीण तिच्या एवढ्याश्या पोराच्या पोटात बोटं खुपसुन त्याला गुदगुल्या करते आणि ते पोर खिंकाळल्यासारखं हसत सुटतं , पोराचा घट्ट शेंबूड थेट त्याच्या ओठांना टेकतो पण त्यामुळे त्यांचा गुदगुल्यांच्या आनंदावर कोणताही परिणाम होत नाही .पोराचं खिदळणं बघून क्ष पण खुश होतो . पण पॉलिशवाला मात्र खुश नसतो . खुश होणं हा सुद्धा स्वभाव आहे किंवा कला आहे म्हणा ना . त्याच्या आणि गिर्हाईकांच्या मध्ये क्ष येतोय म्हणून पॉलीशवाला क्ष वर खेकसतो , क्ष सरकल्यासारखं करतो .

      आता त्याची नजर मुख्य गेट ते लेडीज डबा यावर स्थिरावते . वरच्या खबदाडीत कावळ्याने आपलं घरटं विणणं सुरु केलेलं आहे . त्यांचा विणीचा सिझन जवळ आल्याची नोंद क्ष मनातल्या मनात घेतो . मागच्या बाजूला बसणारी गजरेवाली दुनियेशी काही देणंघेणं नसल्यागत निर्विकार चेहऱ्याने गर्रगर्र फिरवत गजरे गुंफत राहते वास्तविक अहोरात्र सुगंधाच्या सान्निध्यात असूनही ती निर्विकार असते . क्ष मात्र फक्त सखीच्या विचारात गुंतलेला असतो .सुंगंधीत झालेला . संगीतात चिंब बुडालेला .

   क्ष च्या मनातल्या इमल्यांवर रोज नवे मजले चढत राहतात . तिच्याशी ओळख वाढली कि क्ष तिला मस्त सुगंधी गजरा घेऊन देणार असतो . तिचे केस फार लांब नसले तरी रोज तो तिच्या त्या बुटुकभर केसात गजरा माळणार असतो . कोणी गावंढळ किंवा मागासलेला म्हंटल तरी त्याला त्याची पर्वा नसते .क्षच्या घरच्यांनी भुणभुण लावलीये लग्न कर म्हणून . आधी , म्हणजे सखी भेटण्यापूर्वी पर्यंत तो या कटकटीला वैतागायचा , घरच्यांशी फटकून वागायचा , उलट उत्तरं द्यायचा . पण सखीशी एकतर्फी ओळख झाल्यापासून त्याला घरच्यांची भुणभुण हवीहवीशी वाटू लागलीये . आपली म्हातारी आई किंवा नवऱ्याने टाकलेली बहिण भुणभुण करायला विसरल्याच तर हल्ली क्ष स्वतःच बोलण्याचा विषय तिथवर आणून सोडतो . आणि त्यांनी तो विषय काढण्याची वाट बघत बसतो . ते नाही बोलले तर मनातल्या मनात त्यांचे डायलॉग आपणच बोलतो आणि लाजऱ्या चेहऱ्याने त्यांना उत्तरही आपणच देऊन टाकतो , हाही एक चाळाच त्याचा त्यानं स्वतःला लावून घेतलाय .जणू सखी त्याच्या रोमारोमात भिनून गेली असावी . 

 आता लवकरच तिच्याबद्दल घरी सांगून टाकायचं क्ष ने ठरवून टाकलंय . ते कसं सांगायचं याचा तो मनातल्या मनात सरावही करू लागलाय . घरात कोणी नसताना तो आरश्यासमोर उभं राहून आता ते बऱ्यापैकी घोटतोय .

  कोणतीही अनाउन्समेंट न करता त्या दिवशी स्लो ट्रॅक वरून फास्ट गाडी निघाली . गर्दी बेसावध होती . थेट धडधड आवाज आला . वारं जोरात आदळलं आणि ट्रेन धडाडत स्टेशनमध्ये शिरली . डोळ्याचं पातं लवायच्या आत काहीतरी घडलं , गाडी धडधडत आली तशी गेली . एकच गलका झाला " पोरगा पडला पोरगा पडला , पार चिंधड्या झाल्या बघा " क्ष ने फटकन तोंड दुसरीकडे वळवले , त्याला ते दृश्य बघून कळमळून आल्यागत झाले .सगळा लाल चिखल काला झाला . त्याला वाटलं आता आपण गपकन उलटी करणार . तो बाकड्यावर बसला आणि स्वतःच्या हृदयावर घट्ट हात धरून ठेवला . "का करतात लोक आपल्या आयुष्याचं मातेरं !" तो स्वतःशीच पुटपुटला . त्याला जाणवलं त्याचा संपूर्ण देश थरथरत होता .

