STORYMIRROR

Pankaj kharat

Tragedy Others

3  

Pankaj kharat

Tragedy Others

तिलांजली (तिच्या मोरपिशी स्वप्नांची)

तिलांजली (तिच्या मोरपिशी स्वप्नांची)

11 mins
308

नमस्कार मित्रांनो...

काहीतरी लिहायचं पण वेगळा विषय डोळ्यासमोर ठेवून...त्यादिवशी मनात आलं आणि चटकन कसलाही विचार न करता लिहायला बसलो...माझ्या या कथेच्या शीर्षकावरून कदाचित तुम्हाला काही माहिती जाणवली ही असेल..तुमच्या डोक्यात या शीर्षकावरून विचारही चालू झाले असतील.


पुरुषप्रधान समाजात स्त्रियांचा जन्म असो...त्यांना मिळालेलं दुय्यम दर्जाचा स्थान असो...सरकारी पातळीवर करावा लागणारा स्त्री पुरुष समानतेचा नारा असो ....खरच बोलायचं म्हटलं तर खूप काही आहे. दररोज वर्तमानपत्र , टी व्ही मधून बलात्कार , अत्याचार , विनयभंगाच्या बातम्यांचा मारा होतो . त्या वाचताना , त्या ऐकताना तेवढ्यापुरते वाईट वाटते. आपण हळहळतो. संतापात एखादी प्रतिक्रियाही देतो . दृष्टांना कशी सजा व्हावी , न्यायव्यवस्था कशी कमकुवत आहे किंवा आजकालच्या आधुनिक परिस्थितीवर बोट ठेवून आपण मोकळे होतो.थोड्यावेळात सारे विसरून कामाला लागतो . पाच दहा दिवस उगीच चघळलेले ... हो.., हो उगीचच चघळलेले प्रकरण रवंथ करून गिळतो आणि नंतर काय वातावरण थंडावते.


एक सांगावस वाटत...पटत का बघा...महिलांनी मर्यादेची सीमा ओलांडून चालणार नाही . आम्ही उपभोग्य वस्तू नाही हे महिलांनी ठणकावून सांगायलाच हवे. स्वशक्तीचे अफाट कर्तृत्व पुरुषवर्गाला मान्य करायला लावण्याची क्षमता प्रत्येक स्त्रीत असते. ती कृतीतून दाखवायला हवी . विचार केला तर आजकालची तरुणाई बिभत्सतेच्या अंधानुकरणालाच जगण्याची ताकद मानतेय. असो, थोडक्यात सांगतो महिलांच्या मनात रुजू पाहणाऱ्या जे सकारात्मक विचार आहेत , त्या सकारात्मक संस्कृतीला जपण्याचे , वाढू देण्याचे काम समाजाला करावे लागणार आहेत . ही समर्थ साथ लाभली तर " भारतीय संस्कृती जिंदाबाद " हा जयघोष पुन्हा निनादेल यात तिळमात्र शंका नाही. 


अनुभवलेला एका स्त्रीचा जीवनप्रवास ,तिचा जीवन संघर्ष मला खर तर मांडायचा नव्हता. म्हटलं कशाला कोणाचं पर्सनल लाईफ जगासमोर उघडकीस आणावं..तस तीला त्यावेळी मी विचारणाही केली होती .मला खरंच तुझ्याविषयी जाणून घ्यायला आणि लिहायला ही आवडेल ..आणि तिने तशी संमती ही दर्शवली. माझ्या जीवनाचं सार ऐकुन कोणाच्या आयुष्यात जर नक्कीच प्रकाश पडत असेल तर नक्की तुम्ही लिहा...अस ती मला म्हणाली होती. खरच सांगतो मित्रानो ...मला राहवलं नाही ...हिम्मत करून जवळ जवळ एका वर्षाने मी तिच्याविषयी लिहायला हाती पेन आणि कागद घेतला आणि सुरुवात केली.


