Jayvant Jadhav

Tragedy Others

1.9  

Jayvant Jadhav

Tragedy Others

सुटका

सुटका

11 mins
842


गोंद्या आणि सकीचा कोयताही इतर ऊस तोडकऱ्यासारखाच ऊसावरून सपासप फिरत होता .शेंडा बुडका तोडताना सारखं वर खाली, वर खाली करून कंबर धरुन आली होती. त्यात नववा महिना लागलेल्या सकीला जास्तच त्रास होत होता . होणारा त्रास सकीच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता . गरोदरपणामुळं सकीच्या कामातील चपळाई थोडी मंदावली होती . पण सकीची ही कसर भरून काढण्यासाठी आणि इतर तोडकरी जोडप्याच्याआपण मागे राहू नये म्हणून गोंद्याची अगदीच कसरत चालू होती . तोडकऱ्यांची पोरं पोरी ऊसाची वाडी गोळा करुन त्यांच्या पेंङ्या बांधून गावात विकून आपापल्या आई बाबाना मदत करत हाती. तर बारकी पोरंही जवळच आपापले खेळाचे डाव मांडून खेळत होतीे.

    सुर्य डोईवर तळपत होता. सारे फडकरी घाई करताना दिसत होते. अर्ध्या एक तासातच फड संपणार होता. आता एका गाडीची बेजमीही होत आली होती. इतक्यात गोंद्याच्या खिशातील मोबाईलची रिंग वाजली. " च्यामायला, आता कामाच्या वक्ताला आणि कुणाचा फोन आलाय ? "गोंद्या स्वतःवरच त्रागा करत पुटपुटला. तोडीप थांबवत एका हातात कोयता धरला.दुसरा हात खिशात घातला. मोबाईल काढला व ऑन करुन कानाला लावला. रखरखणारं ऊन तर मी म्हणत होतं.ऊनात गोंद्या घामानं पार भिजून गेला होता. हातातला कोयता बाजूला ठेवला. गळयात गुंडाळलेल्या टॉवेलनं घाम पुसतच जवळच्या मोळीवर बसला.

  " हां, हॅलो... "

 ऊनामुळं मोबाईलवरच नाव दिसत नात्यामुळे फोनवर कोण बोलतय याचा कानोसा घेत गोंद्या बोलला . फोन ऐकता ऐकता मात्र गोंद्याच्या त्रासलेल्या चेहऱ्यावर अचानक भितीचे भाव पसरु लागले होतेे. अणि बघता बघता गोंद्या ढसाढसा रडायलाच लागला.एकाएकी रडणाऱ्या गोंद्याकडं सकीच लक्ष गेलं. तिचं काळीज चराकलं . अचानक रडायला काय झालं ?? तिला काहीच कळेना. तिनं आपल्या हातातील कोयता तसाच मोळीवर टाकून गो्द्याकडं लगबगीनं आली. टॉवेलमध्ये तोंड खुपसुन रडणाऱ्या गोंद्याचा खांदा एका हाताने हालवत विचारलं, '' अवं का म्हूण रडताय ? काय झालं रडायला ? "

" आपली शिरमी गेली ." गोंद्या आपल्या गदगदत्या आवाजात डबडबलेले डोळे पुसत बोलला. 

" गेली म्हंजी ? " काहीच न समजलेल्या सकीनं चकित मुद्रेनं विचारलं.

''जीव दिला माझ्या भनीनं.." गोंद्याला हुंदका आवरत नव्हता.

" पर का ? " सकीनं विचारलं.

" परशामुळं.रांडच्या परशाच्या जाचाला वैतागून थिमीटाच औसद खाल्ल म्हणं तिनं " परशाला मोठ्यानं शिव्या देत रडणाऱ्या गोंद्याकडं साऱ्यांचच लक्ष गेलं. जवळच्या तुकालाही नेमकं काय झालं कळलं नव्हतं.

" का रं गोंद्या, का रडतुयास ? "

" शिरमीनं जीव दिला. " डोळयातील आसवं पुसत गोंद्यानं सांगितलं. तसं सगळेच भयचकित नजरेनं एकमेकांकडे पाहु लागले. त्यातल्या भिकाजीनच विचारलं , " आरं कशान रं ? "

" त्यो परशा भाड्या, शिरमीचा दाल्ला. त्येच्यामुळचं जीव दिला. काईमच जाच करायचा त्यो पैशापायी. गतसाली आर्दा यकर रान इकून पैसं दिलेलं.पर त्या भाड्याची हाव काय संपत नव्हती. सारखं पैसं आण पैसं आण म्हणून मारबडव करायचा. बिचारीनं कंटाळून जीव दिला असल. " डोळ्यात आसवं तराळलेली सकी उद्वेागानंच बोलली.सकीचं बोलनं ऐकून फडात एकदमच शांतता पसरली.

" गोंद्या,मग आता रं ?" शांतता भेदत भिकाजीनं विचारलं.

" आता आणि काय. आता मला निगाय पायजे " गोंद्या रडू आवरत आणि डोळे पुसत उठता उठताच बोलला.

"सकी आवर लवकर.कंची गाडी मिळती काय बगू. '' गोंद्या लगबगीनं बोलला तसं सकीनं पदरानच तोंड पुसत एक मोठा ऊसासा सोडला. आता या अवघडलेल्या अवस्थेत ओढातान करत गावाला जाणं खरं तर सकीच्या जीवावर आलं होतं. पण गेल्याशिवाय काय इलाजच नव्हता.

" आता या पोरींचं काय करायचं?" आपली मुलगी कमली व आक्की कडं लक्ष गेल्यावर सकीला प्रश्न पडला.

"सकी तुमी जा. पोरी आमच्या संगत ऱ्हातील. आमी बगतो त्यास्नी. इकडची काय काळजी करू नगा." पारीकाकीच्या बोलण्यानं सकीला थोडं बरं वाटलं . या अवघडलेल्या अवस्थेत पोरींचं हे लटांबर आणखी सोबत घेऊन जायच सकिच्या खरचं जीवावर आलं होत.

" व्हय काकी, पोरींवर जरा ध्यान ठीव. त्यांचं ते करून खातील पर झोपायला तुमच्या जवळच घ्या. रात्रीचं घाबरत्यात ती." 

सकी कोयता, टॉवेल घेता घेता बोलली. आपले आई बा आपल्याला सोडून जायलेत हे ऐकून कमली अाणि आक्की कावऱ्याबावऱ्या झाल्या.सकीनं कमली आणि आक्कीच्या गालावरून हात फिरवला . त्यांची समजूत घालून गोंध्या आणि सकी घाईनच निघाले.