     रेल्वे कर्मचारी आले आणि ट्रॅकवर पडलेला छिन्नविछिन्न देह रक्तमाखल्या कपड्यात कर्तव्यकठोरपणे गुंडाळून निघून गेले . क्ष दिवसभर अस्वस्थ होता . त्याचं कशातच लक्ष लागेना . अगदी सखी कधी आली कधी गाडीत चढली याकडेही त्याचं कधी नव्हे ते दुर्लक्ष झालं . ते रक्तमाखलं गाठोडं काही केल्या त्याच्या नजरेसमोरून जाई ना . त्याला चालणाऱ्या दोनतीन लोकल आल्या आणि निघून गेल्या .

      दिवस सरले .    

     सखीच्या बाबतीत आणखी एक गोष्ट क्ष ने नोटीस केली होती . क्ष ट्रेनमध्ये चढायचा त्या आधीचं स्टेशन अगदी दोनतीन किलोमीटर अलीकडे होतं . सखी बरेचदा क्ष वाल्या स्टेशनवर चढायची पण कधीकधी ती आदल्या स्टेशनवरून सुद्धा बसून येई ,तिथे गर्दी कमी असे त्यामुळे तिला खिडकी सहज मिळून जाई . मग ती खिडकीत बसलेली दिसे . ती प्लॅटफॉर्म वर दिसली नाही कि क्ष तिच्या अशा या खिडकीतल्या रुपड्याची वाट बघत राही .

        मध्ये बरेच दिवस ती दिसली नाही , क्ष अस्वस्थ . काय झालं असेल , बरं नसेल , ऑफिसमध्ये उशीर होत असेल , गाडी किंवा वेळ बदलली असेल एक ना दोन , कोणाला विचारावं ! आपलं चुकलंच तिचा फोन नंबर तरी घ्यायला हवा होता . कधीतरी ओळख व्हायला हवीच होती कि . क्ष अस्वस्थ होता. एक दिवस दोन दिवस, पूर्ण एक आठवडा . त्याच्या मनात शक्याशक्यतांच काहूर उठलं . आणि ती दिसली . दिसली मात्र दुसऱ्याच क्षणी गर्दीची होऊन गाडीत लोटलीही गेली . तो वाकवाकून खिडकीतून आत बघत राहिला , पॉलीशवाल्या मुलाने ब्रश खाडकन आपटला , क्ष त्याच्याकडे दचकून बघू लागला , पॉलिशवाला आपले शुभ्र दात चमकवत क्ष कडे बघून हसत होता . तो का हसला कोण जाणे मात्र आज क्ष ला त्याचा राग नाही आला .बऱ्याच दिवसाने ओझरती का होईना सखी दिसली होती याचाच त्याला अतोनात आनंद झाला होता . ठिपका होत होत दिसेनाशा झालेल्या गाडीकडे क्ष बघत राहिला . सखी दिसण्या न दिसण्याचा हा खेळ त्याला भलताच आवडू लागला . आह , म्हणजे सखीनं गाडी सोडली नाहीये तर .

    नंतर एके दिवशी बऱ्याच ऑफिसेसना कसलीशी सुट्टी होती ,आज क्ष ने त्याचा आवडता ऑफ व्हाईट शर्ट घातला होता आणि त्याच्या बाह्या अर्धवट दुमडलेल्या होत्या . असं केल्यानं आपण भलतेच स्मार्ट दिसतो हे त्याचं मानणं होतं . सखी येईल कि नाही ! तो मनाशीच खेळ करत होता .येईल ... न येईल . येईल ... न येईल . बराच वेळ झाला तिच्या नेहमीच्या ठिकाणी तर ती दिसत नव्हती , क्ष उदास झाला , हे असं उदास होणं सुद्धा हल्ली त्याचं मन रिझवण्याचं साधन होऊन गेलंय . तेवढ्यात गाडी प्लॅटफॉर्ममधे शिरली . गाडी बरीचशी रिकामी होती , क्ष प्राण कंठात आणून बघू लागला , सखी गाडीत बसून येऊ पण शकते . गाडी थांबली . तो बघत राहिला , सखी दारातच उभी होती . सखीss दारातsss ... ! त्याच्या मनातल्या व्हायोलिनवर सुरेल स्वर वाजू लागले . सखीने बोटाने खूण करत त्याला बोलावलं . त्याचा विश्वास बसेना . तो इकडेतिकडे बघू लागला , त्याने मागे सुद्धा वळून बघितलं . तिने पुन्हा इशाऱ्याने सांगितले " तुम्ही तुम्ही ..... तुम्हीच " . एरव्ही बाजूने झुळझुळत जाणारी सुगंधी लहर आज थेट अंगावर आली होती जणू ,क्षणभर त्याचे पाय लटपटले कि काय असं त्याला वाटलं पण दुसऱ्या क्षणी त्यानं स्वतःला सावरलं . संमोहित झाल्यागत तो तिच्या जवळ गेला . तिने दहाची नोट पुढे करत सांगितलं " प्लीज पटकन पाण्याची बाटली आणून देता का ? "

