रुख्मी
रुख्मी


रुखमी वावराच्या धुऱ्यावर उभी रावून रुख्मी भीरभीरल्या नजरीन इकडे तिकडे पाह्यत व्हती...नजरिच्या टप्प्यात तिले कोनीच दिसेना. '' संध्याकायचे पाच वाजत आले असतीन '' ते सोताशीच बोलली..अन दुर कोनीतरी पांदनच्या रस्त्यान येतांनी तिले दिसल...नजरीच्या टप्प्यात येताच तिन तुकाराम आबाच्या संपतले वयखल अन अवाज देला, ''वो संपत मामा एवळा गवताचा भारा दया बर डोक्श्यावर उचलुन..''संपत सायकल बाजुले उभी करुन आला अन भारा पायला न कायजीन तिले बोलला, ''वो माय, बह्याळ्ली काय तु, एवळा मोठा भारा त मानुस बी नाई नेत.'' रुख्मी फकस्त '' हूं '' म्हनून भारा उचल्याले खाली वाकली. संपत न हात लावून भारा डोक्श्यावर देलान सायकल काळून निंघुन गेला.
रुख्मी पांदनच्या रस्त्यान काइ दुर चालली नाइत एकदमच गच्च आभाय भरुन आल अन पान्याचे टपोेरे थेंब सुरु झाले...पायता पायता पान्याचा जोर वाळ्ला...तशी रुखमीची चाल वाळ्ली...झपझप पावल टाकत ते गाव जोळ क-याले लागली...पान्यान ओलीगट्ट झालती ते अन पानी मुरुन गवताच्या भा-याची वजन वाळ्ल होत...पन तिले त्याची कायी फिकीर नोती ..झपझप चालता चालता रुखमी सोताशीच बोलली, '' देव काय माह्यावालीच परिक्सा पायते काय कायजन? देवा बाप्पा अंधार पळ्याच्या आंदी घरी नेरे बाप्पा''... अस बोलुन अजुनच येगान चाल्याले लागली.....तिले डोयाम्हवरे दिसत होती दोन पाख्याची खोपळी....खोपळीत गयनार पानी...दोनी डोयान फुटकी म्हतारी सासु...दिड वर्साच तान लेकरु अन सा वर्साची गुड्डी...लेकराइच्या कायजिन भर पान्यातई रुख्मीचे डोये पानावले....आंगनता येताच धपदिशी डोक्श्यावरचा भारा आपटुन..वल्या हातानच आंगाच पानी निपटत ...''आत्याबाई ..आत्याबाई '', करत घरात घुसली पन बुढीचा काइच अवाज आला नाई.....
''आत्ता माय, कसं करावं तुमचं? दिवेलागनले कोनी झपते काय?'' अस कुकुरत तिन चिळीचिळीच्या तेलची टिमिटमी लावली..साऱ्या घरात उजीळ पळ्ला...नजर फिरली तस तिच्या कायजात चर्र झाल....बुढी एकाआंग उतान्या तोंडान पळेल होती...पोरगी ए कोपऱ्यात चिळचीप पळेल होती...अन पोरगं...पोरवर नजर गेल्याबराबर रुखमी जोऱ्यान कल्ला कऱ्याले लागली...'' ओ तुका आबा, ओ संपत मामा...माया लेकराले वाचवा हो...या हो कोनीतर.....'' पन बदबद पळनाऱ्या पान्याच्या अवाजात तिच्या आरोया कोनाच्याच कानालोग पोचल्या नाई.....रुखमीतली माय जागी झाली ...सेकंदात लेकराच्या आंगावर खेयनार सा - सात फुटाच अस्सल नांगाचं धुळ शेपूट पकळुन तिन ओळत आंगणात आनल....डोक्स्यावर हात निवून गरगर फिरोल अन् तिनं चार खेप जमिनीवर आपटल... ते मेलं हे पटल्यावच रुखमी सुध्दित आली...ते तसंच जमिनीवर टाकुन ते घरात धावली लेकराले पोटुशी घिवून....पटपटा मुके घेता घेता बुढीजोळ बसलीन...बुढीले उठवाव म्हनुन हात लावला....धक्का लागल्याबरोबर बुढी एकाआंग कलंडली...रुखमीन ''आत्याबाई ..''म्हणुन जोऱ्यान हंबळ्ळा फोळ्ला...बाहिरच पानिबी कमी झाल्याचन तिचा तो अकात साऱ्याइले आयकु गेला..सारे शेजारीपाजारी धावले....तुकाराम आबा बुढीले पायताच मटकन खाली बसले.
शेजारच्या कलाकाकीच ध्यान पोरीवर गेलं....तिले उचलाले गेली त पोरगी सन्न तापीन फनफनेल...दोन तिन जन पोरीले घीवून सरकारी दवाखान्यात गेले...अन बाकीचे बुढीच्या पुळच्या तयारीले लागले. आज तिसरा दिवस झाला. रुखमी भितीले टेकुन लेकर जोळ घिवून बसली होती....सारं गनगोत आल तस निंघुन गेलं ...भावजयीन तिले म्हनलं ...''चार दिस माह्याघरी चला, मन रमील आमासाक..'' तटकन पाठचा भाऊ बोलला बायकोले ...''बह्याळ्ली काय व तू, जरासक पानी आलं त सारं घर गयते, आपलेच त झोप्याचे वांदेे होतंत..अन् हे तिन जिव...'' भावजयी बोलली ..'' हो, तुमचं बी बराबरच हाय..''अन तेही निंघुन गेले... रुखमी एकटक पायत होती ..पायता पायता सारा भुतकाय तिच्या नजरीसमोर आला...
भगवान...साऱ्या गावाचा भगा..अनसाबाईचा एकुलता एक लेक...आंगापिंडान भरेल गळी..कोनाच काईबी काम तोंडावर हमेशा हासु ठेवत करणारा...म्हनुन साऱ्या गावाचा लाडका...त्याच्यासंग माप ओलांडुन रुख्मीन संसार सुरु केला...लय खुस होते सारे...दोगबी मेहनत करत...वरसाभरात पायना हालला ..न पयली पोरगी झाली... न काई वरसान दुसरं पोरगं...संसार सुखाचा चालला होतो...पन कोनाची दिठ लागली काय जनं...आमास्याक मानगीत भगवान भरल्या संसारातून... रुखमीवर तीन जिवाची जबाबदारी टाकून देवाला प्यारा झाला....रुखमीवर तं जसं अभायंच कोसयलं....लय दिवस लागले तिले सावऱ्याले ...शेजीरीपाजारी मदत करत...काई दिवसान ..हिम्मतन कंबर कसुन रुखमी कामधंदा कऱ्याले लागली...पोरीले जिला परिषदीच्या शायेत टाकलं...सारं गाव तिच कोतिक करे...कावून त रुखमी एका मानसासारखा कामधंदा करुन संसाराचा गाडा हाकलत होती....अन आता जो आखरीचा अधार होता घरात मोठ्या मानसाचा तो बी देवानं हिसकावला... आता रुखमीची हिम्मत खसली होती...हातापायातला जोर निंगुन गेल्यावानी वाटे तिले....दिवसभर बसेल रायते.
आजकाल रुखमीच गनीत लयच बह्याळत चालल...टकमक आभायाकडे पायते...मंधातच जोऱ्यान हासते...मंधातच लळते...कामधंद्याची त सोळा तिले लेकराइची बी सुध नाई रत....शेजारीपाजारी लेकराईले खाऊ पिवू घालतात....लेकर ''मा व मा व'' करन बिंलगतात तिले....अन रुखमी आभायाकडे पाहून सोताच्याच तंदरीत बोलते...'' तो पाय बाबा आला...ते पाय आजी आली...का व लेकराइले कपडे आनले ना नवे....अन भात्क आनलं ना? ' अन जोरजोऱ्यान हासते...अन हासता हासताच हमसुन हमसुन लळते...सारं गाव हयहयते तिले पाहून...लेकरं माय असून मायेले पारखे होयेल..अन घर असून अनाथ असल्यवानी ....रुखमीच्या भुवाले लय निरप पाठोले लोकाइन ..की लेकर तरी न्या व...पन त्यान सादं इवूनयी नाइ पायल...आखरी गावातल्या करत्या मानासाईन लेकरं एका अनाथ आसरमात निवून देल्ले...रुखमीले कोनीबी पसा दोन पसा भाकर देते...भानावर असली त खाते..नाईत फकस्त आभायात पायते...अन बडबड करते...''आत्याबाई वो आत्याबाई, पा ना बाबू कसा हासते...अन बाई किती गुनाची पा घर बी झाडुन काळते...'' बोलता बोलता जोऱ्याजोऱ्यानं हासते...जोऱ्याजोऱ्यानं हासते...... फकस्त जोऱ्याजोऱ्यान हासते...