रत्नपारखी शिवराय
रत्नपारखी शिवराय
सकाळच्या दुसर्या प्रहरी लालमहालाच्या सदरेवर उपस्थित मातबर शिवबाराजांची वाट पाहत होते. बाजी पासलकर, सोनोपंत, दादोजी साऱ्यांचीच नजर सदरेच्या प्रवेशद्वारावर खिळली होती. तेवढ्यात राजे आले. गौर रंग, नुकतीच ओठांवरची काळी लकेर थोडी स्पष्ट झालेली, डोक्यावर केशरी जिरेटोप, भाळावर चंद्रकोर, अंगात पांढरा शुभ्र अंगरखा, डाव्या हाती समशेर पेलून चेहऱ्यावर नेहमीचे स्मित ठेवीत दमदार पाऊले टाकीत उपस्थितांचे मुजरे स्वीकारीत राजे आपल्या आसनावर स्थानापन्न झाले. आणि सदरेचे कामकाज सुरु झाले.
सदरेच्या कामकाजातच दुसरा प्रहर संपत आला असता एक इसम दरवाज्यातून आता आला. सर्वांचे लक्ष त्याच्याकडे गेले. सावळा, उंचपुरा, पिळदार शरीराचा, पोलादी छाती असलेला, धापा टाकीत आल्यामुळे त्याची भरीव छाती वर खाली होत होती. त्याच्या अंगात बंडी होती आणि पायात गुढघ्यापर्यंत धोतर. बंडीच्या डाव्या खांद्यापासून पोटापर्यंत चिंद्या झाल्या होत्या आणि तेथून रक्त वाहत होते. रक्ताचे काही थेंब त्याच्या धोतरावरही पडले होते. जागोजागी ती बंडी मळाली होती. पण एवढे असूनही त्याच्या तोंडावर त्या जखमांचा जराही लवलेश नव्हता. त्याचे डोळे विलक्षण चमकत होते. त्याच्या कंबरेला त्याने काहीतरी लटकवले होते. त्याच्या उजव्या हातात त्याच्याच उंचीची चांगली मजबूत, भरीव काठी होती. तिच्या अग्राला दोन घुंगरू त्याने बांधले होते.
तो आला तशी सदरेत एकदम शांतता पसरली. उजव्या हातातील काठी त्याने जमिनीवर आदळली तिच्या अग्राच्या दोन घुंगरांनी त्या शांततेचा भंग केला. आपली नजर जमिनीला जोडत तो इसम म्हणाला, “ शिवाजी राजांचा वाडा ह्योच काय ?”
त्याच्यावर नजर रोखीत राजे म्हणाले, “ हो. पण तू कोण ?”
तशी त्याने आपल्या उजव्या हातातली काठी उजव्या खांद्याला टेकविली आणि दोन्ही हात जोडून तो म्हणाला, “सरकार म्या भीमा ! भीमा लव्हार ! सातारकडचा हाय पण ह्या दुष्काळान जगन मुश्कील केलया म्हणून पोटापाण्याकरता इकड आलोया.”
कागदावरील लेखन आवरत घेत बोरू शाईच्या दौतीत ठेवत दादोजी म्हणाले, “ ठीक आहे. पण ह्या जखमा कशा झाल्या तुला ?”
भीमा हात जोडूनच म्हणाला, “ त्या पलीकडच्या डोंगर पायथ्याला आम्ही वस्ती करून चूल मांडलीया. चुलीकरता सरपण आणाया म्या डोंगरावर गेलो व्हतो. सरपण गोळा करत असता म्होरून आल ना ते ! “
चकित होऊन पंतानी विचारले, “कोण ?”
पंतांकडे पाहत भीमा म्हणाला, “जी तीन- चार लांडग व्हत. म्होरूनच त्यांनी महावर हल्ला चढविला. त्यास्नी रोखाया माह्याजवळ काहीच नाय. “
भीमाने उजव्या खांद्याला टेकविलेली काठी हातात घेऊन जमिनीवर आदळली. अग्राची दोन घुंगरे त्यामुळे किणकिणली. तो पुढे बोलू लागला, “तव्हा म्या हि काठी घेऊन धावलो त्यांच्यावर. आमच्यात मोठी झटापट झालीया. त्यात एकान मला जिमिनीवर पाडलया तर दुसऱ्याने ह्या डाव्या खांद्यावर नख मारलया. त्यास्नी हुसकावून म्या उभा राहिलो तर तिसर आलना अंगावर धावून. म काय ह्या काठीचा एक निबार टोला हाणला कि त्याच्या मुस्काटात. जे जिमिनीवर उतान पडलया ते कायमचच ! “
पालथी मुठ आपल्या पल्लेदार मिशांवरून फिरवत बाजी म्हणाले, “ आन बाकीच लांडग ?”
त्यांच्याकडे पाहत भीमा म्हणाला, “सरकार म्होरका पडल्यावर ते कुट थांबतात. गेल पलोन.”
भीमाच पुढे म्हणाला, “ डोंगर उतरत असता वाटेत माणस भेटली ती सांगत व्हती कि, ‘त्या लांडग्याच शेपूट शिवाजी राजांकड नेऊन दाखीव त्यो तुला त्याच चांगल ईनाम देईल.’ आता म्या बाहेर गावचा मला थोडी हे माहित. म्हणून परत तिकड गोलो आन त्या लांडग्याच शेपूट तोडून तुम्हास्नी दाखवाया आलोया.”
भीमाने कंबरेला अडकविलेले ‘ते’ शेपूट काढून सर्वाना दाखविले. सर्व भीमाला शाब्बासकी देऊ लागले. पुण्याच्या जहागीरीची जबाबदारी जिजाऊसाहेब आणि बाल शिवबा यांनी स्वीकारली होती. मुरार जगदेवच्या स्वारीनंतर पुण्याची अवस्था फार बिकट झाली होती. वाड्यांचे तुटलेले अवशेष, अग्नीत भस्म झालेल्या झोपड्या, रयतेचा आक्रोश, सर्वत्र वाढलेली झाडे-झुडपे, त्यामुळे कोल्हे-लांडगे क्वचित प्रसंगी वाघ यांसारख्या हिंस्त्र प्राण्यांचा मुक्तसंचार आणि हे कमी म्हणून स्वारीशिकारीसाठी येणाऱ्या आदिलशाही फौजा अशी काहीशी अवस्था होती पुण्याची. अशा परिस्थितीत जिजाऊसाहेबांनी पुण्याचे पुनर्वसन केले. वाढलेली झाडे तोडून ती जागा राहण्यायोग्य केली. ज्या भूमीवर कधी काळी गाढवाचा नांगर फिरविला होता तीवर सोन्याचा नांगर फिरविला. हिंस्त्र प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी गावातील लोकांना सांगण्यात आले कि, ‘जो कोणी त्यांची शिकार करून पुरावा म्हणून त्याची शेपूट दप्तरात दाखवील, त्यास सरकारकडून ईनाम मिळेल.’ हळूहळू पुण्याचे गत वैभव त्यास प्राप्त होत गेले. किती तरी लोकांनी शिकार करून शेपूट दाखवून बक्षिसे मिळविली. आता भीमा तेच करावयास आला होता.
राजांनी वैद्यांकरवी भीमाच्या जखमांवर मलमपट्टी करून घेतली. दादोजी त्यास म्हणाले, “भीमा फडात जा तेथील कारकुनांना मी सांगून ठेवले आहे त्यांच्याकडून तुझे बक्षीस घेऊन जा.”
भीमा तिकडे जायला निघाला तोच राजांनी त्याला अडविले. त्याला थांबण्यास सांगून टाळी वाजवून एका सेवकाला त्यांनी बोलावून घेतले. राजांकडून आज्ञा घेऊन सेवक आत गेला. काही क्षणात तो परत आला. त्याच्या हातात एका ताटात रेशमी लाल कपड्याखाली काहीतरी झाकले होते. ते ताट त्याने राजां समोर धरले. राजांनी रेशमी कपडा बाजूला केला. ताटात तलवारीच एक पान होत. नुकतच लोहारशाळेतून आणल्यासारख ते चमकत होत. त्याला धार इतकी कि त्यावर माशी जरी अलगद बसली तरी तिचे दोन तुकडे होतील ! राजांनी तबकाला हातस्पर्ष करून तबक भीमाकडे रवाना केले. भीमाकडे पाहून राजे म्हणतात, “ भीमा आता काठीने नाही तर तलवारीने शिकार करावयाची.”
तबक त्याच्याकडे येताच त्याने ते मस्तकाला लावले. त्यातील तलवार हाती घेऊन मागून-पुढून निट निरखू लागला. शेवटी त्याने तलवारीला डाव्या हातात पेलून, उजव्या हाताच्या अंगठ्याद्वारे मधले बोट तिच्या पात्यावर दोन-तीन वेळा आदळले. पुन्हा तलवारीची मुठ आपल्या उजव्या हातात पकडून, पाते डाव्या हातावर टेकवत तो राजांना म्हणाला, “ सरकार हे पात तर रामपुरी हाय. पण हित भेसळ दिसतीया ! गनिमावर वर्मी घाव घालाया जायचो अन इचच तूकड व्हायचं ! “
भीमाचे हे बोलणे ऐकून सर्वजण शांत झाले. पंतांच्या कपाळावर तर आठ्यांच जाळच पडल. सोनोपंत भीमावर नजर रोखून होते. स्वतः राजांनी दिलेल्या बक्षिसाचा भीमाने असा अपमान केल्यामुळे राजे त्याला कोणती शिक्षा करतील ? या विचारानेच त्यांना घाम फुटला. नुकतेच रांझ्याच्या पाटलाच्या शिक्षेमुळे राजे किती कडक शिस्तीचे आहे ते सर्वाना माहित झाले होते. पंतानी राजांकडे पहिले. राजे अगदी शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित होते. गादीच्या डाव्या बाजूस ठेविलेली आपली समशेर त्यांनी उचलुन सेवकाकडे पाहिले. सेवकाने तत्परतेने पुढे येऊन ती समशेर भीमाकडे नेली. भीमाकडे पाहून राजे म्हणतात, “ भीमा हिची तपासणी करून सांग बरे हिच्यात काही कमी-अधिक आहे का? “
लगेच भीमा त्या तलवारीला अगदी बारीक निरखून पाहून राजांना म्हणाला, “ सरकार हे खर वीराच हत्यार हाय... आई भवानीचाच आसीर्वाद हाय हा ! गनिमास लांबन जरी ह्याच दर्शन झाल ना तरी त्यो पलोन जातोय बघा ! “
चेहऱ्यावरील स्मित जराही कमी न होऊ देता राजे म्हणाले, “ नक्की ना.”
“ सरकार म्या मगाच म्हणालो व्हतु कि म्या लव्हार हाय म्हणून. आजपातुरची सारी हयात माही यातच गेलीया.”
“शाब्बास भीमा.” निश्चयी स्वरात राजे म्हणाले, “आता पोटापाण्यासाठी इतरत्र वणवण भटकण्याची जरुरी नाही. तू हाडाचा कलाकार आहेस. शस्त्र तज्ञ आहेस. आमच्या परीक्षेत तू उजवा ठरलास. आम्ही गनिमांच्या जुलूमांपासून या भूमीस मुक्त करण्याची शपथ घेतली आहे. त्यासाठी आम्हास तुझी जरुरी आहे.”
काहीस घाबरूनच भीमा म्हणाला, “ पण म्या काय करू सकतो.”
“भीमा तू तुझ्या ज्ञानाने आणि अनुभवाने आमच्या शूरवीरांसाठी उत्तोमोत्तम शस्त्रांची निर्मिती कर. आम्ही तुझ्यासाठी एक लोहारशाळा काढून देऊ, तुझ्या सोबत आलेल्या सर्वाना काहीतरी कामे देऊ, तुला डोंगर-दर्यांमध्ये भटकण्याची आता गरज नाही जवळच तुला एक घरही देऊ. बोल तू आहेस तय्यार आमच्यासाठी काम करावयास.”©rohitsarode
सर्वांच्या नजरा भीमावर रोखल्या गेल्या. भीमाला काय बोलावे हेच समजत नव्हते. लांडग्याची शिकार करण्याबद्दलच्या बक्षिसासाठी तो आला होता आणि आता त्याला त्यापेक्षाही मोठ बक्षीस मिळाले होते. आनंदाश्रूंनी त्याच्या नेत्रकडा ओल्या झाल्या होत्या. त्यावर त्याने आपले दोन्ही हात ठेऊन ते पुसण्याचा प्रयत्न केला पण काही फायदा झाला नाही. त्यांची जागा नव्या अश्रूंनी घेतली ! समोर बसलेले राजेही त्याला अंधुक दिसू लागले होते. शेवटी त्याने एक दीर्घ श्वास घेतला. त्याची पोलादी छाती फुगली. इतकी कि त्यावर असलेली बंडी आता फाटते कि काय ? तो दीर्घ श्वास सोडून, दोन्ही हात जोडून कंबरेत वाकून तो म्हणाला, “ हुकुम करा सरकार कशी हत्यारं पाहिजे ते गनिमाला उभ चिरणारी का गनिमाची डोचकी धडापासून अलग करणारी ! आजपासून हा भीमा त्याच इमान तुमच्या पायाशी ठेवतोया त्याला आपल मानून घ्या काही चूक झालीया तर गरीबाला मोठ्या मनान माफ करा ! ...”