साधारणतः ... मागील वर्षी थंडीच्या दिवसांत (डिसेंबर).... मी दिल्लीला माझ्या ऑफिस कामासाठी गेलो होतो. माझी आणि तिची भेट पहिल्यांदा तिथेच झाली . त्यावेळी ती शेजारील एका पिठाच्या गिरणी असलेल्या ठिकाणी कामाला होती. माझं त्या ठिकाणावरून नेहमी येणं जाणं असायचं त्यामुळे रोज थोडी बोलचाल व्हायचीच...अंजी तीच नाव...अंजी खरच पहिला वर्गही शिकलेली नाहीये.परंतु काय सांगू...एखाद्या शिक्षित माणसालाही लाज वाटेल असे तिचे विचार...!!! तुम्हालाही तिचे विचार नक्कीच आवडतील, नक्कीच जाणून घ्यायचे असतील.. म्हणून मी हिंमतीने तिच्याबद्दल लिहण्याचे धाडस करत आहे. 


त्या दिवशी नेहमीप्रमाणे आपल्या ऑफिस कामावरून सुटल्यावर नेहमीच्या रस्त्याने जाण्यास मी निघालो . मध्येच मला अंजिने चहा साठी आमंत्रित केले. मी ही चहा घेतला आणि बोलता बोलता विषय वाढत गेला. ती बोलू लागली...


"मी एक साधारण स्त्री आहे साहेब...जास्त बोलले , मी कुठे चुकले तर मला नक्की सांगा...इतकी साधारण की माझ्यावर तुमचं लक्षही नाही जाणार परंतु मी तुम्हाला बघतेय...या समाजातील लोकांना चांगलीच ओळखतेय...त्यांच्या विचारांना चांगलीच ओळखतेय. तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन डॉक्टर कडे जात असता.कश्यासाठी हो...फक्त जाणून घ्यायला की तिच्या गर्भात मुलगा आहे की मुलगी ...!!! तुम्ही खर तर बायकोच्या गर्भातच तुमच्या स्वता:च्या मुलीची हत्या करत आहात. 


तुम्ही कधी विचारही केला नसेल साहेब ...तुम्ही ज्या सडकेवरून नेहमी ये जा करता ना... ती सडक सुद्धा मी माझ्या हातांनी बनवलेली आहे. हो...ही सडक बनवत असताना मी इथेच कामाला होते. या सडके साठी तुमच्या उंचीपेक्षा जास्त मोठे असणारे दगड फोडण्याच काम मी केलं आहे. माझी छोटी मुलगी तेव्हा इथेच खेळत असायची आणि मी तिच्यासमोर काम करायची . 


मला तीन मुली आहेत . काय करू एखादा मुलगा असावा म्हातारपणी आधार द्यायला...तुमचा समाजही असच म्हणत असतो ना ...की म्हातारपणाचा आधार देण्यासाठी मुलीपेक्षा मुलगाच सरस ठरतो...साहेब तुम्ही खूप शिकले आहात ..खरच तुम्हाला तरी अस पटत का हो ...? तुमच्यासारख्या शिक्षित लोकांनी , हा समाज जे घडवत असतात , अश्या लोकांनी जर असा विचार केला तर खरच हा समाज सुशिक्षित आहे का हो...? मुली खरच आईवडिलांचा म्हातारपणीचा आधार बनू शकत नाही का...? तुमच्यासारख्या शिक्षित लोकांनी असा विचार केला तर आमच्या सारख्यांनी कोणाकडे आदर्श म्हणून बघायचं मग....!!! ती बोलत असताना अक्षरशः तिचे हृदय भरून आले होते. त्याक्षणी तिच्यासमोर बसायची माझी काहीच लायकी नव्हती ...खरच ...एक न शिकलेली महिला आणि तिचे विचार असे असतील ...खरच भारावून गेलो . काय करावं आणि काय बोलावं अशी माझी अवस्था झाली होती .


