kishor karanjkar

Tragedy

5.0  

kishor karanjkar

Tragedy

पंचनामा

पंचनामा

8 mins
17.2K


आज सुदामा सकाळीच रानातुन चक्कर मारुन परतत होता. चेहऱ्यावर जरा जास्तच आनंद होता. डोक्यात काय काय विचार चालू होते. या वेळेला पिक चांगले आले आहे. मागच्या वर्षी दुष्काळामुळे आपल्या हातात काहीच लागले नाही आणि घर दुरुस्त करायचे होते ते सुध्दा राहिले. नविन काहीच वस्तू पण घेता आली नाही. कमीत कमी ह्या वर्षी तरी ते करता येईल आणि मुलीच्या लग्नाचे कर्जदेखील फेडता येईल. म्हणजे मुलाच्या शिक्षणाला पण खर्चालासुद्धा ठेवता येईल.

"काय सुदामा कसा काय म्हणतीय पिक पाणी ?? औंदा काय लै मज्जा आहे राव तुझी. जवारीच कणीस तांब्यासारखं पडलयं मर्दा रानात" पाटील.

"राम राम पाटील. वाईच जाऊन आलो रानात आत्ता जवारी आलीया भरत आता. यंदा पाऊस चांगला झालाया.. जवारी, गहु, आणी लागलंच तर थोडफार उस बी हाय.. जरा दिसतंय चांगलच तवा निघल पिक चांगलं समदी वरच्याच कृपा बघा..." सुदामा.

"हाई का बार खिश्यात जरा लावला असता... बस जरा वाईच काय हाय घरी तरी जाशील घटका भर बसून" पाटील.

हे ऐकताच सुदामाचा हात खिशाकडे गेला. बंडीतून हात घालुन चंची बाहेर काढली आणि तंबाखुला चुना चोळायला लागला..

"कसा हाय पाटील आपली काळजी वरच्यालाच असते बघा... आता हेच बघा ना मागल्या वर्षी पाऊल लैच कमी पडला. कापसाला उतार कमी आला.. त्यापाई पैका बी हातात कमीच पडला... जवारी तर घरी खाया पुरतीच आली मंग घरी काय ठेवायची आणी इकायची काय.. त्यात मुलीच लगीन झालं... लै परेशान झालो बघा... कर्जाचा बी लै तगादा लागला होता. पण देवाच्या कृपेने औंदा सगळ ठीकठाक झालाया... " सुदामा.

"कसं हाय सुदामा आपुन आपल्या परीने कष्ट केले ना की वरचा बराबर फळा देतुया तवा काळीजी नकोस करु तो आहेच आपल्या सोबत." पाटील पिचकारी टाकत म्हणाले.

"येतो पाटील घरी माणुस वाट पाहत असेल.. भाकरी घेऊन परत रानात जायच हाय."

"बरं ये बोलु नंतर.."

सुदामा आखरावरुन घराच्या दिशेला निघाला.. घरी आल्या आल्या त्याने अंघोळ करुन देवकी समोर जेवणाची परात घेऊन बसला. देवकीने कालवण आणि भाकरी परातीत ओतुन बोलु लागली..

"काय हो औंदा खोती द्यायची का जवारी काढायला.. पोरगी बी नाय हाताखाली आपल्या आणि म्हयच्यान नाई व्हायची काढन जवारी समदी.."

"बघू की थोडासा हाय येळ अजुन आपल्याकडं आत्ता तर कुठ हुरडा संपत आलाय... होळी झाली की लागू कामाला आपन. कालवण लै झक्कास झालया बरका.. संतु कुठ दिसना झाला त्यो कुठ खपलाय?"

"अहो त्यो गण्याकडं गेलाया कुठल तरी पुस्तक विसरा हाय म्हणे कसल तरी"..

"चल भाकरी बांध लवकर जातू जरा लवकर रानात पाणी बी द्यायच ऊसाला आधीच तर लाईट नसती आता हाय तर टाईम नग घालवायला"

हे सगळ सांगायच्या आधीच देवकीने भाकरीच गाठूडं बांधुन तयार केले होते. सुदाम्याने बैल गाडी जुंपुन रानात निघाला होता.. सोबत रेडीओ घ्यायला विसरला नाही.. तेवढाच काम करताना विरंगुळा म्हणुन.. दुसरं काही लागत नसलं तरी बिड केंद्र तर हमखास लागायचा आणि विविध भारतीवर ५ वाजता बातम्याही ऐकायला मिळायच्या...

