रक्षाबंधन - नाते मनाचे
रक्षाबंधन - नाते मनाचे
नमस्कार,
वाचकांनो ही गोष्ट समजा, किस्सा समजा व एक साधा लेख, पण ह्या तिनही प्रकारात वाचताना ह्यातील दर्शविलेली परिस्थिती वा ती घटना किती वास्तव असेल आणि त्याचे मनांवर झालेले कसे भीषण परिणार असतील ह्याचा विचार करावा हीच विनंती.
एकोणीसशे सत्तेचाळीस चा ऑगस्ट महिना, नागपूरचा राहणारा समर्थ काही कामानिमित्त पंजाबला स्थित झालेला, त्या दरम्यानच्या होणाऱ्या भारतीय राजकारणातील घडामोडींचा तो रोज आढावा घेई, अजूनही आपण पारतंत्र्यात असूनही सडेतोड आपले ब्रिटिशांविषयी विचार ब्रिटिशांसमोरच मांडणारा हा समर्थ, आपल्या लहान बहीण आणि आईस नागपुरातच ठेवून हा इकडे राहत. नुसकत्याच जुलै महिन्यात ब्रिटिश संसदेत मान्य झालेल्या व ब्रिटिश राजेशाही कडून संमती मिळालेल्या इंडियन इंडिपेंडेन्स ऍक्ट १९४७ च्या बातमीने समर्थ हिंदुस्थानास स्वातंत्र्य मिळणार आणि स्वतंत्र भारतीय म्हणून आनंदाची गुढी लवकरच प्रत्येक घरात उभारली जाणार ह्या खुशीत होता.
दीडशे वर्ष होणाऱ्या त्या अंधकारमय सूर्योदयचा अस्त होऊन आपल्या संस्कृतीतील अनेक ऋषीमुनींनी वर्णिलेला, ज्यास अर्घ्य देऊन नतमस्तक होऊन आराधना करता येणारा तो सात्विक, तेवस्वी, प्रखर सूर्योदय अनुभवण्याची इच्छा त्याच्या मनात दिवसेंदिवस तेजोमय होत होती. सगळी कडे स्वतंत्र हिंदुस्थानाचे वारे वाहू लागलेले, हिंदुस्थानातील वातावरणही त्या स्वातंत्र्य मिळाल्यावर होण्याऱ्या सोहळ्याचा थाट आधीच अंगावर चढवून घेऊ लागलेलं. पण म्हणतात ना अनेक सुखद गोष्टींबरोबर थोडी दुःखे येतात तसंच काहीसं हिंदुस्थानच्या बाबतीत झालं, त्या स्वातंत्र्य मिळण्याच्या सुखद प्रसंगात हिंदुस्थान काही व्यक्तींच्या विचित्र वा स्वार्थी निर्णयांमुळे वाट्याला आलेल्या त्या दुःखांचा भार आणि झालेला आघात सहन करू शकला नाही. मे महिन्यापासुन सुरू झालेल्या त्या अखंड हिंदुस्थानच्या फाळणीरुपी ग्रहणाचा अंधार येणाऱ्या स्वातंत्र्याच्या प्रकाशास रोखून धरत होता, त्यातच काही लोकांच्या मान्यतेने ती फाळणी जोमात सुरू झाली आणि अखंड हिंदुस्थान दोन वेगळ्या देशांत विभागला गेला आणि ऑगस्ट च्या चौदाव्या दिवशी पाकिस्तान व चौदाव्या दिवसाच्या मध्य रात्री भारत स्वातंत्र्य झाला. फाळणीचे उमटलेले पडसाद, त्याच्या भारताला होणाऱ्या वेदना, उसळणाऱ्या दंगली आणि ह्याच दंगलींबरोबर येणारे कत्तल रुपी वादळ दिवसेंदिवस फोफावत होते. आता फाळणी प्रक्रिये मुळे समर्थ पूर्णपणे पंजाब मध्ये अडकून गेलेला, भारतातून पाकिस्तान आणि पाकिस्तान ते भारत ही स्थलांतराची प्रक्रिया वेग वाढवत होती, लाखो लोक रोज स्थलांतरित होतं आणि तितक्यांच्याच दिवसेंदिवस कत्तलीही होतं.