ती बोलत होती , " मला तीनही मुलीचं झाल्या , त्यामध्ये माझी काय चूक हो साहेब ....आज माझ्या पदरात पडलेल्या या तीन मुली , त्यांच्यामुळेच माझ्या नवऱ्याने मला सोडून दिले . आजही तो आमच्याकडे येतो . एका स्त्री कडून पुरुष जातीला जे हवं असत फक्त ते घेण्यासाठी...!!! आल्यावर जेवणही करून जातो . पण एक शब्दही मुलींना बोलत नाही . त्यांच्याकडे कधी प्रेमाने बघतही नाही. काय चूक आहे हो साहेब यामध्ये त्या मुलींची ...त्या मुलींना जन्म फक्त मीच दिलंय का...? का त्याला त्या मुलींविषयी आस्था , प्रेम वाटत नाही ...? मला सर्व कळत साहेब ...पण अस वाटत काय बोलून दाखवायच...शेवटी किती केलं तर तो मुलींचा बाप आहे .. सर्व सहन करत असते. मला तर नवल वाटत साहेब , त्या पुरुषाचं की, ज्या मुलींचा तो बाप आहे , त्याला आपल्या मुलींचा इतका तिटकारा वाटावा खरच...ज्या मुलींचा इतका तिटकारा वाटतो , त्याच मुलींच्या नावाने वाढलेली परातीत तो जेवतो. त्याला वाटत मुली ह्या घराला ओझे आहेत . घराला भार आहेत . 


साहेब , माझ्या मुली दिसायला जरी सावळ्या असल्या तरीही नाका डोळ्याला दिसायला सुंदर आहेत ...मोठ्या घरातील मुली इतके काम करू शकणार नाही , आज तितक्या कामाला ते जागतात. जांभळासारखे मोठे डोळे आहेत त्यांचे ....!!! खूप काम करतात बिचाऱ्या...!!! त्यांचही जीवन काय ..., माझ्यासारखाच असणार आहे...परंतु साहेब एक सांगू ...माझ्यासाठी त्याच सर्वकाही आहेत. कमीतकमी मी एकटी आहे याची त्यांनी मला कधीच जाणीव होऊ दिली नाही. त्यांच्यासाठीच मी जगात आहे साहेब ....!!! 


तुम्ही शिक्षित लोक आणि तुमचे विचार ...तुम्हाला वाटत मुली काहीच करू शकत नाही . त्यांना नेहमी तुम्ही आपल्या पायाखालची धुळ समजत असाल , पण नाही साहेब ...तुमच्यासारख्या शिक्षित लोकांची ही सोच खरच चुकीची आहे . खूप चुकीची आहे . कोणी मुलीचा जन्म नकोय यासाठी तो प्रार्थना ही करत असेल , इतके घाणेरडे विचार आहेत या समाजात लोकांचे ....!!! साहेब तुम्हाला काय माहित आहे हो ...मुलीचे काम , त्यांचा जन्म ...त्यांच्या जन्माला आलेल्या हालअपेष्ठा... अहो साहेब ही सडक मी बनवली आहे ...कापसाच्या शेतात कामे केली आहे , मी दगड फोडली आहेत , कपड्याच्या कारखान्यात मशीन चालवण्याच काम केलं आहे ,तीन - तीन मुलींना जन्म दिलाय , त्यांना सांभाळत आहे. त्यांचं पालनपोषण करत आहे .मग मी स्त्री म्हणून पुरुषाच्या बरोबरीने कुठे कमी पडत आहे ..मी बेकार आहे का ...? खरच तुम्हाला वाटत का मी भुईला भार आहे ...? अहो साहेब सध्या जो चहा तुम्ही पित आहात , तो चहासुद्धा माझ्या मुलीनेच बनवला आहे ...