    आह ..! चारच शब्द पण क्षणार्धात तो पीस होऊन गेला . म्हणजे आपण सखीकडे बघतोय हे तिला ठाऊक आहे . म्हणजे तिलाही आपण आवडतोय कि काय . अवघे तीस सेकंद पण विचार तीस किलोमीटर वाहत गेले . नक्की नक्कीच आपण तिला आवडत असणार आणि आपल्या प्रमाणेच ती सुद्धा बोलण्यासाठी काहीतरी बहाणा शोधत असणार . ट्रेन ते स्टॉल आणि स्टॉल ते ट्रेन अवधी वीस पंचवीस पावलं पण विचार चंद्रयानाच्या गतीने सुसाटलेले . नक्कीच हा एक बहाणा मात्र . क्ष च्या चेहऱ्यावर लाली पसरत गेली .

      नोट देताना तिच्या बोटाचा हलका स्पर्श त्याच्या बोटांना झाला आणि त्याच्या अंगातून वीज सळसळून गेली , तो भारावल्यागत स्टॉलकडे गेला , पैसे स्टॉल वाल्याच्या अंगावर जवळजवळ भिरकावलेच आणि बाटली घेऊन झपाट्याने परतला . तोवर गाडी सुटली होती , तो गाडी सोबत धावत निघाला आणि सखीच्या हाती बाटली सोपवली . बाटली घेताना तिच्या हिरव्या बांगड्या दाराच्या रॉडवर किणकिणल्या . ती पुसटसे थॅंक्यू म्हणाली असावी , क्ष जाणाऱ्या गाडीकडे आणि किणकिणत्या हिरव्या रंगाकडे कितीतरी वेळ थिजल्यागत बघत राहिला आणि त्या मागच्या जर्द लाल रंगाच्या मेंदीकडे सुद्धा . अगदी एखाद क्षण बस . त्याचे डोळे शून्य झाले .

   दोनचार मिनिटातच स्लो ट्रॅकवरून एक फास्ट ट्रेन धडधडत आली . कोणतीही अनाउन्समेंट नाही .वाऱ्याचा प्रचंड लोळ उठला आणि ट्रेप्रचंड वेगात घुसलेल्या ट्रेनच्या आवाजानं सगळं स्टेशन हादरून गेलं . डोळ्याचं पातं लवायचा आत ते घडून गेलं . एकच गलका झाला " कोणीतरी पडलं , पडलं . ओळख सुद्धा पटायची नाही बॉडीची "

" मी पाह्यलं , त्याला स्वतःला झोकून देताना "

" का मातेरं करतात लोक आयुष्याचं " ऑफ व्हाईट कपडा आणि लाल रंग मिसळून चमत्कारिक ओल्या चिंध्या इथेतिथे विखुरल्या .

रेल्वे कर्मचाऱ्यांनी मांसाचे तुकडे गोळा करून स्ट्रेचरवरच्या पांढऱ्या कपड्यात टाकले , क्षणात तो कपडा रक्तरंगी माखून गेला . 

वळचणीचा पक्षी अजून काड्या आणतोच आहे , घरटं कधी बांधून होणार कोण जाणे .

स्टॉलवाल्याने सकाळी तळलेले वडे पुन्हा उकळत्या तेलात सोडले . गजरेवालीने शून्य चेहऱ्याने गजरा गर्र्कन फिरवला .

रेल्वेच्या माईकच्या जाळीदार चौकटीतून भावरहित अगम्य आवाज येऊ लागले .

सगळं आपल्या गतीने सुरूच होतं ,तोच रोजचा प्लेटफॉर्म . तीच गर्दी , तोच घामाचा दर्प आणि तेच बिनचेहऱ्याचे मानवीदेह, फक्त रुळावरच्या रक्ताची कधीच खपली धरली जाणार नव्हती .

धडधडत जाणाऱ्या गाडीच्या चाकांवर ठराविक अंतरावर लाल ठिपके तेवढे उमटत गेले . चाकं धडधडत फिरत गेली . वळ उमटवत गेली .

हिरव्या बांगड्या किणकिणत राहिल्या .Rate this content
Log in

More marathi story from Smita Joglekar

Similar marathi story from Tragedy