स्वप्न पाहता लोचणी
स्वप्न पाहता लोचणी


"ऐ हे काय रे सुरेश, असे डोळे का बरं मिटले माझे? सोड म्हणतो ना, मला नाही हं आवडणार असलं सांगून ठेवतो, सोड म्हणतो ना?"
गौरीला इतकं हसायला येत होतं की तिच्याकडून हसू आवरलं जात नव्हतं, गौरीला वाटलं इतक्या वर्षांपासून गिरीष आपल्याला ओळखतोय तरी त्याला माझ्या हाताचा स्पर्श जाणवू नये? पण मी मात्र त्याचं निरीक्षण करून त्याच्या सवयी जपून ठेवल्या आहे मनात.
गिरीष हा सोज्वळ, मितभाषी, देखणा त्यात एकुलता एक त्यामुळे अतिशय लाडाचा! अगदी काँलेजपासून इंजिनिअर झाला तरी गौरीच्या घरी गेल्याशिवाय त्याला करमत नसे.
आज रविवार असल्याने ऑफिसला सुट्टी! त्यामुळे बराच वेळ सूर्याची कोवळी किरणं अंगावर झेलत या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता. रोज कामावर जायचं असल्याने कसंतरी उठायचं, तयारी करून घराबाहेर पडायचं. घरी आल्यानंतर आईच्या हाताचा गरम चहा पिऊन, फ्रेश होऊन मग मित्रांसोबत फिरायला जायचं नाहीतर गप्पा, मग आईचा स्वयंपाक तयार झाला की जेवून "मी जरा गौरीकडे जावून येतो" असं सांगून निघायचा. आज सुट्टी असल्याने सर्वच रूटीन बदललं होतं, आई त्याच्या खोलीत गेली आणि म्हणाली, "अरे बाळ उठ, आता मी तुझ्यासाठी चहा आणि ब्रेड आणला आहे, उठ म्हणतेय ना, जा तोंड धुवून ये आपण इथेच चहा घेऊ."
शेवटी गिरीष आईला म्हणाला, "अगं आई, कशाला एवढी कामं करतेस? चहा इथे आणून द्यायची काही गरज होती का? मी घेतला असता ना, आता शेवटचं सांगून ठेवतो, आता जास्त कष्ट करायची गरज नाही." एव्हाना दोघांचा चहा पिऊन झाला होता आणि नानासुद्धा फिरून आले आणि अंघोळीला बसले होते.
गिरीष आरशासमोर दाढी करत असताना गौरी चोर पावलांनी केव्हा खोलीत आली याचा सुगावा पण त्याला लागला नाही. गिरीषची पाठ असल्यामुळे गौरीने त्याचे चटकन डोळे मिटले.
जेेव्हा गौरीने डोळ्यावरचा हात बाजूला काढला तेव्हा गिरीष म्हणाला अरे, "गौरी तू होय?"
गौरी म्हणाली, "मग आधी का ओळखता नाही आलं? बरं ते जाऊ दे, तुला आईने ताबडतोब बोलवलं आहे, तुझ्या आवडीचे ढोकळे केले आहे, चलिए जनाब वर्ना...!"
गौरी स्वभावाने बोलकी, सालस, दिसायला सुंदर, हुशार त्यात ती पण एकुलती एक मुलगी. गौरी मनोमनी खूप प्रेम करायची गिरीषवर, मनातल्या मनात झुरत होती त्याच्यावर, पण बोलून दाखवायचं धाडसं कधी झालं नाही तिचं.
गौरी बी. एस. सी. फायनलला होती आणि गौरीपेक्षा गिरीष हा नक्कीच हुशार होता. त्यामुळे गणितामधील अडलेली उदाहरणे सोडवायला तो तिला नेहमी मदत करायचा. त्यामुळे त्याचं गौरीच्या घरी नेहमी जाणं-येणं असायचं, गौरीच्या आईला विश्वास होता की, तो गैरफायदा घेणार नाही.