अजुन काय हवंय तुम्हाला मुलींकडून ....? कसली अपेक्षा करता अजुन तुम्ही मुलींकडून ...?? असे अगणित असंख्य कामे सांगेल साहेब ज्यामधे स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी नाहीये...तुम्ही घातलेले हे अंगावरील स्वेटर ...त्याचा एक एक धागा विणायला साहेब दिवस रात्र करून तीन दिवस लागतात ... त्याची किंमत असेल हजार रुपये...पण साहेब हेच स्वेटर मी विणायची, मला एका स्वेटर विणायचे पंधरा रुपये मिळत होते. तेव्हा माझ्या मुली छोट्या होत्या , मी विचार केला घरी बसून राहील तर खायचं काय ...म्हणून मी घरी मुलींकडे लक्ष ठेवता येईल म्हणून घरीच स्वेटर विणण्याच काम करत होती . त्यात पण काही दिवसांनी त्या मालकाने घरी विणकाम करण्यास मनाई केली . त्याच म्हणणं होत की मी कारखान्यात येऊन विणकाम करावं , मला ते शक्य नव्हत...नंतर मला कळलं की त्याची माझ्यावर वाईट नजर होती . तेव्हापासून मी ते काम सोडून दिले आणि पिठाच्या गिरणीच्या ठिकाणी कामाला लागले. खूप कामे केलीय साहेब मी पण ...घरामधे सध्या दोन तीन कोंबड्या आहेत , दोन बकऱ्या आहेत ...बस त्यांच्यावर उदरनिर्वाह चालू आहे.


तुमची बायको जी रेशमी साडी घालते ना साहेब ...त्या साडीचे धागेही स्त्री च तयार करते साहेब ....त्या रेशमी किड्यांना पाळाव लागत . किती अवघड काम आहे माहीत आहे ...? पूर्ण शरीराला अक्षरशः त्रास होतो . कधी कधी जखमा ही होतात. शेतात काम करताना सुद्धा पायाला जखमा होतात , वाकून वाकून कंबर अक्षरशः दुखावते....


इतरांसारखे माझेही माझ्या मुलांसाठी काही स्वप्न आहेत साहेब ...मी पण तुमच्या समाजातील महीलांसारखी एक साधारण महिलाच आहे . मलाही वाटत की माझ्यासारखी दलींद्री आयुष्य माझ्या मुलींच्या भाग्याला येऊ नये. साहेब माझ्याजवळ जर पैसे असते तर नक्कीच मी माझ्या मुलींना शिकवून मोठे केले असते ... त्यांना शिक्षिका , डॉक्टरिन बनवलं असतं...तुम्ही , तुमचा समाज चांगला शिकलेला आहे ...तुम्ही पैश्यावाले आहात ...मग का तुमचा शिक्षित समाज मुलींना गर्भातच मारून टाकतो ...? का असा विचार करतो की मुली ह्या धरतीला भार आहेत ? का असा विचार करतात की मुली काहीच काम करू शकत नाही ??? अरे माणूस म्हणजे काही फालतू वस्तू नसते...कोणताही माणूस असो , तो फालतू , बेकार नसतोच ...पुष्कळशी कामे आहेत त्याला करायला...मग अश्या पद्धतीचा विचार करून मुलींना मारून टाकणं म्हणजे निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध आहे ...का कळत नाही तुम्हाला....? का कळत नाही या शिक्षित समाजाला...?? 


साहेब मला सांगा ....तुमच्या घरामध्ये जर मुलगा जन्माला आला तर तुम्ही काय विचार करता , की मुलीपेक्षा मुलगा आपल्यावर जास्त प्रेम करेल .. हो ना...? मला सांगा साहेब मग मुलींच्या तुलनेत मुलगे का हो जास्त बिघडतात ...? का ते आजकाल टवाळ - गिरी , पत्ते खेळणे , दारू पिणे , मारामाऱ्या यात वाहून घेतात...विचार करा ,त्याच ठिकाणी जर मुलगी पैदा झाली तर तिला तुम्ही चांगले संस्कार देऊन , लिहू , वाचू शकता. तिला चांगले शिकवू शकता. खरच साहेब मुलगी खूप प्रेम करेल...आणि मुलीचं प्रेम मुलांच्या तुलनेत आपल्या आईवडिलांवर अधिक असते .. मुली मायाळू असतात....त्यांना जाणीव असते . कधी चुकीचं पाऊल टाकण्यापूर्वी त्या एकवेळ आपल्या आईवडिलांच्या भावनेचं , त्यांच्या मनाचा नक्कीच विचार करतील ...तिच्या जन्माने तुमच्या घरात रोषणाई , लक्ष्मी येईल , ते वेगळच ....!!! साहेब ...तुम्हाला वाटत असेल , तिच्या लग्नासाठी तुम्हाला हुंडा द्यावा लागेल ... अहो साहेब ...तुम्हीच तुमच्या मुलीला असं बनवा की ती स्वतःच्या पायावर उभी ठाकली पाहिजे ...मोठ्या हिमतीने , जिद्दीने ती आपल आयुष्य जगू शकली पाहिजे ...काय हिम्मत हो कोणाची ...तुम्हाला हुंडा मागण्याची ....हुंडा घेणाऱ्याशी कधीच लग्न करू नका ... असही होऊ शकेल की असाही मुलगा भेटेल की जो हुंडा न घेता , तिच्या गुणाच्या वैभवावर तो मोहित होऊन तिच्याशी लग्न करेल ....सांगा साहेब हे समाजाला पटवून सांगा ...." तिचे बोलणे मला विचार करायला भाग पाडत होते. ती कमावेल , खाऊ घालेल आणि म्हातारं पणात तुमचा आधारही होईल आणि तुमचं नावही रोशन करेल...