अरं ये नवन्या एक गाय छाप घे बरं, संपत आलीया पुडी... जाता जाता नवनाथच्या टपरीवरुन गायछाप घेऊन खिशात कोंबत रानात जायला तो सज्ज झाला होता.. जाताना तो सगळ्यांचे राम राम घेतच होता.. रानात गेल्यावर बैलाला पाणी पाजुन त्याने आंब्याच्या झाडाखाली सोडले...सोडता सोडता एक नजर त्याने झाडाला लागलेल्या कैर्याकडे टाकली...अजुन छोट्याच होत्या...तरी पण त्याला बरं वाटलं...

चला मोटर चालू करुन पाणी दाऱ्यात सोडून द्यावं आणि निवांत पडावं थोडावेळ असा विचार करुन त्याने तंबाखू तोंडात टाकला आणि स्टार्टरच बटन दाबलं.. दार धरुन आल्यावर त्याने रेडीओ चालू करुन आंब्याच्या झाडाखाली अंग टाकुन दिलं...

त्याला जाग आली ते रेडिओवरच्या बातम्यांच्या आवाजाने..

"आजच्या ठळक बातम्या....."

"मलेशिया वरुन बिजींगला जाणारे विमान अचानक गायब.. अपघाताची शक्यता"

"मोदींचा आज महाराष्ट्र दौरा... आज पुण्यात"

"लोकसभेच्या निवडणुक तारखा जाहीर....."

"पश्चिम महाराष्ट्रात गारापीटीची धुमाकुळ"

हे ऐकुन सुदामाच्या काळजात धस्सं झालं.. डोक्यात विचारांचं काहुर माजलं.. आपल्याकडे गारपीट झाली तर हातातोंडाशी आलेला घास निघून जायचा आणि सगळे स्वप्न जागीच विरुन जायचे. अश्या विचारतच तो वर आभाळाकडे बघू लागला. तसा अंदाजच तर काहीच दिसत नव्हता, पण तो घाबरला होता हे खरं. संध्याकाळ झाली तसा तो घराकडे परतण्यासाठी निघाला. घरी आल्यावर त्याने देवकीला ऐकलेली बातमी सांगितली तसे तिला पण धस्सं झालं पण तिचा देवावर फार विश्वास होता.

"अवं असं काई म्हणू नगा सा काई व्हणार नाई.. त्यो आहे ना त्यालाच काळजी हाय आपली. त्याला काय कळत न्हाई का आपण आपल्या पोटच्या पोरासारखं जपलया आपला पिकाला ते."

"बघू काय होतंय ते त्यालाच काळजी.."

जेवण झाल्यावर देवकीने चुल सारवुन झोपण्याच्या तयारीला लागली. तेवढ्यात वारं सुटलं. सुदामाच्या आभाळाकडे पाहील तर ढग दाटून आले होते आणि तासाभरातच वादळ सुरु होऊन पावसाला सुरुवात झाली होती. घरावरचे पत्रे वरच्या दगडाला जुमानत नव्हते. तेही तग न धरता शेजाऱ्याच्या परसात जाऊन पडले होते.

छप्पर राहीलंच नव्हतं, आहे ते सामान आवरण्याच्या मागे सुदामा आणि देवकी लागले होते. तेवढ्यात गारा पडू लागल्या. बैलांना गारांचा मारा सहन नव्हता. ते जिवाच्या आकांताने ओरडत होते. सुदामा त्यांना सोडायला धावला. त्यांना सोडून येईपर्यंत स्वंयपाक घरात भाजीचे डालगे, पिठाचे डबे परसाच्या मार्गावर लागले होते. त्यांना वाचवणे शक्य नव्हते. सगळा संसार सोडून सुदामा त्याच्या बायका पोरांना घेऊन मारोतीच्या मंदीराकडे पळाला होता. कारण आसरा तिथेच मिळणे शक्य होते. मंदिरात पोहचल्यावर मंद दिवाच्या प्रकाशात मारुतीची मुर्ती त्याच्याकडे पाहुन हसत असल्याचा भास सुदामाला झाला होता.

रात्रभर.... रात्रभर पावसाचा थैमान चालू होता. वरुन आभाळ सुदामाच्या स्वपणांवर पाणी फिरवत होता आणि त्याचा निचरा सुदामाच्या आणि देवकीच्या डोळ्यातून होत होता.

पहाटे पहाटे पाऊस थांबल्यावर त्याने आधी बायकोला घेऊन घराकडे गेला. घराची अवस्था तर पहाण्यासारखीच नव्हती. एक पत्तरही जाग्यावर नव्हतं. सगळाच्यासगळाच संसार वाहून गेल्यासारखा झाला होता. बैलही बाभळीच्या झाडाखाली आसरा घेऊन उभे होते.

"देवके एक काम कर आता हे सगळं आवर. पाटलाकडुन किलोभर जवारी घेऊन ये आणि भाकरी कर मी रानातुन चक्कर मारुन येतो, बघतो काही उरलं आहे का ते." भरलेल्या डोळ्याने तो निघाला होता. बैलांना शेतात न्यायचा काही संबधच नव्हता कारण त्यांना आधी दवाखान्यात घेऊन जाणे गरजेचे होते. गारांमुळे त्यांच्या अंगावर जखमा झाल्या होत्या.

सुदामा शेताच्या बांधावर उभा राहून आपल्या स्वप्नांची माती झालेली बघत होता. एकाही कणसाची मान वर नव्हती, सगळे मातीते झोपून गेले होते. मातीत गारांचा थर साचला होता. आंब्याचा झाडाला एकही कैरीच काय, पानही शिल्लक राहील नव्हतं. उभा उस पार आडवा झाला होता. बैलांपुढे टाकायला एक वाढगही शिल्ल्क राहील नव्हतं. हे सगळं बघून सुदामाच्या पायातील त्राण निघून गेले होते. डोकं धरुन खाली बसायचंसुध्दा त्याला समजत नव्हतं.

दुसऱ्या बांधावरुन पाटलांनी हाक मारली.

"अरं ए सुदामा काय झालं रे हे.... सगळंच गेलं की रं काहीचं उरलं नाही कसं व्हायचं रं आता. "

"मालक काईच समजत नाय बघा" हे अस बोलून सुदामा लहान मुलासारख रडत होता.

चार दिवस.... चार दिवस सलग गारांच थैमान चालू होतं. होतं नव्हतं ते सगळंच गेलं होतं. दरम्यान त्याने बातम्यात ऐकल होत की सरकार पंचानामा करुन नुकसान भरपाई देणार होतं. पण त्यासाठीही आचारसंहीता होती म्हणुन काहीच तातडीचे आदेश निघत नव्हते.

"उद्यापासुन महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु होणार आहेत."

दुसऱ्या दिवशी तलाठी गावात आला. सरपंचाच्या म्हणण्यानुसार तलाठीने ठरवले की समिती येईपर्यंत कमीत कमी रानातुन एक चक्कर मारुन यावं म्हणजे अंदाज तरी कळेल की किती नुकसान झाल आहे ते. सुदामा ग्रामपंचायतीत हजर होताच सगळ्यांच्या मतानुसार सगळ्यांनी सुदामाच्या रानात जायच ठरवलं.

तलाठ्याने बांधावरुनच नजर फिरवली. असं वाटत होतं की तिथे जवारी नसुन फक्त चिखलच होता. तलाठी आणि सरपंचात काहीतरी कानगोष्टी झाल्या. सुदामाला काहीच कळलं नाही काय चालु आहे ते.. पण... संध्याकाळी सरंपच घरी आले.

चहा पाणी झाल्यावर सरपंच सुदामाला म्हणाले, "सुदामा मी बोललो तलाठ्याशी पंचनाम्यासाठी तो पैसे मागत आहे आणि तो ऐकत पण नाहीये रे, म्हणतोय की समिती येणार हाय तर ते बी पैसे मागतात म्हणजे त्याच्याशिवाय पंचनामा होणार नाही म्हणे."

"किती मागतोया पैसे ???" सुदामा अगतिकपणे विचारत होता..

"५००० रुपये तरी लागतील म्हणत होता." सरपंच

"पर मालक कुठून आणायचे पैसे येवढे, आमी गरीब माणसं, तुम्ही बघतच हैसा ना की सगळंच वाहुन गेलंया. बैलाला बी दवाखान्यात न्यायला पैसे नाहीत."

"अरं ते बरोबर आहे रे पण मी तरी काय करु सांग. त्यो ऐकतच नाहीये आता काय, वाटलं तर उद्या बोलून बघ ऐकलं तर तुझं, मला निरोप द्यायला सांगितला होता मी दिला. माझं काम संपलया आता."

हे ऐकुन सुदामाच्या पायाखालची जमीन सरकली. सरपंच निघून गेल्यावर सुदामाला काहीच समजत नव्हतं काय करायच ते. तो सरळ पाटलाकडे गेला.

"पाटील तुम्हीच सांगा काय करायचं ते, त्यो तलाठी पैसे मागत आहे हो पंचानामा करण्यासाठी. अवो कुठून आणू पैसे आता त्याला द्यायला ?? सगळंच वाहून गेलया. आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर हाय तुम्हाला तर सगळं माहीती हाय.. मुलीच्या लग्नात सगळं साचवलेल गेलं हो मालक आणि आता ह्यावर्षी पाऊसपाणी चांगलं झालं होतं म्हणून ऊस बी लावला होता. ते बी बँकेच कर्ज काढून, पर सगळंच गेलं हो पाटील काय करु. बायकोला बी काही आनता नाही आलं. पोराची फी भरायचीया, नाय भरली तर पोरग एक वरीस मागं पडल आणि मला त्याला मोठेपणी माझ्यासारखं नाय करायचं कर्जबाजारी. आता नाही शिकलं तर कधी शिकल त्यो ???? बैल बी अंगान सुलजेत हो गाराचा मार खाऊन खाऊन. त्यांचे बी हाड दुखत असतील, त्यांच्या जखमा बी चिघळल्यात पन औषध आनाया एक रुपया बी नायं. आता त्यांना तोंड नाही म्हणून बोलता येत नाही हो, पर आपल्याला कळतयाना त्यांच दुखणं. घर बी नाही ऱ्हायलं, ते बी पडून गेलया. ते कधी दुरुस्त करु आणि माझा संसार कधी लावू ????" सुदाम्याच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं.

हे सगळं ऐकून पाटलांच्या डोळ्यात बी पाणी आलं होतं, पण ते तरी काय करणार होते. सरपंच होताच तसा. त्यांना माहीती होतं की तो तलाठ्यासोबत सगळ्या योजनांचे पैसे खातो म्हणून आणि पाटलांना हे पण माहीत होत की तक्रार करुनही काही होणार नव्हतं कारण तहसीलदारालाही हप्ता जात होता. हे सगळं असंच चालू होतं कित्येक वर्षांपासुन.

"सुदामा काय करावं तुझं सांग आता ते मला बी पैसे मागत होते, मलाच समजत नाहीये काय कराव ते. तक्रार करुनही काही उपयोग होनार नाहीये. समितीला येऊ देत बघू काय होतय ते."

दोन दिवासांनी समिती आली. ठरल्याप्रमाणे पंचनामे सुरु झाले.

"काय रे किती लांब आहे शेत तुझं??" तुक्याला विचारलं. "जी जवळच हाय चला की बांधावर जाऊन बघू" तुक्या.

"त्याची गरज नाहीये सांग रानात काय काय होतं? "

"जवरी आणी करडी" तुक्या.

"काय हो तलाठी साहेब खरंय का हे??"

"हो ७/१२ वर नोंद आहे" तलाठी

"किती उरलं पीक तुझं"

"सगळंच गेलया साहेब काहीच राहील नाहीये" तुक्या

"ठीक आहे. परतावा किती द्यायलास ??? "

"म्हणजे ??" तुक्या

"कळत नाही का रे तुला, तुझ्या मायला सांग पैसे कधी देतो ते."

"मालक नाही हो काहीच नाहीये काही तरी करा."

"चल रे उठ रे. तलाठी १०% नुकसान टाका"

"चल रे सुदामा बोल किती नुकसान झालंय ??"

"मालक बैलाला कडबा बी नाय उरला हो टाकायला."

"पैसे आणलेस का? "

"नाई ओ मालक काहीच उरल नाही सरकारी मदत मिळाली तर काही तरी होईल न्हायतर विष घ्यायला पैसे न्हाईत"

"सगळ्यांच तेच हाल हायेत सुदामा. माझ्याच रानात काय उरलं न्हाई मग मी कसं करु सांग मला बी पैसे पाहीजेत ना पुढच्या वर्षी शेती करायला. तुम्हाला काय सरकार देईल भरपाई आमचं काय ? आम्हाला ते बी मिळायचं नाही कारण आम्ही तलाठी ना ? आम्हाला पगार मिळतो. साले सगळ्या भरपाया तुम्हाला आम्हाला काही मिळायला नको का ?? पैसे देत असशील तर बोल नाही तर काहीच मिळणार नाही सरकारकडून. आम्ही नोंद करणार नाही."

"अवो मालक असं नका हो करु काही तरी दया करा. वाटलं तर जे पैसे येतील त्यातले काढून घ्या, पर असा अन्याव नका करु."

"चल रे उठये इथून, काही होणार नाहीये."

त्रासून गेलेला सुदामा घरी आला तो काहीतरी ठरवूनच. देवकीने भाकऱ्या थापून ठेवल्या होत्या. रागारागात जेवण करुन दोघही झोपी गेले.

दुसर्‍या दिवशी सकाळी पेपरला बातमी होती.

'राज्यात गारपीटीचा पहिला बळी गेला.'


Rate this content
Log in

More marathi story from kishor karanjkar