पण शेवटी व्हायचं तेचं झालं. गिरीषचं य
ेणं-जाणं, उठणं-बसणं चाळीतल्या लोकांना खपलं नाही शेवटी न राहावून जोशी काकू गौरीच्या आईला बोलल्या, "मी तुमच्या चांगल्यासाठी सांगते आजकालच्या मुला-मुलींवर विश्वास ठेवू नका, नाहीतर काय भटाला दिली ओसरी आणि हळूहळू हातपाय पसरी असं काही तरी व्हायचं, अहो... लोकं काय-काय बोलतात शी.. शी, माझे तर कान विटले ऐकून पण या दोघांची मैत्री मात्र वाढतेच आहे चंद्राच्या कलेसारखी!"
गौरीला त्याच्याविषयी खूप वाटायचं, त्यात तो इंजिनिअर आहे, तेच तर स्वप्न होतं तिचं की नवरा इंजिनिअरचं असला पाहिजे. असेच दिवसामागून दिवस जात होते, आजच गौरीचा निकाल लागला होता, ती बी. एस. सी. ला कॉलेजमधून प्रथम आली होती. आई-वडिलांच्या पैशाचे सार्थक झाल्याने तिचा आनंद गगनात मावत नव्हता, त्यामुळे ती सर्वांना पार्टी देणार होती, मित्र- मैत्रिणीला बोलवणं पाठवलं मात्र गिरीषकडे ती स्वतः गेली. गिरीषच्या आईला नमस्कार करून सांगितलं तिने पास झाल्याचे.
रात्र केव्हा सरली कळलं नाही. घरात धामधूम उडाली, पाहुणे मंडळी जमली, रेकाँर्डिंग, लायटिंगचा झगमगाट केला होता सगळीकडे. आज रक्षाबंधन व पार्टीचा दिवस, पार्टीसाठी मैत्रिणी जमल्या पण ती फक्त त्याच्या येण्याची वाट पाहात होती, तेवढ्यात तो आला म्हणजेच गिरीष! ती त्याच्याकडे बघतच राहिली शेवटी न राहावून गिरीषच म्हणाला, "गौरी अभिनंदन!"
तेव्हा ती भानावर येत म्हणाली "थँक्यु" हे वाक्य म्हणते न म्हणते तोच तिचे लक्ष गिरीष शेजारी उभ्या असलेल्या एका सुस्वरूप तरूणीकडे गेले, त्या तरूणीने एका हाताने गिरीषच्या कमरेला घट्ट विळखा घातला होता. गौरीने काय समजायचे ते समजून घेतलं तरी, स्वतःला सावरत ती म्हणाली, "या ना बसा!"
गिरीष म्हणाला, "ही माझी भावी पत्नी म्हणजे तुझी वहिनी, आणि बरं का गं स्वरूपा," गिरीष तिच्याकडे बघत म्हणाला, "ही माझी मानलेली बहीण... या राधाकाकू यांच्याच घरात मला प्रेम मिळालं, सुंदर आचार-विचारांचे धडे मिळाले. मला खात्री आहे तुला पण दोघी नक्कीच आवडतील..."
पण हे ऐकायला गौरी होती कुठे? ती पार्टी सोडून दिवाणखान्यात जाऊन ढसाढसा रडत होती. गिरीष आणि तिची आई ते दृश्य बघून अवाक् झाले. शेवटी गौरीच्या आईने तिची समजूत काढली आणि म्हणाली, "अगं वेडाबाई, तुला तर आनंद व्हायला हवा इतका चांगला भाऊ मिळाला म्हणून, गिरीष पाटावर बैस आणि गौरी ताटातली राखी बांध त्याला... तोपर्यंत मी येतेच मिठाईचा पुडा घेऊन."
गौरीच्या डोळ्यातून मात्र अश्रूंचा सडा पडत होता पण बघणाऱ्याला शेवटपर्यंत कळालेच नाही की हे अश्रू दु:खाचे की आनंदाचे? एकीकडे गौरीला आनंद होत होता की आपल्याला साजेसा भाऊ मिळाला म्हणून तर दुसरीकडे दु:ख होत होते की आपलं स्वप्न ढासळले म्हणून...