Tanishq Patil

Tragedy

3  

Tanishq Patil

Tragedy

रेल्वे आणि ती - भाग - ३

रेल्वे आणि ती - भाग - ३

4 mins
196


भाग - ३

शुभदाच्या सासऱ्यानीं तिच्या बाबानां फोन करून सगळी कल्पना दिली. ते ही त्यांच्यासोबत मुंबईला जाण्यासाठी निघाले. सागरची आई टेन्शनमध्ये आली होती. शुभदाला काहीच सांगितलं गेलं नव्हतं कारण बाळ अजून लहान होतं. सागर सोबत नेमकं काय घडलयं हे नक्की माहीत नसल्यामुळे उगीच शुभदाला त्रास नको असं सगळ्यांना वाटत होतं. सागर व्यवस्थित असेल जास्त काही सिरियस नसेल तर त्याला सोबतच घेऊन येऊ असं सांगून दोघेही मुंबईला रवाना झाले. शुभदाची आई तिच्या घरी त्यांच्या सोबतीला आली होती. अचानक आई आल्यामुळे शुभदा खुप खुश झाली. आईला अचानक कशी आलीस विचारल्यावर " जावईबापू उद्या येणार ना!! म्हटलं त्यांच्या स्वागताला जावं म्हणून आलो त्यांना भेटायला." म्हणत वेळ मारून नेली.

इकडे मुंबईत हॉस्पिटलमध्ये पोहचल्यानंतर सागरची तब्येत खुप सिरियस असल्याचं त्या दोघांना सांगण्यात आलं होतं. त्याला brain hemorrhage (ब्रेन हॅमरेज - मेंदु रक्तस्त्राव) झाला होतं. ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्याला जर तातडीने दोन ते तीन तासाच्या आत जर वैद्यकीय उपचार मिळाले असते तर त्याची तब्येत इतकी सिरियस झाली नसती, पण तो रेल्वेत प्रवास करत असल्यामुळे त्याला उपचार मिळण्यास उशीर झाला, त्यामुळे मेंदूत जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाला. मेंदुतील रक्तवाहिन्यांच जास्त प्रमाणात नुकसान झालं होतं. त्याच्या शरीराची काहीच हालचाल होत नव्हती. त्याच पूर्ण शरीर पॅरालाईज्ड होऊन पडलं होतं. डॉक्टरांना त्याच्या जगण्याची काहीच आशा दिसत नव्हती. 

हे सगळं ऐकून सागर आणि शुभदाच्या बाबांचा धीर सुटत चालला होता. दोघेही देवाकडे प्रार्थना करू लागले. त्यांनी शुभदा आणि बाळाला ही तिथे बोलावून घेण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे शुभदा, तिची आई, आणि सासु तिघीही मुंबईला रवाना झाल्या. शुभदाला काहीच कळतं नव्हतं ते सगळे हॉस्पिटलमध्ये का आले आहेत. तिला सागर होता त्या रूम मध्ये नेण्यात आलं. सागरची अवस्था पाहून तिला काय करावं काहीच कळेना, सगळ्यांच्या तोंडाकडे पाहून फक्त हातवारे करू लागली, तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. तिच्या बाबांनी तिला जवळ घेऊन सर्वकाही सांगितलं. सागरबद्दल ऐकून ती आतून पूर्णपणे मोडून पडली होती. त्याची अवस्था तिला बघवत नव्हती. ती बाळाला घेऊन सागराकडे गेली. " तुम्हाला काही नाही होणार, मी तुम्हाला काही होऊच देणार नाही, आपल्या बाळासाठी तुम्हाला नीट व्हावं लागेल, हे बघा, बाळ कसं तुमच्याकडे पाहून हसतंय. त्याला तुम्हाला कुशीत घ्यायचं आहे, ना!!…अहो!!!आपण किती स्वप्न बघितली ना, ती सगळी पूर्ण करायची आहेत आपण दोघांनी मिळून." ती त्याच्याशी बोलत होती. त्याचं शरीर काहीच प्रतिसाद देत नव्हतं, फक्त डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो बोलू ही शकत नव्हता. तो नजरेनीच खुणावून बाळाला घ्यायचं आहे असं सांगत होता आणि अश्रू गाळत होता. त्याची हतबलता पाहून सगळ्यानांच गलबलून येत होतं. 

रात्री अचानक त्याची तब्येत खुप बिघडली, त्याची घालमेल कोणालाही पाहवत नव्हती. डॉक्टरांची धावाधाव सुरू झाली. त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, पण व्यर्थ!!! तो गेला...कायमचा...तिला एकटीला टाकून...बाळाला कुशीत न घेताच...

सागरच्या जाण्याचा मोठा मानसिक धक्का शुभदाला बसला होता. ती सागरच्या जाण्यानंतर रडली देखील नाही. ती कोणाशी बोलत नव्हती. आपल्याला एक बाळ आहे हे देखील ती विसरली होती, बाळ रडले तरी तिला काही फरक पडत नव्हता. शुन्यात नजर लावून तासनतास सागरचा फोटो हातात घेऊन बसून रहायची. तिला डॉक्टरानां दाखवण्यात आलं पण काही फायदा झाला नाही. डॉक्टरांचं म्हणणं होतं की " तिनं व्यक्त होणं फार गरजेचं आहे, जर ती रडली नाही किंवा काही बोलली नाही तर तिच्या डोक्यावर परिणाम होऊ शकतो, पण ती कोणत्याच गोष्टीला प्रतिसाद देत नव्हती.

तिची आई तिला काही दिवसांनी माहेरी घेऊन गेली, तिच्या परिस्थितीत काहीच फरक नव्हता. बाळाचं सगळं तिची आईच बघायची, ती एका कठपुतली सारखी बनली होती. अचानक तिच्या कानात रेल्वेचा आवाज पडला, आणि ती धावतच गच्चीवर गेली." सागर...सागर...म्हणून ती ओरडू लागली. ये ना रे सागर का मला असं एकटीला सोडून गेलास." म्हणत तिने मोठ्याने हंबरडा फोडला. रडत रडत ती रेल्वेशी ही असबंध बोलू लागली " असं कसं झालं गं, माझ्या सागरला माझ्यापर्यंत सुखरूप पोहचवण्याची जवाबदारी मी तुझ्यावर सोपवली होती ना. माझ्या प्रत्येक सुखात तु माझी भागीदार होतीस, माझ्या मनातील प्रत्येक गोष्ट मी तुला निसंकोच सांगायचे ना गं. तु मला अगदी जिवाभावाची वाटायचीस. मला तुझं खुप अप्रुब वाटायचं गं, तु दोन बिछडलेल्या जीवांना एक करायचीस, कधी एखाद्या आईला तिच्या लेकराशी भेटवलं असणार तु. किती लोकांना तु आनंदाचे क्षण दिले असतील. पण...पण माझ्या दुःखाची साक्षीदार तुच बनावसं. तुला पाहिलं की मला किती आनंद व्हायचा, तुला माहीतच आहे ना गं. पण...पण माझ्या सुखाची भागीदार आज माझ्या दुःखाची साक्षीदार बनली, म्हणत ती रागारागाने खाली पळत आली, आणि अद्वैतला, आपल्या बाळाला छातीशी कवटाळून ओक्साबोक्शी रडू लागली.

रेल्वे आणि शुभदाच नातं आजन्म असंच अबाधित राहणार होत पण त्या नात्याचं स्वरूप मात्र जरूर बदललं होतं...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy