वेश्या..!
वेश्या..!


दोन दिवस झाले पाऊस थांबेना! पाऊस ढगातूनही बरसत होता आणि रेसाच्या डोळ्यातूनही! सारी मुंबई पाण्याखाली तरळत होती. दोन दिवस झाले, रेसाच्या घरी ना चूल पेटली होती ना पोटाची आग विझली होती. आसवांनी ती तिच्या पोटात लागलेली भुकेची आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत होती. ती जरी आसवांनी तिच्या पोटातील आग विझवू शकत होती, परंतु तिच्या त्या तीन वर्षाच्या मुलाचं काय जो भुकेने मरत होता. त्याला तर आसवांची जाणीवदेखील नव्हती. रेसाला मात्र तिच्या मुलाच्या डोळ्यातून वाहणाऱ्या आसवांची जाणीव होती.
आज काहीही करून तिला मात्र तिच्या मुलाच्या पोटातली भूकेची आग विझवायची होती. आज घरात अन्न-पाणी नव्हते! घरातील भांड्यात आणि तिच्या नशिबात केवळ एकच गोष्ट होती... दारिद्र्य! तिच्या पदरी आज एक पैसा नव्हता. तरीही मात्र ती एक आस घेऊन भर पावसात राघोच्या दुकानात दूध घेण्यासाठी गेली. पावसाने तिचे अंग अंग भिजले होते.
राघो, पन्नास वर्ष वय असलेला दुकानदार होता. ती भिजलेलe लाचार देह घेऊन त्याच्या समोर आर्त होऊन उभी राहिली आणि आर्जवr स्वरात म्हणाली,
"राघोदादा घरी मुलगा भुकेला आहे... दूध दे की!"
तिचे डोळे पाणावले.
"पैसे?" राघो तिच्याकडे वासनेने पाहत म्हणाला.
राघोला तिच्यातली लाचारी दिसत नव्हती, तर पंचवीस वर्ष असलेले, रेसाचे पावसात बहरुन आलेले यौवन दिसत होते. पावसाने भिजलेले तिचे शरीर पाहून तो मोहित झाला. वासनेने तो तिच्या छातीवरुन,चेहऱ्यावरून नजर फिरवू लागला. रेसासाठी हे नवीन नव्हते, कारण ती एक वेश्या होती..!
"पैसे नंतर देते की!" रेसा विनवणी करीत म्हणाली.
तोच राघोने तिचा हात पकडला.
"हात सोड..." रेसा चीडून म्हणाली.
"हात पकडला तर काय झाले, आहे तर वेश्या न तू! चल पैसे राहू दे, पण माझी भूक भागिव..... माझ्या संग झोप....."
"राघो मला जाऊ दे बाळ भुकेला आहे! आज नको..." ती आर्ततेने म्हणाली. परंतु, तिला त्या हैवानासमोर झुकावे लागले. आणि एका रात्रभरच्या भुकेसाठी तासभर देह विकावा लागला!
तासाभराने ती घरी पोहोचली. मुलाची आज भूक मिटेल या आशेने ती खुश होती. तिने तिच्या बाळाच्या निरागस मुखावरील भुकेची रेघ वाचली. दूध तापविण्यासाठी चुलीवर ठेवले आणि आपल्या मुलाजवळ गेली. मायेने त्याच्या डोक्यावरुन हात फिरवला. दूध घेण्यासाठी माघारी गेली तोच ती जागेवर स्तब्ध झाली आणि रडू लागली.… चुलीवरील दूध मांजरीने फस्त केले होते. धावत ती आपल्या बाळापाशी गेली आणि त्याला छातीला लावून रडू लागली. आजही दोघे भुकेले झोपले.
सकाळ झाली. बाळाचे अंग तापले होते. डोळे लाल झाले होते. औषधासाठी पुन्हा पैसे लागतील हे तिने जानिले. ती, तिच्या वेश्यापणावर, जीवनावर चिडली आणि तशीच डोळ्यात आसवे आणि ओठांवर हसू घेऊन घराबाहेर आली, खांद्यावर असलेला पदर खाली टाकला.. आणि देह प्रदर्शन करीत ओरडू लागली, "दोनशे रुपये.. दोनशे रुपये.. दोनशे रुपये!!"
एक नर तिच्याजवळ आला, तिला खाली वर न्याहाळले आणि शब्द फेकून निघून गेला....
"चल छिनाल!"
रेसाने समोर असलेले, महिला दिवसाचे बॅनर पाहिले.. आणि उपहासात्मक हास्य केले आणि जागेवर कोसळली!