Gauri Athavale

Tragedy

5.0  

Gauri Athavale

Tragedy

विवर

विवर

7 mins
814


दुसऱ्या प्रहराचे ऊन… तिने डोळ्यांसमोर हात धरला. सूर्याची किरणं थेट तिच्या डोळ्यावर पडत असल्यामुळं तिने मान खाली घातली. तिची सावली तिला दिसली. बराच वेळ ती आपल्या सावली कडे निरखून पाहत राहिली. तिच्या मनात विचार आला, ही सावली आपली कधीच पाठ सोडत नाही नेहमी सोबत असते , तशाच काही आठवणी आपली कधीच पाठ सोडत नाहीत. चांगल्या क्षणी सुद्धा आणि वाईट क्षणी सुद्धा. विचाराने तिला गहिवरून आल्यासारखे झाले पण आजूबाजूला लोक असल्याचं भान तिला झालं आणि तिने स्वतःला आवरलं. एका बाकड्यावर बसून ती ट्रेनची वाट पाहत होती. ट्रेन यायला अजुन तीन मिनिटं अवकाश होता. एक लहान मुलगा आपल्या आईचा हात धरून चालत होता. त्याचे बूट आवाज करत होते त्यामुळे तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं. आजूबाजूच्या परिसराकडे तो लक्षपूर्वक बघत होता आणि आई बरोबर चालत होता. त्याच्या दुसऱ्या हातात फुगा होता आणि त्यावर हसणारं एक चित्रं होतं. आई नेईल तसा तो तिच्या मागून गर्दीतून चालत होता. ट्रेन आल्यानं तिचं लक्ष त्यावरून हटलं. ही तिची नेहमीची ट्रेन, त्यामुळे ती ठरल्या ठिकाणी नेहमीप्रमाणे जाऊन बसली. तशी ट्रेनला फारशी गर्दी नव्हती तरीही ती धावत पळत ट्रेन मध्येे चढली म्हणून सगळ्या बायका तिच्याकडे पाहू लागल्या. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ती आपल्या जागी बसली. तेवढ्यात खिडकीजवळ एक माणूस येऊन उभा राहिला. त्याने तिच्या बोटांना स्पर्श केला. तिने त्याच्याकडे पाहिलं. दोघेही एक क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. "नीट जा. पोचलीस की फोन कर." तो त्यांच्यामधील शांतता तोडत म्हणाला. "हो. मी करेन फोन तु काळजी करू नकोस आणि लांब उभा राहा आता ट्रेन सुरु होईल." तिने म्हटल्याबरोबर तो लांब झाला. दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. निरोप घेतला असाच म्हणावं लागेल कारण त्यांच्या चेहऱ्यावर दुःख होतं. वियोगाच दुःख. स्पष्ट दिसत होतं. "चालू झाली परत यांची नाटकं" एक बाई नाक मुरडत म्हणाली. "आमचे नवरे नाही बाई असले लाड करीत. सोडायला यायला काही लहान आहे का ही बाई." त्यावर बाजूच्या दोघी हसल्या. तिचं मात्र यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. खिडकीतून बाहेर बघत होती ती; पण कोणत्या वेगळ्याच विचारात गुंग होऊन. काय चाललं असेल तिच्या मनात शंकाच आहे. 

   ट्रेन पुढच्या स्टेशनला थांबली तशी ती तिच्या विचारातून भानावर आली. ती त्या खिडकीजवळ एकटीच बसली होती. सगळ्या बायका तिला ओळखत होत्या पण तिच्याजवळ कोणीच बसायला जात नसे. पण शेवटी मुंबईच्या लोकलला गर्दी ही असतेच त्यामुळे दोघीजणी येऊन तिच्या बाजूच्या सीटवर बसल्या. तिचा फोन वाजला तशी ती दचकली, भांबावून गेली. त्या गडबडीत तिचा फोन खाली पडला आणि त्याचे भाग मोकळे झाले. समोर बसलेली मुलगी तिला फोन उचलून देऊ लागली तशी तिने तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि तो तसाच आपल्या पर्समध्ये टाकला. ती मुलगी बिचारी घाबरली. थोड्या वेळाने फोन तिने पुन्हा बाहेर काढला आणि ती जोडू लागली. पण ते तिला काही जमत नव्हतं. "द्या मी लाऊन देते." ती मुलगी तिला परत म्हणाली. पण ही काय आपला फोन द्यायला तयार नव्हती. "कुणाचा फोन आला तर?" ती मुलगी म्हणाली. असे म्हटल्याबरोबर तिने एक संशयाचा कटाक्ष त्या मुलीकडे टाकला. पण नंतर तिने फोन दिला. त्या मुलीने तिला फोन जोडून दिला आणि इतक्यातच तो वाजला. ती पुन्हा दचकली. तिने तशाच गडबडीत फोन उचलला. "हो. मी ठीक आहे. नाही वेळ आहे अजुन पोचायला. ओट्यावर दूध ठेवलं आहे ते घे." अशा सूचना तिने केल्या आणि फोन ठेवला. मुलगी तिच्या सगळ्या क्रियांकडे चमत्कारिक रीतीने पाहत होती. साहजिकच आहे. रोजच्या बायकांना सवय होती तिच्या अशा वागण्याची. ती पुन्हा खिडकीतून बाहेर पाहण्यात गुंग झाली. 

