Kiran Dakle

Tragedy Others

3  

Kiran Dakle

Tragedy Others

शालिनी कोण होती?

शालिनी कोण होती?

17 mins
538


(ही स्टोरी एका मूळ कथेतील छोटासा भाग आहे. )

(नोव्हेबर)

"तुझं नाव सचिन आहे ना? "

तिचा गोड आवाज कानावर येताच पावसात कुडकुडणाऱ्या माझ्या अंगात सुरसुरी उठली, मला एका क्षणासाठी सगळे काही pause झाल्या सारखे भासले. BSc च्या या तीन वर्षात आज शालिनी मला पहिल्यांदा बोलत होती आणि तेसुद्धा स्वतःहून, खरंच ही गोष्ट माझ्यासाठी काही छोटी नव्हती.

"हो" याच्यापुढे काय उत्तर द्यावे कळलं नाही मला.

"आणखी कोणी आलं नाही का रे, शेखर सर एक्स्ट्रा लेक्चर घेणार आहे म्हणून मी पण लवकर आले. पण इथे तर कोणीच नाही, पावसामुळे सरसुद्धा नाही आले."

"पावसात अडकले असतील कुठेतरी...येतील.. आणि पाऊस तर बघ..पावसाळ्यात पडायचा तेव्हा पडत नाही आणि आता बघ कसा पडतोय तुफान."

"ह्म्म्म" अस म्हणत तीने बॅग मधून स्टोल काढला आणि शॉलसारखा अंगावर घेतला.

बोलणे थांबू नये म्हणून मी तिला विचारलं, "तू शिवानीची फ्रेंड आहे ना?"

"हो, का रे?"

"असच, सहज विचारलं"


एक छोटी smile देऊन ती शांत उभी राहून पुढे पावसाला पहायला लागली, मी स्वतःलाच ताना दिला....हे काय विचारणं झालं का? काय तर 'शिवानीची फ्रेंड आहे ना?.... साडे दहा वाजत होते आणि extra लेक्चर साठी लवकर आली होती, आणि मी सुद्धा पावसामुळे लाईट गेली म्हणून नाईलाजास्तव लवकर आलो होतो,नाहीतर सर्वात उशिरा येणारा मीच. नाहीतरी रूममेट्सने पावसात उस्मान भाईंचे भजे खायच्या निमित्ताने माझं पाकीट रिकाम केलंच असतं....

  जेव्हा मी इथ पार्किंग मध्ये आलो तेव्हा पार्किंग मध्ये ती क्लास मधून एकटी उभी होती..मी सायकल पार्क केली आणि आणि लगेच चलन काउंटर कडे पळालो, पावसापासून वाचण्यासाठी तीच एक चांगली जागा होती, आणि माझं बघून ती सुद्धा पळतच चलन काउंटर ला आली... थोडी ओली झाली होती बिचारी, पण खूप सुंदर दिसत होती आज ती. पांढरा गुलाबी कुर्ता, निळी जीन्स आणि ओलसर लांब काळे केस खांद्यावरून घेतलेले...खूपच सुंदर.. आणि एक मोहक परफ्यूम चा गंध होता तिच्या शरीराला, मन अगदी प्रसन्न.

धूम पिक्चरमधला अली आठवतो ना, त्या अलीसारखं मी तिच्यासोबत गर्लफ्रेंड, वाइफ, मुलं असा ड्रीम सिक्वेन्स एका सेकंदात ठरवून घेतला. पण आता पुढे काय बोलू शालिनीसोबत ! एकतर मला या कॉन्फिडन्ट् मुलींची भीती वाटते, माहीत नाही यांना कधी कोणत्या गोष्टीवर राग येईल आणि गाल लाल करून जाईल.....

ड्रामा क्लास बाहेर लावलेल्या short film च्या जाहिरातीकडे बघत तीनेच पुढचा प्रश्न केला..

"तू पिक्चर बघतोस का रे?"

"अरे सवाल...movie बघायला खूप आवडत मला" मी म्हणालो...आणि विचारलं "तुझी फेवरेट movie कोणती आहे?"

"ये जवानी है दिवानी" "रणवीर काय जाम भारी आहे यार त्यात." अस म्हणत पावसाने दिशा बदलल्याने स्वताकडे येणाऱ्या पाण्यापासून वाचण्यासाठी ती थोडी माझ्याकडे सरकली.

मी हसलो आणि विषयांतर होऊ नये म्हणून "फक्त रणवीर आवडतो की movie सुद्धा आवडते?"

माझ्या प्रश्नावर ती थोडी हसली, आणि आमचं movie मधील बनी आणि नैना च्या विचारावर चर्चा सुरू झाली.


