माझ्या आठवणी
माझ्या आठवणी
प्रिय सोनू,
जुन्या गोष्टींची आठवण करून देत आहे. तुला ही आठवत असतीलच हो की नाही.
अगं सोनू ऐक ना
आम्ही नाही जा.
तू परत कट्टी झाली. कां? मी माझ्या डब्यातली लोणच्याची फोड तुलाच देणार होते पण मधेच वृंदाने हिसकवली तर मी काय करु? पण मी खार तर तुला दिला होता ना,आणि खार आणि तेल लागलेला पोळीचा तुकडा पण तर दिला होता. हो की नाही मग कशाला रागवतेस? हस ना ? दोन बोटं काढून बट्टी कर. बट्टी? हं आता बरं वाटलं.
ही गंमत आठवते का आपली ? आणि ती लिमलेटच्या गोळीची?
"बघू तुझ्या हातात काय आहे? अई्याsss लिमलेटची गोळी . ए स्कर्ट मधे ठेऊन तोंडाने अर्धी अर्धी कर ना? चिमणीच्या दाताने गं. हंsss आता कशी मस्त अंबट्ट गोड लागते ना. मज्जा आली .
आठवतं का गं तुला हे सगळं. मला खूप आठवतं. आताच्या आपल्या पोरांना हे काहीच उपभोगता येत नाही. हो की नाही गं? अर्थात त्यांचे खेळ, त्यांचं जग थोडं वेगळं असू शकतं ना?
ए सोनू तो दिवस आठवतो का गं ? तो गं, ज्यादिवशी प्रदीपच्या डब्यातला खाऊ कोणी तरी गपचुप खाल्ला होता आणि तो रडत रडत बाईं कडे गेला होता. बाईंनी वर्गात सगळ्यांना विचारलं होतं
"कोणी खाल्ला ते मुकाट्याने सांगा बघू"
पण कोणीच बोलेना तेंव्हा काय म्हणल्या होत्या ना त्या? की
"आता मी सगळ्यांना तांदूळ खायला देणार आणि ज्याने तो खाऊ खाल्ला असेल त्याच्या तोंडातून रक्त येणार ."
सगळेच किती घाबरले होते ना? मला तर रडायलाच आलं. असं वाटलं समजा त्या तांदूळांचं काही चुकलं तर ? तर माझ्या तोंडातून तर रक्त नाही ना येणार ? मग मी कसं पटवून देणार की " विद्या शप्पथ" मी खाऊ नाही खाल्ला. किती भीति वाटत होती पण बरं झालं अंजली ने कबूल केलं की तिने खाऊ खाल्ला म्हणून. आणि त्या तांदुळा पासून वाचलो आपण. हो बाई रागवल्या अंजलीला हे पण आठवतं आहे.
ते साखळी साखळी खेळणं, घसरगुंडी वरून घसरून घसरून कपडे फाटणं मग आईचं रागे भरणं. काचा पाणी खेळताना झालेली भांडा भांडी किती रागवली होती एकदा तू मंदावर. जवळपास दोन दिवस तुम्ही बोलला नाहीत, आणि मलाच रडायला येत होतं. तू आपली परत परत मला गप्प रहा म्हणायची.
शाळेच्या वार्षिक उत्सवासाठी केलेला तो नाच.
"नाग पंचमीच्या सणी
नागपंचमीच्या सणी
उठा उठा साऱ्या जणी
हरपली तगमग"
ह्या गाण्यावर आपण आपला बसवला होता तो नाच. डाव्या तळहातावर उजव्या हाताचे कोपर टेकवून नाग बनवायचा आणि पाच बोटं दाखवायची म्हणजे झालं. नागपंचमी.
आता खुळेपणा वाटतो पण आपण तेंव्हा त्यासाठी किती तालिमी घ्यायचो ना?
आणि हो नवरस मधे मला, रौद्र रसासाठी, शंकराच्या तांडव नृत्यासाठी निवडलं होतं तेंव्हा सगळ्या माझ्यावर हसल्या होत्या.
" तुला उघडं यावं लागेल स्टेज वर" म्हणून पण तूच फक्त माझ्या बाजूने होतीस. आणि जेंव्हा ते नृत्य सगळ्यांना अतिशय आवडले आणि कौतुक झालं तेंव्हा माझ्या पेक्षा तूच आनंदली होती.
एकदा बाईंनी त्या किशोरला विचारलं होतं
" काय रे? वार्षिक उत्सवात तू एखादं गाणं म्हणणार का?"
आणि त्याने लगेच हो म्हणत भिंतीशी उभं राहून एक पाय जमीनीवर आणि दुसरा पाय मुडपून भिंतीवर टेकवत,
" ये मेरा प्रेमपत्र पढकर के तुम नाराज मत होना" हे गाणं म्हणायला सुरुवात करताच,
" अरे वेड्या ही असली गाणी म्हणून मार खायचा आहे? ये इकडे" म्हणताच त्याचे ते ओशाळणं आणि आपले फिदीफिदी हसणे. आठवतंय ना?
अरे हो! एक आणखी न विसरण्यासारखी आठवण.
आपल्याला शास्त्री बाईंनी काही प्रश्नं दिले आणि न बघता लिहायला सांगितलं. त्यांना मुख्याध्यापिकां कडून बोलवणं आलं म्हणून त्या गेल्या आणि आपण वह्यां मधे बघून तर लिहिलंच पण पटापट डबे उघडून ते ही फस्त केले. त्या वर्गात आल्या बरोबर साळसूदपणाचा आव आणला खरा पण त्यांना सगळं कळलं होतं आणि त्यांनी रागवून विचारताच आपण एक बरोबर
"नाही बाई आम्ही काहीच केलं नाही." असं समवेत स्वरात म्हणालो होतो.
त्या जाम रागवल्या होत्या
" लोणच्याचा वास कसा पसरला वर्गात?"
हे विचारताच सगळ्याच घाबरलो होतो. त्यांनी
"मी ह्या पुढे तुम्हाला शिकवणार नाही." हे म्हणताच कोणीतरी आनंदाने,
"खरंच?" असं उद्गारलं आणि मग बाकीच्या तोंडावर हात ठेवून हसल्या. मग तर त्या तडक वर्गा बाहेर निघून गेल्या होत्या. आपण किती त्यांची मनधरणी केली तेंव्हा कुठे सगळं सुरळीत चालू झालं.
आपण किती उनाडपणा केला ते विसरण़ अशक्य.
एकदा मी आई बरोबर हळदीकुंकवाला गेले असता तिथे तारे बाई भेटल्या. त्यांना कोणीतरी विचारलं
" अगं तुझे केस किती गळले गं. कशामुळे?"
त्यांनीही माझ्याकडे बोट दाखवत सांगितलं,
"ह्या मुली आहेत ना उपद्व्यावी? त्यांची मी वर्ग शिक्षिका त्याचे हे फळ मिळाले आहे."
मला तर खूपच लाज वाटली आणि घरी येऊन आईची बोलणी खावी लागली ती वेगळी.
तुला खरं सांगते मला गणिताची खूप भिती वाटायची. आठवीत गणितात मला शंभरा पैकी नव्याणनऊ नंबर मिळाले तेंव्हा सगळे मला गणित घ्यायला मागे लागले पण मी सरळ नकार दिला. प्राणीविज्ञान हा विषय नको कारण एकदा मी प्रयोग शाळेत गेले असता तिथे बेडकाला टाचण्यांने टोचून बेशुद्ध करून त्यावर ओणवं होऊन मुली काहीतरी बघत होत्या आणि मला ते मुळीच आवडलं नाही.
रसायनशास्त्राचे प्रयोग करताना, येणाऱ्या वासांनी मला मळमळायचं. एकंदरीत काय? मी आपली कला शाखे कडेच वळले ते तुझ्या पासून लपून राहिले नाही आणि तू ही माझ्या बरोबर तिथे आलीच.
किती मस्त दिवस होते ते. पण हळूहळू आपण मोठे होत गेलो आणि ह्या सगळ्याला पारखे झालो.
आता तू म्हणशील आज कां गं तुला हे सगळं आठवलं ? तर त्याचं कारण ही खूप मजेशीर आहे. आज कपाट आवरत असताना मला जुने फोटो सापडले गं आणि त्यांना स्पर्श करताना, तुम्हा सगळ्यांना मिठी मारल्या सारखं वाटलं आणि मी शाळेच्या गोड गोड आठवणींत गेले मग हे पत्र लिहिण्याचे सुचले.
पण किती छान वाटलं ना हे सगळं आठवून.
अच्छा चल आता थांबते. इतर कामं करते चल बाssय
तुझीच
मोनू