गोंद्या आणि सकीला दोन पोरीच होत्या. थोरली कमली आणि धाकटी आक्की .आक्कीनंतर सात वर्सान सकी पुन्हा गरोदर होती. गोंध्याच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. दोन एकर जमीन असली तरी ती बिनभरवशाची. पाऊस पडला तर पिक नाहीतर तणसुदधा उगवायचं मुश्किल. पोटासाठी मग असं परमुलुखात येऊन कष्ट उपसावं लागायचं. गोंद्याही राबणारा होता. मनानं हळवा, भावूक होता. व्यसन म्हणावं तर आहे आणि म्हणावं तर नाही असच होतं. कारण वर्षातनं कधीतरीच एक दोन वेळा प्यायचा. पण प्यायला तर मात्र तो माणसात नसायचा. आपण काय करतोय याचं त्याला भान नसायचं.एरवी मात्र देवमाणूस. गोंद्याचे वडील गोंद्या लहान असतानाच जग सोडून गेलेले. घरात आई आणि एकूलती एक बहीण शिरमी. शिरमिला जवळच्याच एका तांड्यात दिलं होतं. पण बिचारीच्या संसारात काही सुख म्हणून काय नव्हतं. सासरच्या जाचानं घाण्यातल्या ऊसगत पिळून गेली होती. अंगाचं तर चिप्पाडं झालं होतं. हुंड्यासाठी परशाकडून बिचारीला नेहमीच मारबडव व्हायची. गोंदयानंही आपल्या बहिणीच नांदणं सुरळीत व्हावं म्हणून अर्धा एकर जमीन विकून पैसेही दिले होते. पण एवढयाने त्यांची भूक भागत नव्हती. बिचारी शिरमी आपल्या भावाला आणि घरच्याना त्रास नको म्हणून पाहिल्यासारखं आता काय सांगायचंही सोडून दिलं होतं. फोनबीन करायचही ती टाळत होती. पण आईचं काळीज गप्प बसत नव्हतं. आईच कधीमधी आपणहुनचं आपल्या लेकीला फोन लावायची. फोनवर बोलणारी शिरमी मात्र गळ्यात दाटून येणारा हुंदका गळ्यातच दाबून उसण्या अवसानानं चांगलं हाय म्हणायची. कंठ दाटून आला की फोन कट करायची .पण आई तिच्या बोलण्यावरनच लेकीचं दुःख ओळखायची. लेकीसाठी कालवाकालव व्हायची. डोळ्यात आसवं तरळायची. लेकीच्या नशीबावर स्वतःच त्रागा करून घ्यायची. म्हणायची,

 '' माझ्या लेकीचं रोजचच मरण हाय.आसं रोज रोज मरण्यापरिस जल्मली तवाच कायबाय होऊन मेली असती नायतर मीच जीव घेतला असता तर बरं झालं असतं. या जल्माच्या जाचातनं तरी सुटका झाली असती. देवानं बाईचा जल्म कशाला घातलाय कुणास ठावं. "

 गोंध्या आईचा उद्वेग ऐकून अस्वस्थ व्हायचा. सकीच्या आईचही खरचं होतं. रोजचा होणारा त्रास शिरमी सहन करत होती. नेहमीसारखच आजही पुन्हा सकासकाळीच परशानं शिरमिला मारबडव करायला सुरवात केली होती.

 " म्हायेरास जा अाणि तुझ्या भावाकडनं घर बांधाय पैसं आण. घर बांधाय पैसं कमी पडल्याती. " परशा चढ्या आवाजात शिरमीवर डाफरत होता .

  "व्हय , राबराब राबणाऱ्या माझ्या भावाकडनं फुकट पैसं आणतो आणि तुमी आयतं बसुन खावा. हिम्मत न्हाई तर भिक मागून कशाला घरं बांधताय. पडू दे की तुमचं घर तसच. काय झालं तरी मी पैसं मागायची न्हायी. " 

शिरमी आज इरेस पेटली होती.आज ती कुणाचीच भिड ठेवत नव्हती.आपल्या माहेरच्या माणसांना काय पण बोललेलं तिला अजिबात खपत नव्हतं. आज तर ती खुपच संतापली होती. उलट बोलणाऱ्या शिरमीचा परशालाही खुपच राग आला होता. रागाच्या भरात त्यानं शिरमीच्या झिंज्या ओढतच बाहेरच्या खोलीत आणलं होतं. शिरमीची ही सहनशीलता आता संपली होती. तिनं मनाचा हिय्या करून आपले केस हिसडा मारून सोडवून घेतले आणि पळत जाऊन वरच्या फळीवर ठेवलेली थिमिटाची पावडरची पिशवी घेतली. त्यातली पुड मूठभरून घेतली आणि काही कळायच्या आत तिनं आपल्या तोंडात भसकन कोंबली. अचानक व अनपेक्षित घडलेल्या या घटनेनं परशाचे धाबे दणाणले .परशा धावत येऊन तोंडातली पावडर बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला. पण शिरामिनं तोंडच उघडलं नाही . बघता बघता शिरमीचे डोळे पांढरे झाले. जालीम औषध रक्तात कवाच भिनलं होतंं. सकीचं अंग आता थंड पडू लागलं होतं.दवाखान्याला घेऊन जाण्याची उसंतही शिरमीनं परशाला दिली नव्हती. शिरमीन जाचातून स्वतःच आपली कायमचीच सुटका करून घेतली होती.

