तुळशी विवाह
तुळशी विवाह
आनंदी पहाट
स्वप्नपुर्तीच्या मंजूळ
सनईसूरांची
तुळसी विवाह प्रारंभ
महाप्रसाद जननी
सर्व सौभाग्यवर्धिनी,
आधि व्याधि हरा नित्यं
तुलसी त्वं नमोस्तुते
कार्तिक शुद्ध एकादशी अर्थात प्रबोधिनी एकादशीला चातुर्मास संपला. आता एकादशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यन्त तुळसी विवाह संपन्न होणार.
भारतीय संस्कृतीने चराचरावर प्रेम करायला शिकवलेय. येथील सर्वच नदी, डोंगर, पशु, वृक्ष.. वनस्पतींचा जीवनात उपयोग असल्याने त्यांचे श्रद्धेने पूजन करायला सांगितलेय. वड, पिंपळ, अर्जुन आदि आयुर्वेदीय वृक्ष घरासमोर लावणे शक्य नसले तरीही सर्वच वनस्पतींचे प्रतिक म्हणून दारोदार तुळस आहे. पापनाशिनी अशी तुळशीची महती.*
कार्तिक महिना हा तुळस लागवडीसाठी उत्तम महिना. आज तुळसीचे औषधी महत्व अखिल विश्वाने मान्य केलेय. तुळस ही प्राणवायूची संजीवनी. ही प्रत्येक घरी आहेच. तुळसीचे रोपण.. संगोपन.. दर्शन.. स्पर्श.. ध्यान.. नमन.. पूजन सारेच मंगलदायी.
भारतीय संस्कृतीत पहाट होताच तुळसीला पाणी देणे हा नित्यक्रमच. मग पूजन करुन प्रदक्षिणा घालणे पुण्यकारक मानले जाते. तुळशीला कल्पतरुचा मान. ती लक्ष्मीच. या तुळशीच्या पूजनाने पापे नष्ट होतात. तुळशीची माळ घातल्याने इंद्रिय विजय प्राप्त होतो.
प्रत्यक्ष विष्णूसुद्धा तुळशीचा सन्मान करतात. या तुळशीच्या पूजनाने जीवन संपन्न होते. तुळशीचे लग्न हा विधी भावनिक नाते जोडणारा. विष्णू अवतार शालीग्रामाशी तुळशीचा लग्नसोहळा सानंद पार पडणार. तुळशीची आरती करुन विष्णू लक्ष्मीचे आशीर्वाद घेतले जाणार. या विवाहात मांडव ऊसाचा. तर बोर.. आवळा हे पूजनात हवेच. जगातील सर्वात मोठे दान म्हणजे कन्यादान. तुळशी विवाहाने या कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते ही धारणा.
समाजात कुणाचे वर.. वधू संशोधन सुरू असेल तर त्यांना लग्नाची घाई करण्याची आठवण होते. ज्यांची लग्न ठरली आहेत त्यांची विवाह प्रतिक्षा संपणार.. त्यांचा दांपत्य जीवनाच्या शुभारंभासाठी आता लग्न मुहुर्त सुरू झालाय.
पूर्वजांनी वातावरण बदलाच्या पूर्ण अभ्यासांती लग्नासाठीचा संपन्न असा मुहुर्तकाळ निश्चित केलाय. आज पासून सुरू होणार ते मंजुळ सनई चौघड्याचे सूर आणि हवीहवीशी वाटणारी.. सुखावणारी.. आनंदी अशी मंगलाष्टके. तुळशी विवाह ही त्याची रंगीत तालीम.. नांदीच आहे.
तुळशी विवाह झाल्याने आता लग्नास आतुरांच्या भुवया उंचावल्यात. त्यांना शुभेच्छा देत.. चला मग म्हणायला "शुभमंगलss सावधान.. !!". आज तुळशीचे आशीर्वाद घेण्यासाठी म्हणू या,
तुळसी श्रीर्महालक्ष्मी
र्विद्याविद्या यशस्विनी ।
धर्म्या धर्मानना देवी
देवीदेवमन: प्रिया ।
लभते सुतरां भक्तिमन्ते
विष्णुपदं लभेत् ।
तुळसी भूर्महालक्ष्मी:
पद्मिनी श्रीर्हरप्रिया ।
घालिते मी शुभप्रभाती
पाणी तुळशीला
नेम माझा हाची सदाचा
चुकू नये कधी काळा
महती जियेची कल्पतरुहुन
अशी तुळस ही माझ्या अंगणी
जळती पापे रुळता कंठी
पावन तुळशी माळा
तुळशीदलाविण विष्णु भुकेला
धावती देव तिच्या हाकेला
पूजन करिता या लक्ष्मीचे
काय कमी कोणाला ?
जय देव जय देवी
जय माये तुळशी ।
निज पत्राहुनि लघुतर
त्रिभुवन हे तुळशी ॥धृ॥
ब्रह्मा केवळ मूळीं
मध्ये तो शौरी ।
अग्रीं शंकर तीर्थे
शाखापरिवारीं ॥
सेवा करिती भावें
सकळहि नरनारी ।
दर्शनमात्रें पापें हरती निर्धारी ॥
जय देवी ॥१॥
शीतल छाया भूतल
व्यापक तूं कैसी ।
मंजिरिची बहु आवड
कमलारमणासी ।
सर्व दलविरहित
विष्णू राहे उपवासी ।
विशेष महिमा तुझा
शुभ कार्तिकमासी ॥
जय देवी ॥२॥
अच्युत माधव केशव
पीतांबरधारी ।
तुझे पूजनकालीं जो हें उच्चारी ॥
त्यासी देसी संतति
संपत्ति सुखकारी ।
गोसावीसुत विनवी
मजला तूं तारी ॥३॥
तुळशीची आरती : पारंपारिक
‼बोर,भाजी,आवळा‼
‼कृष्णदेव सावळा‼
सुमंगल प्रभात
२४.११.२०२३
