STORYMIRROR

Mugdha Joshi

Romance Others

3  

Mugdha Joshi

Romance Others

नवी सुरुवात

नवी सुरुवात

7 mins
147

    यावर्षी खुप दिवसांनी सुमन दिवाळीच्या निमित्ताने तिच्या घरी आली होती. सुमन तशी चुटचुटीत सगळी कामे पटापटा करणारी, आईला घरात मदत करणे असो, आरवला (तिचा लहान भाऊ )गणितं सोडवायला मदत करणे असो, कायम तयार असायची. आजीची तर ती सगळ्यात लाडकी होती. आजीच्या पायाला मालिश करून देणे, औषधं देणे, पोथ्या वाचून दाखवणे अशी सगळी कामे सुमनकडेच असत. 

     पण आजीला सुमन यावेळी खूपच वेगेळी भासत होती. तिच्यामध्ये असणारा नेहमीचा सळसळता उत्साह कुठेतरी हरवला होता. ती थोडी चिडचिडी झाली होती. उशिराने उठायचं, मनात असलं तरच काम करायचं. दोन वर्षांपूर्वी सुमन ला एका IT फर्म मध्ये नोकरी लागली आणि ती बेंगलोर ला शिफ्ट झाली. आजीने तिला दोन तीन वेळा अडून अडून विचारण्याचा प्रयत्न केला पण तीला काही उत्तर मिळाले नाही. आजीने सुमनच्या आईलादेखील एकदा विचारून पहा असे सांगितले. काहीतरी ऑफिस च्या कामाचं टेन्शन असेल असं वाटून आईने पण काही विचारले नाही. 

    सुमनच्या घरात एक नियम होता, रात्रीची जेवणं उरकली की सर्वजण थोडावेळ का असेना पण एकत्र बसून गप्पा मारायचे. हा नियम आजीनेच बनवला होता. आजी या चौकोनी कुटुंबाचा कर्ण च होती जणू. सुमन चे बाबा सुमन ला म्हणाले, "या दिवाळी नंतर आम्ही तुझ्यासाठी वर संशोधन सुरु करणार आहे." यावर सुमन एकदम चिडली, "वासरू जरा मोठं झालं तर लगेच त्याला दाव्याला बांधायलाच हवं का?" असं म्हणून पाय आपटत ती आपल्या खोलीत निघून गेली. सुमनचे आई बाबा घाबरले.

        सुमन चं असं वागणं सर्वाना अनपेक्षित होतं आणि खटकणारं सुध्दा. रविवारी सकाळी सुमन बेंगलोर ला निघणार होती. त्याआधी घरातल्या सगळ्यांना सुमनच्या बदललेल्या वागण्याचं कारण जाणून घ्यायचे होते. शनिवारी रात्री आजी तिच्या खोलीत आली आणि म्हणाली, "बाळा माझं एक काम करशील काय गं? "सुमन ने विचारलं, "काय? " आजी म्हणाली "तुला आठवतंय का गं, तु लहान होतीस तेव्हा मी बरेचदा माझी जपमाळ कुठेतरी विसरायचे. माझी नात मला ती शोधून द्यायची. तीच माझी नात कुठे तरी हरवली आहे. तुला भेटली तर तिला म्हणावं की तिच्या आजीला तिची खूप आठवण येते." आजीचं हे वाक्य ऐकून सुमन ओक्सा बोक्शी रडायला लागली. सुमनचं रडण ऐकुन तिच्या खोलीबाहेर उभी असलेली आई पटकन आत आली. बाबा आत येणार एवढ्यात आजीने त्यांना बाहेरच राहण्यासाठी खूण केली. आजीने सुमन ला विचारलं, "बाळा काय झालय? " सुमन रडतच होती. "काय झालंय जरा नीट सांगशील का? "आईने विचारले. सुमन सांगू लागली. "जेव्हा मला नवीन नोकरी लागली तेव्हा मी खूप खूष होते. नवीन नोकरी, नवीन शहर सगळं नवीन. मी जॉईन झाल्यावर पुढचे काही महिने अगदी छान गेले. ऑफिस मध्ये ट्रेनिंग होतं त्यामुळे कॉर्पोरेट लाईफ असलं तरीही कॉलेज सारखंच भासत होतं. ट्रेनिंग संपल्यावर आम्ही एका बॅच मधले सगळे वेगवेगळी कडे गेलो. काहीजण पुणे, मुंबई, चेन्नई ला शिफ्ट झाले. मला मिळालेला प्रोजेक्ट बेंगलोर मधेच होता म्हणून मी तिथेच राहिले. ट्रेनिंग संपलं तरीही आम्ही सर्व बॅचमेट्स संपर्कात होतो. नवीन प्रोजेक्ट मधले सगळे लोक माझ्या पेक्षा खूप जास्त अनुभव असलेले होते. आमच्या पूर्ण प्रोजेक्ट मध्ये खूपजण असले तरी आमच्या टीम मध्ये मी एकटीच मुलगी होते. टीम मधले सगळे जण खूप मदत करणारे होते. पण ते कामाव्यतिरिक काहीच बोलायचे नाहीत. पहिल्या पहिल्यांदा आम्ही ट्रेनिंग चे बॅचमेट्स एकत्र जेवायचो. पण आता प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त होते. प्रत्येकाच्या प्रोजेक्ट कॉल च्या वेळा जुळत नसत. त्यामुळं हळू हळू सर्वजण वेगळे होत गेले. आता मला एकटीला जेवावं लागत होतं. ऑफिस मधून हॉस्टेल वर आल्यावर सुध्दा हॉस्टेल च्या रूममेट्स फोनवर असायच्या. त्यांचे फोन कधी कधी रात्र रात्र चालायचे. माझा घरी फोन झाला की उरलेला वेळ मला खायला उठायचा. मग मी जास्त झोपून राहायला लागले. हळू हळू माझ्या ऍक्टिव्हिटी कमी व्हायला लागल्या. शनिवार, रविवारची दोन दिवसाची सुट्टी भली मोठी वाटायची. मग मी जास्तीत जास्त वेळ सोशल मीडिया वापरायला लागले. त्यात वेळ घालवायचा प्रयत्न करायला लागले. मित्र मैत्रिणी शोधायला लागले. आणि असाच एके दिवशी मला प्रतिक भेटला." "कोण प्रतीक? तू प्रेमात वैगरे पडली नाहीस ना? काही चुकीचं केलं नाहीस ना?" तोंडाला पदर लावून भरल्या डोळ्यांनी सुमनच्या आईने विचारलं. "अगं आई नाही गं, पण तो मला आवडायला लागला होता. एके दिवशी प्रतीक जहागीरदार नावाच्या मुलाने मला friend request पाठवली. त्या मुलाचा प्रोफाइल फोटो पाहिला तर त्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं. मग मला आठवलं की तो मला आमच्या ऑफिस च्या बिल्डिंग च्या लिफ्ट मध्ये दिसायचा. एक दोन वेळा मला उशीर झाला असताना त्याने माझ्यासाठी लिफ्ट थांबवली होती. तो त्या बिल्डिंग च्या दुसऱ्या मजल्यावर उतरायचा आणि मी तिसऱ्या. का माहिती नाही पण मी त्याची friend request स्वीकारली. आम्ही chatting वर बोलायला लागलो. तरीही अजून प्रत्यक्ष बोलणं होत नव्हतं. बरेचदा ऑफिस कॅन्टीन मध्ये, लिफ्ट मध्ये आमची नजरानजर व्हायची. नंतर आम्ही एकत्र जेऊ लागलो. तो मूळचा नागपूरचा होता. त्याची फॅमिली नागपूरला रहात होती. आणि तो दोन वर्षासाठी बेंगलोर ला आला होता. आम्ही एकत्र कॉफी प्यायला लागलो. मग हळू हळू आमचे वीकेंड्स पण एकत्र जाऊ लागले. मग मॉल मध्ये भेटणं, एकत्र डिनर करणे या गोष्टी सुरु झाल्या. तो खूप छान होता. त्याला फिरायला फार आवडत होतं. नागपूरचा असूनही पुणेरी मराठी बोलायचा. आम्ही एकत्र मूवी पाहायचो. एकत्र क्रिकेट पाहायचो क्रिकेटच्या कितीतरी गोष्टी त्याने मला न वैतागता समजावून सांगीतल्या. त्यादिवशी माझा वाढदिवस होता. मी त्यादिवशी त्याला तुमची ओळख करून देणार होते. रात्री 12 वाजता फोन करून त्याने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यादिवशी तो मला लिफ्ट मध्ये दिसला नाही. मी मनात खूप खुश होते, आज तो मला प्रपोज करेल असं मला वाटत होतं. दुपारी लंच च्या वेळी पण तो मला भेटला नाही मी अस्वस्थ झाले .तेवढयात फोन वर मेसेज आला रात्री 8:30 वाजता cafe murgan see you soon.


 "मी खास तयार होऊन कॅफे वर गेले. तो तिथे आधीच आलेला होता. मी त्याच्याकडे पाहतच राहिले. हलक्या गुलाबी रंगाच्या शर्ट मध्ये तो अगदी राजबिंडा दिसत होता. मी त्याच्याकडे गेले, हलकेच हसून त्याने माझं स्वागत केलं आणि त्याच्या शेजारी बघून म्हणाला. "लतिका.. ही सुमन. माझी बेंगलोर मधली पहिली मैत्रीण." मी त्याच्याकडे पाहण्यात एवढी दंग झाले होते की, त्याच्या शेजारी बसलेल्या त्या मुलीकडे मी पाहिलेच नव्हते. "आणि ही लतिका माझी होणारी बायको". 

   सुमन खूप रडू लागली. आजी तिची समजूत काढत म्हणाली, "रडू नको बाळा, मग पुढे तू काय केलस?" "मी त्याच्याशी काहीही न बोलता तिथून निघून आले."

आता सुमनच्या बाबांना राहवेना ते म्हणाले "चल आताच्या आता त्या माणसाची पोलिसात तक्रार करूया." आजीने तिच्या बाबांना थांबवलं आणि सुमनला म्हणाली "त्याने तुला फसवलं का?" सुमन म्हणाली, "नाही ग आजी त्याने मला कधीच त्याच्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. पण त्याने कधीच मला सांगितलं नाही की त्याचं लग्न ठरलं आहे. मी माझ्याच कल्पनेत हरवले होते."

     इतक्यात सुमन चा फोन वाजला प्रतिकचाच फोन होता. सुमन म्हणाली "दररोज त्याचा यावेळी फोन येतो पण मी उचलत नाही. मला त्याच्याशी बोलायचं नाही. मी बेंगलोर ला जाणार नाही."

    घरातल्या सगळ्यांनी सुमन ची समजूत काढली आणि कशीबशी तिला झोपवली. दुसरे दिवशी सकाळी आजीने सुमन ला उठवलं आणि दोन दिवस रजा वाढवायला सांगितली आणि म्हणाली "चल माझ्याबरोबर." सुमन म्हणाली "कुठे? " आजीने उत्तर दिले, "पिकनिक ला. फक्त तू आणि मी."आजीने जाणून बुजून सुमन ला फोन घरीच ठेवायला सांगितला "जाता जाता आजीने सुमन च्या बाबांना काहीतरी सांगितले. सुमन आणि आजी एका तळ्याकाठी आल्या, चटई टाकून झाडाच्या सावलीमध्ये बसल्या. उन्हामुळे चमकणार पाणी खूप लोभस दिसत होतं. मध्येच येणारी वाऱ्याची झुळूक सुखावून जात होती. पण सुमनचं याकडे लक्षच नव्हतं. आजी सुमन ला म्हणाली "हे बघ सुमन ती मुंगी पाहिलीस." सुमन त्या मुंगीकडे पाहत होती. आजी म्हणाली "हे बघ ती त्या साखरेच्या दाण्याकडे येत आहे, मी तिचा रस्ता अडवते मग बघू ती काय करते?" आजीने 2-3 वेळा तिचा मुंगीचा रस्ता थांबवला ती मुंगी प्रयत्न करत राहिली आणि थोड्यावेळात ती दुसऱ्या दाण्याला शोधत दुसरीकडे गेली. आजी परत सुमन कडे पाहत म्हणाली, "आपल्याला जर एखादी गोष्ट मिळत नसेल तर ती मिळवण्याचा प्रयत्न जरूर करावा. पण ती मिळण्याचा अट्टहास करून आपलं आयुष्य पणाला लावायचं नसतं."

    सुमन ला आजीचं म्हणणं पटतं. ती थोडी रिलॅक्स होऊन संध्याकाळी घरी परतली. घरी परत आल्यावर सुमनचे बाबा आजीला म्हणाले. "मी प्रतीक ला फोन करून सगळं दणकावुन विचारलं. पण त्याच्या बोलण्यात सुमन विषयी काळजी दिसली. एवढंच नाही ती मुलगी लतिका पण माझ्याशी बोलली. दोघेही सुज्ञ वाटले. आज रात्री पण प्रतीक सुमन ला फोन करणार आहे. फक्त सुमन त्याच्याशी बोलली म्हणजे एक विषय संपेल. "आजी म्हणाली, "बोलेल" याची मला खात्री आहे. आजीने म्हटल्याप्रमाणे सुमन ने प्रतीक चा फोन उचलला, " सुमन, मी कायम तूला एक मैत्रीण म्हणून पाहिलं. तुझ्या मनात माझ्या बद्दल अशा भावना आहेत असं मला कधीच जाणवलं नाही. तरीही माझ्यामुळे तूला जो मानसिक त्रास झाला त्याबद्दल मला माफ कर." त्याला जोडून लतिका पण सुमन ला म्हणाली, "मीच प्रतीक ला सांगितलं होतं की जोवर घरचे मान्य करत नाहीत तोवर कोणाला सांगू नकोस. जर त्याने तुला माझ्याबद्दल आधीच सांगितलं असतं तर असा पेच झाला नसता. I am really very sorry." प्रतीक म्हणाला, "You deserve someone better than me".  

   तिने प्रतीक ला मोठ्या मनाने माफ केलं आणि स्वतःनेही त्याची माफी मागितली. सुमनचं मन आता खूप हलकं झालं.तिने आयुष्याला नव्याने सुरुवात केली. आता तिच्यातला उत्साह परत दिसायला लागला. आरव ने आणि सुमन ने मिळून वीकएंड ला करण्यासाठी म्हणून खूप मोठी लिस्ट काढली त्यात सुमनचे सगळे छंद होते. खूप साऱ्या पुस्तकांची लिस्ट होती. बेंगलोर जवळचे पिकनिक स्पॉट्स शोधले आणि तीन महिन्यातून एकदा आई बाबा बेंगलोर ला जाणार, एकदा आजी आणि आरव जाणार आणि सहा महिन्यातून सुमन घरी येणार असं ठरलं. 

    सुमन खूष होती. ऑफिस करून तिने आपले सगळे छंद जोपासले. यावेळी जेव्हा ती घरी आली तेव्हा ती स्वतः बाबांना म्हणाली, "बाबा मी लग्नासाठी तयार आहे. तुम्ही वर संशोधन सुरु करा." आजी डोळेभरून सुमन कडे पाहत होती. तिच्या डोक्यावरून हात फिरवत आजी म्हणाली "आज मला माझी नात परत मिळाली."


आजच्या धकाधकीच्या जीवनात अशा कितीतरी सुमन आपलं घर सोडून दुसऱ्या शहरांत राहत आहेत. ज्या मुलांचं बालपण सुखवस्तू असतं त्यांना आयुष्यात येणारा नकार कसा पचवायचा हे समजत नाही. मग असे बरेच नकार प्रमोशन, नोकरी, रिलेशनशिप इत्यादिंच्या बाबतीत त्यांना निराशेच्या गर्तेत जायला भाग पाडतात. याचे परिणाम खूप आयुष्य उध्वस्त करणारे असतात. अशा वेळी आपल्या भावना वेळीच व्यक्त करणं खूप गरजेचं असतं. प्रत्येक सुमनला अशी मनकवडी आजी मिळतेच असं नाही. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Romance