Rupali Murkar

Tragedy

2  

Rupali Murkar

Tragedy

शेवटची आठवण

शेवटची आठवण

2 mins
172


"आम्ही जातो आमच्या गावा,

आमचा राम राम घ्यावा||

तुमची आमची हेची भेटी,

येथुनीया जन्म तुटी||"


हा अभंग बहुतांश हिंदू संस्कृतीमध्ये मृत व्यक्तींच्या अंत्य विधीच्या वेळी बोलला जातो. लहानपणापासून या अभंगाचा अर्थ कळाला नाही, परी मी तो कधी शोधण्याचा प्रयत्नही केला नाही... पण त्या दिवशी घडलेल्या एका घटनेने समजले...


जेमतेम वर्षापूर्वीची गोष्ट असेल माझी मैत्रिण छकुली, लहानपणापासून आम्ही एकत्रच होतो शाळेतही आणि सगळीकडे त्यांचे आणि आमचे अगदी घरच्यासारखे संबंध होते. छकुलीचे आजोबा आम्ही त्यांना बाबा म्हणायचो... तेही मला अगदी त्यांच्या नातीइतकंच प्रेम करायचे. म्हणून कधी जाणवलंच नाही की मी त्यांची नात नाही असं.


ते आम्हाला शाळेत सोडायला येई. खूप खायला आणत, आमच्या बरोबर अगदी लहान मुलासारखे खेळत असत. त्यांच्याकडे बघितलं की वाटत नसे आपण जे बोलतो की, "Generation gap" वगैरे तसे काही नव्हते. ते जुन्या विचारसरणीचे होते पण बुरसटलेल्या विचारांचे मुळीच नव्हते.


आम्ही लहान असताना ते आम्हाला खूप गोष्टी सांगायचे. मग त्यांच्या कथेचा नायक गिरणी कामगार ते शेतकरी अशी पात्रं असायचा, तसेच शेतीचे अनेक किस्से, गावातल्या  सणांचे किस्से, लहानपणीच्या नातवंडांचे किस्से, या साऱ्यांचा झोपण्याचा अगोदर डोस असायचा. शाळेतून आल्यानंतर रात्री झोपेपर्यंत मी त्यांच्याकडेच असायची. खूप खेळायचो. मग बाबा रेफरी बनायचे, खरंच रम्य ते बालपण...


मागच्या वर्षी त्यांना कॅन्सर झाल्याचं समजलं. त्यांच्यावर त्वरीत उपचार झाले. ऑपरेशनही झाले. जेमतेम सहा महिन्यात ते पूर्ववत झाले होते... परंतु माहीत नाही थोड्याच दिवसा अगोदर समजलं की त्यांना पुन्हा कॅन्सर झालाय आणि त्यांच्याकडे आता खूप कमी वेळ आहे. हे ऐकल्यावर सारं काही क्षणार्धात स्तब्ध झालं. काही महिन्याचे सोबती त्यानंतर ते कायमचे निघून जाणार... आपली आवडती व्यक्ती आपल्याला सोडून जाणार आहे, हे जेव्हा माहीत होतं ना तेव्हा जास्त दुःख होतं, कारण आपण तिथून प्रत्येक दिवस मरत मरत जगत असतो.


ऑफिसच्या कामामुळे हल्ली जास्त काही जाणं-येणं होत नसे, पण येता-जाता मात्र नजरभेट होत असे, परंतु ही बातमी कळताच मी लगेच सुट्टीच्या दिवशी त्यांना भेटायला गेली. बाबा निपचित बेडवर दरवाजाकडे तोंड करून झोपले होते. वयाची 90 पार केल्यामुळे त्यांना लांबचे मात्र तितके सुस्पष्ट दिसत नसे. पण आवाजावरून त्यांनी ओळखलं. मी जवळ गेले आणि बाजूला बसले. त्यांचं कृश झालेले शरीर पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. ते बोलण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांचे शब्द ओठातूनच परतत होते... ते सांगत होते त्यांना होणाऱ्या वेदना. पण आमच्या कानांना त्यांच्या वेदनांच्या किंकाळ्या ऐकू येत नव्हत्या असं नाही. पण त्या न ऐकण्यापलीकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. गोळ्या देऊन थोड्या वेळासाठी त्या वेदना थांबवू शकतो परंतु नंतर काय??


त्यांची पट्टी बदलण्याची वेळ झाली. त्यांना उठता येत नव्हतं, म्हणून मी हात दिला... मला समजलं नाही की तो पकडलेला हात पुन्हा माझ्या हातात येणार नाही. तो स्पर्श शेवटचा असेल. मग थोड्या वेळाने मी बाबांना जाते म्हणून सांगितलं तर तेही इशाऱ्याने "मी पण चाललो" असे बोलले. ते शेवटचं बोलणं... "तुमचे आमचे भेटी, येथूनिया जन्म तुटी..."


सहा दिवसांच्या आत तर, बाबांनी प्राण सोडला आणि अनंतात विलीन झाले... ते एक दिलखुलास स्वच्छंदी मनाचे अगदी प्रामाणिक व्यक्तिमत्व होतं... हा मला आलेला कटू अनुभव होता. त्यांना ही म्हण सार्थ ठरेल असं मला वाटतं, "मरावे परि किर्ती रूपे उरावे..."


Rate this content
Log in

More marathi story from Rupali Murkar

Similar marathi story from Tragedy