  तिच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं. पण ते कसलं होत तिचं तीच जाणे. हृदयात तिला काहीतरी सलत होतं तिच्या. अपार दुःखात बुडालेली ती. काय होतं तिच्या नशिबात तिलाच माहिती. आता ट्रेन मधली गर्दी बऱ्यापैकी कमी झालेली. ती डोळे मिटून गप्प पडून होती. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने तिचे केस तिच्या चेहऱ्यावर पसरले होते. तशी ती चांगल्या घरातली वाटत होती. लिंबू रंगाचा ड्रेस आणि त्यावर गुलाबी रंगाची लिपस्टिक शोभून दिसत होती. कुरळे केस होते. मध्यम वर्गीय कुटुंबातली वाटत होती ती. तिच्या डोळ्यांचे कोपरे ओले होते. झोपेत सुद्धा विचार चालू होते तिच्या डोक्यात किंवा झोपली नसेल डोळे मिटून स्वतःची आसवे लपवत असेल. कोण जाणे काय चाललं होतं तिच्या मनात. कसली एवढी भुणभुण लागून राहिलेली तिच्या डोक्यात. तिने पापण्या उघडल्या आणि अश्रुचा एक थेंब तिच्या गालावरून ओघळला. तिने तो लगेच पुसला. आपल्याला कोणी पाहिलं नसेल ना याची खात्री करून घेण्यासाठी तिने आजूबाजूला एक नजर फिरवली. आपल्या पर्स मधून आरसा काढून त्यात पाहू लागली. केस विस्कटलेले ते सरळ केले. ट्रेन थांबली होती. तो लहान मुलगा आपल्या आईचं बोट धरून ट्रेन मधून उतरताना तिने पाहिलं. समोर फुगेवला उभा होता. तो मुलगा त्याच्या आईकडे फुग्यासाठी हट्ट करू लागला. सकाळी त्याच्या हातात जो फुगा होता तो आता त्याच्याजवळ नव्हता. त्या मुलाने एका फुग्याकडे बोट केलं आणि त्या दिशेने बघून तो रडत होता. मधेच आईकडे पाहिलं त्याने. पण आई फोन वर बोलण्यात बिझी होती. तो नारिंगी रंगाचा फुगा त्यावर एक दुःखी चेहरा होता. तरी तो त्या मुलाला हवा होता. तो सारखाच रडत होता म्हणून त्याची आई त्याच्यावर रागवली. तो थोडा वेळ शांत झाला पण पुन्हा रडू लागला. हट्ट करायला लागला. शेवटी त्याच्या हट्टापुढे त्याच्या आईने हार मानली आणि तो फुगा त्याला घेऊन दिला. तो आनंदाने तो फुगा हवेत हलवू लागला. त्या फुग्याच्या दुसऱ्या बाजूला हसणारा चेहरा होता. ती त्याच्याकडे फार लक्षपूर्वक पाहत होती आणि पाहत असतानाच तिला आठवण झाली. तिच्या मुलाची. तोही असाच हट्ट करायचा. अजिबात ऐकायचा नाही. खूप मस्ती करायचा. मित्रांच्या खोड्या काढायचा. शेजारच्या काकांच्या अंगणातली फळे तोडायचा आणि रात्री येऊन तिच्या कुशीत झोपायचा. त्याच्या आठवणीने तिच्या चेहऱ्यावर नाजुकसं हसू आलं. पण ती पुन्हा खिन्न झाली आणि खिडकीला डोकं टेकून विचारात मग्न होऊन गेली. ट्रेन सुरु झाली तशी गार वाऱ्याची झुळूक आली आणि ती डोळे मिटून त्याचा अनुभव घेत होती. तिला कधी झोप लागली कळालच नाही. 

  "अगं हेमा?" या ओळखीच्या तरी पण अनोळखी असलेल्या लोकांमधून कोण आपल्याला हाक मारत आहे या विचाराने तिने खाडकन डोळे उघडले. ती तिची जुनी मैत्रीण होती. 

"कशी आहेस?" मैत्रिणीने विचारलं. 

"मी ठीक आहे. तू कशी आहेस? किती दिवसांनी भेटते आहेस पल्लवी." हेमा. 

"अगं हो. काय सांगू तुला नुसती धावपळ चालू आहे माझी. लग्न ठरलं माझं. हे काय त्याचीच शॉपिंग करायला गेले होते मी." पल्लवी हातातल्या पिशव्या दाखवत म्हणाली. 

"अरे वा! काय सांगतेस काय, अभिनंदन!" हेमा तिच्या हातात हात घालून अभिनंदन करत. 

मग तिच्या होणाऱ्या नवऱ्या बद्दल थोडी चर्चा झाली. 

"अगं हेमा तू सांग बाकी तुझं कसं चालू आहे? घरातले सगळे बरे आहेत ना?" पल्लवी. 