समर्थला समजत नव्हतं काय करावं, त्याने पुन्हा नागपुरास जाण्याचा निर्णय घेतला, आजूबाजूचे वातावरण रोज नवनवीन पट मांडत होतं, स्वातंत्र्य मिळूनही होणाऱ्या वेदना कोणीही सहन करू शकत नव्हतं. आजूबाजूने फोफावणाऱ्या दंगलींमुळे त्याने ऑगस्टच्या सव्वीस तारखेच्या मध्यरात्री नागपूर साठी आपली वाट धरली. आपल् जीवापाड प्रेम असणाऱ्या त्याच्या आई आणि बहिणीस भेटून, त्याला पंजाब मधून सुटकेचा मोकळा श्वास घेण्याची घाई झालेली. पंजाब मधूनच आपण आपल्या बहिणी साठी येणाऱ्या रक्षाबंधनानिमित्त काही घेऊ ह्यासाठी वाटेतून त्याने काही छानशी कापडं रमा साठी घेतली, रमा त्य
ाची लहान बहीण, रमाही तिकडे बेचैन होती दादाला भेटायला लवकरच येणाऱ्या रक्षाबंधनाचा तयारीत होती, लहान असल्यामुळे तिला आजूबाजूच्या परिस्थिचे भान नव्हते. आपल्याला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालं एवढंच तिला ठाऊक आणि रक्षाबंधनाला आपल्या नेहमी येणाऱ्या भावाची ओवाळणी करणे. फाळणीच्या विकट परिस्थितीमुळे समर्थला प्रवासात बरेच अडथळे येऊ लागलेले, नेहमी सोयीत होणार रेल्वेचा प्रवास भारत स्वतंत्र होऊनही त्याला त्रास देऊ लागलेला, अचानक दंगली उसळत आणि रक्ताच्या नद्या वाहत. आजूबाजूच्या प्रतिकूल परिस्थितीत समर्थ तीस तारखेच्या मध्य रात्री नागपूरला उतरला, फाळणीच्या विचित्र वेढ्यातून सुटण्याचा मोकळा श्वास त्याने घेतला. पण नियतीने मांडलेल्या पुढील खेळाचे त्याला भान नव्हते, ऑगस्टचा एकतीसावा दिवस उजाडण्यास काहीच तास शिल्लक होती, किंबहूना तेव्हा रमाही तिच्या स्वप्नात समर्थला राखी बांधतच असेल आणि तेव्हाच समर्थच्याही मनात तिच्या राखी बांधणीची आस सतत डोकावत असेल पण तितक्यातच समर्थच्या नागपूरच्या घरा शेजारीच फाळणी समर्थक आणि असमर्थ ह्याच्या झालेल्या वादातून त्याला अचानक मध्यरात्रीच मारहाणीचे, कत्तलीचे आणि नको असलेल्या दंगलीचे स्वरूप प्राप्त झाले, समर्थाचे घर स्टेशन पासून बरेच लांब असल्याने त्याला ह्या घटनेचे भान नव्हते. समर्थची आई आणि रमा आपल्या घरी गाढ झोपेत होते. तितक्यातच सुरू झालेल्या दंगलीत, रॉकेल बाँब चा वापर सुरू झाला आणि त्यातलाच एक समर्थच्या घरात फेकला गेला, सुरू झालेल्या आगीने आपणे घरातील वास्तव्य ठाम केले. गाढ झोपेत असलेली समर्थची आई अचानक त्या गरमीने जागी झाली, पण उशीर झालेला, स्वप्नात आपल्या भावाला ओवाळणी करत असलेल्या रमाच्या चेहऱ्यावर झोपेत येणारे स्मित हास्य लहरत होते, तिची त्या स्वप्नातून बाहेर पडण्याची इच्छा नव्हतीच, आईचे खुप प्रयत्न चालले तिला उठवायचे, शेवटी तिला तसच उचलून नेणार तेवढ्यात बाहेरून पूर्ण लाकडाचे असलेलं समर्थचे घर आगीच्या ज्वलनशील भुकेत पुर्णपणे कोसळले आणि क्षणात झालेल्या ह्या घटनेत समर्थची आई आणि निद्रेत तशीच असलेली रमा त्यात अडकली गेली. आजूबाजूच्या क्रूर परिस्थितीपुढे लोकांना त्या घराचे भानच नव्हते. थोड्या वेळाने दंगल शांत झालेली लोकांच्या नंतर लक्षात आल्याने सकाळी पाणी वर्षाव त्यावर सुरू झालेला, बचावाची वेळ केव्हाच निघून गेलेली. समर्थ सकाळी घराजवळ पोहोचला आणि समोर असलेलं भयाण दृष्य त्याच्या मनाला, त्याच्या शरिराला सुन्न करून टाकणारं होतं, नियतीने त्याच्याशी मांडलेल्या खेळात तो हरून गेलेला, आतुरतेने रमा साठी आणलेली कापडं तशीच कायम त्या बॅगेत पडून राहिली, रमाच्या आज राखी बांधणीची असलेली आस मनातच किंचाळ्या मारत राहिली. लहानशी रमा ह्या स्वातंत्र्य मिळालेल्या भारतात ह्या ३१ ऑगस्ट १९४७ च्या रक्षाबंधनात तिच्या भावाला फक्त स्वप्नातच भेटु शकली. आणि तिची आणलेली समर्थची राखी त्या अग्निबंधनात तशीच जळून गेली. रमा आणि समर्थचे असलेले भाऊ बहिणीचे प्रेमळ नाते ह्या दीडशे वर्षांनंतर स्वातंत्र्य मिळालेल्या भारतात फक्त समर्थच्या मनातच शिल्लक राहिले. बंधनाला सुरवात होण्याच्या दिवशीची क्रूर, स्वार्थी, बेलगाम आणि घातक विचारसरणीमूळे उदय झालेल्या फाळणीच्या ज्वालेत अनेक नाती वास्तवात राख झाली आणि फक्त प्रत्येकाच्या मनांत दुःखद आठवणी घेऊन राहिली.