पांढरी चादर
पांढरी चादर
"ऐ आई ! निघतो गं. उशीर झाला आहे. बस मिळाली म्हणजे मिळविले."
असं म्हणत नीरज मित्राच्या बाईकवर बसून निघाला. बसस्टॉप येण्या अगोदरच त्याला त्याची बस दिसली. बाईक वरून उतरत, त्याने मित्राला बाय केले आणि चालत्या बस मधे बसला. मित्र ओरडला.
" अरे ! बाईक वरून अचानक कुठे गायब झालास?"
नीरजला आॉफीस च्या कामाने एका प्रोजेक्ट साठी कालपेटा(केरळ) ला पोचायचे होते. ह्या प्रोजेक्ट नंतर त्याचे प्रमोशन होणार हे नक्की होते.बस मधे बसल्यावर त्याने शेजारी बसलेल्या प्रवाश्याकडे बघितले. पण तो पांढरी चादर तोंडावर ,अंगभर गुंडाळून झोपला होता. नीरज ने बस मधे एक नजर टाकली सगळेच पांढऱ्या चादरी लपेटून झोपले होते.
कंडक्टर तिकिट द्यायला त्याच्याजवळ आला " तिकिट" हा आवाज ऐकून पैसे काढता काढता त्याने कंडक्टर कडे बघितलं आणि अभावित पणे तोंडातून निघालं "मंदार?"
कंडक्टर ने हसून नीरज कडे बघितलं. आणि नीरज चकरवला आता आपण मंदारला कसं बघू शकतो? आलेल्या विचारांना त्याने परतवून लावलं. कंडक्टर ने तिकीट देऊन, त्याला ही पांढरी चादर देऊ केली, पण त्याने नाही म्हणून सांगितले. थोड्याच वेळात तो झोपलाही. मधेच त्याची झोप उघडली, आणि तो दचकला कारण त्याच्या जवळचा प्रवाशी त्याच्या कडे बघत होता, पांढरा फटक निर्जीव चेहरा,डोळ्यांच्या खळग्यात दोन निखारे ज्यातून धूर येत होता. हे पाहून नीरज घाबरून जोरात ओरडला. कचकन् ब्रेक दाबत ड्रायव्हर ने बस थांबवली. "काय झालं" म्हणत कंडक्टर आला. नीरजने शेजारी बोट दाखवले आणि बघितलं तर तिथे एक साधारणच माणूस बसलेला दिसला. "स्वप्न बघितलं वाटतं" म्हणत कंडक्टर परतताना मागे वळून म्हणाला "साहेब पांढरी चादर लवकर घेतलीत तर बरं" असं म्हणत पुढे गेला,आणि बस सुरु झाली.
किती तरी वेळ नीरज बैचैन होता. त्याचा भुतांवर वगैरे मुळीच विश्वास नव्हता, पण त्याने जे पाहिले ते स्वप्न होते ते मानायला ही त्याचे मन तयार नव्हते..
त्या विचारां मधेच त्याला कधी झोप लागली ते त्याचे त्याला ही कळले नाही.
मध्यरात्री कंडक्टर ने नीरजला उठवले.
"उठा कालपेटा आलं"
नीरजला आश्चर्य वाटलं.
"इतक्यात? अहो सकाळी येतं ना कालपेटा.?"
"आम्ही शार्टकट ने आलो. उठा आणि उतरा."
नीरज खांद्याला बॅग टांगत उतरला. बाहेर मिट्ट काळोख पसरला होता. एक नजर समोर टाकत, तो मागे वळला तर बस दिसलीच नाही.
"अरे! क्षणार्धात बस कुठे गेली ?" त्याच्या मनात आले.
तो अंधारात चाचपडत होता . मोबाईल काढून टार्च चालू करावी म्हटली तर ती चालू होईना. बाहेर थंडी ही जाणवायला लागली होती. अचानक कोणीतरी त्याच्या जवळून गेलं असं नीरजला वाटलं. पण डोळे फाडून बघितल्यावर फक्त एक पांढरा ठिपका पुढे सरकताना दिसला. तो थोडा दचकला. पण मान झटकून तो पुढे चालण्याचा प्रयत्न करु लागला. चालताना त्याला खूप प्रयत्न करुन चालावं लागतं आहे असं वाटतं होतं. असं काय होतं आहे त्याला कळेना. बहुतेक झोपे मुळे होत असावं हा विचार त्याच्या मनात आला.
तितक्यात त्याला एक चहाची टपरी दिसली. नीरजला वाटलं ह्या अंधारात आणि विचित्र ठिकाणी चहाची टपरी? कदाचित् ह्या टपरीवाल्या कडून आपल्याला एखाद्या हाॅटेल चा पत्ता मिळेल म्हणून, आणि चहा प्यायला म्हणून तो त्या टपरी वर गेला. तो चहावाला ही पांढरी चादर लपेटून होता नीरज ने चहा मागितला. चहावाल्याने न बोलता त्याच्या हातात कप ठेवला. आणि नीरजला दरदरून घाम फुटला. कारण त्याचा हात म्हणजे फक्त सापळा होता. घाबरलेल्या नीरजच्या हातून कप खाली पडला. पण त्या चहावाल्याने चांगला मोठ्ठा हात वाढवून तो झेलला. त्याचा तो सापळा हात आणि तो ही इतका लांब? हे पाहून नीरज बराच घाबरला आणि ह्या सगळ्या पासून लांब जाण्यासाठी तो धावू लागला. पण परत त्या चहावाल्याने हात वाढवून त्याची काॅलर धरली. थंड हाताच्या अति थंड स्पर्शाने नीरजचे त्राण गेल्या सारखे झालं. त्याने चारीकडे नजर टाकताच त्याच्या लक्षात आले कि ही जागा खूपच विचित्र आहे. तिथे वस्ती तर नव्हतीच त्या उलट नुसती वाळकी झाडं, खड्डाचे रस्ते,आणि वटवाघुळांच्या पंखांची सळसळ हेच दिसत होते.
इथे आपण बहुतेक भयंकर आणि वेगळ्याच जगातील प्राण्या बरोबर अडकलो ह्याची जाणीव नीरजला व्हायला लागली.आता इथून बाहेर कसे निघायचे हा विचार तो करु लागला.तितक्यात चहावाल्याने विचारले
" साहेब! हॉटेल शोधत आहांत ना?"
ह्याला हे कसे कळलं? त्याचे नीरजला आश्र्चर्य वाटले. नीरजने नुसती मान हलवली.
"चला" म्हणत तो पुढे चालू लागला.नीरजने मागच्या मागे पळण्याचा प्रयत्न केला, पण त्याच थंड हाताने त्याला धरले होते. आणि फक्त हात वळवून. नीरज आता बिनासायास त्याच्या मागे चालत होता. एक प्रकारची लाचारी त्याला जाणवत होती. थोडं चालल्यावर त्या चहा वाल्याने बोटाने एक इमारत दाखविली आणि तो मागे वळला आता नीरजचे लक्ष त्याच्या पायाकडे गेले.फक्त हाडं असलेली पावलं उलटी होती.
नीरजला आठवू लागले लहान पणी सगळे म्हणायचे भुतांची पावलं उलटी असतात.तेंव्हा हसू यायचे आणि तो उलटी पावलं कशी असतील हे करुन बघायचा.
त्या चहावाल्या ( भुता) ने दाखवलेल्या इमारतीत आपण शिरायचे नाही. हा विचार त्याच्या मनात यायचाच अवकाश,जोरदार वाऱ्याने त्याला त्या इमारतीत ढकलले. समोर त्याला एका टेबला भोवती चार लोकं पत्ते खेळताना दिसले. त्यांच्या भोवती ही पांढऱ्या चादरी वेढलेल्या होत्या. उजेड फक्त टेबलावर पडत असल्याने, त्यांचे चेहरे नीरजला दिसत नव्हते. नीरज नाइलाजाने पण थरथरतच उभा होता. आणि एकदम त्या चौघांचे चेहरे दिसले आणि हसणं ऐकू आलं. तेच पांढरे चेहरे, आणि डोळ्यांच्या खाचां मधे धूर निघणारे निखारे. तो किंचाळतच बाहेर निघण्यासाठी वळला आणि कोणाला तरी धडकला. बघितलं तर तो बस कंडक्टर. नीरजला थोडा धीर आला.
" अहो! कुठे सोडलंत मला. काय भयंकर जागा आहे? मला वाचवा हो. हात जोडतो. पाया पडतो"
म्हणत नीरज अक्षरश: त्याच्या पायावर वाकला.त्याने नीरजला धरून उभं केलं आणि नीरजला जाणवला स्पर्शातला थंडपणा. समोर बघितलं तर तोच निर्जीव पांढरा फटक चेहरा आणि डोळ्यांच्या खाचां मधले धूर निघणारे निखारे.
" काय नीरज हा प्रोजेक्ट मिळाला कि तुझे प्रमोशन नक्की ना? आठवलं का काही. माझं प्रमोशन? ते झालं असतं तर माझं लग्न नैनाशी झालं असतं. पण नैनाने तुला नकार देऊन माला स्वीकारलं हे तू सहन करु शकला नाही. आणि असंच प्रोजेक्टवर निघाल्यावर तू काय अमानुष कृत्य केलं होतं ते आठवतं ना? मग आता तू तुझ्या कर्माची फळं भोगायला तयार ह़ो.आता मी तुझं प्रमोशन होऊ देणार नाही. आता तू ही पांढरी चादर पांघर आणि आमच्यात ये. तुला ती बस दिसणं,त्यात तू चढणं , कंडक्टर म्हणून मी दिसणं हे सगळं तुला आमच्यात यायचं आहे हे सुचवत होतं. कां बरं ती बस तुझ्या मित्राला दिसली नाही? विचार कर? जितक्या लवकर तू ही चादर पांघरशील तितके तुझे त्रास कमी होतील आणि ही चादर ज्याची त्यानेच पांघरावी लागते. दुसऱ्याने पांघरवून चालत नाही. आता तरी घे."
आता नीरज एका अनामिक शक्ति च्या आधीन झाला होता. फक्त त्याला मित्राने विचारले हे वाक्य आठवतं होतं.
"अरे! तू बाईक वरुन अचानक कुठे गायब झाला?"
ह्या वाक्याचा संदर्भ आता लागत होता. मागे केलेल्या अपराधाची जाणीव व्हायला खूप उशीर झाला होता.
तो हतबल झाला होता. अदृश्य शक्तिने त्याचा ताबा घेतला होता. हात वाढवून त्याने ती पांढरी चादर घेतली. पछाडल्या सारखाच तो झाला होता. त्याने ती चादर पांघरली
त्याचे रक्त शोषले जात होते,कातडे जळत होते डोळे फुटून निखारे भरत होते .नीरज जिवाच्या आकांताने ओरडत होता. त्यांच्या चारीकडे पांढऱ्या चादरी नाचत अट्टाहास करित होत्या.