"हो हो सगळे बरे आहेत." हेमा. 

"मी जुना जॉब सोडला त्यानंतर आपली भेट कधीच झाली नाही. नंतर पण मी जॉब करत होते पण तो शिफ्ट वाइज असायचा त्यामुळे ठरलेली ट्रेन आपली कधीच मिळाली नाही." पल्लवी. 

हेमाने नुसती मान डोलावली. 

"ए पण तू जातेस ना अजून जॉब ला?" पल्लवी. 

"नाही अगं दोन महिन्यांपूर्वीच मी जॉब सोडला." हेमा खालच्या आवाजात म्हणाली. 

"का ग काय झालं? म्हणजे चांगलाच होता की जॉब तुझा पार्ट टाईम होता तुलाही त्यामुळे जमायचं सगळं आवरून वगेरे यायला." पल्लवी. "हो…" हेमा बोलता बोलता थांबली. 

"काय झालं? पल्लवी काळजीच्या स्वरात. 

"तुला तर माहीतच आहे सगळं यांचा भाऊ आणि माझी जाऊ आमच्या सोबतच राहायचे." हेमा सांगू लागली. 

"हो त्यांचं काय?" पल्लवी. 

"अगं माझी वहिनी आमच्याशी कोणाशीच नीट वागत नव्हती. मी कामाला गेले की ह्यांना माझ्या मुलाला खायला द्यायची नाही. खूप हाल करायची माझ्यामागे." 

पल्लवीला हे ऐकुन आश्चर्यच वाटलं. तिला आठवलं तीन महिन्यांपूर्वी हेमा हॉस्पिटलमध्ये असताना ऑफिस मधल्या सगळ्याच मैत्रिणी तिला भेटायला गेल्या होत्या. पल्लवीसुद्धा गेलेली. तेव्हा हेमाची जाऊ नीट बोलत होती सगळ्यांशी. चहाला घरीसुद्धा घेऊन गेली होती. 

हेमा पुढे बोलत होती. "रोज भांडणं व्हायची. शेवटी कंटाळून दीराने माझ्या दुसरीकडे घर बघायचं ठरवलं. मग भांडायची बंद झाली ती. त्यांनी चांगला मोठा फ्लॅट घेतला तीन खोल्यांचा. आम्हाला राहायला बोलावलं. पण मी साफ मना केलं. आजपर्यंत हिने काय केलंय मला महिती नाही काय… उगीच कशाला तिच्याकडे म्हणजे ही परत स्वतःचं खरं करायला मोकळी." 

पल्लवीच्या हळूहळू सगळी गोष्ट लक्षात येऊ लागली. "तुझा मुलगा कसा आहे?" पल्लवी ने मुद्दामच विचारलं. 

"तो बरा आहे. आता नोकरी शोधतोय. हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे त्याने." हेमा कौतुकाने सांगत होती. 

तिचं ते उत्तर ऐकून पल्लवी चपापलीच. तिला काही कळेना हीचा मुलगा तर दोन महिन्यांपूर्वीच वारला होता. पल्लवीच्या मनात इतक्या वेळापासून जी शंका होती तीच खरी ठरली होती. 

तिच्या मुलाला व्यसन लागलं होतं. त्या व्यसनामुळे खूप कर्जही झालं होतं. तिच्या जावेने त्याला एकदा इंजेक्शन घेताना पाहिलं होतं. तिने परोपरीने सांगण्याचा प्रयत्न केला. पण हेमाने काही ऐकलं नाही. कर्जापोटी घर गमावून बसली. नवऱ्याची नोकरी गेली. तिच्या मुलाचाही अपघात झाला की अपघात करवून आणला. सगळे असच म्हणत होते. या सगळ्याचा इतका त्रास तिला झाला की तिच्या मनावर परिणाम झाला. खरं जग तिला खोटं वाटू लागलं आणि तिच्या मनातलच जग तिला खरं वाटू लागलं. रोज मुलाच्या शोधात ती ट्रेन मधून भटकत असते. तिने हेमाच्या मैत्रिणीकडून ऐकल होतं. नवऱ्याने समजवायचा खूप प्रयत्न केला पण ही ऐकायलाच तयार नाही. म्हणून काळजीपोटी नवरा रोज सोडायला येतो. ती बहुतेक आता ही तिथेच जात असेल अशी शंका तिला आली. जाऊ तिची तिला खरं सांगत होती पण तीचं मुलावरचं आंधळं प्रेम त्याच्या इतकं आड आलं की तिला सत्य काय आहे हे जाणून घ्यावं असं वाटलच नाही. पल्लवीला फार वाईट वाटलं. 

"काय ग पल्लवी कोणत्या विचारात आहेस?" हेमाने विचारलं. 

"काही नाही ग.." आपल्या विचारातून बाहेर येत पल्लवी.  

हेमाला आपल्या लग्नाची पत्रिका दिली. लग्नाला नक्की यायचं असही सांगितलं आणि ती तिचा निरोप घेऊन निघाली.

   



Rate this content
Log in

More marathi story from Gauri Athavale

Similar marathi story from Tragedy