      शिरमीन जग सोडून जाणं गोंद्यानं मनाला चांगलच लावून घेतलं होतं. शिरमीच्या आठवणीनं सैरभैर, अस्वस्थ होत होता. डोळयातलं पाणी थांबत नव्हतं. गेले तीन चार दिवस पोस्टमार्टम, पोलिस चौकशी, मूठमाती देणे या धावपळीतत केंव्हाच संपून गेले होते.

   सकीलाही तीन चार दिवस आपल्यापासुन दुर असलेल्या आपल्या मुलींची आठवण येत होती.सकीच्या मनात परत कामावर जावसं वाटलं. तसं ती गोंद्याला कचरतच म्हणाली, " अवं, तिकडं पोरी एकट्याच हाईत. कधी जायचं ? "

गोंद्यालाही मुकादमाचा सकाळीच फोन आला होता. निदान पोरींसाठी तरी कामावर जाणं भागच होतं.

    गावावरून फडावर परत आलेल्या गोंद्याचं मन मात्र पाहिल्यासारखं कामावरं लागत नव्हतं. शिरमीनं भोगलेल्या त्रासाच्या,दुःखाच्या आठवणीन मन कासावीस होत होतं, गहिवरून येत होतं. सकीलाही येण्याजाण्याच्या लांबच्या प्रवासाची दगदग सहन झाली नव्हती.आज गावावरून आल्यापासुन ती कामावर गेलीच नव्हती. पोटात दुखत होतं म्हणून ती पालातच पडून होती. पोटात कळा वाढायला लागल्या तसं तिनं आक्कीला बोलावलं,

"आक्की जरा फडाकडं पळत जा. आणि तुज्या बाला आणि पारीकाकीला बोलावून आण. पोटात दुखाय लागलंय म्हणावं." 

 घाबरलेली आक्की धावतच गेली. निरोप ऐकून दोघंही लगबगीन यायला निघाले.पारीकाकी आणि गोंद्याला पाला जवळ येईल तसं लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तसं दोघानी एकमेकाकडं संशयान पाहिलं. ते पाला जवळ येताच त्यांचा संशय अगदी खराच ठरला. ही दोघं यायच्या अगोदरच सकी बाळंत झाली होती.पाला जवळ येताच पारीकाकी लगबगीनं पुढं झाली. पालात शिरली आणि पारीचं एक जूणं लुगडं समोरच्या उघड्या बाजूला आडोसा करून बांधलं. गोंद्या बाहेरच घुटमळला. थोडया वेळानं पारीकाकीनं आवाज दिला , 

" आरं गोंदया, जरा जाळ कर आणि चुलीवं पाणी ठीव तापवायला. "

" व्हयं व्हय. ठेवतो " म्हणत गोंद्या लगबगीनं चुलीकडं गेला. जाता जाता -

"पारी काकी...सकी आणि लेकरू बरं हाईत न्हवं ?" गोंद्यानं न राहून विचारलं.

" आरं बाबा, बरी हाईत. तू पाणी ठीव .मी बगते बाकीचं. " सगळी आवराआवर करता करता पारीकाकी आतूनच बोलली. तसं गोंद्यानं जवळच पडलेल्या काटक्या मोडल्या आणि दगड लावलेल्या चुलीत कोंबल्या. काटक्याजवळच ठेवलेल्या रॉकेलच्या बाटलीचं बुच काढून बाटलीच्या तोंडावरच एक कापडाचा बोळा भिजवला व चुलीत काटक्याखाली सारला. आणि आगकाडी पेटवता पेटवताच पारीकाकीला उत्सुकतेनं विचारलं,

" काकी, काय झालंय. पोरगा का पोरगी? "

" काय रं बाबा, आणिबी पोरगीच झाली नव्हं.. "

पारी काकी कन्हतच बोलली. पारीकाकीचं उत्तर ऐकून गोंद्या एकदम गप्पच झाला. हातातली काडी काही पेटत नव्हती. नाराज झालेल्या गोंद्या रागान जोरातच काडी पेटवू लागला पण काडी पेट घेत नव्हती. गोंद्यानं पुन्हा नव्यान दुसरी काडी घेतली.गोंद्या काहीच बोलत नाही तवा तो नाराज झाला असल असं समजून पारीकाकी समजूतीच्या सुरात म्हणाली, 

" आरं गोंद्या ,काय वाईट वाटून घेऊ नगस. पोटाला पुन्यांदा तुजी भैन शिरमीच जलमलीया समज. "

पेटवलेली काडी चुलीत टाकताच चूल भडकन भडाकली. ' पुन्यांदा शिरमी ' म्हणताच गोंद्याच डोकंही चुलीसारखच भडकन भडकलं होतं. पुन्हा पोरगी झाल्यानं आधीच डोकं तापलेलं त्यात ' पुन्हा शिरमी ' म्हणताच त्याचं डोकचं सणकलं. 'पुन्हा शिरमी ' म्हणजे पुन्हा शिरमी सारखेच भोग तिच्या वाट्याला येणार. ' या विचारानं तो अस्वस्थ झाला. पुन्हा शिरमी सारखे भोग हिच्याबी वाट्याला नको. इतकेच नव्हे तर पोरगीच नको.' गोंद्याच्या डोक्यात नको त्या विचारानी घर केलं. गोंद्या अविचाराच्या गर्तेत सापडला होता. चुलीतला जाळ पेटतच होता. चुलीवर पाण्याचं भूगूनं ठेवायचं भानही त्याला राहिलं नव्हतं.

" गोंद्या ठेवलास काय पाणी तापवाय? "

पारीकाकीच्या हाकेनं गोंद्या भानावर आला.

    गेले दोन दिवस गोदया खुपच तणावात होता. मन बेचैन, सैरभैर झालेलं. गोंद्याच्या अस्वस्थ मनान मात्र दारुला जवळ केलं होतं. गेले दोन दिवस गोंद्या पिऊन तर्रर्र होता.

  आजही गोंद्या भरदुपारीच पिऊन झेपडतच पालाकडं येत होता. सारे फडकरी दुपारच्या विश्रांतीनंतर पुन्हा कामावर जात होते . त्यात त्या सर्वांच्याबरोबर फडावर तोडपीला निघालेल्या जाणत्या विठूनं वाटेत आडवं येत विचारलं , " काय रं गोंद्या, आजबी तोडपीला येत न्हाईस व्हयं रं. आरं लई खाडं झाल्याती. मुकादम वरडत व्हता सकाळी. अशानं पैसं कसं फेडणार त्यो? असं म्हणत व्हता. "

"आरं इतकं कशाला टेंशन घ्यायचं बाबा. कुणाला काय पोरी होत न्हाईत व्हयं? आरं डोक्यातलं खुळ काढ. पिणं बंद कर आणि ये उद्यापास्न कामावर ." 

  गोंद्या मात्र काहीच न ऐकल्या सारखं करुन न बोलता झेपडतच पुढं निघूनही गेला होता . तसाच येऊन तो पाला जवळच्याच दगडावर झिंगत बसला होता . गोंद्या आजबी पिऊन आलाय म्हणून सकीची संतापानं कायबाय तणतण चालूच होती. गोंद्या मात्र डोळ्यांची झापडं ताणत झिंगत शांत बसला होता. पण डोक्यात मात्र विचारांचं चक्र गरगर फिरतच होतं.

 गोंद्यानं झिंगतच सभोवार नजर फिरवली.आसपास कुणीच नव्ह तं. सारी पालं रिकामीच होती . सारीच फडावर गेली होती. नाही म्हणायला दुरवर कमली आणि आक्की खेळत होत्या तेवढंच.पालात बाळाचं रडनं आणि सकीचा गोंध्याच्या नावानं शिमगा चालूच होता. बराच वेळ रडणाऱ्या बाळाला खाली ठेवत सकी बाळानं ओले केलेले कपडे वाळत घालण्यासाठी बाहेर आली. बाळानं घाण केलेले कपडे धूवून टाकण्यासाठी घागरीतलं पाणी बादलीत ओतलं. तिकडं सकी बाहेर आलेली पाहून गोंद्या हळूच पालात शिरला. आज पहिल्यांदाच गोंद्यानं बाळाला पाहिलं होतं.पारीकाकीनं म्हटल्यासारखं त्याला त्या बाळात खरचं शिरमीच दिसत होती. बाळाला बघता बघता शिरमीचं बालपण, तिचं खेळणं, बागडणं आणि तिच्या लग्नानंतर तिचे झालेले हाल, सासरचा जाच सगळं डोळ्यापुढून सरसर सरकत होतं. शिरमीच्या आठवणीनं आई नेहमी त्राग्यानं बोलत असलेले बोल पुन्हा पुन्हा कानावर आदळू लागले

' माझी लेक तवाच काय बाय होऊन मेली असती तर या रोजच्या मरणातन सुटका तरी झाली असती.' 

नशेतल्या गोंद्याच्या मनात नको त्या विचारनं थैमान घालायला सुरवात केली होती. त्याच्या मनात सारखं येत होतं, ' व्हय, आईचच खरं. पोरगीचा जन्मच वाईट. या पोरीच्याबी जन्मात शिरमी सारखे भोग वाटेला नको. आधीच पदरात दोन पोरी.आता हिला आणि कुठला हुंडा आणायचा ?हिलाबी हुंड्यासाठी मारबडव नको. त्यापेक्षा आताच हिची या जन्मातनं सुटका केलेली बरी.'

नशेत असलेल्या गोंद्याला आपण काय करायला चाललोय याचं भानच उरलं नव्हतं. आपल्याला मुलगी झाली म्हणून की शिरमी सारखे भोग नको म्हणून आपण कोवळ्या जीवाला संपवायला चाललोय हे त्याचत्यालाच कळत नव्हतं. पण गोंद्या मात्र मनात चमकून गेलेल्या निर्णयावर ठाम होता. पिणाऱ्याच्या अंगात राक्षस शिरतोय म्हणतात ते काही खोटं नव्हतं. गोंद्याच्या अंगातही असाच अविचारांचा राक्षस संचारला होता.

नशेतला गोंद्या झिंगत झिंगतच पुढं झाला. एकवार आपले डोळे घट्ट मिटले. एक लांब उसासा सोडला आणि आपला उजवा हात रडणाऱ्या बाळाच्या नाकातोंडावर घट्ट दाबून धरला. तान्हुलं कोवळं बाळ गुदमरलं. तिकडं बाहेर गेलेल्या सकीला बाळाचा आवाज एकाएकी गुदमरुन बंद झाल्यासारखा वाटला. घाबरी घुबरी होऊन हातातलं कापड तिथच टाकून सकी धावतच आली. समोरचं दृष्य पाहुन तर तिला धक्काच बसला. गोंद्यान बाळाचं नाकतोंड घट्ट दाबून धरलं होतं. ती वीजेच्या चपळाईनं पुढं झाली. आणि आपल्या दोन्ही हातांनी गोंद्याला जोरात ढकललं. सकीच्या धक्क्यानं गोंद्या लांब जाऊन पडला. सकीनं बाळाला पटकन वर उचललं. पाहते तर बाळाचा श्वास बंद पडलेला. तिनं जोरात हंबरडा फोडला.सकीच्या जोरात रडण्यानं गोंद्या भानावर आला. नशेत आपण काय केलय हे त्याच्या लक्षात आलं. पडलेल्या जागीच तो लगबगीनं उठून बसला. बसल्या जागीच त्याला दरदरुन घाम सुटला. अंगाला कापरा सुटला.सकी ऊर बडवून घेऊन रडू लागली. तसं नशा उतरलेला गोंद्या चटकन वर उठला. घडून गेलेल्या घटनेचे परिणाम त्याच्या डोळ्यासमोर दिसु लागले .तो जागेवरून चपळाईनं उठला व धायमोकलून रडणाऱ्या सकीचं मानगुट एका हातान पकडलं आणि दुसऱ्या हातानं सकीचं तोंड ताकदीनिशी दाबून धरलं.सकीचा आवाज तोंडातच बंद झाला पण तिची सोडवून घ्यायची धडपड थांबली नव्हती.गोविंदाच्या ताकदी पुढं मात्र तिचं काहीच चालत नव्हतं. उगाच बोभाटा नको म्हणून तोंड दाबून धरलेला गोंद्या आता चांगलाच शुद्धीवर आला होता. बराच वेळ प्रयत्न करूनही आपली सूटका होत नाही हे पाहुन सकी हताश झाली होती. सकीचा प्रतिकार हळूहळू कमी होत गेला. गोंद्याही बराच वेळ तसाच होता.सकीचा जोर एकदमच कमी होत गेला. तसं डोळ्यात पाणी आणून गोंद्या स्वतःच ढसाढसा रडू लागला. त्याचा सकीच्या तोंडावर दाबून ठेवलेला हातही हळूहळू सैल झाला होता. पश्चातापाचे अश्रु गोंद्याच्या डोळ्यांतून घळाघळा वाहु लागले होते.

" सकी मला माप कर. नशेत नको ते खुळ माझ्या डोक्यात शिरलं होतं बघ. जे व्हायला नको हुतं ते झालं. खरं हिच्याबी नशीबात शिरमी सारखे भोग नको म्हणून माझ्या हातनं हे पाप घडलं." गोंद्याची पकड आता पूर्ण ढीली पडली होती. सकीचं अजूनही ढसाढसा रडणं चालूच होतं. गोंद्या काय बोलतोय याकडं तिचं लक्षच नव्हतं. तिचं सारं लक्ष बाळावरच खिळलं होतं. रडताना डोळ्यातून ओरंघळणारे अश्रु बाळाच्या अंगावर पडत होते. आणि एकाएकी सकीच्या उबदार अश्रूंनी की आणखी कशानं माहित नाही पण बाळाची दचकल्यासारखी हालचाल सकीला जाणवली. सकी चमकली.सकीनं बाळाला एकदा जोरात हलवलं. हलकीशी चापट मारली. चापट मारताच बाळानं अचानक टाहो फोडला. श्वास कोंडलेल्या बाळाचा श्वास पुन्हा सुरु झाला होता.

   सकी आणि गोंद्याच्या जीवात जीव आला.सकी बाळाचे अधाशासारखे मटामटा मुके घेऊ लागली. कुणाच्या नशिबी काय वाढून लिहून ठेवलय त्या विधात्यालाही माहित नसताना गोंद्या मात्र या गोंडस नवजात बाळाची या जन्मतूनच सुटका करायला निघालेला. अघोरी जाचातून बाळाची सुटका करू पाहणाऱ्या गोंद्याचीच नियतीने या दुष्कर्मातून सुटका केली होती


Rate this content
Log in

More marathi story from Jayvant Jadhav

Similar marathi story from Tragedy