सुमा
सुमा


गावाशेजारी शेतातच भटकी लोकं पाल ठोकून राहू लागली. त्यांच्यासोबत माणसाबरोबर कुत्री-मांजरदेखील त्यांनी सांभाळली होती. त्यातीलच एका झोपडीत गंगी व म्हाद्यासोबत त्यांची लेक सुमा राहात होती. ती जरी डोंबाऱ्याची लेक होती तरी गोरीपान, सडपातळ, लांबसडक केसांची, घाऱ्या डोळ्यांची अशी सुंदर होती. जसा कोळशाच्या खाणीत हिरा सापडावा ना तशी होती सुमा.
लहानपणापासून सुमाला डोंबारी खेळाची आवड नव्हती. गावातील पोरी शाळेत जाताना ती बघत होती. तिलादेखील वाटायचं आपण पण शाळा शिकावी.
एकदा ती आईला म्हणाली, "माय मना शालेत जाव दे की. मना बी शाला शिकून लय मोटं व्हायचंय."
आई म्हणायची, "बयो, शाला आपन नाय शिकायची. शाला शिकून तू काय करनार? मास्तरीन व्हनार काय? बाबा तर काय दिवसभर काम करून घरी दारू पिऊन येनार."
एकदा सुमाला राहवेना दारू पिऊन आलेल्या बाबांना तिने विचारलं, "बा मना बी जाऊद्या की शालेत. मी नाय डोंबारी खेल खेळनार."
बाबा रागाने लालेलाल झाला आणि तिला बोलला, "शाळा शिकून काय करणार? निमूट चल खेल कराया."
नाईलाजास्तव ती खेळ करायला जाई पण तिचे सारे लक्ष शाळेत जाणाऱ्या मुलींकडेच असे.
सुमा काही वेळ मिळाला तर तो शाळेच्या बाहेर व्हरांड्यात बसून घालवी. नाहीतर देवळात जाऊन भजन, किर्तन चालू असे तिथे ऐकत बसे. असे दिवसामागून दिवस जात होते. रोज डोंबारी खेळ करायचा व रात्री कोरडी भाकरी किंवा भात तिखट टाकून खावा असे दिवस ती काढत होती. शाळेचे नाव काढले की पाठीत रपाटे बसत होते.
बघता बघता सुमा चौदा वर्षांची झाली. पहिल्यापेक्षाही आता ती अधिकच सुंदर दिसू लागली. तिच्या बापाला दारूचे व्यसन असल्यामुळे पैशाच्या लालूचपायी एक पन्नास वर्षाच्या म्हाताऱ्याच्या गळ्यात तिला बांधली. सुमाने खूप विरोध केला पण बापाच्या पुढे तिचे काहीच चालले नाही. खूप ढसाढसा रडली. हात-पाय जोडले. मला लगीन करायचं नाही म्हणून बापाला विनवणी केली पण बापानं तिचे काही एक ऐकले नाही. शेवटी पन्नास वर्षाच्या बीजवराजवळ सुमाचं लग्न लावलं. तिने पण आपलं नशीबच फुटकं समजून सारं स्वीकारलं.
लग्न लावून सुमा सासरी आली. दारात तिच्या स्वागताला सावत्र सूना आल्या. एवढी लहान वयाची सासू पाहून त्यांना नवल वाटलं व तिची दयादेखील आली. त्यामुळे ती घरात आल्यापासून सूना तिची खूप काळजी घेत होत्या. तिला हवं नको ते पाहत होत्या. तशी सासरची परिस्थिती चांगली असल्यामुळे सुमाला कसली कमतरता पडत नव्हती.
बघता बघता वर्ष उलटलं. सुमाने मुलीला जन्म दिला. सुमासारखीच तिची मुलगीही सुंदर होती. बाराव्या दिवशी बारसं केलं. मुलीचं नावं आशा ठेवलं कारण तिच्या अपूर्ण इच्छा तिला मुलीकडूनच पूर्ण करायच्या होत्या.
हळूहळू मुलगी रांगायला लागली. सुमाचे दिवस मुलीचे कोडकौतुक करण्यात जात होते. पण देवाला काही वेगळंच घडवायचं होतं. तिच्या नशिबी आता कुठे सुख येत होतं पण तेदेखील देवाला पाहवलं नाही. कारण एक दिवस असेच दुपारी सुमाचे पती घरात बसले असताना अचानक त्यांच्या छातीत कळ आली आणि त्यातच त्यांचे प्राण गेले.
सुमावर आभाळ कोसळले कारण आता आधार कोणाचा? वडिल गेल्यावर मुलांची व त्यांच्या बायकांची मती बदलली. त्यांनी सुमाला घराबाहेर काढलं. आता छोट्या मुलीला घेऊन कुठे जायचं हा प्रश्न सुमासमोर होता. पण पहिल्यापासून ती मनमिळावू असल्यामुळे बाहेर तिला सगळी खूप मानत असत. त्यामुळे तिच्या सावत्र मुलांनी तिला बाहेर काढल्यावर गावातील माणसांनी तिला राहायला खोली दिली. गावातील बायकांबरोबर शेतावर रोजंदारीवर जावू लागली. दिवसभर खूप कष्ट करी. तिचे एकच ध्येय होते आपल्यासारखी आपल्या मुलीच्या आयुष्याची फरफट हाऊ द्यायची नाही. तिला खूप शिकवायचं आणि मोठं करायचं.
त्याप्रमाणे सुमाने आशाला शहरात शाळेत घातलं. हॉस्टेलला आशा राहू लागली. सुमा खूप सारे कष्ट करे. एकवेळ उपाशी राहून आशाला पैसे पाठवी.
बघता बघता आशा मॅट्रिक पास झाली. सुट्टीला घरी आली व म्हणाली, "आई मला पुढे शिकायचे आहे. शिक्षण घेऊन नोकरी करायची आहे."
सुमाने आपल्या परिस्थितीची जाणीव आशाला करून दिली नाही. ती म्हणाली, "शिक बाळ. शिकून लय मोठी हो."
आशा आता डी.एड. करून नोकरी करू लागली. कष्ट करून सुमादेखील खूप थकली होती. नोकरी करून आशाने एल.एल.बी.ची परीक्षा दिली आणि वकील झाली. सुमाचा आनंद गगनात मावेना. ती गावभर सांगत सुटली, "माझी आशा वकील झाली. माझी आशा वकील झाली." लोकांनीदेखील तिचे कौतुक केलं.
सुमाचे सारे कष्ट आशाने पाहिले होते. खूप शिकून आईच्या इच्छा आपण पूर्ण करायच्या हे आशाने ठरविलं होतं व त्याप्रमाणे दिवसरात्र एक करून तिने वकिलीची परीक्षा दिली.
आशा सारखाच शिकलेला मुलगा पाहून सुमाने तिचे थाटात लग्न लावले. आता सुखाचे दिवस आले होते पण नियतीला काही वेगळंच घडवायचं होतं. अचानक सुमाची तब्बेत बिघडली. दिवसेंदिवस ती अधिकच ढासळत गेली. आशा तिच्या नवऱ्याबरोबर आईला बघायला आली. आईला आपल्याबरोबर चल, चांगल्या डॉक्टरला दाखवू म्हणाली. पण सुमा नको म्हणाली. खूप आनंदात आहे मी, सारं काही मिळालंय मला. आता आनंदाने मरणाला सामोरी जाईन म्हणाली. तिने लेकीकडे डोळे भरुन पाहून घेतले व हसत हसत तिने शेवटचा श्वास घेतला. तिच्या चेहऱ्यावर तृप्तपणा दिसत होता. सारं सुख भरभरून मिळाल्याचा आनंद होता. कारण तिच्या साऱ्या इच्छा तिच्या लेकीने पूर्ण केल्या होत्या.