तिला बनीचे विचार खूप आवडायचे, त्याच character कसं; जग फिरायचं, वेगवेगळ्या लोकांत मिसळायचं, नवीन नवीन शहरात फिरायच, कुणासाठीही आपलं आयुष्य न थांबू देणार. तशीच ती होती...ती देखील कुणासाठी आपलं आयुष्य स्वप्न थांबवायचे नव्हते.. आणि या विरूद्ध मला नैना चं पात्र माझ्या तर्कसंगतीचे वाटत; कितीही प्रयत्न करा, शेवटी काही ना काही मागे राहणारच आहे तर मग आता ज्या क्षणात आपण आहोत त्या क्षणाची मज्जा घायची.


मला शालिनी खूप आवडायची, पण ती इतकी सुंदर होती की माझा मेंदू मला समजवायचा.... ''बाळा...तू कुठे तू कुठे, विचार पण नको करू तिचा.''

पण आज मी शालिनीशी बोललो, आणि माझ्या मनात आनंदाच्या लाटा उसळायला लागल्या होत्या आणि पोटात धक धक होत होतं. अस समजा की हे सगळं एका कॅमेऱ्याच्या वाईड शूट मध्ये सुरू आहे, आम्ही एका ठिकाणी उभा आहोत, पावसाचे हलके हलके तूषारे आमच्या अंगावर उडत आहे, थंडी थंडी हवा तिच्या मोकळ्या केसांना परेशान करत आहे...आणि यासोबत मागे बॅकग्राऊंड ला 'main hun na' पिक्चर मधले ती व्हायोलिन वाजवणारे पोरं व्हायोलिन वाजवत आहे आणि एक गाणं सुरू आहे

" रिम झिम गीरे सावन, सुलग जाये ये मन

 भिगे आज मौसम में, लगी कैसी ये लगन

 रिम झिम गीरे सावन........"

..........................................................................


कालच्या रंगलेल्या गप्पावरती मैत्रीचा शिक्कमोर्तब करण्यासाठी शालिनी आज माझ्या बाजूला येऊन बसली. क्लास मधे बसून बसून आम्ही दोघं कंटाळलो होतो, मी कंटाळलो होतो कारण मला केमिस्ट्री ची schiff base रिअँक्शन काही केल्या समजत नव्हती आणि ती कंटाळली होती कारण तिला ती रिअँक्शन अगोदरच येत होती. तिने रॉक, पेपर,सिजर चा गेम सुरू केला माग काय, 15 डावापैकी 6 मी जिंकलो 4 ती जिंकली आणि बाकी ड्रॉ झाले. लेक्चर नंतर लंच ब्रेक सुरू झाला, आम्ही सगळे बॅग घेऊन कॅन्टीन ला निघालो. मी माझ्या नेहमीच्या मित्रांसोबत निघालो होतो, तोच,

"ये सचिन ऐक ना, थांब थोडावेळ"

"का गं, काय झालं?"

" ऐक ना आपण बाहेर जाऊया का कुठेतरी फिरायला? आणि लंच पण बाहेर करूया, आज टिफीन ला हलवा आणलाय तर मग बाहेर जाऊन खाऊया का?"

मी मित्रांकडे बघत बघत तिला विचारलं.."कुठे? आणि practical च काय?"

"एका दिवसाचे काही नाही होत रे....आज आपल्या बॅच एकत्रित बसविणार आहे, आणि काही खास होणार नाही...तू सांग जायचं का?"

"पण कुठे जायचं?"

"तू सांग तर यार अगोदर , जायचं का? मग सांगते कुठे जायचं ते?"

मी नजर फिरवली, आशुतोष, शैलजा आणि बाकी काही एक दोन क्लासमेट आमच्याकडे बघत होते, जुई आणि अंशिका पाण्याच्या कूलर पाशी उभे राहून परिस्थितीचा अंदाज घेत होत्या. आता या सगळ्यांना गॉसिप करण्यासाठी विषय देत तिला म्हणालो, "हो, चल".

"एक काम कर, तू अॅक्टिवा घेऊन गेट च्या बाहेर थांब. मी मित्राला सायकल ची key देऊन येतो."

"ओके. पण लवकर ये हा."

.

.

.

.

.

"हा, चल आता" अस म्हणत मी अॅक्टीवा वर बसलो पण मग आता हात कुठे ठेऊ? तिच्या खांद्यावर? नको नको, मुलीसारखी पोज वाटते. मग तिच्या कमरेवर?...अबे कानफडात बसेल ना....मग मी तूर्रम खां बनायचा विचार सोडून दिला आणि चुपचाप अॅक्टिवाच्या बॅकरेस्ट ला पकडून बसलो.

तसे अॅक्टीवा वरती मी आमच्या दोघात अंतर ठेवले होते...."मैत्रीचं अंतर" पण काय आहे ना तिच्या त्या मुलायम केसांना हे अंतर मान्य नव्हतं, तीचे ते केस लहरत होते आणि या नादात ते माझ्या चेहऱ्यावर येऊन माझ्याशी जवळीक करू पाहात होते.