समाजातील लोकांना तर आजकाल पैसाच सर्वकाही आहे . मला तर वाटतं मुलींच्या जन्माची भीतीच साऱ्यांना सतावत असेल ...ती हसत होती ...कमीतकमी साहेब प्रत्येक माणूस आपल्या मुलीला प्रेम तर देऊच शकेल ना...आणि अर्थातच मुलगी तर प्रेम देईलच ...कोणताही माणूस आपल्या मुलांना प्रेम देतच असतो . आणि त्यासाठीच तर आपण जगत असतो ना साहेब ...पैसा वगैरे बाकीच्या सर्व गोष्टी मोह माया आहेत ... बाकीचं सोडा हो ...पण एक मुलीचं आपल्या आईवडिलांशी असलेलं नातं खरच खूप वेगळं असत हो साहेब...मुलीचा जन्म म्हणजे घरात लक्ष्मी आल्याच संकेत असत ...


निसर्गाशी मानव जातीची इतकी मनमानी चांगली नाही साहेब ...मुलींना तुम्ही असच गर्भात मारून टाकले तर विचार करा स्त्रियांचं प्रमाण कमी होणार नाही का...? साहेब एक लक्षात घ्या....ती वेळ दूर नाही मग स्त्रियांसाठी तुम्हाला कुत्र्यासारखा लढण्याची वेळ येईल ...हुंड्याच्या भीतीपोटी तुम्ही आज तिची गर्भात हत्या करत आहात , तर मग उद्या पैसाच्या लालचेपोटी तुम्ही तीला विकायला ही मागे पुढे विचार करणार नाही . अश्या पद्धतीने वागाल तर खरच हे जग आपण जसा विचार करतो तस होईल का हो ...? खरच तुमच्या घर परिवारात खुशी खेळेल का ? तुम्ही खरच आनंदी असाल का ...?? 


मला तर त्या स्त्रियांना खरच सांगावस वाटत की ज्या पुरुषांशी तुम्ही लग्न केलं आहे ... त्यांना तुम्ही का म्हणून घाबरता...? काय वाटतं तुम्हाला ...तुम्हाला तो सोडून देईल...? आणि त्या मीच मीच करणाऱ्या पुरुषाने तुम्हाला जर खरच सोडलं तर तुम्ही काय मराल काय...?मी तर लिहू वाचू शकत नाही .. मी तर शिकलेली नाहीये ...तरीही मी कधीच माझ्या नवऱ्याच्या अश्या वागणुकीला कंटाळले नाही . त्याच्या भांडण करण्याच्या स्वभावापुढे हरले नाही . कधीच त्याच्यासमोर नतमस्तक झाले नाही .एक पुरुष , आपला नवरा , एका बायकोसाठी तिचा नवरा देव असतो ...म्हणतात ...त्याचा आदर ही करायची ...पण मग काय त्याने काहीही करावं .. कसही वागावं ...आणि मी सहन करावं...का ...का म्हणून ...? नवऱ्याने मला सोडायची धमकी दिली ... मी म्हटलं चल सोड... स्वतः वेगळी राहू लागले आणि कमवून खाऊ लागले... मुलींनाही मीच सांभाळत आहे ...नवरा जवळ असताना ही काम करायची त्यामुळे तेव्हाही आयुष्यात काम होतंच आणि आताही आहे ...तो काय मला सोडेल ...काही काम तर करत नाही ...तेव्हाही मीच काम करून घर संसार चालवत होते...त्यापेक्षा त्याने मला सोडून चांगलच केलं मी तर म्हणेन...साहेब आम्ही स्त्रिया खूप कामाच्या आहोत ...पुरुष जात काय आम्हाला सोडेल ..? त्यासाठी मनगटात बळ असावं लागतं ..." ती हसत होती ...परिवाराची गरज तर यांनाही असतेच ...नाहीतर गुदमरून मरतील हे पुरुष ....यांना कोणी वेळेवर पाणी द्यायलाही सापडणार नाही ...


साहेब ...तुमचं ही लग्न झालेलं आहे ...तुम्हालाही मुलगीच होवो ...हुंडा घेऊ नका ... देऊही नका...घाबरु नका ... सध्या जग जस आहे भविष्यात त्यापेक्षाही छान असेल ...कमीतकमी मारामाऱ्या , धमक्या , गुन्हेगारी तरी कमी होईल ... ती माझ्याकडे बघून बोलत होती ...


माझ्या मुलींना स्वयंपाक बनवता येतो , शिवणकाम , विणकाम करता येत. आज त्या नसत्या तर काय झालं असत...मी तर असेच छोटे मोठे काम करून मरून गेले असते . आताही मेहनत करते पण खरच साहेब मेहनत करताना नेहमी चेहऱ्यावर आनंद , एक खुशी असते. माझ्या तीनही मुली खूप गुणवान आहेत ... कोकिळा - सारखा आवाज आहे त्यांचा ...आवाज ऐकताच माझा आलेला थकवा कुठेच्या कुठे पळून जातो . नका करू कोणी माझ्या मुलींशी लग्न ....गेलं चुलीत....आणि केलं तर नक्कीच ते भाग्यवान असतील ...." एक नारी सब पे भारी ....😊" ....ती हसून म्हणाली....


"चला येते मी ...ठेकेदार आले असतील ...काम नाही केलं तर ओरडतील....खूप वेळ झाला बोलत आहे ...डोळ्यांनी कमी दिसत आहे आता ...चष्म्याचा नंबर वाढला आहे ...खूप दिवसापासून चाललं ...आणायचं आणायचं ...येथील मालक पूर्ण शहरात दुकाने उघडायचं म्हणत आहेत ..तिथेच काम करेल आता...काम तर चांगल आहे .तसेही खूप कामे केली आहेत आयुष्यात .. त्या दुकानासमोर एका डॉक्टरचा दवाखाना आहे ..तिथे मुलगा मुलगी टेस्ट होत असते ...बरेचसे लोक तिथे येताना दिसतात...बस ते बघूनच मनात एक घुटमळ चालू असते. ते बघून मन बेचैन होत असत... नेहमी नेहमी तुमच्या सारख्या शिक्षित लोकांचा चेहरा बघावा लागतो ...हत्यारांचा...पाप्यांचा....!!! " ती बोट दाखवून सांगत होती .


बस ...यापेक्षा अजुन कुठे दुसरीकडे काम मिळालं तर हे काम सोडेल ...तोपर्यंत काय ....आहे इथेच ....!!! मी जर शिक्षित असते ...तर नक्कीच हे सर्व मीच लिहले असते ..तुम्हालाही माझ्या मनातील भावना वाचायला मिळाल्या असत्या...तुम्हाला ही माझ्या मोरपिशी स्वप्नांची ओळख करून दिली असती ... वाचून तुम्हीही म्हणाले असते सोळा आणे खरी गोष्ट बोलली अंजी....!!! 


येते मी..!


जीवन तर सुंदर आहेच आणि अर्थपूर्ण ही आहे...बस आपण ते समजून जगायला हवे...आता जीवनाला अर्थ कसा प्राप्त करून द्यायचा , हा ज्याचा त्याचा प्रश्न ..


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy