फरपट
फरपट
जया, एक चुणचुणीत व देखणी मुलगी. एकुलती एक असल्याने लाडात वाढलेली. घरची परिस्थिती बेताचीच. तरीही आई-वडील तिचे संपूर्ण लाड पुरवायचे. बालपण अगदी मजेत चाललं होतं. अवखळ, हसतमुख व सुंदर, सर्वांना हवीहवीशी वाटणारी जया आता दहावीत आली होती. शिकून खूप मोठं व्हायचं स्वप्न त्या दिवशी भंगल होतं, जेंव्हा दहावीची परीक्षा संपताच आई-वडिलांनी जयासाठी स्थळं शोधायला सुरुवात केली. ग्रामीण संस्कृतीच्या प्रभावाचा फटका तिलाही बसला होता. सुरेशचे स्थळ तिच्यासाठी सांगून आलं. साधाच पण थाटात विवाह सोहळा पार पडला. पुरेसं जग समजायच्या आतच संसाराची जबाबदारी तिच्या खांद्यावर आली. ती सुरेशसह अतिशय आनंदाने राहत होती. तिच्या संसारात कशाचीही कमतरता नव्हती. उभयतांच्या प्रेम वेलीवर सुजाता नावाची एक कळी उमलली.
जया व सुरेश यांच्या सहजीवनाचा प्रवास अत्यंत आनंदात व समाधानाने चालत होता. त्यातच सुरेशला नोकरीत बढती मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. नोकरीच्या निमित्ताने सुरेशचं बाहेर राहणं वाढू लागलं. त्यातच त्याला दारुचं व्यसन लागू लागलं. सुरूवातीला अधुनमधून असणाऱ्या व्यसनाने त्याला कधी आपलसं केलं हे कळलंही नाही. सुरेश आता घरी येताना घेऊनच येऊ लागला. अशातच जयाला पुन्हा दिवस गेले व सुजय ला तिनं जन्म दिला.
नवरा दिवसभर घराबाहेर, रात्री उशिरापर्यंत घरी यायचा. स्वत:चं भान नसलेला सुरेश घरात येताच मारहाण, शिवीगाळ करायचा. दोन्ही मुलं भेदरलेल्या नजरेनं सारं पाहत होते. घरात अन्नाचा कणही नसायचा. त्यावरून रोज दोघांचं भांडण चालायचं. शेवटी उशीत तोंड लपवून रडत रडत उपाशीपोटी दोन्ही लेकरांना पोटाशी धरून ती झोपायची, पुन्हा येणाऱ्या उद्याच्या तमाशाला सामोरं जायला.
दिवसेंदिवस सुरेशचं व्यसन वाढतच होतं. दारू बरोबरच तो जुगारही खेळू लागला. पगाराचा पैसा पुरत नव्हता. तिकडे हृदयविकाराच्या धक्क्याने जयाच्या वडीलांचा घात केला. तिचं माहेरघर उध्वस्त झालं. माहेरचा आधार संपला. हतबल आई शिवाय आपलं म्हणायला तिच्याकडे कुणी उरलं नव्हतं. एवढ्यावरच तिची परवड संपली नव्हती. तिच्या नवऱ्याने तिच्या नकळत दोन खोलीच्या घराचा सौदा केला व देणी चुकती केली पण दैना पाठ सोडायला तयार नव्हती.
एक दिवस अचानक सुरेश चक्कर येऊन पडला. धावपळीत जयाने दवाखाना गाठला. त्याला दुर्धर आजाराने ग्रासल्याचे निदान झाले. तो आता काही दिवसांचाच सोबती आहे हे तिला माहीत होते तरीही ती पतीच्या उपचारात तडजोड करायला तयार नव्हती. ओळखीच्या लोकांकडून उसणे पैसे घेऊन उपचार सुरू होते. हळूहळू कर्जाचा बोजा वाढत होता. लोकांच देणं कसं फेडायचं याचा विचार करण्यापुरता वेळ तिच्याकडे नव्हता. आजारी पतीची मनोभावे सेवा करीत होती. व्यसनाधीन पतीने सर्व नातेवाईकांशी संबंध तोडले होते. तिची आई सांत्वना शिवाय तिला काही देऊ शकत नव्हती. अशा प्रकारे वर्षभर दवाखाना करून सुरेश कर्जासह मुलांची सर्व जबाबदारी जयावर टाकून मोकळा झाला होता.
दोन तीन महिन्याचा कालावधी उलटला जयाचं दुःख हळूहळू हलकं होऊ लागलं. देणेदारांची रांग घरापुढे लागू लागली. जया दोन मुलांची आई असून वयाच्या तीशीतच वैधव्य आले. लोकांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. जगाच्या हावरट नजरेतून ती स्वत:ला सावरत धुणीभांडी करून गाडा हाकायचा विचार करू लागली. चार घरं धरली पण तिथेही तिला जगाची विषारी नजर चुकवता आली नाही. स्वत:ला सावरत कामं करणं म्हणजे तिच्यासाठी तारेवरची कसरत झाली होती. दिवसेंदिवस मुलांच्या गरजा वाढू लागल्या. अशातच एक देव माणूस भेटावा तसा आनंद तिला भेटला. जयाची दोन्ही मुलं चांगल्या वसतीगृहात ठेवून तिलाही आधार देण्याचा प्रस्ताव त्यानं जयापुढे ठेवला. तिचे सर्व कर्ज फेडण्याचा शब्द दिला होता. जयाच्या मनाने त्याचा स्वीकार केला पण पुन्हा सुरेशची पुनरावृत्ती झाली तर काय करावं? या प्रश्नाने तिचा मेंदू सून्न झाला. शेवटी तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तिने आनंदचा प्रस्थाव स्वीकारला. मुलांना वसतीगृहात ठेवून आनंद सोबत सहजीवनाची नव्याने सुरूवात करायचं ठरवलं. आनंदने सर्वच जवळपास लाखांची देणी चुकती केली. लग्नानंतर ते दोघे फिरायला दिल्लीला गेले होते. पाच-सहा दिवसांत ते लखनौला पोहोचले. तेथे एका आलीशान हॉटेलमध्ये आनंद तिला घेऊन गेला व तिच्या नकळत पाच लाख रुपयात तिचा सौदा करून त्याने जयाला विकलं होतं. जयाला काही कळायच्या आतच एका निर्जन ठिकाणी ठेवण्यात आलं. तिथे रोज स्रीयांचा बाजार भरायचा, बोली लागायची व देहाचे लचके तोडले जायचे. आता तिच्यापुढे फक्त अंधार होता. जयाची जयाबाई कधी झाली तिला समजलंही नाही. ती निर्भिडपणे वावरू लागली पण काळजातून मुलांची ओढ लागली होती. मालकाच्या परवानगीने तिच्या कमाईतून काही हिस्सा मुलांना पाठवण्याची व्यवस्था केली. स्वत:ला विकून तिनं मुलांचं शिक्षण चालू ठेवलं.
मुलं शिकून मोठी झाली होती. दोघांनाही नोकरी मिळाली. इकडे जयाबाई लखनौच्या बाजारात राहू लागली. सुजय नोकरीच्या निमित्ताने लखनौला गेला तेंव्हा त्याला अचानक आजपर्यंत केवळ पत्रातून भेटणारी त्याची आई दिसली. तो धावत जाऊन तिला बिलगला. तिनेही त्याला ओळखले. ओळख द्यावी की नाही म्हणून क्षणभर थबकली पण तिच्यातली आई तिला स्वस्थ बसू देत नव्हती. हंबरडा फोडून ती सुजयच्या गळ्यात पडून रडत होती. थोड्याच वेळात स्वत:ला सावरत त्याने आईला राहण्याची व नोकरीची विचारपूस करायला सुरुवात केली. ती त्याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नव्हती. उडत उडत आईविषयी कळलेली हकीकत त्याला खरी वाटू लागली. त्याच्या मनात आईबद्दल घृणा निर्माण झाली.
घरी परत आल्यावर सुजयने सुजाताला सर्व हकीकत सांगितली. तिच्या मनात एकदा आईला भेटायची इच्छा जागृत झाली. ताईच्या हट्टापायी दोघेही अचानक लखनौला आईला भेटायला गेले. तिथले दृश्य पाहून दोघेही मान खाली घालून उभे राहिले. जया बाईने त्यांना बैठकीतून आतल्या खोलीत नेले. तिघेही एकमेकांना पाहून गहिवरून आले होते. ते एकमेकांच्या गळ्यात पडून रडत होते. पुढच्याच क्षणी सुजय बाजूला सरकत परत जाण्यासाठी तयार झाला. सुजाताने आईचा निरोप घेतला. दोघेही तेथून बाहेर पडले ते पुन्हा कधीही परत न येण्यासाठी. सुजय मुंबईला तर सुजाता नागपूर ला निघून गेली. पुन्हा एकदा त्यांच्या नशिबी एकाकी जीवन जगण्याची वेळ आली होती.
या सर्व गोष्टींचा विचार केला तर नक्की चुक कुणाची? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. जयाच्या आयुष्यात झालेल्या उलथापालथीस नक्की कोण जबाबदार होते? परंपरेच्या नावाखाली लहान वयातच तिचे लग्न करून देणारे आई-वडील, सातजन्म सोबत राहण्याचं वचन देणारा सुरेश, पतीच्या निधनानंतर वासनांध नजरेने पाहणारा समाज, आशेचा नवा किरण घेऊन आलेला आनंद, सुजय, सुजाता की फक्त तिचं नशिब............ ? नक्की चुक कुणाची हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे........ !!!