आज तीन वर्षात पहिल्या वेळेस मी एका मुलीसोबत औरंगाबाद शहर पहात होतो, काळभोर ढगांनी भरून आलेलं आभाळ आणि त्याच्या छायेत एका सुदंर मुली सोबत मी फिरतोय म्हणजे अगदी सोने पे सुहागा, त्यामुळे आज औरंगाबाद अगदीच सुंदर दिसत होतं. आणि सहज म्हणून अंदाज लावून पहायचा विचार केला की खरंच औरंगाबाद अगोदर पासूनच इतके सुंदर आहे की शालिनीच्या सहवासामुळे मला हे इतकं सुंदर दिसत आहे.

..........................................................................


प्रेमाची सगळ्यात खास गोष्ट काय आहे माहितीये का? जेव्हा आपण प्रेमात असतो ना तेव्हा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आनंद मिळत असतो. जसं की, आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत फिरायचं, मावळत्या सूर्याकडे बघत आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत बसून गप्पा मारणे,रस्त्याने फिरणे, गाणे ऐकणे, चिमण्यांची चिवचिव, हवेची मंद झुळूक, रात्री गच्ची वरती जाऊन तुटत्या ताऱ्याची वाट पाहणे आणि तो दिसताच काहीतरी मागणे....माझ्या आयुष्यात प्रेम साखरे सारखं होतं, ते माझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणात विरघळत जात प्रत्येक क्षणाला गोडवा देत होतं आणि या गोडव्या मुळे मलादेखील प्रत्येक क्षण प्रेमळ वाटायला लागला होता.

माझं शालिनिप्रती असणार प्रेम मला एक उत्कृष्ठ फिलॉसफर बनवू पहात होतं आणि माझ्या त्या फिलॉसॉफी ची भाषा फक्त शालिनी समजू शकणार होती किंवा अशी व्यक्ती जी माझ्या दृष्टिकोनातून प्रेमाकडे पहात असेल..माझ्या फिलॉसॉफीच्या दृष्टिकोनातून प्रेमाला मी कोणतीच व्याख्या परिभाषा दिलेली नव्हती, प्रेमाला आणि प्रेमाचे अनंत रूप असतात अस मी मानत होतो. लहानपणीच प्रेम, शाळेतलं प्रेम, किशोरवयातील प्रेम, शेजारचं, गल्लीतलं प्रेम, Facebook प्रेम, एकदिवसीय प्रेम, कसोटी प्रेम, इतकचं काय तर एका तासाचे प्रेम, एका नजरेत झालेलं प्रेम, आणि हो....या सर्वात अतिशय वेगळे म्हणजे एकतर्फी प्रेम. परंतु यांनी काहीच फरक पडत नाही की आपल्याला या पैकी कोणते प्रेम झालंय ते...फरक याने पडतो की प्रेमात असताना त्या प्रेमळ क्षणांना किती अनुभवलं ते...

शालिनी माझ्या आयुष्यात तेचं प्रेम घेऊन आली होती ज्याचा प्रत्येक क्षण हा बहरलेला होता. मातीतून पहिल्या पावसाच्या येणाऱ्या सुगंधासारखा, पण प्रेमामध्ये कदाचित घड्याळाच्या काट्यांची गती सहसा जास्तच वाढत जाते आणि आपल्याला कळत सुद्धा नाही.

.....................................................................................

(मार्च)


BSc च्या exam नंतर शालिनी दिल्ली ला काकांकडे UPSCच्या तयारीला जाणार होती. या चार महिन्यात मी तिला प्रपोज करूच शकलो नाही. 4मार्च म्हणजे कॉलेज चा शेवटचा दिवस राहणार होता तिच्यासाठी, सबमिशन करून त्याच रात्री ती मुंबई ची ट्रेन पकणार होती आणि तिथून दिल्ली. "ती कायमची जाणार या विचारापासून मी नेहमी पळ काढायचा प्रयत्न करायचो कारण मी पहील्यांदा कुणाच्यातरी इतक्या जवळ आलो होतो की जर ती माझ्यापासून दुरावली तर कस होईल या विचाराने मला भीती वाटायला लागली होती.


हे चार महिने एका म्युजिकल फिल्म कटत होते. एकमेकाशी बोलणे नाही झालं तर आमचे बैचेन होणे, तिने माझ्याकडे पाहून smile देणे, चालू क्लास मध्ये एकमेकांना जीभ दाखवून चिडवणे, एकत्र बसलो तर नोटबुक वरती चॅटिंग करत बोलणे, Hike वरती romantic sticker पाठवणे, फोन वरती तासनतास बोलत बसणे, आणि आठवड्यातून दोन तीन वेळा क्लास बंक करून आमच्या आवडत्या ठिकाणी जाणे. हे सगळं माझ्यासाठी एका स्वप्नापेक्षा कमी नव्हते. शालिनी ला किशोर कुमार चे गाणे आवडायचे, कधी कधी ती गाणे गाऊन दाखवायची. अभ्यासाबरोबर तिला डान्स करायला खूप आवडायचं. आणि तिचा राग.....तिचा राग नेहमी तिच्या नाकाच्या शेंड्यावर असे, तीला कोणी छेडायची मजाल? आणि कोणी छेडलच तर तिथेच त्याची वरात काढल्या शिवाय तिला चैन पडत नसे. हळू हळू आम्ही एकदुसऱ्याला जाणायला, समजायला लागलो. शालीनीचा संगतीमध्ये मला एक गोष्ट कळली की टॉपर मुलीच्या आयुष्यात फक्त पुस्तकच नसतात, त्यांच्यामध्ये ती प्रत्येक गोष्ट असते जी आपण एका मुलीच्या सवयी मध्ये शोधत असतो. एकदा लहानपणीची गोष्ट सांगता सांगता शालिनी माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन रडली होती. ज्या मुलीशी एकदातरी बोलणं व्हावं अस माझं स्वप्न होतं आज तीच मुलगी तिच्या साऱ्या शंका, अडचणी मला सांगत होती.

हे सगळं एका लयबध्द तालावर सुरू आहे अस वाटत होते.

"अभी कुछ दिनो से लगे ऐसे

जैसे दिल है मेरा धुत नशे में

क्यू लडखडाये, गाये, बहके दिल रास्ते में

हैं दिल पे मेरे शक मुझे

क्या इसे प्यार हो गया तूमसे.."

.........................................................................

औरंगाबादमध्ये आमची गप्पा मारण्याची स्पेशल जागा रेल्वे स्टेशन होती आणि दुसरी बौद्ध लेणी,  देऊन यायचो. आम्ही तिथे तासनतास बोलत बसायचो. स्टेशन वरचे काही लोक तर आम्हाला कपल समजायला लागले होते. दामिनी पथकाच्या भीतीमुळे आम्ही सहसा बौद्ध लेणीकडे जात नसत. तिची बडबड ऐकायला खूप मजा यायची,सारखं काही ना काही बोलत असे like, तिला नॉनव्हेज खायला का नाही आवडत, ती जळकी श्रुती तिच्यावर सतत का जळत असते, तिची आई नेहमी छोट्या भावाचीच साईड का घेते, तिला रात्री काय स्वप्न पडलं, अश्या असंख्य विषयावर प्रश्न घेऊन बोलायची.. पण या सर्व गोष्टींमध्ये शालिनी फोकस मध्ये असायची आणि तिथे फिरणारी हवा शालिनीच्या चेहऱ्यावर मखमली सारखा स्पर्श करायची. हवेची मंद झुळूक आली की तिच्या डोळ्यांजवळ आलेली बट लहरायला लागे.

.........................................................................

4 वाजत होते, मी प्लॅटफॉर्म वर एकटा बसून विचार करत होतो, "शालिनी शिवाय किती भयंकर वाटतो हा प्लॅटफॉर्म, किती एकटा आहे मी, तिच्याशिवाय हे प्लॅटफॉर्म किती अपूर्ण भासतय, मी तिच्याशिवाय स्वतःला अपूर्ण समजायला लागलो होतो, आणि आज शेवटचा दिवस होता या अपूर्ण गोष्टींना तिच्या सहवासाने भरून काढण्याचा. मी तिला फोन लावला, "अजीब दास्तां हैं ये, कहा शुरू कहा खतम" हीच कॉलर ट्यून होती तिच्या फोन ची. मला खूप आवडायची ही ट्यून पण नंतर ऐकून झाली की आठवायच की ते sad song आहे. पण कितीतरी वेळ तेचं गाणं मी गुणगुणत बसे.

"हा सचिन"

"शाले, 4 नंबर वरती येऊ शकते का?"

"सच्या, उद्या सबमिशन आहे आणि तू तिथं काय करतोय?"

"काही नाही गं, असच, रूम वरती मन लागत नव्हतं ना म्हणून आलो."

ती काही क्षण शांत बसली, मग म्हणाली,

" सचिन काही झालंय का? रूममेट सोबत भांडण झाले का?" तिच्या आवाजातून मला वाटतं होते की तिला कळले आहे की मी इथे का आलोय पण तरी तिने विचारलं.

मी लांब श्वास घेतला, पण काही खास कारण सुचलं नाही आणि जे सुचलं ते बोलायची हिम्मत झाली नाही, " नाही, बसं असचं, तू येऊ शकते का?"

"अच्छा येते, थांब 20 मिनिट."

तिला यावेच लागणार होतं, आणि का नाही येणार? आज आमची एकत्र भेटण्याची शेवटची संध्याकाळ होती.

मी तिची वाट पहात बसलो, संध्याकाळच्या वेळी त्या लालभडक सूर्यामुळे पूर्ण आभाळ लाल लाल झाले होते. मावळत्या सूर्याला पहात पहात मी विचार करायला लागलो. " शालिनी किती हुशार आहे, इंटेलिजन्ट आहे. अभ्यास असो किंवा दुसरे काही, ती खरंच खूप छान आहे आणि किती सुंदर आहे ती. मी तर तिच्यासमोर काहीच नाही, तरीदेखील मी तिचा मित्र आहे...अशी एक एक विचार करत करत मी आमची प्रत्येक गोष्ट आठवत आठवत फ्लॅशबॅक मध्ये गेलो, तासनतास चालणाऱ्या गप्पा, हसणं, रुसण आणि नंतर एकमेकांना हसवणे. आमच्या पैकी कोणाची तबीयत जर खराब असली तर बैचेन व्हायचो आम्ही. या व्यतिरिक्त ती वेळ काढून मला केमिस्ट्री चे पॉइंट्स समजून सांगायची पण केमिस्ट्री वरती लक्ष केंद्रित करण्या एेवजी मी स्वतः शालिनी च्या रुपावर केंद्रित होई.

"तुला आठवतंय का आपण पहिल्या वेळेस इथेच आलो होतो ते?"

मी तिच्याबद्दल विचार करतच होतो आणि मागून तिचा आवाज आला, मी वळून पाहिले, मागे शालिनी उभी होती.

"अरे, तू केव्हा आली?"


ती खळखळून हसली आणि बाकावर शेजारी बसत म्हणाली, "महाशय, जेव्हा तुम्ही गहिऱ्या चिंतनात लीन होता ना तेव्हा."

ती माझ्या बाजूला बसली खरी पण नेहमी प्रमाणे एक मैत्रीचं अंतर ठेवूनच. जेव्हा मी पहिल्या वेळेस शालिनीच्या मागे तिच्या अॅक्टीवा वर बसलो होतो ना तेव्हा पण हे मैत्रीचं अंतर ठेऊनच बसलो होतो. कदाचित या पेक्षा जास्तच.... परंतु तिच्या इतक्या जवळ येऊन सुद्धा मी खूष होतो तरीसुद्धा आज हे जे अंतर होते ते मला टोचत होते. का? मी आज सांगून टाकू का शालिनी ला, की शालिनी माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते, की मग तिचा हात हातात घेऊन की मैत्रीचं नातं टिकवून मला तिचा प्रियकर सुद्धा व्हायचं आहे, अर्थात माझ्या या विचारांना साथ म्हणून दृश्य देखील सिनेमॅटिक आहेच की.....मावळणारा सूर्य, दूरवरून येणारी ट्रेन, पण जर यामुळे आमची मैत्री तुटली तर? या जर तर च्या विचारात मी पुन्हा हरवून गेलो.

"ओय हॅलो, कुठे हरवला, इतका उदास का आहे?" "काय झालंय सांगशील का?"

"शालिनी, तू दिल्लीला जाणं कॅन्सल नाही का करू शकत?"

शालिनीने तिची नजर रुळावर फिरवली, आणि तिकडेच नजर केंद्रित करून पाहू लागली, जस ती म्हणायचा प्रयत्न करू पहात होती "शक्य असतं तर मी कॅन्सल करू शकले असते", तिच्याकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही पाहून मी सुध्दा ट्रेन मधून उतरणाऱ्या प्रवाशांकडे पाहायला लागलो. पण शालीनीला तो क्षण उदासवाना वाटायला लागला म्हणून मजाक करायच्या अंदाजात म्हणाली,

"काय रे, तू त्या जुई वर लाईन मारतोस ना, नेहमी तिच्या अवती भवती रेंगाळत असतो."

"अरे..... तू हे CID चं काम कधी पासून सुरु केलं? अस काही नाही, आमची practical batch एक आहे म्हणून results साठी बोलतो आम्ही एवढंच..."

"ह्म्मम.... त्या सगळं कळतं मला, पण त्या जुई च्या नादात विसरु नको मला."

"चल ये, आली मोठी शहाणी, तुला याद तरी कोण ठेवेल येवढं, विसरु नको म्हणे, एवढी मैत्री कधी झाली आपली?"

ती खळखळून हसायला लागली, आम्ही काही वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या, आणि बोलता बोलता शेवटचा निरोप देत शालिनी म्हणाली, "यार, तुझ्याशी मैत्री झाल्यापासून कळलंच नाही इतके दिवस कसे गेले ते, कधी कधी वाटते की काल परवाचीच गोष्ट आहे आपण चलन काउंटर समोर भेटल्याची. असं वाटते की जसे एखादे स्वप्न पहात आहे मी आणि अचानक झोपेतून जाग होऊन स्वप्न तुटतय. किती कमी वेळ आहे नाही आपल्याकडे, जितका वेळ जगता येईल तेवढे मनसोक्त जगा म्हणजे नंतर जेव्हा स्वप्न तुटेल तेव्हा पच्छाताप व्हायला नको."

"किती छान झालं असत ना जर आपण वेळोवेळी मागे past मध्ये जाऊ शकलो असतो तर, past मध्ये कस आपल्याला ज्यांच्यापासून दूर जावे लागलय त्यांच्या सोबत राहता आले असते, नाहीतर मग वेळेला pause करता आले असते तर आणखीनच मज्जा नाही का? हा सूर्य बघ, आपल्याला सायंकाळ होण्याची धमकी देतोय, त्याला वेळ pause करून मावळू दिलंच नसत. ही सरसरणारी हवा बघ, ही हवा की नाही आपलं बोलणे रेकॉर्ड करत असते त्या रेकॉर्डिंग ला जर एका drive मध्ये save करता आल असत तर कितीच मजा ना......" येवढं बोलून ती शांत झाली, सूर्य मावळला होता, प्लॅटफॉर्म 2 वर येणाऱ्या ट्रेन ची अनाउनसमेंट झाली होती आणि ट्रेन पकडण्यासाठी गर्दी वाढत होती.

आता आम्हां दोघांत एक शांतता तरंगत, कारण तिच्याकडे बोलायला शब्द राहिले नव्हते आणि मला मला शब्दांची जुळवाजुळव करता येत नव्हते. ती उभी राहिली, तिने चहाच्या स्टॉलकडे पाहिलं आणि माझ्याकडे वळून म्हणाली,

"बरकत ला जाऊया का?"

"हो जाऊया ना, आणि आता तसे पण इथून निघायला हवं."


"आम्ही नेहमी खूप बडबड केल्यानंतर (आम्ही म्हणजे शालिनीने बडबड करायची आणि मी ऐकायची) बरकत चहा प्यायला जात, कधी कधी कॅनॉट परिसरात बिर्याणी, तर कधी कधी MGM कॉलेज च्या बाजूला पाणीपुरी, भेळपुरी खायला जात.....आम्ही दोघे खवय्ये असल्याने आमची मैत्री आणखी घट्ट झाली होती....पण बिर्याणी म्हटल तर मी नेहमी राहुल सोबतच मनसोक्त खाणार कारण शालिनीला नॉनव्हेज खायला आवडत नसे, पण आग्रहास्तव ती माझ्यासोबत खात असे. स्टेशन ते पैठण गेट ला जाई पर्यंत आम्ही शांतच होतो, बरकत ला आल्यानंतर मी टोकण देऊन चहा घेतला, तिथे नेहमी सारखीच गर्दी होती, पण त्या गर्दीची जाणीव मात्र काही होत नव्हती.

चहा पिऊन झाल्यावर स्कुटी ची key माझ्याकडे करत शालिनी म्हणाली, "आज स्कुटी तू चालव, फक्त पाडू नको हा."

मी छोटी smile दिली आणि की स्कुटी स्टार्ट केली, "कसं जायचं?"

"लांबचा round घे"


आमचा लांबचा round म्हणजे, पैठण गेट मधून गुलमंडी चौक ला जायचं आणि तिथून Central bus stand, कर्णपुरा, स्टेशन आणि J टॉवर असायचा, J टॉवर ला मला ती सोडणार आणि तिथून ती घरी जाणार. असा आमचा लांबचा round असायचा. आज पहिल्यांदा ती माझ्या मागे बसत होती, तिला तिच्या अॅक्टिवा वरती खूप प्रेम म्हणून ती स्वतः चालवणार. पण आज ती मागे बसणार होती आणि मी पुढे. औरंगाबदची ती संध्याकाळची हवा आमच्या चेहऱ्याला स्पर्श करत जात होती, शालीनीचे दोन्ही हात माझ्या खांद्यावर होते. अंबा अप्सरा टॉकीज पर्यंत पोहोचलोच होतो तेव्हा शालिनी म्हणाली,

"सचिन, थोडं हळू चालव ना"

मी मुळात स्कुटी हळूच चालवत होतो पण तरी मी तिला म्हणालो,

"अग तुला उशीर होईल घरी जायला, आणि तसे पण............." मी माझं बोलणं पूर्ण करणार तोच शालिनी पुढे सरकली, दोन्ही हात कमरेच्या बाजूने पुढे घेऊन तिने मला मागून मिठी मारली आणि डोकं माझ्या खांद्यावर ठेवले....

मी काय बोलावं मला समजेना, म्हणून मी शांत बसलो, पण तरीही "शालिनी" म्हणून मी तिला आवाज दिला,

" शांत पणे स्कुटी चालव सचिन " ती डोळे बंद ठेऊनच म्हणाली.

मग मला तिथे बॅकग्राऊंड मध्ये म्युजिक आठवलं,

"चूप तुम रहो, चूप हम रहे,

आज खामोशी को खामोषी से....बात करने दो..."

..........................................................................

J-टॉवर ला आल्यावर मी स्कुटी थांबवली, शालिनी अजूनही डोळे मिटून मला बिलगुन होती, पण तिला काय माहित की ती ज्या स्वप्नाला माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन पहात आहे ते आता माझ्या आवाजाने तुटणार होते.

"शालिनी", मी तिला म्हणालो, पण तिने लक्ष दिले नाही, म्हणून मी परत तिला आवाज दिला पण मी या आशेने आवाज दिला की तिने पुन्हा दुर्लक्ष करावं.

"शालिनी"

"हा..." ती जागी झाली, तिने पुढे चेहऱ्यावर आलेले केस कानामागून सावरले, आणि खाली उतरली.

मी स्कुटी स्टँड वरती लावली, उशीर झाला होता म्हणून तिने लगेच स्कुटी स्टार्ट केली आणि एकदा माझ्याकडे पाहिले, पण चेहऱ्यावरचे भाव स्थिर ठेवत तिने लगेच पुढे बघितल, आणि तसच तिने अक्सिलेटर वाढवला आणि निघून गेली.

..........................................................................

ती रात्र माझी स्वप्नात न सरता विचारांच्या साखळीमध्ये सरत राहिली, आणि विचार असे की कसं मला माझ्या या प्रेम कहाणी ला एक परफेक्ट क्लाइमॅक्स देता येईल? कसा शेवट असायला हवा या एकतर्फी प्रेमाचा जेणे करून या एकतर्फी प्रेमाचं रूपांतर दुतर्फा प्रेमात होईल आणि ती माझी होईल....

"उद्या संथ गतीने वारा वाहत असणार, त्यामुळे आम्हां दोघांचे केस हवेत लहरत राहील. उद्या शालिनी लवकर येईल जेणेकरून कॉलेजच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक क्षण ती माझ्यासोबत राहू शकेल. नेहमी मुलीचं भाव खातात, मुलं नाही खाऊ शकत का? मी उद्या मुद्दाम उशिरा जाणार आणि पूर्ण वेळ तिला दुर्लक्ष करण्याची अॅक्टींग करणार. सबमिशन झाल्यानंतर ती माझ्याकडे येऊन म्हणेल,

" राग आलाय का सचिन?"

"राग! नाही.. मला का राग येईल?"

"तुला कळतंय का? तू किती पागल सारखं वागतोय आज ते. तुझ्यात जराशी पण समज नाहीये, नाहीतर तुला कळलं असतं की मी सकाळ पासून तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतीये आणि तू फक्त दोस्तांसोबत बसून आहे."

"अरे..... दोस्तांसोबत नाही बसणार तर मग कोणासोबत बसणार?"

"मग, मी तुझी दोस्त नाहीये का?"

"ते मी कस कसं सांगू? " 


अर्थात 'ते मी कसं सांगू' हे उत्तर देण्यासाठी मला मन घट्ट करावच लागेल....तिला एका क्षणात सर्व काही तुटून गेल्यासारखं जाणवेल, स्कुटीवर पाहिलेलं स्वप्न, इतक्या दिवसाची मैत्री सर्व काही...आणि नंतर ती एक लांब श्वास घेऊन पाणावलेल्या डोळ्यांनी Thanks म्हणून तिथून जायला लागेल आणि तेवढ्यात एक background म्युजिक वाजेल, ती काही पावलं पुढे चालेल आणि मी तिला मागून आवाज देईल,

"शालिनी..... आय लव्ह यू...."


माझा आवाज ऐकुन ती तिथेच उभी राहील, एक क्षण विचार करेल की ती जे ऐकत आहे ते खरंच आहे का? ती जागेवरच मागे वळून माझ्याकडे बघेल आणि लगेच माझ्याजवळ येऊन मला मिठी मारेल, तीचे पाणावलेले डोळे माझा शर्ट ओला करण्याचा प्रयत्न करतील आणि नंतर ती हळूच माझ्या कानात बोलेल,

"आय लव्ह यू टू, सचिन.."


अशा प्रकारे मी माझ्या विचारांचं जाळं विणता विणता केव्हा झोपी गेलो कळलंच नव्हते. सकाळी उठताच डोक्यात पहिला विचार आला तो, शालिनी. मी तयार होऊन कॉलेज ला थोडा लवकरच आलो आणि वाट पाहू लागलो की केव्हा शालिनी येईल, केव्हा ती माझ्याशी बोलायचं प्रयत्न करेन आणि केव्हा मी तिला इग्नोर करेन. मित्रांशी बोलत असताना माझी नजर गेट वरतीच अडकलेली होती, आणि मी माझा मलाच प्रश्न विचारत होतो, "काय मग? कुठे आहे तुझी हिरोईन?". सबमिशन सुरू होण्यासाठी 10 मिनिट राहिले होते तेव्हा ती आली, पांढरा गुलाबी कुर्ता, निळी जीन्स आणि लांब काळे केस खांद्यावरून घेतलेले...खूपच सुंदर.. आज ती डिक्टो तशीच दिसत होती जशी ती त्या दिवशी पावसात काउंटर समोर दिसत होती, आमच्या पहिल्या भेटीच्या वेळी. ती स्कुटी पार्क करून माझ्याकडे आली आणि म्हणाली,

" अरे यार, पेट्रोल पंप वरती गर्दी होती म्हणून उशीर झाला, तू केव्हा आला?"

" अर्धा तास झाला असेल."

"खूप लवकर आला!"

" हो."

"अच्छा चल, सबमिशन करूया आणि मग बोलूया, अगोदरच उशीर झालाय."


मी जसा विचार केला होता तसं काही झालं नाही, शेवटचा दिवस असला तरीही ती नेहमी सारखी बोलत होती, कालची भेट तिने कुठेतरी आठवणींमध्ये साठवून ठेवली होती, आणि ज्याला प्रेम समजत होतो कदाचित ती तिची good bye म्हणायची पद्धत असेल...आम्ही बॅच नुसार आमच्या आमच्या क्लासरूम मध्ये गेलो, 2-3 तास सबमिशन आणि व्हायवा झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. ठरल्यानुसार आम्ही 20-30 जन गेट बाहेरच्या कॉफी स्टॉलवर कॉफी पिली. त्यानंतर सिग्नेचर डे सेलिब्रेट केला. शालिनी ने तिच्या ड्रेस वर कुणालाच काही लिहू नाही दिले. क्लासमध्ये सगळे तिला टरकून असायचे म्हणून कुणी अट्टाहास नाही केला. माझ्या हट्टा समोर देखील ती नमली नाही. पण तिने मात्र माझ्या मागे "भुक्कड प्राण्या, नेहमी आनंदी रहा आणि विसरु नको लिहून खाली सही केली."

साधारणतः 4 वाजत आले होते, तिला लवकर निघावे लागणार म्हणून आम्ही चालत चालत पार्किंगमध्ये तिच्या स्कुटीजवळ आलो. आता आम्ही शेवटचे एकमेका समोर उभे होतो. मी विचार करू लागलो की शालिनी अशीच चालल्या जाईल का? अशाच प्रकारे माझी स्टोरी संपणार का? मी तिला म्हणालो,

"शालिनी"


तिने माझ्याकडे पाहून माझ्या डोळ्यांत बघितल, कदाचित तिला कळलं होतं की मी अस्वस्थ आहे, एक स्माईल देऊन म्हणाली, "काय रे काय झालं? काही बोलायचं आहे का?" हाच क्षण आहे सचिन, सांगून टाक तिला की तू तिच्यावर प्रेम करतो ते, माझं मन मला हिम्मत देऊ बघत होते पण माझी हिम्मत नाही झाली. कुणास ठाऊक कसे काय अश्रूंचा बांध फुटणार तोच शालिनीला दिसू नये म्हणून मी बुटांची लेस बांधायच्या निमित्ताने खाली बसलो आणि कसे बसे अश्रूंना सावरलं, ते तिला कळले की नाही माहीत नाही. मी उठून उभा राहिल्यावर तिला विचारलं,

"मग कोण येणार आहे सोबत दिल्लीला?"

"अरे, मम्मी पप्पा दोघेही येतायेत. काका काकूला भेटून ते परत येतील.₹

"ट्रेन केव्हा आहे?"

"रात्री 9 ला, अगोदर मुंबई ला जाणार आणि तिथून दिल्ली, आणि यार पॅकिंग पण करायची आहे नाहीतर आज कुठेतरी फिरायला गेलो असतो."

"अरे काही हरकत नाही."

"चल की J टॉवर पर्यंत, तुला सोडते तिथपर्यंत."

J-टॉवर ला आल्यावर मी खाली उतरलो, ती स्कुटी बंद न करता म्हणली, " चल मग, फोन करत रहा, विसरु नको आणि एखादी चांगली मुलगी पटव, त्या जाई-जुई च्या फंद्यात नको पडू, result कळवशील...आणि हो सचिन, आय विल मिस यू...."

मी क्वचितच हसलो, तिने एक्सीलेटर फिरवलं, आणि मी क्लाईमॅक्स ची वाट पहात होतो, बॅकग्राऊंड म्युजिक वाजायची वाट पहात होतो, मी तिला आय लव यू म्हणायची वाट पहात होतो, माझं I love You ऐकून तिने स्कुटी थांबवून मागे वळून पाहण्याची वाट बघत होतो. तिने स्कुटीवरून खाली उतरून माझ्याकडे येत मला मिठी मारायची वाट बघत होतो.....

मी रोडवरती उभा होतो, ट्रॅफिक चा आवाज कानाचे पडदे फाडत होता, उतरतं ऊन चटके देत होतं, एक रिक्षावाला सिटाकरिता ओरडत होता तर बाजूला दोन रिक्षावाले एकमेकांशी भांडत होते, कुणीतरी मंदिराची घंटी वाजवत होतं आणि एक बाईकवाला माझ्या मागे हॉर्न वाजवत होता, जसं की हॉर्न वाजवून तो म्हणत होता, "साईड ला हो यार तुझी स्टोरी घेऊन."


हे जे सगळं होत होतं त्यातून एकच अर्थ निघत होता की आयुष्यातल्या गोष्टी सिनेमॅटिक नसतात, इथे कोणताही कॅमेरा ऐंगल नसतो आणि ना कोणते बॅकग्राऊंड म्युजिक असतं."


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy