ओढ
ओढ
"केदार , मला वाटतं पियूला नकळतपणे या सगळ्याचा ताण येत असेल. म्हणजे ही तिचीच कल्पना होती. पण अजून लहान आहे रे ती. "
केदार जवळपास 15 दिवसांनी घरी आला होता. आम्ही नेहमीप्रमाणे कॉफी घेत अंगणात पाय-यांवर बसून बोलत होतो. मी खरोखरच अस्वस्थ होते . पियू अजून उठली नव्हती.
"हंऽऽऽऽ अनु, मला पण पटतंय तू म्हणतीयेस ते. मी बोलतो पियूशी. तिचा ऑडिओ ऐकून काल तो बच्चू शांत झाला खरा पण मला जरा ते सगळंच नको वाटतंय. पियूचं खेळण्याचं ,मज्जा करण्याचं वय आहे. तिचीच कल्पना होती हे खरंय पण अपेक्षेपेक्षा हे वाढत चाललंय. गणेशने आणून दिलेलं पत्र दाखव गं जरा"
मी केदारला प्रशांत नावाच्या पेशंटचं पत्र आणून दिलं. पियूने तिच्या फाईलमधे ते अगदी सांभाळून ठेवलं होतं. केदारने परत पत्र वाचलं आणि माझ्याकडे पाहिलं. त्याच्या चेहर्यावर एकाच वेळी अभिमान, कौतुक, पियुबद्दलची काळजी असं सगळंच दिसत होतं.
"बाबुडी, तू कधी आलास? आई, मला उठवलं का नाहीस. "
असं ओरडतच पियूने बाबाला हात पुढे करून व्हर्चुअली मिठी मारली. केदारनेही हात पुढे केले आणि व्हर्चुअली तिला जवळ घेतलं. मग दोघांचं लांबून शेकहँड करणं , एकमेकांकडे पाठ करून कंबर हलवणं आणि डोळे मिचकावत काय काय करतात ते सगळं झालं. मी डोक्याला हात लावत मान हलवली तशी दोघंही हसायला लागले.
" झालं तुमचं ? ओ बाई , दात घासलेत की तशाच आलायत? म्हणजे दूध आणते इथेच. तुम्ही काही आता आत येणार नाही इतक्यात"
"आईसाहेब, आम्ही सगळं आवरून आलो आहोत. आता दूध आणावं आमच्यासाठी"
नाक फुगवून पियू माझ्याकडे पहात खिदळत म्हणाली तशी मला पण हसू आलं.
"बाईसाहेब, आम्हालाही नाष्टा मिळाला असता तर आम्ही पण कृतकृत्य होऊ"
असं म्हणत केदारने मला मुजरा केला आणि दोघं परत हसायला लागते.
" कठीण आहे. बसा खिदळत. आणते दोघांना नाष्टा आणि दूध."
"बाबा, प्रशांतदादाच्या आईवडीलांना पोहोचलं नं रे पत्र? "
"हो पोचलं. गणेशने सांगितलं मला. आईला घरी सोडलंय त्याच्या पण अजून होम आयसोलेशनमधे आहेत त्या. वडील हॉस्पिटलमधे आहेत. पण पत्र मिळालं त्यांना. गणेशने त्याच्या आईला फोन लावून दिला होता . प्रशांत बोललाय त्यांच्याशी."
"मस्त. बाबा, प्रशांतदादाला घरी कधी सोडणार आहेत?"
"सोडतील दोन तीन दिवसात. बरी आहे त्याची तब्येत आता. पियू, मला काय वाटतंय आता तू थोडं हे सगळं दुर्लक्ष कर. तुझा ड्रॉइंगचा क्लास वगैरेवर लक्ष द्यावसं असं मला वाटतंय. पेशंटची काळजी घ्यायला आम्ही सगळे आहोत नं गं बाळा. नाहीतर तू आणि आई आजीकडे जाऊन येता का थोडे दिवस? मी पास काढून देतो तुम्हाला"
"का रे बाबा? तुला आवडत नाहीये का मी हे करतीये ते. आणि माझी ड्रॉइंगची प्रॅक्टीस मस्त चालू आहे. "
" अगं पियुड्या , आवडत नाहीये असं नाही पण तू कशाला ताण घेतेस या सगळ्याचा? तू लहान आहेस बाळा अजून. "
"मला खरंच ताण येत नाहीये बाबा. तुला सांगू का आई जेव्हा पेशंटच्या नातेवाईकांशी बोलत असते , त्यांना धीर देत असते , त्यांचं काऊन्सिलिंग करत असते तेव्हा मला आईबद्दल इतकं मस्त वाटतं. बाबा, माझी मैत्रीण आहे नं , अनुष्का रे , ती आणि तिची आई दोघी मिळून मास्क तयार करतात आणि फुकट देतात वेगवेगळ्या संस्थांना. अनुष्कासाठी तिच्या आईने एक छोटंसं सुईंग मशीन पण घेतलंय. "
" अगं हो पण आम्हाला दोघांना वाटतं की तू आता या सगळ्यापासून...."
"बाबा, ऐक नं, मला आवडतंय हे सगळं प्लीज . आणि तुला सांगू का त्या बच्चूला मी ऑडिओ पाठवला नं तेव्हा पण मला खूप छान वाटलं होतं. खरंच. आईला पण वाटतंय की हे अती होतंय पण मला काय वाटतं माहितीये? मी तुला थोडी मदत केली की मला असं वाटतं मी तुझ्याबरोबर आहे , मी तुझं बोट धरलंय आणि तुझ्याबरोबर काम करतेय. इतकं भारी वाटतं मला. "
हातात नाष्ट्याचा ट्रे धरून मी पियूचं बोलणं दारातूनच ऐकत होते. बाबा भेटत नाही या तिच्या घालमेलीवर पियूने तिचा मार्ग शोधून काढला होता. आम्ही दोघं काय बोलणार होतो यावर!
