The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Tanuja Inamdar

Tragedy Others

4.0  

Tanuja Inamdar

Tragedy Others

श्रावण

श्रावण

4 mins
56


तूफान कोसळणारा कोकणातला पाऊस. कडेकपरीतुन ओसंडून वाहणारे धबधबे आणि श्रावणाच्या आगमनाने हिरवागार झालेला निसर्ग. तुषारला पाऊस खूप आवडायचा. मुंबईच्या प्रचंड घामट हवेत पावसाची चाहूल लागली की हा प्रचंड खुश व्हायचा. एका मोठया मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर काम करून चांगलं मोठं पॅकेज घेणारा तुषार एरवी वर्षभर कधीच सुट्टी घ्यायचा नाही, पण पावसाळा सुरू झाला की वरचेवर याच्या सुट्ट्या सुरू. जोरात पाऊस असला की हा आपली आवडती बुलेट घेऊन बाहेर पडायचा. 

दरवर्षी एक नवीन ठिकाण शोधून काढून खेड्यापाड्यात जाऊन निसर्ग आणि पाऊस यांच्या सोबत वेळ घालवायचा हा नेहमीचा शिरस्ता. त्यासाठी तो वर्षभर अशा युनिक ठिकाणांचा शोध घेत असे. सोलो ट्रव्हलिंग करत असल्याने त्याला अगदी स्वतःच पोट भरता येईल एवढ्या गोष्टी करता येत असत, आणि राहायला सोबत त्याचा टेंट असेच. त्यामुळे हॉटेल हवं अशी काही त्याची अट नसे. गावातल्या देवळात देखील तो आरामात राहू शके. अगदीच उन पाऊस असला तर गावातल्या लोकांची परवानगी घेऊन मोकळ्या जागी आपला टेंट लावून तो दिवसभर फोटो काढत बसे. मनमौजी असा तुषार. दिसला देखणा, उंच, रसिक मनाचा. व्यायामाने तयार झालेलं पिळदार शरीर. कोणीही पाहिल्यावर प्रेमात पडावं असं व्यक्तिमत्व. पण हा कधी कुणाच्या प्रेमात पडला नाही. म्हणजे त्याला हे सगळं खोटं वाटायचं. सगळं टाइमपास वाटायचं. अनेक मुली त्याच्या मागेपुढे करत राहयच्या. पण याने कधी ते सिरयसली घेतलंच नाही. मित्र मैत्रिणी गप्पा टप्पा हे सगळं तो एंजॉय करायचा. पण त्याच्या स्टेटसला कधी "इन रिलेशनशिप" हे आलं नाही. 

आयुष्य बंधनात जगू नये असं त्याला वाटायच. प्रत्येक क्षण आपल्याला हवा तसा जगता यायला हवा. त्याने अनेक मित्र पाहिले होते की ज्यांची मित्र की प्रेयसी यात फार ओढाताण होत असे. काही मित्र तर याला म्हणत ही "तू बरा रे एकटा आहेस. वाटेल ते करू शकतोस. कटकट नाही कसली."


या वर्षी देखील असाच तुषार तूफान बेफाम पडणाऱ्या पावसात बाहेर पडला. तो एक सोलो ट्रॅव्हलर होता. एकट्याने फिरयला त्याला फार आवडायचं. सोबतीला गझल आणि बुलेटची धडधड असली की बाकी काही नको. मुंबईहून निघलेला तुषार पावसात भिजत मधेच थांबून चहा आणि भजी यांचा मनमुराद आनंद घेत कोकणात केळशीला पोचला. समुद्राचा अतिशय सुंदर किनारा लाभलेलं हे गाव, सोबतीला उंचचउंच नारळ सुपारीची बाग, समुद्र पाहूनच मन खुश झालं. मुंबईचा समुद्र वेगळा हा वेगळाच. स्वच्छ किनारा असणारा, ना गर्दी, ना कोलाहल. अगदी शांत फक्त त्याची गाज ऐकायची. तो निर्माण करत असलेल संगीत ऐकायचं. तुषारने गावात राहण्याची सोय होते का पाहिलं आणि नशिबाने त्याची एका घरी सोय झाली. मस्त फ्रेश होऊन गरम गरम कोकणी पद्धतीच्या जेवणावर ताव मारून निवांत झोपी गेला. सकाळी उठून आवरून नाश्ता करून तो बाहेर पडला. खूप वेळ समुद्राचे फोटो काढले. हिरवेगार डोंगर कॅमेऱ्यात कैद केले. आजूबाजूच्या निसर्गाचे अनेक अनेक फोटो त्याने काढले. दिवसभर फिरून थकून जेव्हा तो राहत असलेल्या ठिकाणी आला, तेव्हा मस्त गवती चहा आलं घातलेला चहा आणि भरपूर ओला नारळ घातलेली मोकळभाजणी त्याची वाटच पाहत होते. ते खाऊन तो आपला कॅमेरा घेऊन आज काढलेले फोटो पाहण्यात रमून गेला. एक एक फोटो अगदी झुम करून बारकाईने बघत बसला असताना, एक अतिशय सुंदर चेहरा त्याला एक फोटो झुम करून पाहताना नजरेला पडला. भान हरपून पाहावं असा तो चेहरा. तो आठवू लागला ते ठिकाण, जिथे तो फोटो घेतला होता. आता मात्र तो अस्वस्थ झाला. या आधी अनेक मुली त्याला तो आवडतो असं सांगणाऱ्या भेटल्या होत्या. पण त्याला मात्र कोणी आवडली नव्हती. पण या चेहऱ्याने त्याला नजरबंदी केलं होतं. आता कधी एकदा सकाळ होते आणि आपण पुन्हा याच जागी जातो आणि या मुलीला प्रत्यक्ष पाहतोय, भेटतो असं झालं होतं. अशा वेळी खरंच घड्याळ खूप उशिरा धावतं असं वाटत राहत.


एरवी एवढी पायपीट करून थकलेला तुषार बेडवर पाठ टेकली की लगेच निद्रादेवीच्या अधीन होत असे. पण आज मात्र ती देखील त्याला प्रसन्न होई ना. नजरे समोर तोच चेहरा सतत तरळत होता. सकाळी अगदी पहाटेच उठून तयार होऊन बाहेर पडून हा समुद्रावर पोचला. सूर्य नुकताच आकाशात डोकावत होता. हा मात्र नारळाच्या झाडा आड लपलेला तो चेहरा शोधण्याचा प्रयत्न करत होता. खूप वेळ वाट पाहिल्यावर त्याला ती दिसली. एखादी परी, अप्सरा असावी एवढी देखणी स्त्री त्याने आज पर्यन्त पहिली नव्हती. तो हरवून गेला स्वतःला तिच्यात. ती समुद्रावर येऊन लाटा बघत बसली होती. याला बोलायच तर होत पण बोलणार कसं हा प्रश्न. तिने गैरसमज करून घेतला काही तर? पण त्याला तिच्या जवळ बोलल्या शिवाय चैन देखील पडणार नव्हतं. तो धीर करून गेला. तिच्या पेहरावा वरुन ती देखील कुठून तरी शहरातुनच आलेली वाटत होती. त्याने हाय, म्हटलं. काही तरी बोलायचं म्हणून बोललायला सुरुवात केली. तेव्हा त्याला कळलं ती डॉक्टर होती. नुकतीच ती इथे आली होती आणि तिने स्वतची प्रॅक्टीस इथे या खेडेगावात सुरू केली होती. तिला देखील फोटोग्राफीची खूप आवड होती. आवडी जमल्या आणि मग गप्पा ही खूप झाल्या. 4 दिवसात परत जाणारा तुषार 8 दिवस झाले तरी तिथेच रमला. एवढ्या पटकन ते मनाने एकमेकांच्या जवळ आले की तुषारने तिला प्रपोज देखील केलं, एवढी त्याला ती आवडली होती. आयुष्यात आवडलेली पहिली मुलगी. पण तिने नकार दिला त्याला. त्याच्या बुलेटच्या धडधडीपेक्षा ही तिच्या नकाराने हृदयात झालेली धडधड खूप जास्त होती. नकार घेऊन निघलेला तुषार पुन्हा एकदा वर्षभराने तिथेच परत श्रावणात गेला. पण तिने कधीच ते गाव सोडलं होतं. पण तुषार मात्र अजूनही न चुकता श्रावणात केळशीला पोचतो. पौर्णिमेच्या रात्री तिच्या एकमेव फोटोला जवळ घेऊन समुद्राच्या साक्षीने तिची वाट बघतो. त्याला अजूनही वाटत ती नक्की येईल. एका श्रावणातील पौर्णिमेला त्याचा चंद्र त्याच्या जवळ नक्की असेल.


Rate this content
Log in

More marathi story from Tanuja Inamdar

Similar marathi story from Tragedy